Wednesday, February 24, 2010

किती सांगू मी सांगू कुणाला... आज आनंदी आनंद झाला...वेडा झालोय... आज मला माझ्या नशिबावार विश्वास नाही बसत आहे. आज काय झालं आणि मी कंटाळूनच लवकर घरी आलो. जरा चिडचिडच झालेली. पण घरी येऊन पाहतो तर काय सचिन नुसता सुटलेला. तुफान.... १००, १२५, १५० आणि बघता बघता साहेब १८० वर पोहचले. मग स्वत : चा १८६ धावांचा रेकॉर्ड मागे टाकला. मग चेंडू इतके शिल्लक होते की आज काही झालं तरी २०० करतो पट्ठ्या. धडधड वाढु लागली. मग सईद अन्वरचा रेकॉर्ड मागे पडला. अन्वरने हा रेकॉर्ड भारता विरुद्धच केलेला. त्यामुळे तो घाव ही अनेक वर्ष आपल्या उरावर होता. सेहवाग कधीतरी ह्या जखमेवर मलम लावेल ह्याची खात्री होती. पण आज सचिनने ते करून दाखवले. मग २०० कधी होणार? मनात नाही नाही त्या शंका येऊ लागल्या. चेंडू कमी कमी होऊ लागले आणि तिकडे धोणी पेटला. नुसते चौके छक्के. म्हटलं काय रे बाबा.... पण नाही शेवटी तो क्षण आला. शेवटच्या षटकातल्या पहिल्या चेंडूवर षटकार हाणून धोणीने दुसर्या चेंडूवर एक धाव घेतली आणि सचिनला स्ट्राइक दिला. सचिन १९९ नाबाद. मग वेळ न काढता, उत्कंठा न वाढवता सचिनने पुढाचाच चेंडू एका धावेसाठी तटावून एक दिवशीय क्रिकेटमध्ये २०० धावा करण्याचा विक्रम केला. नेहमीप्रमाणे हेल्मेट काढून आकाशाकडे पहात बॅट उंचावली. ऐन शिमग्यात देशभर दिवाळी सुरू झाली. आपल्या सगळ्यांच्या सचिनने एकदिवशीय क्रिकेट मध्ये प्रथम २०० धावा करण्याचा मान मिळवला. आज अगणित रेकॉर्ड त्याच्या नावावर आहेत. अहो फार कशाला तो एक धाव करून आउट झाला तरी ती धाव विश्व विक्रमीच असते. २०० केले त्यापेक्षा अन्वरचा रेकॉर्ड मोडला ह्याचा जास्त आनंद आहे. ह्या एका माणसाने गेली २० वर्षे जे काही केलं आहे त्याला तोड नाही. मी काय बोलणार त्याबद्दल. फक्त क्रिकेटसाठी जन्माला आलेला माणूस. परवाच्याच मॅचचं घ्या. भारत एका धावेने जिंकला आणि त्याधीच्या षटकामध्ये सचिनने जी डाइव मारुन चौकार अडवला ते पाहून १५-२० वर्षाच्या मुलांनी पण तोंडात बोटं घातली असतील. कोण म्हणतं होतं ते ३ वर्षापूर्वी की सचिन ने आत्ता रिटायर व्हायला हवे. आज या आणि बोला.

मला नाही वाटतं की कुणी आत्ता भारत दक्षिण आफ्रिकेची जी उरलेली मॅच सुरू आहे ती बघत असेल. न्यूज़ चॅनेल तर फक्त सचिन सचिन आणि सचिन. आजतकने तर नेहमी प्रमाणे अब्दुल कादिरला फोन करून १९८९ मध्ये सचिनने केलेल्या जखमांवरची खपली काढली. अब्दुल कादिरला पुन्हा अल्ला आठवला. जाता जाता अब्दुल कादिर सचिनला शुभेच्छा देताना म्हणाला की "यह रेकॉर्ड सिर्फ सचिन को शोभा देता है, शायद इसिलिये आज तक २०० के इतने करिब जाने के बाद भी कोई २०० को छू नही सका". खरं आहे गेला बाजार हेडन, गिलख्रिस्त आणि आत्ता सेहवाग, गेल आणि असे कितीतरी स्फोटक खेळाडू असताना २० वर्षांनंतर सचिननेच एकदिवशीय क्रिकेट मध्ये सर्वप्रथम २०० धावा केल्या ह्यातच सर्व आले. ब्रायन लाराने कसोटी मध्ये सर्वप्रथम ४०० धावा केल्या त्यामुळे आत्ता कुणीही ४०० चा टप्प ओलांडला तरी लाराने पहिल्यांदा तो ओलांडला असल्याने लाराचं कौतुक कायम राहाणार. तसेच आज आपल्या सचिनने एकदिवशीय क्रिकेटमध्ये सर्वप्रथम २०० चा टप्पा ओलांडाल्यामुळे उद्या कुणीही २०० चा टप्पा ओलांडला तरी आपला सचिनच लक्षात राहाणार. या आधीच अनेक वेळा सचिनला मानाचा मुजरा करून झालाय.आत्ता काय काय लिहु अजुन. आज इतकं तृप्त वाटत य की काय सांगू. आज मला माझा स्वत:चाच हेवा वाटतोय की मी सचिनला २०० धावा करताना याची देही याची डोळा पाहिले. काही काही गोष्टी न मागता मिळतात. आजची ही सचिनची खेळी त्यापैकीच एक...

