Friday, December 31, 2010

२०१० जाता जाता...

सरत्या वर्षाला निरोप द्यायला आणि नववर्षाचे स्वागत करायला कारवारला देवबाग बीचवर आलोय. २०१० ची सुरूवात स्कंधगिरीवरुन सूर्योदय पाहून केली होती त्यामुळे २०१० चा शेवट सूर्यास्ताने. बाकी यंदा जास्त फिरणे झाले नाही म्हणून आत्ता २०११ चा पहिला विकांत देवबाग आणि मुरुड़ेश्‍वर फिरून साजरा करणार. परतलो की पोस्ट लिहायचा विचार आहे पण ईग्रहांची महादशा अजुन संपली नसल्याने आजकाल ब्लॉगिंग पूर्णपणे थंडावले आहे. संकल्प सोडत नाही पण निदान २०११ मध्ये तरी लिखाण नियमीत सुरू व्हावे असे मनापासून वाटते. पाहू...

२०१० चा निरोप घेऊन मावळलेला सुर्यनारायण...



जाता जाता नवीन वर्षासाठी म्हांराजाकं गार्‍हानं घालतायं.

रे म्हांराजा !!!!!
बारा राटीच्या, बारा वहिवाटीच्या म्हांराजा !!!!! तुका आज गार्‍हाणं घालतायं रे म्हांराजा !!!

ह्या सरत्या साला बरोबर हे भ्रष्टचारी, त्यांचे घोटाले, महागाई पण नष्ट होऊदें...
व्हयं म्हांराजा !!!

लोकांच्या ईडा-पीडा त्यांच्या नवीन वर्षाच्या संकल्पाइतक्याच टिकूदें...
व्हयं म्हांराजा !!!

कांदाभजी परत रस्त्यावरच्या गाडीवर मिलूदें...
व्हयं म्हांराजा !!!

सगळ्यांका चांगली बुद्धी आणि आरोग्य लाभूदें...
व्हयं म्हांराजा !!!

आणि येता नवीन वर्ष सगळ्यांका सुखसमृद्धी आणि भरभराटीचो जावंदे...
व्हयं म्हांराजा !!!

Tuesday, September 21, 2010

ई ग्रहांची महादशा

गेले दीड वर्ष बी.एस्.एन्.एल्.चे इंटरनेट वापरतोय. आत्तापर्यंत सरकारी काम म्हणून कधी बी.एस्.एन्.एल्.चे कुठलेही कनेक्शन घेण्याच्या भानगडीत पडलो नव्हतो. एका शनिवारी सकाळी चहा प्यायला म्हणून बाहेर पडलेलो. चहा पिता पिता बी.एस्.एन्.एल्.ने रस्त्यावर लावलेला स्टॉल दिसला. बी.एस्.एन्.एल्.चा आधून मधून ग्राहक मेळावा भरतो आणि त्या दोन तीन दिवसांमध्ये फुकट सिम कार्ड, ज्यादा टॉक टाइम, बिना डीपॉझीट नवीन ब्रॉडबॅंड कनेक्शन वैगरे वैगरे स्किम असतात. मित्र म्हणाला अरे तसही डीपॉझीट वैगरे काही घेत नाही आहेत तर भर अर्ज. मग काय पत्ता लिहून आलो. मोडेम आणि फोन वैगरे माझ्याकडे होताच. त्यामुळे मला केवळ इंटरनेटचे बिल भरायला लागणार होते. मग आम्ही "आज अर्ज दिलाय, आत्ता हे येतील एक वर्षांनी" अश्या गप्पा मारत घरी आलो आणि विसरून पण गेलो. पण झालं भलतचं सोमवारी दुपारीच मोबाइल थरथरला.

मी: हॅलो
पलीकडून: साssssर, बी.एस्.एन्.एल्.कनेक्सन.
मी: हू ईज़ धिस?
पलीकडून: साssssर तमिल, तेलगू, कन्नडा?

आयला ह्यांच्यासाठी तमिल, तेलगू, कन्नडा झालं की थेट पाकिस्तान आणि नेपाळची बॉर्डर लागते. मध्ये बाकी कुणी नाहीच. मराठी सोडा राष्ट्रभाषा पण फाट्यावर?

मी: (मनात: हाड् रे) हिंदी हिंदी.
पलीकडून: साssssर बी.एस्.एन्.एल्. कनेक्सन होना ?
मी: हां हां मैने अप्लिकेशन किया था.
पलीकडून: हा करेक्ट साssssर.
मी: कब मिलेगा कनेक्शन?
पलीकडून: अब्बी.
मी: अभी? अभी तो मैं ऑफीस मे हूँ.
पलीकडून: आय यॅम इन फ्रंट ऑफ युवर हौस नो? कम नाऊ ओन्ली.

नशिबाने ऑफीस पाच मिनिटांच्या अंतरावर असल्याने मी त्याची नाऊ ऑर नेव्हर ऑफर स्वीकारून लगेच रूमवर पोहोचलो. पुढच्या दहा मिनिटात सगळं जोडून माणूस (पैसे न मागता) निघून गेला देखील. बी.एस्.एन्.एल्.चं असं सुसाट काम बघून माझा विश्वासच बसत नव्हता. ऑफीसच्या लोकांनाही ही गोष्ट पचनी पडली नाही. त्यातल्या काही बुजुर्ग लोकांनी "अरे आत्ता बघ रोज रोज डिसकनेक्ट झाल्याच्या तक्रारी करायला बी.एस्.एन्.एल्. ऑफीसच्या वार्‍या करायला लागतील" असा आशीर्वाद दिला. पण नाही. तो ते कनेक्शन जोडुन गेल्या पासून पुढची दीड वर्षे मी ती रूम बदले पर्यंत काडीचीही तक्रार नाही. केवळ वेळेवर बिल भरा आणि सेवेचा आनंद घ्या. बिलात देखील कधी चुकीचे रीडिंग नाही की भरमसाठ रक्कम नाही. ह्याच बी.एस्.एन्.एल्.च्या कृपेमुळे ब्लॉग देखील सुरू झाला. जमेल तसं लिखाणं झालं. बी.एस्.एन्.एल्.बद्दल असलेलं माझं मत पूर्ण बदललं होतं. प्राइवेट कनेक्शन वापरणार्‍या माझ्या एक दोन मित्रांना पण मी पुढच्या मेळाव्यावर लक्ष ठेवा आणि बी.एस्.एन्.एल्. चं ब्रॉड बॅंड घ्या असं सांगून ठेवलं.

