Wednesday, August 26, 2009

बाल्या डान्स, जाकडी नृत्य आणि हरीनाम सप्ताह

गणेशोस्तव आला की आठवतात त्या आरत्या, बाल्या डान्स आणि जाकडी नृत्य. बाल्या डान्स आणि जाकडी नृत्य ही नावं बर्‍याच लोकांना नवीन असतील. कोकणातील नामशेष होत जाणार्‍या संस्कृती आणि कलांपैकी ही दोन नावे. कोकणात हा प्रकार अजूनही काही गावात प्रचलित आहे. ह्यात जण ढोलकी घेऊन बसतात आणि काही लोकं ह्यांच्याभोवती फेर धरून नाचतात. नाचणार्‍यांच्या एका पायात घूंगरू बांधलेले असतात. जसं जसा नाच पुढे सरकत जातो तसं तसा नाचण्याचा आणि फेर धरण्याचा वेग वाढत जातो. मज्जा येते पाहायला. नाचताना उडत्या चालीची गाणी (पारंपरिक गाणी, हिंदी नव्हे) म्हणतात. हल्ली हे कलाकार फार नाही राहीले. पोटापाण्यासाठी बरेच लोकं मुंबईची वाट धरतात आणि गावाची नाळ हळू हळू तुटत जाते. कलियुगात दुष्काळ, भ्रष्टाचार आणि स्वाइन फ्लू अशा अवकळा लवकर पसरतात पण ह्या सगळ्यात बाल्या डान्स आणि जाकडी अश्या कला कधी नष्ट होऊन जातात हे कळत देखील नाही.

गणेशोस्तवा आधी श्रावण महिन्यात गावातल्या देवळात हरीनाम सप्ताह असायचे. श्रावण महिन्यात देवधर्माचे जास्त कार्यक्रम असण्याचे अजुनएक कारण म्हणजे पुर्वी पावसाळा वेळेवर सुरू व्हायचा. मग जून-जुलै मध्ये शेतीची कामे संपली की लोक रिकामेच असायचे दसर्‍यापर्यंत. मग त्यात श्रावण महिन्यात गावातल्या देवळात सप्ताह बसायचे. ह्यात गावातल्या वाड्या (आळी) सहभागी व्हायच्या. प्रत्येक वाडीला ३तास याप्रमाणे दिवसाच्या २४ तासाचे विभाजन व्हायचे. असा पूर्ण आठवडा मंदिरात अहोरात्र हरीनामाचा गाजर चालत असे. सप्ताह दरम्यान अभक्ष्य भक्षण आणि प्राशन बंद असे. पूर्ण सप्ताह गावातल्या बेवड्याची तोंडे बघण्यासारखी होतं असत. भजनात पण मज्जा येई. तीन तास भजन म्हणजे नाही म्हटल तरी लांबायाचेच. मग आधून मधून लोकांमध्ये जान आणण्यासाठी "जंजिरा पाण्यामध्ये किल्ला, शिवाजी आत कसा शिरला", "यमुनेच्या तिरी काल पाहिला हरी, कान्हा वाजावतो बासरी" अशी "जोश" भजने म्हटली जात. यासाठी खास टाळ आणि घंटानाद केला जाई. अधून मधून भजन म्हणणारा एखाद्या ओळी वर जरा जास्त रमला किंवा काही कीडा करून आपली गायकी दाखवू लागला की जमलेल्या कोरसमधून "वा बुवाsss" अशी शाल जोडीतील दाद येत असे. दाद देणार्‍याला वयाची मर्यादा नव्हती. २री ३री तले शेंबडे मूल देखील ही दाद देऊ शकत होते. फक्त खार्‍या हवेतील खोचकपणा अंगात हवा मग झाले. आम्ही देखील जमेल तशी शाळेला दांडी मारुन देवळात जात असु.आमच्यासाठी खास आकर्षण म्हणजे विणेकरी. देवळात गाभार्‍यासमोर लोक दोन रांगा करून भजन म्हणत उभी असतात. गाभार्‍याकडे तोंड करून तबला-पेटीवाले उभे रहातात. त्यांच्या आजूबाजूला भजन म्हणणारे. ह्या सगळ्यांच्या मधोमध एक जण वीणा घेऊन मागे पुढे फिरत असे. दर्शनाला येणारे सर्वजण विणेची देखील पूजा करतात, विणेकार्‍याला नमस्कार करतात. विणेकरी होण्यासाठी आम्हा मुलांची जोरदार शर्यत असे. लोक आपल्याला एवढा मान देतात, आपल्याला नमस्कार करतात हे म्हणजे आम्हाला काहीतरी आड्स (आड्स म्हणजे अचाट, सही, फंडू इत्यादी इत्यादी...) वाटे. सगळ्यात महत्वाचे म्हणजे आमचे शाळेतले गुरुजी, बाई, हेडमास्तर हे देखील देवळात आल्यावर विद्यार्थ्यासमोर झुकत असत. आज हे सगळं आठवलं की हसू येतं, पण आजच जीवन पहिलं की वाटत यार आपण लहानपणीचं भरभरून जगलो. आत्ता बस्स श्वास सुरू आहे. सगळं कसं यांत्रीक आणि साचे बद्ध होऊन गेलय.

