Showing posts with label सुट्टी. Show all posts
Showing posts with label सुट्टी. Show all posts

Wednesday, October 22, 2014

मेकिंग ऑफ आकाशकंदिल

शाळेत असताना सहामाही परीक्षा संपून दिवाळीची सुट्टी लागली रे लागली की धांदल उडे. सहामाहीचा शेवटचा पेपर आणि दिवाळीचा पहिला दिवस यात 3-4 दिवस मिळत. त्या 3-4 दिवसात किल्ला आणि कंदील बनवणे ही दोन महत्वाची कामे असायची. स्वयंपाक घरात लाडू, करंजी, चकली अश्या पदार्थांची तयारी सुरू असायची आणि अंगणात आम्ही किल्ल्यासाठी माती कालवून बसायचो. दुपारी उन डोक्यावर यायच्या आत किल्ल्याचे काम करायचे. त्याच बरोबर चिवड्याचे पोहे आणि इतर जिन्नस वाळवण्यासाठी अंगणात ठेवले जायचे त्यावर पहारा द्यायचा. दुपारी भर उन्हात बाहेर जायला मनाई असायची म्हणून त्या वेळात आकाशकंदिलाचे काम करायचे. संध्याकाळी उन्हे कलली की पुन्हा किल्ला मोहिम आणि रात्री परत आकाशकंदिल असे दरवर्षीचे वेळा पत्रक असायचे. पुढे शाळा संपल्यापासून किल्ल्याचे काम पुढील पिढीच्या हाती सोपवल्यामुळे केवळ आकाशकंदिल हे मुख्य काम राहीले आहे. यथावकाश स्वयंपाक घरात प्रवेश मिळाला आणि चकली, करंजी आणि शंकरपाळी विभागात हातभार लागू लागला. पोटापाण्याला लागल्यावर देखील दिवाळीच्या आधी दोन दिवस आकाशकंदिल हाच मुख्य प्रोजेक्ट असतो. सेवानिवृत्त झाल्यापासून बाबानीं देखील या कामात लक्ष घालण्यात सुरूवात केलीय. कंदिलाची मुख्य कलाकुसर तेच करतात. त्याचीच एक सचित्र झलक. आज ही आम्ही पारंपारीक त्रिकोणी-चौकोनी बाजू असलेला आणि लांबलच्चक शेपटीवाला आकाशकंदिल बनवतो. त्यासाठी बांबूच्या काड्यांचा एक साचा तयार करून ठेवलेला आहे. कंदिलाचे कागद आणि पर्यायाने कंदिलाचा रंग हाच मुख्य आणि एकमेव बदल दरवर्षी असतो. दिवाळी झाली की कंदिल माळ्यावर जपून ठेवणे आणि पुढील दिवाळीच्या आधी "स्वच्छ घर" मोहिमे दरम्यान तो साफ करून खाली काढणे हे पहिले काम.

साफ केलेला कंदिलाचा साचा.

कंदिलाच्या कोरीव कामासाठी बाबानीं 2-3 वेगवेगळ्या आकाराचे खीळे टोकाकडून तासून एक छोटेसे Tool Kitच बनवले आहे. त्याचा वापर करून कंदिलाच्या त्रिकोणी आणि चौकोनी बाजूचे कोरीव काम करताना.

कंदिलाला लावण्यासाठी करंज्या

कंदिलाच्या कोपर्‍यानां लावण्यासाठी फुले

कंदिल बिटा वर्जन ;-)

धनत्रयोदिशी पहिला दिवा लागतो दारी, कंदिल आणि दिव्यांनी रात्र उजळते सारी

मोठ्या कंदिलाला कंपनी म्हणून लावयच्या छोट्या छोट्या कंदिलांची जबाबदारी अस्मादिकांची. त्याचा हा एक कोलाज.

|| शुभ दीपावली ||

Tuesday, August 7, 2012

साला एक मच्छर...

