Saturday, July 30, 2011

बब्याचो बंदोबस्त

बब्या महाडिक... ह्याच्या अंगात लहानपणापासनच हाडका कमी आणि काल्याकांड्या जास्ती. वय वाढलो, मिसरूड फुटलो तशी तोंडाक बाटली लागली अन् ह्याचो अजूनच डोक्यास ताप झालो. आख्ख्या गावात ह्याच्याबद्दल कोण चांगला बोलील तर शप्पथ. ह्याचे घरचे लोकं पण ह्याच्या विरुद्धच असतले. बब्या खै गेलो आणि राडे केलान नाय असा फार कमी वेळा झालो असेल. गावच्या देवळातले पूजा नायतर हरिनामसप्ता असे कार्यक्रम सोडले तर बाकी सगळीकडे हा हजर. बरेचदा टाम् असात म्हणून की देवाक घाबरता म्हणून, पण बब्या तसो देवळात पाऊल नाय टाकणार. पण पालखी बाह्यर पडली की ह्यो आलो ढोल ताशे घेवन. बाकी पूर्वी पासन गावासाठी काय उपयोगाचो काम केलान असेल तर ढोल बनवायचो. बकऱ्याची कातडी आणून सुकवन् त्याचे ढोल ताशे बनवायचो. मग काय शिमाग्याक बब्या म्हणजे हिरो. कोणाक् ढोल ताशे वाजवायचो असाल तर बब्याक् कटवूक लागायचो. बब्या सांगेल त्याचो पयलो चान्स. अगदी झेपा जात आला तरी ढोला जवलन् हलणार नाय. धा वर्षापूर्वी त्यानं बापाच्या नावान् गावच्या देवळाकं नविन स्टायलचे ढोल घेवन देलान.

बब्याचो बाप मास्तर महाडिक. दुसरी तिसरीतच लेकाची प्रगती बघून आपला पोर काय दिवे लावायचो नाय म्हणून मास्तरान गावाची पोरा शिकवता शिकवता आपल्या पोराला, बब्याला मात्र पाचवीत जायच्या आधीच शाळेतना भायर काढलान् आणि सरळ दोन म्हशी घेतालान. पहाटे उठून दूध काढून गावात विकायचा आणि दिवसभर म्हशीकां चरायंक् न्यायाचा, गोठा साफ करायचा अशी कामा बब्याच्या मांग लागली. म्हशी चरवता चरवता गाव भटकूकं मिळायचो म्हणून बब्या पण खुष. मास्तर सोताच्या पोरांक अगदी नीट वळखून होता. बब्या मोठा झालो तसा त्याचा लगीन लावन् दिलान आणि बरोबर हापूसची धा कलमं पण घेवन दिलान. बब्याच्या अंगात किती पन् काल्या कांड्या असल्या तरी मास्तर बापापुढे बब्या वचकून असायचो. मास्तरान पण जीता असे पर्यंत बब्याच्या हातात कधी व्येवार दिलान नाय. मास्तर मजुरी दिल्यासारखा बब्याला आठवड्याला चार-पाच रुपये द्यायचा आणि बब्यापन् गप्-गुमान आपली विडीकाडी त्यात भागवायचा. मास्तर असेपर्यंत गावाकपण बब्याचो तसो त्रास कधी नव्हतो. पण चांगली तीस-बत्तीस वर्षा पेन्शन खावंन् मास्तर खपलो आणि बब्यान् पण कात टाकल्यान. जणू मास्तर आणि बब्या दोघांचे आत्मे कसे एकदम मोकळे झाले. एकीकडं मास्तरान् जाता जाता बब्याच्या उरलेल्या आयुष्याची पन् सोय लावलान् होती. बब्याकं पन् त्याची जाणीव होती पण मास्तराच्या रूपात एक प्रकारचा धाक-दडपन् होता, ता गेला म्हणून बब्याकं कसो मोकळा मोकळा वाटला. आत्ता मास्तराच्या उपकाराची जाणीव म्हणा की तो खपल्याचा आनंद म्हणून म्हणा, पण मास्तर खपल्या खपल्या बब्यान् आधी मास्तराच्या नावान् गावच्या देवळाला ढोल देलान्.