Sunday, August 23, 2009

औसी की तैसी

आपला तर बुवा बरेच दिवसांनी मस्त वीकेंड साजरा झाला... कांगारूंची औसी की तैसी करून इंग्लंडने मानाची अॅशेस पटकावली. गेले काही दिवस आपण जेव्हा गणपतीबाप्पाच्या स्वागताच्या तयारीत गूंतलो होतो तेव्हा इंग्रज कांगारूंच्या विसर्जानाची तयारी करत होते. गेली काही वर्षे घरघर लागलेल्या ऑस्ट्रेलियन टीमला आज पुन्हा एकदा तडाखा बसला. क्रिकेटवर जवळपास दोन दशकं अधिराज्य गाजवल्यानंतर त्यांना असा काही माज आला होता की बास रे बास. स्टीव वॉ ने सुरू केलेली हुकुमत पॉंटिंगने पुढे चालू ठेवली होती. अर्थात ज्या टीम मध्ये ग्लेन मॅकग्राथ, गिलख्रिस्त, शेन वॉर्न, लॅंगर असे खेळाडू आहेत ती टीम कुठेही जिंकेल ह्यात काही वाद नव्हता. पण जसजसे हे सगळे दिग्गज हळूहळू निवृत्त झाले तसतशी ऑस्ट्रेलियन साम्राज्याला उतरती कळा लागली. त्यातच बरेचसे ऑस्ट्रेलियन खेळाडू माजले होते. उद्धटपणा आणि गुर्मी मैदानाबाहेर आणि मैदानात ही दिसू लागली होती. सगळ्यात पहिल्यांदा सौरव गांगूलीच्या संघाने त्यांना जमिनीवर आणले होते. त्यानंतर सुद्धा भारतीय संघाने जेव्हा जेव्हा कांगारूंशी सामना केला तेव्हा त्यांना जेरिला आणले होते. ह्याच वर्षी दक्षिण आफ्रिकेने त्यांना ऑस्ट्रेलियामध्ये घरच्या प्रेक्षकांसमोर पाणी पाजले होते. त्यानंतर नुकत्याच झालेल्या ट्वेंटी-ट्वेंटी विश्वचषकामध्ये कांगारू पहिल्याच फेरीत झाले होते. हरभजनने माकड नाही म्हटले तरी सायमंड्सने "आधीच सायमंड्स त्यात दारू प्यायला" ही म्हण खरी करून दाखवली.