नेहमीप्रमाणेच एक इश्यू आला आणि पाहता पाहता डोक्यावर बसला. कस्टमरचा डेटा Encrypt होत नव्हता म्हणजे आमच्या प्रॉडक्टचा मुख्य उद्देश धाब्यावर बसवला गेल्यामुळे आणि त्यात तो कस्टमर म्हणजे एक इंटरनॅशनल बॅंक असल्याने हा इश्यू अगदी मॅनेजर लोकांच्या पण बापांपर्यंत जाऊन पोहोचला होता. आमचे डेटा एनक्रीप्ट/डिक्रीप्ट करणारे प्रॉडक्ट म्हणजे आपल्या WinZip/UnZip सारखेच पण डेटाची सेक्यूरिटी हा मुख्य उद्देश आणि त्यात ते कस्टमरला विकले जात असल्याने जरा "लै भारी" प्रकारातले. प्रॉब्लेम असा होता की कस्टमरचा एनक्रीप्टेड डेटा USB पेन ड्राइव्ह लावून कॉपी करता येत होता. कुणीही ऐरा गैरा माणूस ती सगळी महत्वाची माहिती वाचू शकत होता. त्यात हा डेटा बॅंकेचा म्हणजे प्रश्न अधिकच नाजूक.

नेमका हा इश्यू शुक्रवारी मध्यरात्री रिपोर्ट केला गेल्यामुळे शनिवारी सकाळी सकाळी फोनाफोनी होऊन आमची सगळी टीम हाफिसात. दुपारपर्यंत सोल्यूशन मिळाले. टेस्टिंग टीममधील विभोरला टेस्ट सेटअप तयार करायाला सांगून मी बिल्ड सुरू केले. बिल्ड पूर्ण व्हायला तासभर तरी लागणार होता. ऐन विकांतात सकाळ पासून दगदग झाल्याने म्हणून मी जरा आरामातच खुर्चीत मागे रेलून मॉनिटरवर लक्ष ठेवून होतो. उगाच बिल्ड फेल झाले तर लगेच कळेल, त्यात आणखी वेळ जायला नको म्हणून. बिल्ड आणि स्टेटस रिपोर्टची वाट पाहाणारे अनेक जण होते त्यामुळे सगळे डिटेल्स भरायला सुरूवात केली. रिपोर्ट लिहीत असतानाच अचानक डाव्या हाताला काहीतरी टोचले. पहातो तर डास. मस्तपैकी रक्त शोषित बसला होता. वातानुकुलित वातावरणात मध्येच हा डास कुठून आला मला कळेना. रिपोर्ट पूर्ण करायची गडबड असल्याने मी फार विचार देखील करीत बसलो नाही. नुसताच हात झटकून त्याला पळवून लावला आणि यूनिट टेस्टमध्ये काय काय टेस्ट्स रन केल्या आहेत याची माहिती भरू लागलो..

त्या टेस्ट केसेस लिहिताना अचानका माझ्या लक्षात आले की जरी कस्टमरचा इश्यू फिक्‍स झाला असला तरी आत्ताच एका साध्या डासाने आपला कोड ब्रेक केला. आपले एनक्रीप्टेड रक्त आपले प्रॉडक्ट न वापरता डिक्रीप्ट करून एक डास शोषून गेला. आपले प्रॉडक्ट फेल गेले. इतकी साधी टेस्ट केस आपल्या लक्षात आली नाही. याचा अर्थ हा बग पूर्णपणे फिक्‍स झालेला नाही. जर हे बिल्ड पास करून आपण कस्टमरला दिले असते आणि हा इश्यू जर कस्टमरला पुन्हा सापडला असता तर काही खरे नव्हते. डायरेक्टर, व्हीपी आणि कुणी कुणी अश्या वरच्या लेवलच्या माणसापर्यंत आपली तक्रार गेली असती. आमच्या कंपनीमधील एक साधा डास तुमच्या इंजिनियरने लिहालेला प्रोग्रॅम ब्रेक करू शकतो अश्या शब्दात कस्टमरने टेक-सपोर्टला सुनावले असते आणि टेक-सपोर्टने असला भिकार फीडबॅक पार CEOच्या कानावर घातला असता. कंपनीचे शेअर्स धाडकन खाली पडले असते. आणि आपली तर पार नोकरीतून हाकलपट्टीच. आणि ह्या सगळ्याला कारणीभूत कोण तर साला एक मच्छर....