सगळं कसं सुरळीत सुरू होतं. मे महिन्याची सुट्टी संपवून हापूस आंब्याचे फोटो ब्लॉगवर टाकले आणि जून अखेरीस ग्रह फिरले. नवीन जॉब जॉइन केला त्याच बरोबर आधीच्या मालकाने भाडेवाढ मागीतल्याने त्याच गल्लीत चार घरं सोडून नवीन रूमवर शिफ्ट देखील झालो. नवीन नोकरीत आणि नवीन जागेत इतर गोष्टी सुरळीत सुरू झाल्या मात्र माझ्या पत्रिकेतले ई-ग्रह मात्र बिघडले. त्यांची महादशा सुरू झाली. नवीन प्रॉजेक्टमध्ये बाहेरच्या सगळ्या साइट्स ब्लॉक. ब्लॉगिंग सोडा पर्सनल ई-मेल्सदेखील वाचता येईनात. म्हटलं नवीन रूम त्याच गल्लीत आहे बी.एस्.एन्.एल्. ब्रॉडबॅंड कनेक्शन पटकन जोडुन देतील. जुलैच्या पहिल्याच विकांताला जाऊन त्याबद्दल अर्ज देऊन आलो. म्हटलं नवीन कनेक्शन फटकन दिलं तर हे रिलोकेशन रातोरात करून टाकतील. पण नाही. ई-ग्रहसौख्य पूर्ण बिघडून गेलेलं होतं. पूर्ण आठवडा गेला तरी साधा फोन देखील नाही. शनिवारी बी.एस्.एन्.एल्. ऑफीसला चक्कर टाकून आलो तर संबंधित माणसे गायब. कुठे तरी मोठा लोचा झालेला तो सोडवात बसलेले. आत्ता माझं नवीन ऑफीस लांब गेल्याने सोमवार ते शुक्रवार काहीच करता येईना. दोन आठवड्यानंतर संबंधित माणूस भेटला एकदाचा. इथल्या प्रथेप्रमाणे त्याचंही नावं श्रीनिवास होतं. मी माझी शिफ्टिंगची वर्कऑर्डर त्याच्या पुढयात धरली. ती हातात धरून एखाद्या माणसाची पत्रिका पाहावी तशी पहात २-३ मिनिटे काहीतरी गूढ विचार करीत बसला. थोड्यावेळाने त्याने गंभीर शब्दात समस्या सांगितली

श्रीनिवास : "साssर, केबल नही है".
मी: क्या??? केबल नही?
श्रीनिवास : हा स्टोर रूम ने भी नही. आप अपना नंबर दो मुझे मैं आपको दो बजे कॉल कर के बताता हूँ.

मी आपला नंबर देऊन आलो पण पुन्हा आठवडा भर काहीच हालचाल नाही. साहेबांना फोन केला तर साहेब फोन उचलतील तर हराम. महिना होऊन गेला पण रूमवर ब्रॉडबॅंडचा काहीच पत्ता नाही. महिना अखेरीस बी.एस्.एन्.एल्.ने न वापरलेल्या इंटरनेटचे बिलमात्र नवीन पत्त्यावर पाठवून आपली तत्पर सेवा दाखवून दिली. त्याच्या पुढच्या शनिवारी ते बिल घेऊन बी.एस्.एन्.एल्.च्या ऑफीस मध्ये गेलो. म्हटलं इंटरनेटचा पत्ता नाही आणि हे बिल कुठून आले? तर म्हणतात कसे "ते तुम्ही इंजिनियरला विचारा. आम्ही फक्त बिलं बघतो." श्रीनिवासच्या थोबाडासमोर बिल नाचवलं तर त्याचं पुन्हा "साssर, केबल नही है". म्हटलं अरे महिना उलटून गेला तरी बी.एस्.एन्.एल्.कडे केबल नाही सांगताना लाज वाटतं नाही का? त्याच्यावर काही परिणाम दिसला नाही. मागच्यावेळीप्रमाणे "मैं आपको दो बजे कॉल कर के बताता हूँ" सांगून मला मार्गाला लावला. सर्वीस नसताना बिल कसं काय आलं हे विचारायला तिथल्या वरिष्ठ अधिकार्‍याकडे गेलो तर तो म्हणे "डोण्ट वरी साssर. वी विल कॅन्सल इट नो." कॅन्सल कसलं डोंबलाचं आधीच्या महिन्याची लेट फी मिळवून दर महिना बिल येतय. मध्यंतरी माझ्या बोलण्यातून हा विषय घरी बाबांना पण कळला होता. ते म्हणाले अरे दे १०० रुपये, करेल काम सटकन. मी म्हटलं त्याला हवे तर त्याने हात पसरून मागवेत. मी स्वत:हून देणार नाही. भीक हवी तर भीक मागण्यात लाज कसली? आणि मला असं दोन महिने पिळल्यानंतर आत्ता तर मी त्याला xxदेखील देणार नाही.

हळूहळू कामाच्या गडबडीत बी.एस्.एन्.एल्.चा नाद सोडून दिला. दरम्यान ह्या महादशेतून एक दोन ग्रह हटले आणि महिनाभरात मला दुसरा प्रॉजेक्ट मिळाला. आत्ताच्या ह्या प्रॉजेक्टमध्ये कुठलीही साइट ब्लॉक नाही. त्यामुळे ऑफीसमधून का होईना इंटरनेट वापरायला मिळतं. अधूनमधून बझता येतं. बी.एस्.एन्.एल्.कडून पुन्हा कनेक्शन मिळेलं ही अशा सोडली आहे तरी पण परवा पुन्हा सहजच त्यांची छेड काढायला गेलो. पाहतो तर श्रीनिवासकडे नेहमीप्रमाणे कुणीतरी आपले गार्‍हाणे घेऊन उभा होता आणि श्रीनिवास आपल्याकडच्या कागदावर काहीतरी लिहून घेत होता.