आत्ता देखील अॅशेस मालिकेसाठी कांगारूंनी इंग्लंडमध्ये पाऊल ठेवताच प्रथेप्रमाणे इंग्लंडच्या खेळाडूवर काही ना काही शेरेबाजी सुरू केलीच होती. खरं तर मालिकेच्या सुरुवातीला इंग्लंड चा संघ मालिका जिंकू शकेल असे मला तरी वाटले न व्हते मालिका सोडाच पण एखादा सामना देखील जिंकेल की नाही ह्या बद्दल शंकाच होती. मायकेल वॉसारखा अनुभवी खेळाडूने निवृत्ती घेतलेली. फ्लिन्टॉपदेखील दुखापतीनी बेजार. त्यात पहिल्या सामन्यानंतर केविन पीटरसन मालिकेबाहेर पडलेला. अश्या एक ना अनेक कटकटी असून देखील इंग्लंडने दुसरा सामना जिंकला. तिसरा सामना कांगारूंसाठी मायकल क्लार्कने वाचवला. चौथ्या सामन्यात कांगारूंनी इंग्लंडचा साफ चोथा करून टाकलेला. चौथ्या सामन्यात कांगारूनी ज्या रीतीने पुनरागमन केले ते पाहून शेवटच्या निर्णायक सामन्यात इंग्लंडने सामना वाचवून मालिका बरोबरीत सोडावली तरी खूप झाले असे वाटत होते. पण इंग्लिश खेळाडूनी ही विश्वचषक किंवा IPLपेक्षा अॅशेस जास्त मोलाची असा निर्धार करून पण आज मालिका २-१ अशी काबीज करून कांगारूंचे मनसुबे पूर्णपणे उधळून लावले. संपूर्ण मालिकेत हेडन, लॅंगर, गिलख्रिस्तशिवाय ऑस्ट्रेलियन फलंदाजी आणि ग्लेन मॅकग्राथ, शेन वॉर्न, ब्रेट लीशिवाय गोलंदाजी अगदीच मिळमिळीत दिसली. एखाद दुसर्‍या सामन्यात जॉनसन, मायकल क्लार्क आणि सायमन कॅटीच सोडले तर कुणीही प्रभाव पाडू शकला नाही. इंग्लंडने २००५ प्रमाणेच पुन्हा एकदा गेलेली अॅशेस परत मिळवलीच पण कांगारूना अनेक वर्षानंतर कसोटी क्रिकेटमध्ये प्रथमच चौथ्या क्रमांकावर नेऊन बसवले. त्याचबरोबर २००५ची अॅशेस गाजवणारा अँड्रू फ्लिन्टॉप देखील सन्मानने कसोटी क्रिकेट मधून निवृत्त झाला. Bravo...

ह्या सगळ्यात रिकी पॉंटिंगचे थोबाड बघण्यासारखे होते. गेली काही वर्षे जी काही गुर्मी आणि माज घेऊन तो वावरत होता तो आज पूर्णपणे उतरलेला दिसला. बरेचदा सचिन, लारा अश्या खेळाडूंशी तुलना करताना २ वेळा विश्वचषक उचलणारा पॉंटिंग वरचढ ठरतो. एक फलंदाज म्हणून पॉंटिंग नक्कीच श्रेष्ठ आहे पण स्टीव वॉनंतर तो आजवर कप्तान म्हणून जो काही नावरूपाला आला तो केवळ ग्लेन मॅकग्राथ, गिलख्रिस्त, शेन वॉर्न, लॅंगर असे खेळाडू दिमतीला होते म्हणूनचं. मला स्व:तला तर ऑस्ट्रेलिया हरली पण त्याचबरोबर ती पॉंटिंगच्या नेतृत्वाखालीखाली इंग्लंडमध्ये सलग दुसर्‍यादा हरली ह्याचा जास्त आनंद आहे. आत्ता सगळ्यात मज्जा येणार आहे ती पुढील काही दिवसात. पंटर आणि कंपनीवर ऑस्ट्रेलियन निवड समिती, माजी खेळाडू आणि मुख्य म्हणजे प्रसार माध्यमं उभी-आडवी चढतील. बहुतेक पॉंटिंगचे कर्णधारपद देखील जाईल. Ashes संपली आणि आत्ता पाळी आहे पंटर आणि कंपनीच्या ASS'es ची. काय मंडळी??? खरा की नाय???

Thursday, August 20, 2009

आमदार दुष्काळग्रस्तांना देणार चक्क २० टक्के पगार ???