नुसत्या विचारानेच मला दरदरुन घाम फुटला. घशाला कोरड पडली. मी समोरच डेस्कवरची पाण्याची बाटली उचलून तोंडाला लावली पण हे काय??? मला पाणी पिताच येत नव्हते. अरे देवा, अजुन एक इश्यू. आमच्याच कंपनीमध्ये एनक्रीप्ट केलेले पाणी मलाच डिक्रीप्ट करून पिता येत नव्हते. आमच्ये एनक्रीप्शन/डिक्रीप्शनचे अल्गोरिदम्स साध्या साध्या गोष्टीत फेल होत होते. ह्या इतक्या साध्या चिंधी टेस्ट केसेस आजवर कुणीच कश्या रन केल्या नाहीत? टेस्टिंग टीम काय माशा मारीत होती? टेस्ट प्लानचा रिव्ह्यू कुणी केला? एक ना अनेक. कुणा कुणाला मेल लिहु आणि कुणा कुणाची तक्रार करू असे झाले होते. इतक्यात विभोर माझ्या क्यूबमध्ये आला आणि म्हणाला "सेटअप रेडी हो गया है. बिल्ड रेडी हो जाएगा तो रिलीज नोटस् के साथ मेल भेज देना." मी त्याला म्हटले "अबे काहे का बिल्ड और काहे का रिलीज. इधर बडा गेम हो गया है. साला एक मच्छर अपना कोड ब्रेक कर गया. और उपर से पानी भी डिक्रीप्ट नही हो रहा है." हे ऐकून विभोर पण एकदम टरकून म्हणाला "अरे क्या बात कर राहा है?".



"अरे क्या बात कर राहा है? बिल्ड रेडी हुवा की नाही?" विभोर माझा खांदा धरून मला गदागदा हलवून विचारात होता? मी खडबडून जागा झालो आणि विभोरला म्हटले "दो बग और है. मेजर इश्यू हुवा है" विभोर म्हणाला "कौन से बग? मैने टेस्ट बिल्ड पर तो सारे टेस्ट केसेस रन कीये. सारे के सारे पास हो राहे है. तूने कौन से टेस्ट रन कीये? और तेरे को ईतना पसिना क्‍यू छूट रहा है बे? ले पानी पिले." असे म्हणून त्याने पाण्याची बाटली माझ्या हातात दिली. अरेच्च्या म्हणजे हे स्वप्न होते तर? ... असा विचार करीत करीत मी घाबरत घाबरत मी ती बाटली तोंडाला लावली तर पुन्हा तेच. मी ते एनक्रीप्ट केलेले पाणी पिऊ शकत नव्हतो. म्हणजे हे स्वप्न नक्कीच नव्हते. आमचे प्रॉडक्ट खरोखरीच ते पाणी डिक्रीप्ट करू शकत नव्हते. "देखा देखा. पानी डिक्रीप्ट नहीं हो रहा है रे" बाटली उलटी करून बाटलीकडे बोट दाखवून मी विभोरला म्हटले. विभोर पहिल्यापेक्षाही विचित्र नजरेने आणि त्रासिक चेहर्‍याने माझ्याकडे पहात म्हणाला "अबे ढक्कन, बोतल का ढक्कन तो खोल..."

अरेच्च्याsss... म्हणजे मी बाटलीचे बुच्च न काढताच ते 'सो कॉल्ड' एनक्रीप्टेड पाणी पिण्याचा प्रयत्न करीत होतो तर... मी पुन्हा शांतपणे सगळा विचार केला आणि सगळ्याचा उलगडा झाला. मला माझेच हसू आले. ती बिल्ड होताना खुर्चीत आरामात रेलून बसल्याने मला छोटीशी डुलकी लागली आणि ते भीतीदायक स्वप्न पडले होते. स्टेटस पाहिले तर बिल्ड रेडी झाले होते. विभोर अजुन ही वेड्यासारखाच माझ्याकडे पहात होता. त्याच्याकडे पाहून हा सगळा घटनाक्रम, स्वप्न आणि प्रॉडक्टमध्ये नसलेले बग हे सगळे समजावून त्याला अजुन गोंधळात टाकण्यापेक्षा मी त्याला म्हटले "अरे कोई नहीं. बिल्ड रेडी हो गया है. मैं अभी मेल भेज देता हूँ. तुम रिलीज टेस्टिंग शुरू कर दो."

विभोरला देखील मी काहीतरी बरळत होतो हे कळले म्हणून जाता जाता तोही बोलला .