मी: क्या ये आप से अपना नंबर मांग रहे है?
पीडीत: हां
मी: इसने कहा की ये आप को दो बजे कॉल करेगा?

इतकं अचूक निदान ऐकल्यावर त्या पीडीत माणसाबरोबर श्रीनिवासनेदेखील चमकून वर पाहिले. मला पाहून तो काही बोलणार इतक्यात

मी: इसने बहूत लोगोंक को कहा है की ये दो बजे कॉल करेगा. क्या है ना इसे सिर्फ दो बजे फ्री कॉलिंग होता है. आज दो बजे तो आप का नंबर नाही लगने वाला क्यों की मैं पहलेसे लाइन मे हूं और मुझे दो महिने से कभी कॉल नही आया. अगर आप चाहते हो की ये आपको कॉल करे तो इसे ५० पैसा दे दो.

मग श्रीनिवासकडे वळून

मी: बराबर है ना? आपको आउट गोइंग ५० पैसा ही है ना?

त्याला काही बोलू न देता पुन्हा त्या पिडीताला उद्देशून

मी: चलो छोड दो. आप पुरा १ रुपया ही दे दो. पक्का कॉल आयेगा.

पुन्हा श्रीनिवासकडे वळून

मी: ठीक है ना?

ह्या दरम्यान श्रीनिवासच्या चेहर्‍यावर "हा आत्ता कुठून उपटला" पासून "क्या बात करते साssर", "हो", "नाही", "अबे चूप" असे सगळे भाव झरझर उमटत होते. माझा बोलण्याचा पवित्रा पाहून ह्या वेळी मी कनेक्शन कधी देताय हे विचारायला आलेलो नाही हे एव्हाना त्याच्या लक्षात आलं होतं. तरी पण काहीतरी सबळ आणि नवीन कारण देण्यासाठी त्याने तोंड उघडले.

श्रीनिवास: साssर, ऐसा नही है साssर. आप बोलते ऐसा क्या भी नाही होता.

मी मात्र माझ्या भलत्याच मुद्द्यावर ठाम.

मी: क्यों आप को दोपहर दो बजे फ्री कॉलिंग नही होता? तो कब होता है? आप तो सब को दो बजे हो बोलते हो.
श्रीनिवास: (त्रासून तरी पण शक्य तितक्या समजावणीच्या सुरात) नही साssर. क्या है ना पहले हमारे पास केबल नही था. अब केबल आया पर उस के लिये रास्ता खोदना पडता. मुन्सिपालटी उसका पर्मिसन नही देता.
मी: तो अब क्या? मैं क्या करू?
श्रीनिवास: क्या बी नही . जैसे ही काम होगा मैं आप को कॉल करूंगा.
मी: (जाता जाता) हा ठीक है, लेकिन बस दोपहर को दो बजे कॉल मत करना. क्या है दो बजे मैं थोडा ज्यादा बिज़ी रहता हूँ. आप कॉल करो. काम होते ही आप के कॉल का पैसा मैं आपको लौटा दूँगा.

एवढे बोलून अजुन काही आणा भाका न घेता मी तिकडून बाहेर सटकलो.

तर असं आहे. सध्या नवीन प्रॉजेक्टमध्ये काम पण खूप आहे त्यामुळे ऑफीसमध्येच जास्त वेळ जातो. ऑफीसच्या जवळच नवीन रूम पहावी म्हणतो त्यामुळे सध्यातरी नवीन कनेक्शन घ्यायचा विचार नाही. ऑफीसमध्ये वेळ मिळाला तशी ही पोस्ट टंकली. बी.एस्.एन्.एल्.बद्दल बोलायचं तर अपेक्षाभंग नक्की कधी झाला हे कळत नाही? अपेक्षा नसताना मिळालेल्या सेवेमुळे की त्यांनी आपली औकात दाखवून दिली तेंव्हा?

असो. आत्ता पाहू ई-महादशा कधी संपते आणि पुन्हा कधी घरून विकांताला मस्त लोडाला टेकून वाचन सुरू होतं. कोकणात असतो तर एखाद्या भगताकडून श्रीनिवासचे भूत उतरवले असते (की त्याच्या मानेवर बसवले असते?). सध्या तरी ह्या ईहलोकात असून ई-लोकात येण्याजाण्यावर काही निर्बंध आले आहेत हे नक्की.

Wednesday, August 25, 2010

श्रावण, शाकाहार आणि आम्ही

सोमवारी रत्नागिरीच्या भैरीचा (रत्नागिरीचे ग्रामदैवत श्री देव भैरी) श्रावणातला हरीनाम सप्ताह संपला आणि आज तब्बल दोन आठवड्यानी नॉनव्हेज खाल्ले. सतत उसळी, पालेभाज्या खाऊन पोटावर अमानुष अत्याचार झाले होते. श्रावण महिना म्हणजे आमच्यासारख्यांना काळ्या पाण्याची शिक्षा. आमच्या घरी रविवार, बुधवार आणि शुक्रवार हे मांसाहार करण्याचे तीन दिवस. त्यापैकी बुधवार, शुक्रवार आणि रविवार हे कसे एकदिवासाआड येतात. रविवारनंतर बुधवारची तब्बल दोन दिवस चातकाप्रमाणे वाट पाहाणारे आम्ही, आमच्यासाठी श्रावणाचा पूर्ण महिना पाळणे म्हणजे जिभेची आणि पोटाची काय अवस्था होत असेल बरे? लहानपणापासून घरची वडीलधारी माणसे (पक्षी: महिला वर्ग) घरातल्या सगळ्यांनी (म्हणजे मुख्यत: आम्ही लहान मुलांनी, कारण मोठी माणसे (पक्षी: पुरूष वर्ग) त्यांचे ऐकत नसत) श्रावण पाळावा असा आग्रह धरत असत. आपल्या मुलाबाळानां थोडेफार पुण्य लागावे असं त्यांना वाटायचे. पण श्रावण पाळण्यावरून ह्या दोन्ही वर्गाचे (आजतागायात) कधीही एकमत न झाल्याने आणि आम्हा मुलांचा पुरूषवर्गाला मूक आणि बिनशर्त पाठिंबा असल्याने ग्रामदेवतेचा हरीनाम सप्ताह संपेपर्यंत तरी शाकाहार करावा असा एक अघोषित कायदा आमच्याकडे पाळला जातो.

