Sunday, October 7, 2012

भाजीपाला

साधारण जूनचे पहिले दोन आठवडे चांगला पाऊस पडून गेला की बाबा उन्हाळ्यात सुकवून ठेवलेलं बी-बियाण बाहेर काढतात. त्यात फुले, फळे, भाजीपाला अश्या सगळ्या प्रकारचे बी असते. नातेवाईक मित्रमंडळीपासून ते आजुबाजूच्या शेतकर्‍यापर्यंत, असे सगळ्याकडून वर्षभर जमवून ठेवलेले. कुठे कुठला भाजीपाला पेरायचा, नवीन फूलझाडे आणि फळझाडे कुठे लावायची हे सगळे त्यांनी आधीच ठरवलेले असते. मग एकाद्या सुट्टीच्या दिवशी किंवा पावसाने जरा उघडीप दिली की हातात पारय (पहार) घेऊन पावसाने नरम झालेल्या मातीत मारायची आणि त्या खड्ड्यात एक-एक बी टाकायचे. पावसाळा सुरू होण्याआधीच पडवळ, दुधी-भोपळा, तोंडली, कारली अश्या भाज्यांसाठी मांडव तयार असतो. काकडी, चिबूड, भोपळ्याच्या वेली पसरण्यासाठी नीट उताराची जागा केलेली असते. भेंडा, वाली, वांगी, मिरच्या आणि पालेभाजीसाठी छोटे छोटे वाफे तयार करून ठेवलेले असतात. सुरुवातीच्या पावसामुळे त्या वाफ्यातील मातीत असलेले बीज म्हणजे गवत आणि तण आधीच उगवलेले असते. ते साफ करून टाकले की पुन्हा त्या मातीत रानगवत उगवण्याची शक्यता नसते. भाजीपाला लावायला वाफा तयार. अळूवडी आणि फतफत्याच्या भाजीसाठी सालाबादप्रमाणे ठरलेल्या जागी अळूदेखील उगवतो. शेवग्याचे झाड तर असतेच.

पडवळ

दुधी-भोपळा


अशी सगळी पेरणी झाली की मग महिनाभर फार काही काम नाही. फक्त बी रुजून आले की त्यावर लक्ष ठेवायचे. अधून-मधून रोपांच्या वाढीला जोम यावा म्हणून खताचा डोस द्यायचा तो देखील अगदी चिमुटभर. मुळाशी मुंग्या लागू नये म्हणून पावडर मारायची. पुरेसे पाणी मिळावे म्हणून मुळाशी नीट आळी करायची. पाऊस मध्येच गायब झाला तर ह्या वेलांनां आणि नव्या झाडानां पाणी घालायचे तसेच पावसाचा जोर जास्ती असेल तर पाण्याचा नीट निचरा होतो आहे की नाही त्याकडे लक्ष द्यायचे. नाहीतर खास करून भाज्यांच्या वेली अती पाण्याने कुसण्याची भीती असते. शेतीची कामे सुरू असताना विहिरीवर पाणी आणायला येणारे शेतकरीदेखील अधून-मधून पहाणी करून जातात. त्यांच्या डोळ्याला काही तण, गवत दिसले तर काढून टाकतात. पानाला किड दिसली तर पाने खुडून टाकतात.