"आप एक काम करो. एक बार यह बिल्ड आ जाए तो फिर आप एखाद हप्ते की छुट्टी लेके अपने गाँव हो आओ. वहाँ समंदर के एनक्रीप्टेड पानी में मछली पकड़ोगे नां तो सब ठीक हो जाएगा... :D "

=========================================================

Image Courtesy : Google Images

ता.क. - ही पोस्ट काम धंद्यावर आधारित असल्याने काही संदर्भाबाबतीत जरा जडावली आहे. त्यातून "आमी लैई भारी" वैगरे भासवण्याचा अजिब्बात उद्देश नाही. :-)

Tuesday, June 7, 2011

७ जूनच्या आठवणी

आज ७ जून. ७ जून ह्या तारखेला लहानपणापासून मनात एक खास स्थान आहे. ७ जूनला शनिवार रविवार नसेल तर ह्याच दिवशी शाळा सुरू व्हायची. दीड-दोन महिन्याची सुट्टी, मुंबईहून आलेले पाहुणे, सुट्टीत रत्नागिरीत आलेल्या माझ्या चुलत भावाबरोबर केलेली धमाल आणि आंबे, फणस, काजू असं सगळंच मे महिन्याअखेर संपून जायचे. माझ्या भावाचीदेखील शाळा सुरू होणार असल्याने तो मे महिन्याअखेर परत मुंबईला जायचा. मग शाळा सुरू होईपर्यंतचा एक आठवडा खायला उठायचा. काय कारायचे कळायचे नाही. घरचे लोकं पावसाळ्यात चुलीला आणि आंघोळीसाठी असलेल्या बंबात टाकायला लाकडे जमा करून ठेव, लाकडे साठवण्याच्या खोपटाला पावसाचे पाणी आत जाऊ नये म्हणून माडाच्या झावळ्यानीं नीट शाकारून ठेव अश्या कामात मग्न असत. मी काडी पैलवान असल्यामुळे श्रम पडतील अश्या कामात माझा सहभाग नसायचा. त्याकाळी टीव्हीची इतकी क्रेझ नव्हती. केवळ दूरदर्शन असल्यामुळे कार्यक्रमदेखील जास्त नसायचे. त्यामुळे कधी एकदा शाळा सुरु होते आहे असे व्हायचे.

शेवटी एकदाचा ७ जून उजाडायचा. ७ जून म्हणजे नव्या कोऱ्या वह्या पुस्तकांचा वास. एखाद्या वर्षी नवीन गणवेश. पुढच्या शैक्षणिक वर्षात गेल्यामुळे नविन वर्ग. नविन वर्गशिक्षक. वर्ग् शिक्षकांकडे हजेरीचा नविन कॅटलॉग. हजेरीसाठी नवा पट क्रमांक. नविन वर्गात नविन जागा. बसायला भारतीय बैठकच असे. वर्गात लाकडी बाके वैगरे इंग्रजी माध्यमांच्या शाळेतच असतात असे ऐकून होतो. कुणीही कुठेही बसण्याची मुभा असल्याने आपल्या मित्र मंडळींबरोबर बसून घ्यायचे. अगदीच उंच मुलांना शिक्षक मागे बसवायचे. टगी मुलं टेकायला भिंत असावी म्हणून मागेच बसायची. पहिल्या दिवशी एखाद्या ठिकाणी बस्तान मारले की जोपर्यंत गडबड करणे किंवा अन्य काही कारणाने शिक्षकांनी तुम्हाला उठवले नाही तर वर्षभर तीच तुमची जागा. गावात नगरपरिषदेची शाळा होती. सकाळी १० वाजता भरायची. आजूबाजूच्या वाड्यांमधून मुले घोळक्याने चालत यायची. काही एकएकटी. माझे घर शाळेपासून फक्त २ मिनिटांच्या अंतरावर होते. शाळेत शिपाई वैगरे कुणी नसायचा त्यामुळे शाळा भरायच्या आधी पहिली पंधरा मिनिटे सफाईसाठी असत. शाळेभोवतीचा भाग प्रत्येक वर्गाला वाटून दिलेला असायचा. त्या भागात पडणारा पालापाचोळा त्या त्या वर्गाने जमा करून एका ठराविक ठिकाणी जमा करायचा. साफसफाई करताना मुलांवर लक्ष ठेवण्यासाठी प्रत्येक वर्गात वर्गमंत्री, क्रीडामंत्री अश्या मानाच्या पदांबरोबर सफाईमंत्री देखील असे. सफाई झाली सगळी मुले पाचवीच्या वर्गात जमत. पाचवीचा वर्ग म्हणजे शाळेतला सगळ्यात मोठा वर्ग. पहिली ते सातवीची सगळी मुले त्या वर्गात मावत. आत्ताच्या काळात त्याला हॉल म्हटले तरी चालेल. त्या वर्गाच्या बाहेर एक लांबलच्चक वर्‍हाडा. तिथे सगळ्यांनी आपले चप्पल काढून ठेवायचे आणि ओळीने आत जायचे. तिथे मग प्रतिज्ञा, राष्ट्रगीत मग प्रार्थना आणि दिवसाचे पंचांग असे कार्यक्रम ठरलेले असायचे. पहिल्या दिवशी सगळी मुले एकदम उत्साही असत, सगळं कसं अगदी खणखणीत आवाजात.