हरीनाम सप्ताहादरम्यान आठ दिवस देवळात अखंड भजन सुरू असते. आत्ता आमचे ग्राम दैवत भैरी म्हणजे शंकराचे एक रूप. त्यामुळे त्याचा सप्ताह श्रावणातल्या पहिल्या सोमवारी सुरू होऊन दुसर्‍या सोमवारी म्हणजे आठ दिवसांनी संपतो. त्यामुळे शाकाहाराचा हा अघोषित नियम केवळ सोमवार ते सोमवारच्या साप्ताहा दरम्यान पाळायचा की श्रावण महिना सुरू झाल्यापासून ते श्रावणातल्या दुसर्‍या सोमवारपर्यंत पाळावा ह्यावर आजही दुमत आहे. वर वर जरी हा प्रश्न अत्यंत साधा दिसत असला तरी खोलवर विचार करता तो गहन आहे. उदाहरणार्थ यंदा श्रावण मंगळवारी सुरू झाला म्हणजे श्रावणाचा पहिला सोमवार उजाडला तेंव्हा श्रावणातले पहिले ७ दिवस उलटून गेले होते. याचाच अर्थ आमच्या घरी बुधवार, शुक्रवार आणि रविवार हे तिन्ही हक्काचे दिवस फुकट गेले. म्हणजेच हरीनाम साप्ताहातले बुधवार, शुक्रवार आणि रविवार धरून एकूण दोन आठवडे शाकाहारी. याउलट श्रावण जर का सोमवारीच सुरू झाला तर मोजणी पहिल्या दिवसापासूनच सुरू होईल आणि एका आठवड्यात 'जन'जीवन पूर्व पदावर येईल. आत्ता ह्या विचार सरणीस आमचे आजोळ जबाबदार आहे कारण मामा मंडळी (स्त्रीवर्ग धरून बरं का) केवळ सोमवार ते सोमवार श्रावण पाळतात.

यंदा शाकाहाराचे दोन आठवडे पाहाता गटारी आमावस्येच्या (पुण्य?) दिवशी आमच्या मामामंडळीच्या पावलावर पाऊल ठेवून आपणही केवळ हरीनाम सप्ताहादरम्यान, म्हणजे सोमवार ते सोमवार श्रावण पाळावा असा प्रस्ताव संबंधित मंडळींनी मांडला होता परंतु तो प्रस्ताव गृहखात्याने गटारीच्या मटणाच्या उरलेल्या हाडकांबरोबर केराच्या टोपलीत टाकला. उलट यंदा तसेही दोन आठवडे श्रावण पाळता आहातच तर अजुन दोन आठवडे कळ काढा आणि गौरी विसर्जनानंतरच सगळे मिळून उपवास सोडू असा उलटा प्रस्ताव मांडण्यात आला. तो प्रस्ताव आज मासे खाऊन आम्ही Dustbin मध्ये (ऑफीसमध्ये असल्याने) टाकला हे सांगायलाच नको. असो पुढील वर्षी मामा मंडळीचा पाठिंबा घेऊन पुन्हा हा प्रस्ताव गृहखात्याकडे पाठवायचा मनसुबा आहे. मामा लोकं बिनशर्त पाठिंबा देतीलच पण तरी देखील त्यांच्याकडून अधिक जोर लागण्यासाठी पुढील आषाढात कोलंबी, पापलेट, सरंगा, बांगड्याच्या उपस्थितीत त्यांच्याशी पुन्हा एकदा बोलणी करून घेऊ म्हणतो. तूर्तास पुढील गटारीपर्यंत नियमीतपणे रविवार, बुधवार आणि शुक्रवारची वाट बघणे.

Monday, June 14, 2010

सुट्टी संपली!!!



तिकडे कोकणात मस्त पाऊस सुरू झालाय. मुलांच्या शाळा पण आजच सुरू झाल्या. शेतकरी नांगरणीच्या कामाला लागले आणि मी पण मानेवर जोत घेऊन कामाला जुंपून घ्यायला परत आलो. गेला महिनाभर ईमेल, प्रोजेक्ट, ब्लॉग, बझ्झ सोडाच पण कंप्यूटरचा पण थोबाड बघितलं नाही. नुसतं उठा, फर्माईशी करा, आंबे चोखा, कोंबडी, बोकड, कुर्ल्या, कालव्, एक शिंपी, मासे .... हाणा आणि पुन्हा ताणून द्या. पोट भरलं की झोपा आणि भूक लागली की उठा असा साधा सोपा मार्ग होता. आणखी खूप काही लिहायचे आहे पण आत्ता पुर्वी सारखी सवय नाही राहिली. चार ओळी लिहून दमलो... गेल्या महिन्याभरात जे काय चार फोटो मारले ते पहा आणि गोड मानून घ्या...



Friday, April 30, 2010

फसलेली खादडी

आजपर्यंत बर्‍याच खादडिच्या पोस्ट वाचल्या आणि तोंडाला पाणी सुटलं. किती ही निषेध नोंदवला गेला तरी तो निषेध म्हणजे प्रोत्साहन समजून जनतेने फोटोसकट खादडी महात्म्य सुरुच ठेवले. आज मी माझी खादडीची एक आठवण लिहितोय ज्यामुळे माझ्या तोंडाला पाणी सुटले नाही पण तोंडचे पाणी पळाले होते.