पक्षाध्यक्ष सोनिया गांधी यांनी गेल्या आठवड्यात, पक्षाच्या प्रत्येक लोकप्रतिनिधीने आपल्या पगारातील २० टक्के रक्कम दुष्काळग्रस्तांसाठी द्यावी असा आदेश दिला. आत्ता २० टक्के म्हटल्यावर आपल्यालाही वाटेल की बाबा काही समाधानकारक रक्कम जमा होईल. पण आत्ताच महाराष्ट्र टाइम्स मध्येखालील बातमी वाचली.

"पक्षाध्यक्ष सोनिया गांधी यांनी गेल्या आठवड्यात, पक्षाच्या प्रत्येक लोकप्रतिनिधीने आपल्या पगारातील २० टक्के रक्कम दुष्काळग्रस्तांसाठी द्यावी असा आदेश दिला. याचे स्वागत महाराष्ट्रातील काँग्रेस आमदारांनी करायला हरकत नाही. कारण त्यांना पगार मिळतो अवघा २००० रूपये. यापैकी २० टक्के म्हणजे ४०० रूपये देण्यास त्यांची काहीच हरकत नसणार. इतक्या कमी पगारात आमदारांचे कसे काय भागत असणार असा प्रश्ान् सामान्य मतदाराच्या मनात आला असणार. यावर आमदाराला मिळणारे भत्ते ही पगारापेक्षा कितीतरी अधिक असतात. उदाहरणच द्याचे झाले तर, टपाल खर्चासाठी महिना ७५०० रूपये, वाहन भत्ता २५,००० रूपये, टेलिफोन भत्ता दरमहा ८००० रुपये, इतर भत्ते १५०० रूपये आणि पीएचा पगार ८००० रूपये आमदाराला मिळतात. याखेरीज, अधिवेशनाला आणि सभागृहाच्या समितीच्या बैठकीला उपस्थित राहील्यास दरदिवसाला पाचशे रूपये इतका भत्ता दिला जातो.
हे सर्व भत्ते करमुक्त असतात आणि मिळणारे २००० रूपये मासिक वेतन आयकराच्या जाळयात येत नाही." (संदर्भ - महाराष्ट्र टाइम्स)

सर्वसामान्य माणसाला कसं उल्लू बनवला जातं ह्याच अजुन एक उदाहरण. लगे रहो... कारण ह्या बातमीने देखील काहीच फरक पडणार नाही. उलट हा ४०० रुपयाचा निधी अजुन एखादा भत्ता निर्माण करून वसूल केला जाईल. जय हो!!!

Tuesday, August 11, 2009

अजुन एक स्वातंत्र्यदिन...

आज १५ ऑगस्ट... अजुन एक स्वातंत्र्यदिन. सालाबादप्रमाणे आज आपला सगळ्यांचा देशाभिमान जागृत होणार. काल परवापासून सिग्नलला मिळणार्‍या झेंड्याची खरेदी झाली असेलच. मी शाळेत असताना कागदी झेंडे मिळायचे पण हल्ली प्लास्टिकचे मिळतात. दुसर्‍या नाहीतर तिसर्‍या दिवशी जनतेचा देशाभिमान फूटपाथ, रस्ता आणि कचर्‍याकुंड्या अश्या ठिकाणी दिसू लागतो. देशाभिमान टिको ना टिको पण हे झेंडे जास्त टिकतात. आणि मग एक दिवस इतर प्लास्टिकच्या कचर्‍याबरोबर सगळे समुद्रात जाते. पुढच्या पावसाळ्यात एखाद्या वादळी दिवशी समुद्र हा सगळा आहेर तुम्हाला परत देतो. (यंदा मुंबई मध्ये आलेल्या अजस्त्र लाटांनी साडे सहा लाख टनाचा प्लास्टिकचा कचरा साभार परत केला).

