Tuesday, June 7, 2011

७ जूनच्या आठवणी

आज ७ जून. ७ जून ह्या तारखेला लहानपणापासून मनात एक खास स्थान आहे. ७ जूनला शनिवार रविवार नसेल तर ह्याच दिवशी शाळा सुरू व्हायची. दीड-दोन महिन्याची सुट्टी, मुंबईहून आलेले पाहुणे, सुट्टीत रत्नागिरीत आलेल्या माझ्या चुलत भावाबरोबर केलेली धमाल आणि आंबे, फणस, काजू असं सगळंच मे महिन्याअखेर संपून जायचे. माझ्या भावाचीदेखील शाळा सुरू होणार असल्याने तो मे महिन्याअखेर परत मुंबईला जायचा. मग शाळा सुरू होईपर्यंतचा एक आठवडा खायला उठायचा. काय कारायचे कळायचे नाही. घरचे लोकं पावसाळ्यात चुलीला आणि आंघोळीसाठी असलेल्या बंबात टाकायला लाकडे जमा करून ठेव, लाकडे साठवण्याच्या खोपटाला पावसाचे पाणी आत जाऊ नये म्हणून माडाच्या झावळ्यानीं नीट शाकारून ठेव अश्या कामात मग्न असत. मी काडी पैलवान असल्यामुळे श्रम पडतील अश्या कामात माझा सहभाग नसायचा. त्याकाळी टीव्हीची इतकी क्रेझ नव्हती. केवळ दूरदर्शन असल्यामुळे कार्यक्रमदेखील जास्त नसायचे. त्यामुळे कधी एकदा शाळा सुरु होते आहे असे व्हायचे.

शेवटी एकदाचा ७ जून उजाडायचा. ७ जून म्हणजे नव्या कोऱ्या वह्या पुस्तकांचा वास. एखाद्या वर्षी नवीन गणवेश. पुढच्या शैक्षणिक वर्षात गेल्यामुळे नविन वर्ग. नविन वर्गशिक्षक. वर्ग् शिक्षकांकडे हजेरीचा नविन कॅटलॉग. हजेरीसाठी नवा पट क्रमांक. नविन वर्गात नविन जागा. बसायला भारतीय बैठकच असे. वर्गात लाकडी बाके वैगरे इंग्रजी माध्यमांच्या शाळेतच असतात असे ऐकून होतो. कुणीही कुठेही बसण्याची मुभा असल्याने आपल्या मित्र मंडळींबरोबर बसून घ्यायचे. अगदीच उंच मुलांना शिक्षक मागे बसवायचे. टगी मुलं टेकायला भिंत असावी म्हणून मागेच बसायची. पहिल्या दिवशी एखाद्या ठिकाणी बस्तान मारले की जोपर्यंत गडबड करणे किंवा अन्य काही कारणाने शिक्षकांनी तुम्हाला उठवले नाही तर वर्षभर तीच तुमची जागा. गावात नगरपरिषदेची शाळा होती. सकाळी १० वाजता भरायची. आजूबाजूच्या वाड्यांमधून मुले घोळक्याने चालत यायची. काही एकएकटी. माझे घर शाळेपासून फक्त २ मिनिटांच्या अंतरावर होते. शाळेत शिपाई वैगरे कुणी नसायचा त्यामुळे शाळा भरायच्या आधी पहिली पंधरा मिनिटे सफाईसाठी असत. शाळेभोवतीचा भाग प्रत्येक वर्गाला वाटून दिलेला असायचा. त्या भागात पडणारा पालापाचोळा त्या त्या वर्गाने जमा करून एका ठराविक ठिकाणी जमा करायचा. साफसफाई करताना मुलांवर लक्ष ठेवण्यासाठी प्रत्येक वर्गात वर्गमंत्री, क्रीडामंत्री अश्या मानाच्या पदांबरोबर सफाईमंत्री देखील असे. सफाई झाली सगळी मुले पाचवीच्या वर्गात जमत. पाचवीचा वर्ग म्हणजे शाळेतला सगळ्यात मोठा वर्ग. पहिली ते सातवीची सगळी मुले त्या वर्गात मावत. आत्ताच्या काळात त्याला हॉल म्हटले तरी चालेल. त्या वर्गाच्या बाहेर एक लांबलच्चक वर्‍हाडा. तिथे सगळ्यांनी आपले चप्पल काढून ठेवायचे आणि ओळीने आत जायचे. तिथे मग प्रतिज्ञा, राष्ट्रगीत मग प्रार्थना आणि दिवसाचे पंचांग असे कार्यक्रम ठरलेले असायचे. पहिल्या दिवशी सगळी मुले एकदम उत्साही असत, सगळं कसं अगदी खणखणीत आवाजात.

बहुतेक वेळा १ जूनला केरळमध्ये दाखल झालेला मान्सून बरोब्बर ७ जूनला कोकणात पोहचायचा. त्यामुळे ७ जूनला शाळेच्या पहिल्याच दिवशी पहिला पाऊस देखील पडायचा. पावसाची पहिली सर वर्गाच्या खिडकीतून बघायला मज्जा यायची. सकाळी घरून निघताना पावसाची काही लक्षणे नसल्यामुळे छत्री वैगरे जवळ नसायचीच. शाळेचा पहिलाच दिवस असल्याने पाऊस आला तर शिक्षक चक्क शाळा सोडून द्यायचे. मग पहिल्या पावसात मस्त भिजत घरी जायचे. पुढे देखील कधी गडगडाटी वादळी पाऊस झाला आणि गावातले आजूबाजूचे नाले, वहाळ भरून वाहू लागले की लगेच शाळा सुटायची. रस्त्यावर वाहणारे पाण्याचे छोटे छोटे ओहोळ तुडवत जायला मज्जा यायची. काही मुलं प्लास्टिकचे मोठे काळे बूट ज्यांना गमबूट म्हणायचे ते घालून यायची. त्या बुटात देखील पाणी भरायचे आणि चालताना एक वेगळाच पच्याक पच्याक असा गमतीशीर आवाज यायचा. तसे गमबूट आपल्याकडे देखील असावे अशी खूप इच्छा व्हायची पण जेंव्हा शाळेतली बरीचशी मुलं अनवाणी यायची ते पाहून आपण शाळेत चपला घालून जातो हेच अपराध्यासारखे वाटायचे.