झालं काय तर अमेरिकेत असताना दर दुपारी जेवायला बाहेर जायचो. भारतातून गेलेले आम्ही दोघे, मी आणि चंद्रु, नेहमीच दुपारी बाहेर जायचो. दररोज टॅकोबेल, चिलीज्, पिझ्झाहट, बर्गर-किंग, चिपोटले, कधी चायनीज तर कधी जापनीज अश्या ठराविक ठिकाणी आलटून पालटून भेटी दिल्या जायच्या. शुक्रवारी ऑफीसचे इतर लोक देखील घरून लंचबॉक्स न आणता बाहेरच येत असतं. अश्याच एका शुक्रवारी आमच्या बरोबर आमच्या टीम मधले ३-४ अमेरिकन निघाले जेवायला. कुठे जायचं कुठे जायचं करता करता Joe's या इटालियन रेस्तोरंटला जायचे असे ठरले. तो पर्यंत मेक्सिकन, जापनीज चाखुन झालेच होते. आम्ही पण म्हटले चला आत्ता इटालियन होऊन जाऊ दे. Joe's ला गेलो. आत गेल्या गेल्या शोले स्टाइलमध्ये कितने आदमी है वैगरे विचारून झाल्यावर आम्ही सगळे मावू असे टेबल दिलं गेलं. मी, चंद्रु आणि टॉम असे तिघे बसलो. टॉम वेगन होता. हे वेगन लोकं म्हणजे नॉनव्हेज सोडाच पण दुधापासून बनलेले पदार्थ पण खात नाहीत. फक्त नैसर्गिकरित्या उपलब्ध असणारी घासपुस आणि त्यापासून बनणारे पदार्थ खातात म्हणे. इतर अमेरिकन जसे सकाळ संद्याकाळ कॉफीचा एक मोठा मग नाहीतर कोल्डड्रिंकचा टीन घेऊन फिरताना दिसायचे तिथे हा पठ्ठ्या केवळ पाणी प्यायचा. ऑफीसपार्टीला देखील डोनट सोडून कुठल्या चीज-बर्गर अश्या पदार्थांना देखील शिवायचा नाही. आधी टॉम वेगन आहे म्हणून हे सगळं खात नाही असं मला कळलं तेंव्हा वेगन म्हणजे काहीतरी रोग असावा असं मला वाटलं होतं पण वेगन हा रोग नसून तो डाएट आहे हे मला नंतर कुणीतरी सांगितलं. त्यात विकीपिडियावर वेगनबद्दल पहिल्या ओळीतच हा काय प्रकार आहे आणि मुख्य म्हणजे आपल्या पूर्णपणे विरुद्ध जीवनशैलीचा प्रकार आहे हे समजताच मी ते पेज बंद केलं. आपल्याला ज्या गावाला जायचंच नाही तिथला पत्ता कशाला शोधा... असो. तर असा हा टॉम (बिच्चारा!!! व्यर्थ ते जीवन) त्याच्या ह्या वेगन डाएटमुळे म्हणे त्याचे विमान प्रवासात हाल व्हायचे आणि ह्या एकाच कारणामुळे तो कधी अमेरिकेबाहेर गेला नव्हता.

तर मूळ मुद्दा असा की मला आणि चंद्रुला दोघांना ही काय ऑर्डर कारायचं काहीच माहीत नव्हतं. इतर वेळी रेस्तोरंटमध्ये जायच्या आधी आम्ही लिंडाला विचारून अमुक अमुक ठिकाणी काय मागायचं ते विचारून जायचो आणि हाणून यायचो. आज बरोबर टीममधली लोकं असल्याने आम्ही लिंडाला काही न विचारता आलेलो. त्यामुळे सहाजिकच टॉमला तूच आमच्यासाठी (काहीतरी नॉनव्हेज) ऑर्डर दे असं सांगितलं. त्याप्रमाणे टॉमने सगळ्यांसाठी ऑर्डर दिली. साधारण १५-२० मिनिटांनी तो वेटर एका प्लेटमध्ये पालापाचोळा आणि एका परडीमध्ये बरेचसे पाव घेऊन आला. ते बघून आम्ही आधी "ह्याने काय होणार" या अर्थी एकमेकांच्या तोंडाकडे बघितलं आणि टॉमला तू सगळ्यांसाठी एकच डिश ऑर्डर केलीस का? असे विचारले. नंतर आम्हाला कळले की इटालियन रेस्तोरंट मध्ये गेलं की हा घास पूस प्रकार येतोच. मग आम्ही आपले चीज लावून दोन दोन पाव आणि ती कोवळी पाने खाल्ली आणि उरलेली भूक मुख्य ऑर्डरसाठी राखून ठेवली. थोड्या वेळाने वेटर उरलेले पाव आणि आमच्या रिकाम्या डिश घेऊन गेला आणि दुसर्‍याने ऑर्डर प्रमाणे प्रत्येका समोर मेन मेनू आणून ठेवला. आमच्या दोघांसाठी टॉमने पास्ता ऑर्डर केला होता. चंद्रुसाठी पेन्ने रिगाते आणि माझ्यासाठी असच एक अगम्य नाव असलेली डिश. चंद्रुची डिश निदान दिसायला तरी देखणी आणि आकर्षक होती. टॉमच्या पुढयात मात्र मागाच्याच घासपूसप्रमाणेच पण जरा अधिक चांगली दिसणारी डिश होती. पण माझ्या पुढयातील प्रकार पाहण्यालायक देखील नव्हता. माझ्यासाठी टॉमने काहीतरी चिकनची डिश ऑर्डर केलेली. चरबी किंवा पातळ मऊ रबराचा शोभेल असा एक सेंटिमीटर जाडीचा कसलासा थर होता, तो चमच्याने भोसकला तर रक्त यावं तसा लाल लाल जरा जरा घट्ट असा (टोमॅटो??) सॉस बाहेर आला. आत चमच्याने ढोसून पाहिलं तर काही तुकडे असावेत असा अंदाज आला. बहुतेक तेच चिकन असावं. स्मगलिंग केल्यासारखं चिकन त्या अगम्य थराखाली लपवून ठेवलं होतं. रेस्तोरंटमध्ये शिरल्या पासून जो एक प्रकारचा आंबट वास येत होता तो त्या सॉसचाच होता ह्याची खात्री पटली. जसं दुसर्‍याची बायको चांगली दिसते (असं म्हणतात बुवा, आम्हासनी काय बी ठावं नाय) तसं मला दुसर्यांच्या पुढयातल्या डिश चांगल्या वाटू लागल्या. चंद्रुच्या डिशमध्ये पिवळ्या रंगाच्या रेघा-रेघांच्या एक दीड इंच लांबीच्या लांब नळ्या होत्या. त्या पण रबरीच दिसत होत्या. काही माणसे कशी स्वभाव कळण्या अगोदरच प्रथम दर्शनीच मनातून उतरतात तशीच माझ्या पुढयातील डिशदेखील चाखण्याआधीच माझ्या जिभेवरून उतरली होती. पहिल्या प्रथम मी तो थर फाडून बाहेर आलेला चमचा भर सॉस घेतला. जसजसा तो तोंडाजवळ नेत गेलो तसतसा त्याचा वास (दर्प) अधिकच जाणवला. जिभेवर ठेवताच डिश जशी दिसते तशीच आहे ह्याची खात्री पटली. मी चंद्रुकडे पाहिलं तर तो काट्या-चमच्यामध्ये त्या नळ्या पकडून गिळण्यात रमला होता. मला वाटलं नळ्या दिसतात त्या प्रमाणे चांगल्या असाव्या. टॉम नेहमीप्रमाणे प्रसन्न वदनाने वदनी केवळ पाला पाचोळा घेत होता. बहुतेक माझाच गेम झालाय असं मला वाटलं आणि मी पण माझं थोबाड् शक्य तितकं प्रसन्न ठेवत आणखी दोन चमचे ओरपले. गिळायला होईना. त्या सॉसचा वास तर नाकात घुमत होता. शेकडो मैल दूर असून देखील मला अचानक कोल्हापूर-रत्नागिरी बसमध्ये आंबा घाट लागल्यावर मुलं ओकली की जो वास येतो तो आठवला आणि अजुन कसतरीच झालं. मग पटकन पाण्याचा ग्लास तोंडाला लावून सॉस गिळला. मग म्हटलं चला काहीच नाही तर चिकनचे तुकडे हाणू म्हणून सॉसमध्ये चमच्याने शोधाशोध करून दोन तुकड्यामध्ये चमचा खुपसला आणि मोठ्या अपेक्षेने स्वाहा केले तर इथेही त्या तुकड्यानां लागलेला सॉस आपली चव पुन्हा उतरवून गेला. चिकन देखील चिकन नसून कसल्याश्या कंदमुळाचे उकडलेले तुकडे असावे असे वाटले. इथेही पचका. जिथे भरोश्याच्या चिकनने ऐनवेळी घात केला तिथे त्या रबरी थराकडून काडीची देखील अपेक्षा नव्हती आणि त्याने अपेक्षेप्रमाणे ती खरी केली. बहुतेक मैद्याचा थर असावा, मला तो घास गिळल्यावर आठवडाभर दररोज १-२ किमी धावलो तरच हा थर आपल्या पोटातून निघून जाईल असे वाटले. एखाद्या दिवशी सगळ्या गोष्टी तुमच्या विरुद्ध जातात (मुंबई इंडियन्स फाइनल हारल्यावर सच्चुपण असचं म्हणाला होता) तसा माझ्या आयुष्यातला तो दिवस होता.