मास्तर अगदी जुन्या हाडाचो त्यामुळे तो खपेपर्यंत बब्यान् पण पन्नाशी पार केलान् होती. नोकरीक् अस्ता तर बब्या पेन्शनीत गेला असता. मास्तरानं अख्खो आयुष्य पांढरा शर्ट आणि खाकी हाफ प्यांट घालून काढलान्. म्हातारपणी डोळ्याला चष्मा आणि आधाराकं घेतलेली काठी हीच काय ती चैन केलान् असेल. करमणूक म्हणजे रोजचो रत्नांग्री टायम्स मोठ्यान वाचायचो. नाय म्हणायाला मास्तरान नंतर ब्लाक अन् व्हाईट टीवी घेतालान पण केबलबिबल घ्यायच्या भानगडीत न् पडता दूरदर्शनवरच भागावाल्यान. म्हावरा बब्याच गरवन आणायचो समुद्रावरून. सांगायचा मुद्दा काय तर घरात पैसा असून सुदिक म्हाताऱ्यामुळे बब्याक् त्याचो कधी उपभोग घेवूक मिळालो नसा. त्यामुळे मास्तर खपल्या खपल्या उभ्या आयुष्यभर सायकलवर फिरून दारोदार दूध घातलेला, चार-पाच रुपयात सगळी चैन भागवलेला बब्या रातोरात राजा झाला. उशिरा का व्हयनां पण बब्याच्या हातात पैसा आला. मग काय बब्यान् आधी दुधाचा धंदा आणि कलमाची कामा करायसं दोन गडी लावलान् आणि आपण सोता इतकी वर्षे आत दाबून ठेवलेल्या काल्याकांड्यांची जादू गावाक् दाखवायक् बाह्यर पडला. घरात कलर टीवी आली, सायकलच्या ऐवजी बुडाखाली फटफटी आली आणि पूर्वी शिमग्याला, गटारीला मिळणारी पहिल्या धारेची आत्ता रोजची झाली. बब्या गावाबाहेरच्या खोपटाचा रोजचा गिऱ्हायक आणि त्याच बरोबर गावातल्या लोकांक् एक नविन ताप झालो.

शिमग्यातले राडे काय गावाक् नविन नवते. शिमग्यात गाऱ्हानां घालायचो काम कैक वर्ष मास्तरांन केलेला त्यामुळे मास्तराच्या पाटी गाऱ्हानां घालायचो मान बब्यास हवो होतो. मन्या गुरवानं अगदी कडकडून विरोध केलान. गावकऱ्यांनी कसो बसो आवरल्यानी बब्याक्. पुऱ्या गावासमोर मन्या गुरवानं केलेल्या विरोधाचा बदला म्हणून बब्यान् हापूसचा सिझन यायच्या आतच आपले गडी लावन् गुरुवाच्या कलमावर लागलेल्या सगळ्या तयार झालेल्या कैऱ्या काढून रातोरात लोणची करणाऱ्या व्यापाऱ्याला जावन् विकलान्. आत्ता हे काम बब्याचाच हे गुरवाला आणि गाववाल्यांना पण ठावक होता पण पुरावा नसल्याने बब्याच्या नादी कोन लागणार म्हणून सगळे गप्प बसले. त्यानंतर बब्यान् पुढचो किडो रंगपंचमीस केलान. रंगपंचमीस गावातली पोरा रंग घेवन गावभर फिरतात आणि जो भेटील त्यास रंगवितात. बब्यान् काय केलान तर तेच्या घरासामोरच्या म्हशीनां पाणी पिवूच्या हौदात चार दिवस आधीपासना शेण कालवन् ठेवल्यान. अगदी सारवान घालायला करतात तसो आणि रंगपंचमीक् जवा गावातली पोरा बब्याच्या घरा समोरून जावक् लागली तेवा अचानक पाटन् येवन पटकन तिघा चौघांना उचलून त्या शेणाच्या हौदात टाकल्यान. बेवडो आणि दिसायाक किडकिडीत, काटक असलो तरी लहानपणी पासन् अंगमेहनतीची कामा करून बब्यात ताकत चांगलीच होती. त्याच्यासमोर पोरा दिसायला वजनदार असली तरी शेवटी वडापाव-मिसळपाव खाल्लेली पोरा ती. त्यांच्यान् काय बब्या आवरला नाय. दोघजण बब्याक पकडूक् गेले आणि आयते त्याच्या तावडीत गावले. बब्यान् त्या दोघांक् पण उचलून हौदात टाकल्यान. पोरांचे अवतार बघवत नव्हते. चांगला चार दिवस कुसवलेला शेण ता, पाच पाच वेळा आंघोळी करून पण पोरांच्या अंगाचो वास जायत नव्हतो.