हे झाले झेंड्या बाबत. मग देशभक्तिपर चित्रपट पहिल्या शिवाय स्वातंत्र्यदिन पूर्ण होणे शक्यच नाही. तसं ही हा पूर्ण आठवडाच "आजादी का जश्न" म्हणून बहुतेक वाहिन्यानी गाजवला असेलच पण खास स्वातंत्र्यदिना निमित्त राखीव म्हणून बॉर्डर, भगत सिंग, क्रांतीवीर, रंग दे बसंती असा बर्‍यापैकी देश भक्ति उफाळुन आणणारा चित्रपट ठेवलेला असतोच. यंदाचे खास आकर्षण "A Curious Case of" स्लमडॉग मिलेनीयर आहे.

त्याचप्रमाणे यंदा आपल्याकडे श्रियुत कसाब खास पाहुणे म्हणून आहेतच. त्यांच्याबरोबरीने मुंबई बॉम्बस्फोटप्रकरणी नुकतेच फाशी जाहीर झालेले तिघं देखील एखाद्या कार्यक्रमाला उपस्थिती लावू शकतात. बरं फाशीचा दुसरा अर्थ भारतात जन्मठेप असा आहे. कारण फाशीची शिक्षा झालेला गुन्हेगार हा अतिशय उत्तम आरोग्यदायी आयुष्य भोगून नैसर्गिक रित्या मरतो. उत्तम उदाहरण म्हणजे अत्यंत क्रूरपणे लहान मुलांच्या हत्या केलेली अंजनाबाई तुरुंगात शांतपणे मेली. तिकडे अफजल गुरू फाशीची वाट बघत बसलाय आणि नुकतेच गेल्या आठवड्यात मुंबई बॉम्बस्फोटातील तिघांना वेटिंग लिस्ट टाकलाय. हे लोक एवढे माजले आणि निर्ढावले आहेत की ह्यांना जेवणात मासे-मटण हवे. तो कसाब म्हणे शाकाहारी जेवणाचे ताट फेकून देतो. हे सगळं वाचून अशी काही सणकते की काही विचारू नका. आपले सैनिक, पोलिस जिवावर उदार होऊन लढतात, आपले प्राण गमावतात आणि आपला कायदा कसाब सारख्याला वर्षानुवर्षे खटला चालवत, त्याला हवे नको ते बघत पुढच्या हल्ल्याची वाट बघत राहतो. बॉम्बस्फोट होऊन गेले की पुन्हा सगळा सिनेमाची स्क्रिप्ट लिहाल्यासारखे. तेच तेच Dialoges, आलटून पालटून त्याच त्याच जिहादी संघटनांचे जबाबदारी स्वीकारल्याचे कबुलीजवाब, आपल्या हिजड्या राजकारण्याची घटना स्थळाला भेट आणि "हे खपवून घेतले जाणार नाही, चोख प्रत्तुत्तर दिले जाईल" अशी (ही धमकी बर का) दरवेळची टेप. जखमीना ५० हजार आणि मेलेल्याना ५ लाख. मिळतात की नाही कोणास ठाऊक. ते स्वत: जखमी झाल्याशिवाय कळणार नाही. मेलो तर कळण्याचा प्रश्नच नाही म्हणा. मला तर डाउट आहे की जस सरकारी घर योजना मंत्रीसंत्री लोकांच्या नातेवाईका ना मिळतात तसे हे पैसे पण हेच लोक "आम्ही मेलो" असे दाखवून खात असतील. ह्या साल्यानी सामान्य माणसाचे जीवन स्वस्त आणि जगणे महाग करून ठेवले आहे.