चंद्रुदेखील आधी आवडीने खातो आहे असं मला वाटलेलं पण तो देखील जरा थंडावला होता. पण त्याने कसं बसं का होईना बर्‍याचश्या नळ्या घश्याखाली उतरवल्या होत्या. मी त्याच्याकडून स्फूर्ती घेऊन आपण पण डोळे मिटून गिळून टाकु म्हणून पुन्हा माझ्या डिशकडे वळलो आणि सॉस, चिकन, रबर असे जे काय मिळेल ते एकत्र चमच्यात उचललं आणि मुखी लावलं. म्हटलं एक एक डिश खाण्याची ठराविक पद्धत असते, हे सगळं एकत्र चांगलं लागत असेल. जशी म.रा.प.म.च्या बस स्टॅंडवर सगळे टाकाऊ पदार्थ एकत्र करून त्यावर रस्सा ओतला की कशी मिसळ बनते आणि समस्त जनता ती कशी आवडीने खाते. तिथेही जर एक एक टाकाऊ पदार्थ वेगळा खायला गेलं तर त्याला घंटादेखील चव नसते पण बाकीच्या टाकाऊ पदार्थंबरोबर कसं 'मिले सूर मेरा तुम्हारा तो सूर बने हमारा' होतं. म्हटलं तसं करून पाहू पण नाही. तिथे ही आधी सॉसचा वास, मग सॉसची चव आणि मग कंदमुळं अश्या क्रमाने पुन्हा सगळं पाण्याच्या घोटाबरोबर माझ्या पोटात गेलं. त्या रबराला रंग रूप सोडलं तर वास, चव आणि इतर काहीच गुणधर्म नव्हते. त्या क्षणी टॉमकडे पाहून मलादेखील आपण वेगन बनून पालापाचोळा खावा असे वाटून गेले. बहुतेक टॉमने लहानपणी हीच डिश खाल्ली असावी आणि त्या घटनेने त्याला आयुष्यभरासाठी वेगन डाएटची दीक्षा घेण्यास प्रवृत्त केले असावे.