चिबडाचे फूल

चिबूड

चिबूड

तयार चिबूड

श्रावणाची चाहूल लागली की नवीनच खेळ सुरू होतो. रोजच्या रोज सकाळ संध्याकाळ त्या झाडे वेलींकडे बारकाईने पाहण्याचा. मग एखाद्या दिवशी भेंड्याच्या झाडाचा पानाचा देठ आणि झाडाच्या खोडामधून एक छोटीशी कळी दिसून येते. भोपळा, कारली, चिबूड, पडवळांचे वेलदेखील पांढर्‍या पिवळ्या फुलांनी डवरतात. भेंड्याचे एक बरे असते. एकदा कळी आली की हमखास भेंडा लागतो पण बाकीचे वेल मात्र असंख्य फुले देत असले तरी ठराविक फुलेच गळून जाण्यापुर्वी देठाशी फळ सोडून जातात. त्यामुळे ही फुले पूर्ण फुलली की प्रत्येक फुलाचा देठ बारकाईने पाहावा लागतो. त्याच्या देठाशी जर का बारीक मण्याएवढा फुगवठा दिसला की समजायचे ह्यातून फळ मिळणार. मग वेलाचा तो भाग लक्षात ठेवायचा, खास करून चिबूड, काकडी आणि भोपळ्याचा वेळ असेल तर कारण ते वेल जमिनीवर पसरलेले असतता. पडवळ, दुधी, कारली वैगरे मांडवावर असल्याने भाजी वाढीस लागली की हमखास दिसून येते पण चिबूड, काकडी, भोपळा जमिनीवर असल्याने ती फळे वजनाने खाली मातीला टेकतात. वेलाखाली लपून बसतात. ह्या वेलांची पाने देखील मोठी त्यामुळे चिबूड, भोपळा मोठा फोफावला तरी दिसून येत नाही. त्यामुळे ह्या वेलांवर नीट लक्ष ठेवावे लागते.

वाली

भेंडा

ही नवीन फळे शोधण्यात देखील गंमत असते. आम्ही शाळेत होतो तेंव्हा मज्जा असायची. फुलाला लागलेला भोपळा, चिबूड सगळ्यात आधी कुणी पाहिला? ज्याने पाहिला तो इतरांना सांगणार. भोपळ्याचा/चिबडाचा त्या वर्षीचा काउंट एकाने वाढणार. फळ पहिल्यांदा जो पाहील त्याच्याकडे त्या फळाची जबाबदारी आपोआप जाते मग तो भोपळा असो, काकडी असो वा पडवळ, कारली. ते फळ दिसल्यापासून ते घरात आणेपर्यंत मधल्या वेळात त्याची वाढ नीट होते आहे की नाही, जमिनीवर त्याला किड-मुंगी तर लागली नाही, पावसाने कुसत तर नाही वा उन्हाने करपत तर नाही अश्या बारीकसारिक कामांची जबाबदारी. भेंडे, वांगी, मिरच्या जून व्हायच्या आत वेळच्या वेळी काढायाच्या. काकड्या नीट कोवळ्या बघून घ्यायच्या... इत्यादी, इत्यादी.

मिरच्या
वांगी
अळू

भाज्या तयार झाल्या की मग मॅनेजमेंट. एक एक भाजी तयार झाली की घरच्या भाजीचे नवं करायचे. चिबूड, काकडी चवीने खायची. ह्या भाज्या एकदा पडायला (तयार व्हायला) लागल्या की मग नियमीत लक्ष ठेवून वेळच्या वेळी तोडून घरात आणायच्या. मग त्यात सख्या शेजार्‍याचा, नातेवाईकांचा वाटा करायचा. बीयाणे दिलेल्या शेतकर्‍याला आठवणीने भाजी पाठवायची. आत्येला, मावशीला, सासरी गेलेल्या ताईला त्यांच्या दारात स्वस्त भाजी मिळत असली तरी रिक्षाला जास्ती पैसे घालून आपल्या दारातील भाजी कौतुकाने त्यांच्याकडे पोचती करायची. बाजारात सगळ्या भाज्या मुबलक मिळत असल्या तरी गणपतीत ऋषिपंचमी दिवशी ऋषिच्या भाजीत परसात पिकवलेली प्रत्येक भाजी असेल अश्या रीतीने भाजी झाडावर शिल्लक ठेवायची. आणि महत्वाचे म्हणजे सगळ्या प्रकारातील एक-एक फळ तसेच झाडावर ठेवायचे. ते उन्हात पूर्ण सुकले की त्यातील बी काढून पुढच्या वर्षी रुजत घालण्यासाठी.

ShareThis