वपु काळ्यांचे एक पुस्तक आहे "आपण सारे अर्जुन". जरूर वाचावे असे पुस्तक आहे. त्यात वपुनी म्हटले आहे "पेपरात रोज भ्रष्टाचार, खून दरोडे आणि इतर मनस्ताप देणार्‍या बातम्या वाचून प्रत्येक घरात, प्रत्येक मनात एक ठिणगी पडते आणि विझून जाते. ज्या दिवशी ह्या ठिणग्या घरात न विझता बाहेर येतील तेंव्हा सगळ्या वाईट प्रवृती, राजकारणी जाळूनच पुन्हा घरात जातील." पण दुर्दैवाने ह्या ठिणग्या कधीच एकत्र येत नाहीत. आणि येणार तरी कश्या? सरकारने व्यवस्थाच अशी करून ठेवली आहे की प्रत्येकाला जीवनावश्यक वस्तूसुद्धा दररोज धावपळ करून अक्षरशहा जमवव्या लागतात. मग ते दूध असो किंवा स्वयंपाकाचा गॅस, भाजी असो वा पेट्रोल. कधी त्यात भेसळ तर कधी वाहतूकीच्या संपामुळे तूटवडा. ह्या सगळ्यात सामन्या माणसाला इतका गुरफटवून टाकलेला आहे की त्याला समाजात सोडाच घरात पण घरात पण पुरेसे लक्ष्य द्यायला वेळ मिळत नाही. बिचारा बॉम्बस्फोट झाले तरी दोनवेळच्या जेवणासाठी पुन्हा कामावर हजर होतो. तीच गर्दी, तीच धावपळ. बॉम्बस्फोटातून वाचला तर आज वाचलो म्हणून दुसर्‍या दिवशी पुन्हा संध्याकाळी सुखरूप घरी येण्याची आशा धरून पोटासाठी बाहेर पडतो. नाही पडला तर संध्याकाळी काय खायचे हा प्रश्ना आहेच. ह्याला "मुंबई स्पिरिट" म्हणून खपवले जाते. प्रत्येक जण दररोज रात्री दत्ताजी शिंदे असल्याप्रमाणे "बचेंगे तो और भी लढेंगे" म्हणून झोपी जातो.


स्वतंत्र दिनाकडे एक सुट्टी म्हणून पहिले जाते. यंदा तर १५ ऑगस्ट शनिवारी आला आणि त्यामुळे सुट्टी किंवा संभावीत Long Weekend फुकट गेला असा सूर जास्त होता. चालायचेच. अर्थात ह्यात आपण सगळेच येतो. कुणालाही दोष देण्याआधी आपण किती जबादारीने वागतो ह्याचा विचार केला पाहिजे. मी स्वत: देखील बर्‍याच गोष्टी चुकीच्या आहेत हे माहीत असून देखील दुनिया करते म्हणून करतच असतो. चौकट मोडायची हिंमत नाही. पण दुसर्‍याने मात्र बरोबर वागावे ही अपेक्षा. ह्या सगळ्या मुळे वेनस्डे आणि डोंबिवली फास्ट सारखे चित्रपट मनाला भावतात. आपण कुठेतरी स्वत:ला पडद्यावर पाहत असतो. असो तर. लिहाण्यासारखे खूप आहे पण मी असाच उगाच भरकटत जाईन. लिहायला काही वेगळेच बसलेलो आणि उतरलं काही भलतचं. विषय कुठून कुठे गेला. त्यामुळे बराचसं विस्कळित आहे...

चला तर, गाववाल्यानू तुम्हा सगळ्यांका स्वातंत्र दिनाच्या खूप खूप शुभेच्छा... भारत खराखुरा स्वतंत्र होवो, आणि त्यासाठी आपला खारीचा तरी वाटा असो ही मनोकामना...