नंतर बब्याचो अवतार दिसलो दहीकाल्यास्. ह्या वेळी बब्यान् हंडी बांधल्यान पण दोरी दोनीकडे पक्की न बांधता दुसऱ्या बाजूला सोता दोरीचो एक टोक हातात धरून झाडावर जावन् बसलो. पोरा हंडी फोडायस् आली, मनोरा रचल्यांनी. जशी पोरा हंडीच्या जवल जायची बब्या दोरी ताणून हंडी वर घ्यायचो. पोरा पडली की परत हंडी खाली. लै झुंजवल्यान् पोरांना. शेवटी पोरा कंटाळून गेली मग बब्यान् हंडी खाली करून अगदी दुसरी-तिसरीतल्या बारक्या बारक्या पोरांकडन् फोडून घेतल्यान् आणि वर मोठ्या बाप्या लोकांनां "बारक्या पोरांनी हंडी फोडलांनी पण तुमच्या बुडात दम नाय. थू तुमच्यावर" असो बोंबलत गावभर फिरलो.

हळू हळू बब्याचो तरास वाढू लागलो. पूर्वी पौर्णिमा अमावास्येला म्हणजे अधनंमधनं ह्याच्या अंगात यायचो, पण नंतर जवळपास रोजचाच झाला. त्याचो तरास ह्याच्या शेजाऱ्यापाजाऱ्यांनां आणि घरच्यांना जरा जास्तीच होता. बब्यान् म्युजिक सिष्टीम घेतलान् आणि मग कधी मनात येल तेवा मोठ्या आवाजात गाणी लावन् डोस्की फिरवायला लागला. शेजारीच काय तर आख्ख्या वाडीतल्या लोकांचे कान किटले. पोरांना अभ्यास करणे आणि म्हाताऱ्या कोताऱ्यांना दुपारी वामकुक्षी आणि रात्रीची झोप कठीण होवून बसली. ह्या सगळा कमी की काय म्हणून बब्यान् रोज झिंगून आल्यावर वाटेत पारावर बसलेल्या पोरांना शिव्या द्यायस् सुरुवात केलेली. पोरा बिचारी दिवसभर कामधंद्या वरून आल्यावर जेवन-खावंन् जरा पारावर गजाल्या मारायास बसायची तर हा तिकडे जावन् त्यांच्या कुरापती काढायचा. सगळे बब्याला वैतागले होते. शेवटी पोरांनी बब्याचा गेम करायचाच असा ठरवल्यांनी. पप्या मांडवकराच्या डोक्यात एक आयडिया आली, पोरा पण तयार झाली.

रत्नांग्रीत रेल्वे आली पण त्याच्याबरोबर रेल्वे स्टेशनच्या भागात चोऱ्या पण वाढल्या. रेल्वेस्टेशन जवळची घरफोडी, दुकाने छोट्या-मोठ्या टपऱ्या फोडून चोर रातोरात रेल्वेनेच पसार व्हायचे. गावातली पोरा आत्ता अशीच एखादी चोरी होतेय का त्याची वाट बघीत होते. सगळी व्यवस्था तयार करून ठेवलेली होती. आता सगळी पोरा फक्त योग्य संधीची वाट बघीत बसली होतीत. तशी संधी महिना भरात मिळाली पण. कोणीतरी रेल्वेस्टेशन जवळची चायनीजची गाडी फोडलान्. तशी किरकोळ चोरी होती, नुकसान जास्त झाला नव्हता. पैसा अडका चोरीला गेला नव्हता केवळ भांड्याकुंड्यावर निभावले होते. पोरांना पण असाच कायतरी हवा होता जेणेकरून पोलिसांची भानगड जास्ती नसेल. चोरी झाल्याच्या दुसऱ्याच दिवशी पोरं संध्याकाळपासून बब्यावर पाळत ठेवून होतीत. बब्यानेहमी प्रमाणे संध्याकाळी टामकावायाला गावाबाहेर गेला आणि दोघे जण थोड्या वेळानं त्याच्या मागावर गेले. बब्या एकटोच पायी चालत जायचो त्यामुळे अजून कोण बघील अशी काही भीती नव्हती. बब्या टामकवून झाल्यावर झेपा टाकत यायला निघाला तसा एका ठिकाणी झाडी बघून पोरांनी पाटना येवन बब्यावर घोंगडं टाकलानी आणि तो बोंबलायच्या आत त्याच्या मुसक्या बांधून तिकडेच आत रानात आडवाटेला ठेवून दिलांनी. रात्रीची जेवणा आटपून पप्या मांडवकर, सुन्या, दादू असे दोघे तिघे बब्याचा बोचका घेवन् नानाच्या रिक्षान् रेल्वे-स्टेशनला गेले. बब्या टाम् होताच त्यामुळे त्यान काय जास्ती त्रास दिलान नाय. रेल्वेस्टेशनवर जावन् पप्या आणि दादू त्या चायनीजवाल्याला भेटले आणि तुमची गाडी फोडलान् तो चोरटा आमच्याच गावातला असा, त्याका घेवन् इलोय असा सांगितल्यानी. तो तसो भुरटो चोर असा, म्हणून पोलिसात न् देता तुमच्या ताब्यात द्यायला आलो. आम्ही गेल्यावर तुम्ही काय ती वसुली करा असे सांगून पोरा परत घरी आली आणि शांत झोपली.