बहुतेक वेळा १ जूनला केरळमध्ये दाखल झालेला मान्सून बरोब्बर ७ जूनला कोकणात पोहचायचा. त्यामुळे ७ जूनला शाळेच्या पहिल्याच दिवशी पहिला पाऊस देखील पडायचा. पावसाची पहिली सर वर्गाच्या खिडकीतून बघायला मज्जा यायची. सकाळी घरून निघताना पावसाची काही लक्षणे नसल्यामुळे छत्री वैगरे जवळ नसायचीच. शाळेचा पहिलाच दिवस असल्याने पाऊस आला तर शिक्षक चक्क शाळा सोडून द्यायचे. मग पहिल्या पावसात मस्त भिजत घरी जायचे. पुढे देखील कधी गडगडाटी वादळी पाऊस झाला आणि गावातले आजूबाजूचे नाले, वहाळ भरून वाहू लागले की लगेच शाळा सुटायची. रस्त्यावर वाहणारे पाण्याचे छोटे छोटे ओहोळ तुडवत जायला मज्जा यायची. काही मुलं प्लास्टिकचे मोठे काळे बूट ज्यांना गमबूट म्हणायचे ते घालून यायची. त्या बुटात देखील पाणी भरायचे आणि चालताना एक वेगळाच पच्याक पच्याक असा गमतीशीर आवाज यायचा. तसे गमबूट आपल्याकडे देखील असावे अशी खूप इच्छा व्हायची पण जेंव्हा शाळेतली बरीचशी मुलं अनवाणी यायची ते पाहून आपण शाळेत चपला घालून जातो हेच अपराध्यासारखे वाटायचे.

खूप पाऊस पडला, वारे सुटले की कुठेतरी झाडे पडणे, दरड कोसळणे असे प्रकार हमखास व्हायचे. लाईट जायची. मग घरी रात्री कंदील, मेणबत्तीच्या प्रकाशात कामकाज चाले. रात्रभर लाईट येणार नाही अशी पक्की खबर असेल तर घराच्या माळ्यावर ठेवलेली पेट्रोमॅक्सची बत्ती पेटवली जायची. बाहेर सोसाट्याचा वारा सुटलेला असायचा. घराच्या आजूबाजूचे माड समुद्रावरून येणाऱ्या वाऱ्यावर हेलकावे घ्यायचे. त्या हलत्या माडांच्या आकृत्या अंधारात खूप भीतीदायक वाटायच्या. माड आपल्या घरावर पडतात की काय अशी भीती वाटायची. वाऱ्यामुळे नारळ, झावळी पडून कधी कधी कौले फुटायची. लाईट गेली मज्जा व्हायची. घरच्या अभ्यासाला सुट्टी मिळायची. अगदी परीक्षा असेल तरच आम्ही दिव्याच्या प्रकाशात अभ्यास करायचो. (दिव्याच्या प्रकाशात रोज अभ्यास केला असता तर मी थोरा-मोठ्यांच्या पंगतीत जावून बसलो असतो हा पांचट विनोद आवरावा असं मनापासून वाटल्यामुळे आवरतोय :D). मग अशावेळी मेणबत्ती बरोबर खेळ सुरु व्हायचे. मेणबत्तीतून सांडणारे गरम गरम मेणाचे थेंब बोटावर जमा करून चिमटीत पकडून आपल्या हाताचे ठसे त्यावर घेणे हा आवडता खेळ असायचा. टीव्हीवर लागणाऱ्या एक शून्य शून्य, हॅल्लो इन्स्पेक्टर, व्योमकेश बक्षी ह्या धारावाहिक मालिकांचा तो परिणाम होता. त्याचप्रमाणे मेणबत्तीतून सांडलेले मेण गोळा करून शिवण कामाच्या रिकाम्या रिळाच्या पुठ्ठ्याच्या नळीत भरून त्यामध्ये दोरा टाकून एक नवी मेणबत्ती बनवणे हा ही पावसाळ्यातला अजून एक हंगामी उद्योग. मेणबत्तीशी खेळल्यामुळे बरेचदा ओरडा मिळायचा. मग मेणबत्तीच्या उजेडात बोटांचे निरनिराळे आकार करून भिंतीवर ससा, हरीण अश्या प्राण्यांच्या सावल्या बनवत बसायचो. अजून एक आवडता उद्योग म्हणजे चपातीच्या पिठाचा एक गोळा घेवून त्यापासून टीव्हीवर लागणाऱ्या कार्टूनप्रमाणे सुपरमॅन, स्पायडरमॅनच्या प्रतिकृती बनवणे. सुपरमॅन, स्पायडरमॅन उभे रहावे म्हणून त्यांच्या हातापायात आधारासाठी उदबत्तीच्या काड्या घालणे. ही सुपरमॅन स्पायडरमॅन मंडळी मी झोपेपर्यंत माझ्याबरोबर असत पण सगळे झोपले की घरातले उंदीर बिचार्यांचा फडशा पाडत.