एव्हाना आज उपाशी राहावं लागणार हे समजून चुकलं होतं. भूक तर काहीच भागलेली नव्हती. मनातून सारखं त्या वेटर ला बोलावून "अरे ते माघाचचे पाव घेऊन ये रे जरा" असे सांगावेसे वाटत होते. टॉमदेखील माझ्या डिशकडे "Sid didn't like it huh?" पाहून असं म्हणाला. मी कसबसा हसलो. कारण नाही नाही, मला आवडली, ठीक आहे असं काही म्हणणं शक्य नव्हतं. चार पाच चमचे सोडले तर ती डिश जशीच्या तशी होती. मी देखील प्रथमच असं अन्न टाकून उठनार होतो. पण काही इलाज नव्हता, मी माझ्या परीने प्रयत्न केला होता. वेटरने देखील पॅक करून देऊ का? असं विचारलं. मी नको म्हटलं आणि आम्ही बिल वैगरे भरून तीकडून बाहेर पडलो. ऑफीसला आल्यावर जवळची सगळी चिल्लर वेंडिंग मशीन मध्ये टाकून वेफर्स, कूकीज, चॉक लेट्स असं जे मिळेल ते खाल्लं आणि वरुन पाणी प्यायलो. त्या दिवसापासून संकटकाळी बाहेर पडण्याचा मार्ग म्हणून ऑफीसच्या बॅगेत मॅगीचं एक पॅकेट ठेवू लागलो. लिंडाला देखील माझा कसा पोपट झाला ते सांगितलं पण झालं भलतचं. तिला इटालियन खूप आवडायचं आणि ती आत्ता पुढच्या वेळी मी तुम्हाला घेऊन जाते असं म्हणाली. गेम झाला. लिंडाला नाही म्हणणं शक्य नव्हतं त्यामुळे पुन्हा आम्ही Joe'sच्या वारीला गेलो. ह्या वेळी मात्र भविष्यातली गुंतवणूक म्हणून मी आधीच ५-६ पाव आणि सगळा पाला पाचोळा साफ करून टाकला. मागच्या वेळी चंद्रु "इतक्या काही खास नसतात पण गिळण्यालायक असतात" असं म्हणाला होता म्हणून मी त्याच्या अनुभवावरून ह्या वेळी त्या पिवळ्या नळ्या ऑर्डर केल्या होत्या. त्याने सांगितल्या प्रमाणे त्या नळ्या गिळण्याइतपतच बर्‍या होत्या आणि ऑफीसमध्ये मॅगीचे पॅकेट असल्याने चिंता नव्हती. पण तेंव्हापासुन कानाला खडा लावला आणि पुन्हा कधी इटालियन रेस्तोरंटचं नाव देखील काढलं नाही.

तर ही होती माझ्या फ़सलेल्या खादडीची कहाणी.

(ता. क. भारतात परत येताना फ़्लाइटमध्ये एअरहोस्टेसने जेवणासाठी माझ्यापुढे पास्ता धरला त्याच वेळी माझ्या MP3 प्लेअरवर "भय इथले संपत नाही" हे गाणं सुरु झालं हा योगायोग असावा.)

Monday, March 29, 2010

एक क्षण मोहाचा

गेले काही महिने रोज सकाळी हा मोहाचा क्षण येतो. रोज रात्री झोपताना न चुकता सकाळी सहा साडे-सहाचा गजर लावतो. का तर सकाळी उठून जॉगिंगला जायचे. कमरेभोवती साइकलचा टायर झालाय. म्हटलं त्याची स्कूटर आणि नंतर सुमो किंवा ट्रॅक्टरच्या टायरपर्यंत पदोन्नती व्हायच्या आत काही हालचाल करायला हवी. कोंबडी-बोकडाच्या रूपाने कॅलरी नित्यनेमाने शरीरात प्रवेश करत असतात आणि वर आम्ही निर्लजपणे दिवसभर कचेरित क्लिकक्लिकाट करीत बसलेले. त्यात शुक्रवार हा चिकन बिर्याणी आणि शोरमा रोल खाल्ल्याशिवाय जात नाही. असो ही पोस्ट खादडीवर नसून खादडीच्या दुष्परिणामांवर आहे त्यामुळे तोंड आवरतं घेतो. तर सांगायचा मुद्दा असा की सकाळी गजर झाला की हात आपसूक ताणला जातो आणि गजर बंद करण्यात येतो. रोज वेगवेगळी कारणं असतात. गुरुवार ते रविवार "आज कुठे सोमवार पासून जाऊ", सोमवारी "वीकेंडला जागरण झालाय. झोप पूर्ण करू. आज पासून पुन्हा काम करायचं आहे". मंगळवार बुधवार मनात येईल ते काही कारण. महिन्याच्या २० तारखेनंतर "अरे आत्ता कुठे १ तारखेपासून जाऊ." तरी नशीब मी पोर्णिमा-आमावस्या बघत नाही. डिसेंबर मध्ये नवीन वर्षाचा संकल्प करू असं म्हणून टाळलं आणि नवीन वर्ष सुरू झाल्यावर "आत्ता नवीन वर्षाच्या संकल्पवाल्यांची गर्दी असेल" म्हणून टाळलं. स्व:तच स्व:तला द्यायची असली तरी कारणे कशी स्व:तच्या मनाला पूर्णपणे पटतील अशी. उगीचच "आज कंटाळा आलाय", "आज नको उद्या जाऊ" अशी थातुर मातुर कारणे कधी नाही दिली.

तसा गेल्या वर्षी जून-जुलैपर्यंत जॉगिंगला जात देखील होतो पण ऑगस्टच्या दरम्यान बंगलोरला पाऊस जरा वाढला आणि जरा खंड पडला. मग काय आत्ता गणपतीला घरी जायचं आहेच मग ४ दिवस चुकेल, नंतर काय तर दिवाळीला घरी जायचं आहे मग ४ दिवस चुकेल म्हणून आत्ता घरी जाऊन आलो की मगच सुरू करू असा विचार करून गजर बंद करून पुन्हा घोरु लागायचो. गणपती दिवाळी चे ४ दिवस खंड पडेल असा सुद्न्य विचार करून ४ महिने मी जॉगिंगला गेलो नाही. दिवाळी तर काय थंडी घेऊन आली मग गुलाबी थंडीत गजर बंद करण्यासाठी देखील डोळे उघडत नव्हते तर उठून बाहेर पडायचा तर प्रश्नच नव्हता.

दुसरी गोष्ट म्हणजे त्याच दरम्यान ब्लॉगिंगचा पण नाद लागला. ब्लॉग वाचणे, प्रतिक्रिया देणे, आपण काहीतरी लिहण्याचा प्रयत्न करणे ह्यात रोजचे बारा वाजू लागले. वर आम्हाला "लवकर निजे लवकर उठे"पेक्षा "शरीराला किमान ८ तास झोप हवी" हे जास्त लक्षात राहते त्यामुळे रात्री किती ही उशीर झाला तरी किमान ८ तास झोप पूर्ण करण्याची नवीन चांगली सवय लागली. ह्या सवई नुसार सकाळचे सहा-साडेसहा म्हणजे मध्यरात्र की हो. मग माणूस कसा उठणार?