H1N1: दुष्काळात तेरावा महिना

ह्या वर्षाची सुरूवात मंदीच्या विषयाने झाली. महागाई वैगरे चिल्लर विषय होतेच नेहमीप्रमाणे. मग सालाबाद प्रमाणे हळूहळू पावसाळ्याची भाकितं सुरू झाली. 26 जुलैची पुनरावृत्ती होऊ नये केलेली उपाय योजना पाहून घाबरलेला पाऊस पडलाच नाही. दुष्काळ तोंडावर आला तर स्वाइन फ्लूची भर पडली. दुष्काळात तेरावा महिना म्हणतात ते ह्याला.
आपल्याकडची सुरक्षा व्यवस्था म्हणजे आधीच बोलायची सोय नाही. कुठेतरी बॉम्बस्फोट झाला की त्यानंतरचे दोन दिवस बस स्थानक, रेल्वे स्टेशन अशा ठिकाणी अगदी कसून तपासणी असते. परत 4 दिवसा नंतर कुणीही पुन्हा बॉम्ब घेऊन सहज आत जाऊ शकतो. हा ही त्यातलाच प्रकार आहे फक्त दहशतवाद्याएवजी इथे न दिसणारा पण जास्त संहारक विषाणू आहे. दहशतवादी हल्ल्यानंतर घटना स्थळांना भेटी देणारे राजकारणी आत्ता कुठे शेपूट घालून बसले आहेत? आपल्याकडे निष्पाप लोकांचा बळी गेल्याशिवाय यंत्रणेला जाग येत नाही हे त्रिवार सत्य आहे. नेहमीप्रमाणे आत्ता देखील सगळीकडे कडक सुरक्षा असेल आणि हे प्रकरण निवळल्यानंतर पुन्हा येरे माझ्या मागल्या. 2-3 महिन्या पुर्वी जेंव्हा स्वाइन फ्लूचे लोण पसरले तेंव्हाच योग्य ती खबरदारी न घेतल्यामुळे आज ही परिस्थिती ओढवली आहे.

आत्ताच बातमी वाचली की पुण्यात दहीहंडी रद्द करून येता गणेशोत्सव साधेपणाने साजरा करण्याचा निर्णय बर्‍याच मंडळानी घेतला आहे. अगदी योग्य वेळी योग्य पाऊल उचलले असून हा निर्णय सर्वांच्या हिताचा आहे. पुण्या मुंबईतील गणेशोत्सवाची गर्दी पाहता हा सण डामडौल न करता जितक्या साधेपणाने केला जाईल तितके चांगले.

Saturday, August 8, 2009

नवज्योतसिंग सिध्दूची मला सर्वात भावलेली कॉमेंट

काल परवाच शशी थरूर ह्याच्या "Across The Playing Field" पुस्तकाचे प्रकाशन झाले. त्या समारंभाला सचिन तेंडुलकर, हर्षा भोगले, नरेंद्र मोदी ही क्रिकेटशी निगडीत माणसे उपस्थित होती. त्यावेळी हर्षा भोगलेने सचिन संदर्भात सिद्धूची एक फारच छान कॉमेंट सांगितली. "1947 के बाद भारत के साथ सबसे अच्छी बात ये हुवी की यह बच्चा (सचिन तेंडुलकर) यहाँ पैदा हुवा, वहाँ नही|" खरचं यार जर सचिन तेंडुलकर भारता ऐवजी पाकिस्तानात जन्माला आला असता तर?... कल्पनाच नाही करवत. जाऊ दे कशाला उगाच असले विचार करा... त्यापेक्षा महाराष्ट्राची खंत, राखी सावंत जर पाकिस्तानात जन्माला आली असती तर... हा विचार जास्त चांगला आणि प्रेरणादायी आहे.

असो तर सिद्धूची कॉमेंट मला तरी फारच भावली. तसा नवज्योतसिंग सिध्दू त्याची क्रिकेट कारकीर्द संपल्यानंतरच जास्त प्रकाश झोतात आला आणि तोही त्याच्या कॉमेंट्स मुळेच. अर्थात त्याला नंतर त्याच्या कॉमिंट्रीमुळेच कांट्रॅक्ट पूर्ण व्हायच्या आधी घरी बसवले हा भाग वेगळा. चला तर आत्ता सिद्धूचा विषय निघालाचा आहे तर जाता जाता मला ह्याआधी आवडलेली त्याची टिपिकल सिद्धू कॉमेंट लिहून ही नोंद संपवतो. (ही कॉमेंट मराठीत मला तितक्या प्रभावीपणे मांडता न आल्याने ती जशीच्या तशी इंग्रजीत लिहीत आहे.)

Situation भारत-श्रीलंका सामना. भारत धावसंख्येचा पाठलाग करताना चांगला मोठ्या धावफरकाने पिछाडीवर. हार निश्चित. पण भारताची शेवटची जोडी बराच वेळ धावसंख्या वाढवत तग धरून मैदानात उभी.

सिद्धू: There is light at the end of the tunnel for India, but it's that of an oncoming train which will run them over.

ShareThis