खूप पाऊस पडला, वारे सुटले की कुठेतरी झाडे पडणे, दरड कोसळणे असे प्रकार हमखास व्हायचे. लाईट जायची. मग घरी रात्री कंदील, मेणबत्तीच्या प्रकाशात कामकाज चाले. रात्रभर लाईट येणार नाही अशी पक्की खबर असेल तर घराच्या माळ्यावर ठेवलेली पेट्रोमॅक्सची बत्ती पेटवली जायची. बाहेर सोसाट्याचा वारा सुटलेला असायचा. घराच्या आजूबाजूचे माड समुद्रावरून येणाऱ्या वाऱ्यावर हेलकावे घ्यायचे. त्या हलत्या माडांच्या आकृत्या अंधारात खूप भीतीदायक वाटायच्या. माड आपल्या घरावर पडतात की काय अशी भीती वाटायची. वाऱ्यामुळे नारळ, झावळी पडून कधी कधी कौले फुटायची. लाईट गेली मज्जा व्हायची. घरच्या अभ्यासाला सुट्टी मिळायची. अगदी परीक्षा असेल तरच आम्ही दिव्याच्या प्रकाशात अभ्यास करायचो. (दिव्याच्या प्रकाशात रोज अभ्यास केला असता तर मी थोरा-मोठ्यांच्या पंगतीत जावून बसलो असतो हा पांचट विनोद आवरावा असं मनापासून वाटल्यामुळे आवरतोय :D). मग अशावेळी मेणबत्ती बरोबर खेळ सुरु व्हायचे. मेणबत्तीतून सांडणारे गरम गरम मेणाचे थेंब बोटावर जमा करून चिमटीत पकडून आपल्या हाताचे ठसे त्यावर घेणे हा आवडता खेळ असायचा. टीव्हीवर लागणाऱ्या एक शून्य शून्य, हॅल्लो इन्स्पेक्टर, व्योमकेश बक्षी ह्या धारावाहिक मालिकांचा तो परिणाम होता. त्याचप्रमाणे मेणबत्तीतून सांडलेले मेण गोळा करून शिवण कामाच्या रिकाम्या रिळाच्या पुठ्ठ्याच्या नळीत भरून त्यामध्ये दोरा टाकून एक नवी मेणबत्ती बनवणे हा ही पावसाळ्यातला अजून एक हंगामी उद्योग. मेणबत्तीशी खेळल्यामुळे बरेचदा ओरडा मिळायचा. मग मेणबत्तीच्या उजेडात बोटांचे निरनिराळे आकार करून भिंतीवर ससा, हरीण अश्या प्राण्यांच्या सावल्या बनवत बसायचो. अजून एक आवडता उद्योग म्हणजे चपातीच्या पिठाचा एक गोळा घेवून त्यापासून टीव्हीवर लागणाऱ्या कार्टूनप्रमाणे सुपरमॅन, स्पायडरमॅनच्या प्रतिकृती बनवणे. सुपरमॅन, स्पायडरमॅन उभे रहावे म्हणून त्यांच्या हातापायात आधारासाठी उदबत्तीच्या काड्या घालणे. ही सुपरमॅन स्पायडरमॅन मंडळी मी झोपेपर्यंत माझ्याबरोबर असत पण सगळे झोपले की घरातले उंदीर बिचार्यांचा फडशा पाडत.

त्या काळी दळणवळणाची साधने आजच्या इतकी जलद नसल्याने मुंबईत छापले जाणारे लोकसत्ता, महाराष्ट्र टाईम्स, नवाकाळ हे पेपर रत्नागिरीत संध्याकाळनंतरच मिळत. मोठा भाऊ ऑफिसमधून येताना पेपर घेवून येई. तेंव्हा मुंबई आणि महाराष्ट्रातल्या ताज्या बातम्या रात्री वाचल्या जात. गावात आजूबाजूला खूप सारी दाट झाडे असल्याने उन्हाळ्यातदेखील फार उकडत नसे. पावसात तर गारठा पडे. अश्या गार वातावरणात भाकरीबरोबर माश्याचे कालवण किंवा मातीच्या मडक्यात शिजवलेली चिंगळे, कुर्ल्यांचा रस्सा नाहीतर साधं कुळथाचे गरमा गरम पिठलं आणि उन्हाळ्यात केलेल्या पापड, फेण्या, सांडगी मिरची हाणण्यात अवर्णनीय आनंद मिळायचा.

पुढे सातवीपासून रत्नागिरीमधल्या हायस्कूलला जायला लागलो. त्या शाळेतली दरवर्षीची आठवण म्हणजे शाळा आणि पावसाळा सुरु झाला की शाळेच्या आवारात फुलणारा गुलमोहर. तो गुलमोहर फुलांनी असा काही डवरलेला असायचा की पहातच रहावं. आज ही तो गुलमोहर पावसाच्या आणि लहानपणीच्या भरगच्च आठवणी घेवून मनाच्या एका कोपऱ्यात आहे.

ShareThis