~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
याच विषयी आधी नवज्योतसिंग सिद्धूची मला सर्वात भावलेली कॉमेंट
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~

.

Saturday, February 13, 2010

मेरा पहेला प्यार!!!

कधी तुम्हा कुणाला बोललो नाही. तशी गरज देखील वाटली नाही. पण माझ्या एकंदरीत बोलण्यावरून सॉरी लिहण्यावरून कदाचित तुमच्या पैकी काही जणांनी ओळखलं देखील असेल की I am engaged. हो आहे माझं प्रेम तिच्यावर आणि तेदेखील लहान पणापासून. जेंव्हा फार काही समजण्याची अक्कल नव्हती तेंव्हापासून. खरं तर तिची ओळख घरच्यांनीच करून दिली त्यामुळे आमच्या प्रेमाला विरोध वैगरे कधी झालाच नाही. आत्ता घरच्यांनी विरोध नाही केला त्यामुळे समाज काय म्हणेल वैगरे फालतू विचार मी कधी केला नाही. त्यामुळे माझे तिच्यावर किती प्रेम आहे आणि मी तिच्याशिवाय कसा राहू शकत नाही ह्याचा बभ्रा करत मी दुनिया फिरलोय.

तिचा विरह तर मी दोन दिवस देखील सोसू शकत नाही. आत्ता मी कोकणात असताना ती मला जशी मनमोकळे पणाने भेटायची तशी पुण्यात असताना आणि आत्ता बंगलोरला नाही भेटत. खरं तर आधी मी बंगलोरला आलो तेंव्हा तर फार हाल झाले हो. अगदी जिकडे पाहावं तिकडे सारखे तीचेच भास व्हायचे. भेट होणार नाही हे माहीत असल्यामुळे निदान तिला पर्याय शोधण्यासाठी तरी मी वीकेंडला नाना ठिकाणी भटकायचो. अर्थात तिला पर्याय शोधत होतो म्हणजे माझं तिच्यावरचं प्रेम कमी झालं असं समजू नका. उलट तिला दुसर्‍या रूपात स्वीकारण्याची ती तडजोड होती. अखेर एक दिवस केरळी वेषात मला तशीच स्वप्न-सुंदरी भेटली देखील. ही खोबरेल तेल लावून यायची पण आत्ता विरहच सहावेसा झाल्यानंतर खोबरेल तेल तर खोबरेल तेल, मी परिस्थितीला सामोरे जाण्याचं ठरवलं. इतक्या दूर बंगलोर सारख्या ठिकाणी आपल्याला आपलं प्रेम मिळतय ह्यातच मी खुश होतो. बाकी सणासुदीला घरी गेलो की ती भेटतच होती. त्या दोन चार दिवसात आमच्या प्रेमाला नुसतं उधाण येत असे. नंतर एके दिवशी मला बंगलोरला तिच्यासारखीच अगदी हुबेहुब दुसरी बसस्टॅंड जवळच्या कामातांकडे दिसली. मला तर अगदी "अगर सच्चे दिल से किसी को चाहो तो पुरी कायनात उसे तुमसे मिलाने के लिये जूट जाती है" चा याची देही याची डोळा प्रत्यय आला. ही अस्सल सारस्वत घराण्यातील होती. मी तर बेह्द्द खुश. सारस्वतांबद्दल ऐकून होतो पण आत्ता तर प्रत्यक्ष अनुभवायला मिळत होते. घरापासून इतक्या दूर मला माझे प्रेम पुन्हा मिळाले होते. तेंव्हापासून खोबरेल तेल लावून भेटायला येणारीचं तोंड देखील पाहिलं नाही. चालतं तेवढं. प्रेमात आणि युद्धात सगळं क्षम्य असतात म्हणे. आजकाल रविवार दुपारी १५ किलोमीटर अंतर तुडवून मी कामातांकडे जातो. आठवड्यात एखाद्या दिवशी सुट्टी मिळाली तर ती देखील सत्कारणी लावतो. हिच्यासोबत घालवलेल्या रविवारच्या आठवणीत आणि येणार्‍या रविवारच्या भेटीची स्वप्न बघत उरलेला आठवडा कंठतो. खरं प्रेम असेल तर कुठेही भेटतं कारण परदेशी गेलो तेंव्हा मला तिच्या सारख्याच एकीची ओळख झाली. ही जापनीज होती पण किती 'सुशी'ल. आजही तिच्या आठवणीने मनाचा कोपरा हळवा होतो.

आज वॅलिंटाइन डे. शुक्रवारी शिवरात्रीची सुट्टी होती म्हणून खास लॉंग वीकेंडला जोडुन सोमवारी सुट्टी घेऊन आज वॅलिंटाइन डेला हिला भेटायला खासं घरी आलोय. म्हटलं आज वॅलिंटाइन डे हिच्याबरोबर घरी साजरा करू. चला तर मंडळी मी तिला घरी घेऊन जायला आलोय. आत्ता मी तिची एवढी स्तुती केलीय तर तिचे फोटो पण देतो. मला खात्री आहे तुमच्यापैकी बरेच जण तिला जवळून ओळखत असतील, कदाचित माझ्यप्रमाणे तिच्यावर जीव ओवाळून देखील टाकत असतील. ती आहेच तशी प्रेमात पडण्यासारखी आणि प्रेमात पडल्यावर पुन्हा न विसरण्यासारखी... माझी प्रिय मासोळी...

ShareThis