त्या काळी दळणवळणाची साधने आजच्या इतकी जलद नसल्याने मुंबईत छापले जाणारे लोकसत्ता, महाराष्ट्र टाईम्स, नवाकाळ हे पेपर रत्नागिरीत संध्याकाळनंतरच मिळत. मोठा भाऊ ऑफिसमधून येताना पेपर घेवून येई. तेंव्हा मुंबई आणि महाराष्ट्रातल्या ताज्या बातम्या रात्री वाचल्या जात. गावात आजूबाजूला खूप सारी दाट झाडे असल्याने उन्हाळ्यातदेखील फार उकडत नसे. पावसात तर गारठा पडे. अश्या गार वातावरणात भाकरीबरोबर माश्याचे कालवण किंवा मातीच्या मडक्यात शिजवलेली चिंगळे, कुर्ल्यांचा रस्सा नाहीतर साधं कुळथाचे गरमा गरम पिठलं आणि उन्हाळ्यात केलेल्या पापड, फेण्या, सांडगी मिरची हाणण्यात अवर्णनीय आनंद मिळायचा.

पुढे सातवीपासून रत्नागिरीमधल्या हायस्कूलला जायला लागलो. त्या शाळेतली दरवर्षीची आठवण म्हणजे शाळा आणि पावसाळा सुरु झाला की शाळेच्या आवारात फुलणारा गुलमोहर. तो गुलमोहर फुलांनी असा काही डवरलेला असायचा की पहातच रहावं. आज ही तो गुलमोहर पावसाच्या आणि लहानपणीच्या भरगच्च आठवणी घेवून मनाच्या एका कोपऱ्यात आहे.

Monday, June 14, 2010

सुट्टी संपली!!!



तिकडे कोकणात मस्त पाऊस सुरू झालाय. मुलांच्या शाळा पण आजच सुरू झाल्या. शेतकरी नांगरणीच्या कामाला लागले आणि मी पण मानेवर जोत घेऊन कामाला जुंपून घ्यायला परत आलो. गेला महिनाभर ईमेल, प्रोजेक्ट, ब्लॉग, बझ्झ सोडाच पण कंप्यूटरचा पण थोबाड बघितलं नाही. नुसतं उठा, फर्माईशी करा, आंबे चोखा, कोंबडी, बोकड, कुर्ल्या, कालव्, एक शिंपी, मासे .... हाणा आणि पुन्हा ताणून द्या. पोट भरलं की झोपा आणि भूक लागली की उठा असा साधा सोपा मार्ग होता. आणखी खूप काही लिहायचे आहे पण आत्ता पुर्वी सारखी सवय नाही राहिली. चार ओळी लिहून दमलो... गेल्या महिन्याभरात जे काय चार फोटो मारले ते पहा आणि गोड मानून घ्या...



ShareThis