तिकडे चायनीजवाल्याकं पण चोरी करणारा कोन तो भेटला नव्हताच. पोरा काय खरा-खोटा सांगून गेली ते बघुया आणि अगदीच काय नाय तर हा जो कोन भुरटा चोर हाय त्याच्याकडून निदान भांडी तरी घासून घेवया म्हणून त्यानं बब्याचो बोचको सोडल्यान. तोपर्यंत बब्याची पण जरा उतरली होती. हे काम गावातल्याच पोरांचे हे बब्याला माह्यत होता त्यामुळे घोंगड्याच्या बाह्यर आल्या आल्या बब्यान् समोर कोन हाय कोन नाय ते न् बघता घोंगडं काढणाऱ्या चायनीजवाल्याच्याच कानाखाली एक सणसणीत ठेवन् दिल्यान्. वरतून तोंडातन् नाय नाय त्या शिव्या सुरु होत्याच. आत्ता मघापासनं हा माणूस कोन हाय, ह्याने चोरी केलान हाय की नाय अश्या सगळ्याच बाबतीत संभ्रम असलेला चायनीजवाला बाकायदा कानाखाली खाल्ल्यामुळे पिसाळला. मग त्याने आणि आजूबाजूच्या गाडीवाल्यांनी बब्याला असा काय कुटलानी की बास रे बास. पावसाळी दिवस त्यात त्यांनी बब्याला धुतल्यावर त्याचे कपडे काढून हाफ प्यांटवर सोडून दिलानी. आत्ता अश्या अवस्थेत परत घरी जायचा तर रिक्षाला पैसे पण नाहीत. एवढ्या रात्री चालत जायचा तर शरीराचो जो भाग हलतो तो ठणकत होतो, अशा अवस्थेत मार खावंन् सुजलेल्या बब्यान् उघड्या अंगाने तिकडेच एका बस स्टापवर भिकाऱ्यांच्या बाजूला पुरी रात्र कुडकुडत काढलान् आणि दुसऱ्या दिवशी मेनरोड सोडून आडवाटेनं, कातळावरून, शेतीच्या बांधांच्या आडोशाला लपत बब्या कसाबसा दुपारी घरी आला. मुको मार तर इतको पडलो होतो की बब्याक बरा होवूक आटवडो लागलो. झाल्या प्रकारानं बब्यानं गावातल्या पोरांची अशी काही धास्ती घेतलानं की बाहेर जावन् कोणाला जाब विचारायची पण त्याची हिंमत व्हत नव्हती आणि हिंमत व्हयल तरी कशी कारण त्या गाडीवाल्याच्या ताब्यात द्यायचा आधी, पप्या घोंगडीत बांधलेल्या बब्याच्या कानात पुटपुटला होतो...

"आज नुसतीच तुका कुटायची सुपारी दिलीय, पण परत फिरून काल्याकांड्या करशील तर पुढच्या वेळी किल्ल्यावरच्या लाईट हावसवर नेवन् दरीत ढकलून देव. काय समजलास?"

ShareThis