बरं मी जेंव्हा जॉगिंगला जायचो तेंव्हा देखील Motivation नाही हो. सकाळी पार्कात धावायला येणार्‍या मुलींमध्ये पण consistency म्हणून नाही. अशी एखादी कुणी नाही की जिच्यासाठी उठून जावे आणि ती बया नित्य नेमाने साडेसहाला पार्कात हजर होईल. कुणी दिसलीच आणि आम्ही पुढचे दोन दिवस आशेने पहाटे पहाटे उठून गेलो की दररोज न चुकता येणार्‍या जेष्ठ नागरिक संघाचे दर्शन घेऊन परत. कसं होणार ह्यां मुलींचं?

असो चला तर मग, आधीच बराच उशीर झालाय. झोपायला जातो. उद्या सकाळी ६ वाजता उठायचे आहे.

Wednesday, February 24, 2010

किती सांगू मी सांगू कुणाला... आज आनंदी आनंद झाला...



वेडा झालोय... आज मला माझ्या नशिबावार विश्वास नाही बसत आहे. आज काय झालं आणि मी कंटाळूनच लवकर घरी आलो. जरा चिडचिडच झालेली. पण घरी येऊन पाहतो तर काय सचिन नुसता सुटलेला. तुफान.... १००, १२५, १५० आणि बघता बघता साहेब १८० वर पोहचले. मग स्वत : चा १८६ धावांचा रेकॉर्ड मागे टाकला. मग चेंडू इतके शिल्लक होते की आज काही झालं तरी २०० करतो पट्ठ्या. धडधड वाढु लागली. मग सईद अन्वरचा रेकॉर्ड मागे पडला. अन्वरने हा रेकॉर्ड भारता विरुद्धच केलेला. त्यामुळे तो घाव ही अनेक वर्ष आपल्या उरावर होता. सेहवाग कधीतरी ह्या जखमेवर मलम लावेल ह्याची खात्री होती. पण आज सचिनने ते करून दाखवले. मग २०० कधी होणार? मनात नाही नाही त्या शंका येऊ लागल्या. चेंडू कमी कमी होऊ लागले आणि तिकडे धोणी पेटला. नुसते चौके छक्के. म्हटलं काय रे बाबा.... पण नाही शेवटी तो क्षण आला. शेवटच्या षटकातल्या पहिल्या चेंडूवर षटकार हाणून धोणीने दुसर्या चेंडूवर एक धाव घेतली आणि सचिनला स्ट्राइक दिला. सचिन १९९ नाबाद. मग वेळ न काढता, उत्कंठा न वाढवता सचिनने पुढाचाच चेंडू एका धावेसाठी तटावून एक दिवशीय क्रिकेटमध्ये २०० धावा करण्याचा विक्रम केला. नेहमीप्रमाणे हेल्मेट काढून आकाशाकडे पहात बॅट उंचावली. ऐन शिमग्यात देशभर दिवाळी सुरू झाली. आपल्या सगळ्यांच्या सचिनने एकदिवशीय क्रिकेट मध्ये प्रथम २०० धावा करण्याचा मान मिळवला. आज अगणित रेकॉर्ड त्याच्या नावावर आहेत. अहो फार कशाला तो एक धाव करून आउट झाला तरी ती धाव विश्व विक्रमीच असते. २०० केले त्यापेक्षा अन्वरचा रेकॉर्ड मोडला ह्याचा जास्त आनंद आहे. ह्या एका माणसाने गेली २० वर्षे जे काही केलं आहे त्याला तोड नाही. मी काय बोलणार त्याबद्दल. फक्त क्रिकेटसाठी जन्माला आलेला माणूस. परवाच्याच मॅचचं घ्या. भारत एका धावेने जिंकला आणि त्याधीच्या षटकामध्ये सचिनने जी डाइव मारुन चौकार अडवला ते पाहून १५-२० वर्षाच्या मुलांनी पण तोंडात बोटं घातली असतील. कोण म्हणतं होतं ते ३ वर्षापूर्वी की सचिन ने आत्ता रिटायर व्हायला हवे. आज या आणि बोला.

मला नाही वाटतं की कुणी आत्ता भारत दक्षिण आफ्रिकेची जी उरलेली मॅच सुरू आहे ती बघत असेल. न्यूज़ चॅनेल तर फक्त सचिन सचिन आणि सचिन. आजतकने तर नेहमी प्रमाणे अब्दुल कादिरला फोन करून १९८९ मध्ये सचिनने केलेल्या जखमांवरची खपली काढली. अब्दुल कादिरला पुन्हा अल्ला आठवला. जाता जाता अब्दुल कादिर सचिनला शुभेच्छा देताना म्हणाला की "यह रेकॉर्ड सिर्फ सचिन को शोभा देता है, शायद इसिलिये आज तक २०० के इतने करिब जाने के बाद भी कोई २०० को छू नही सका". खरं आहे गेला बाजार हेडन, गिलख्रिस्त आणि आत्ता सेहवाग, गेल आणि असे कितीतरी स्फोटक खेळाडू असताना २० वर्षांनंतर सचिननेच एकदिवशीय क्रिकेट मध्ये सर्वप्रथम २०० धावा केल्या ह्यातच सर्व आले. ब्रायन लाराने कसोटी मध्ये सर्वप्रथम ४०० धावा केल्या त्यामुळे आत्ता कुणीही ४०० चा टप्प ओलांडला तरी लाराने पहिल्यांदा तो ओलांडला असल्याने लाराचं कौतुक कायम राहाणार. तसेच आज आपल्या सचिनने एकदिवशीय क्रिकेटमध्ये सर्वप्रथम २०० चा टप्पा ओलांडाल्यामुळे उद्या कुणीही २०० चा टप्पा ओलांडला तरी आपला सचिनच लक्षात राहाणार. या आधीच अनेक वेळा सचिनला मानाचा मुजरा करून झालाय.आत्ता काय काय लिहु अजुन. आज इतकं तृप्त वाटत य की काय सांगू. आज मला माझा स्वत:चाच हेवा वाटतोय की मी सचिनला २०० धावा करताना याची देही याची डोळा पाहिले. काही काही गोष्टी न मागता मिळतात. आजची ही सचिनची खेळी त्यापैकीच एक...

~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
याच विषयी आधी नवज्योतसिंग सिद्धूची मला सर्वात भावलेली कॉमेंट
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~

.

ShareThis