Saturday, January 30, 2010

क्षत्रिय कुला"वसंत"

वसंत नावाचा माझा एक मित्र. पुण्यात असताना ह्या दिव्य व्यक्तीशी माझी ओळख झाली. एक अविस्मरणीय व्यक्तिमत्व. आपल्या घराण्याचा फार अभिमान होता त्याला. कधी काळी पणजोबा खापर पणजोबांनी कुठे राजेशाही अनुभवली होती पण लौकिक अर्थाने राजेशाही गेली तरी पणजोबा खापर पणजोबांचे रक्त मात्र आज ही ह्यांच्या धमन्यांमधून वाहतं आहे. हल्लीच्या युगात देखील ह्यांच्या घरी मानपान, घराण आणि तत्सम राजेशाही थाट टिकून आहेत. पण 'राजविलासी आणि घोडे पलंगाशी' अशा पार्श्वभुमीतून डाइरेक्ट आमच्या सारख्या सामान्य मावळ्यांमध्ये येऊन पडल्यामुळे त्याची 'न घर का ना घाट का' अशी परिस्थिती झालेली. त्याचे जगण्याचे आणि जगाबाद्दलचे फंडे वेगळेच होते आणि शिक्षण संपल्यावर प्रथमच घराबाहेर पडल्यावर खरोखराच्या जगात आपले फंडे संभाळाताना त्याचे हाल झाले.

जे लोकं आम्हा दोघांना ओळखतात आजसुद्ध मला प्रत्यक्ष किंवा फोन वर भेटल्यानंतर पहिल्यांदा "त्याची" चौकशी करतात. "तो" काय म्हणतो किंवा "त्या" चे नवीन पराक्रम (आमच्या भाषेत गेम) याबाबत विचारणा आधी होते. अर्थात "त्या"ला भेटलेला "त्या"च्या सोबत चार "गोष्टी" बोललेला, त्याचे जगावेगळे फंडे ऐकलेला माणूस त्याला विसरणे अशक्य. व्यक्तिमत्वच असे आहे. एखादी सरळ साधी गोष्ट बेकायदेशीररित्या करण्यात ह्याला परमानंद मिळतो. मग ते काही असो. आमची जेंव्हा सुरुवातीला ओळख झाली तेंव्हा माणूस मरणाचा कन्फ्यूज़ होता. विषय काही असो, ह्याचे काही ठराविक फंडे. त्याच्या चौकटीमध्ये काही बसल नाही की माणूस खचला. त्यावेळी आम्हा सगळ्यानाच जॉबची घाई होती. कधी कधी कोणा मित्राला जॉब मिळाल्याची खबर येई. मग तो कुठल्याही डोमेन मधला असो. ज्याला जॉब मिळेल त्याची लाईन चांगली. कोणाला नेटवर्किंग मध्ये जॉब मिळाला की हा सुरू झाला, "अबे तो कोर्स साही आहे. xyz ला Offer लेटर मिळाला आहे, त्याचा Format घेऊ. अमुक अमुक ठिकाणी Experience लेटर बनवून मिळतात. आपण तस करू, १-२ Fake Project टाकु. मस्त जॉब लागून जाईल." बाकी मार्कशीट, लेटरहेड आणि तत्सम प्रकार कुठे छापून मिळतात हे ह्याला माहीत. मला तर वाटते ह्याने मोठा झाल्यावर आपले २-३ फेक जन्मदाखले बनवून घेतले असतील. ना जाणो उद्या जॉब च्या वेळी वय आडवे आले तर लगेच २ वर्षानी माणूस लहान. वय, अनुभव, आणि जे काही बदलता येईल ते सगळ शक्य. कुठेही कसली डिपेंडेन्सी नाय पाहिजे. हा इंजिनियरिंग पास झाला तेंव्हा खुद्द ह्याच्या आजोबांनी "हे पोट्ट पहिल्याच फटक्यात पास झालं म्हणजे दाल मे कुछ काला है" असे कौतुकाचे उद्‌गार काढले होते. ड्यूप्लिकेट चाव्या बनवणे हा आणखी एक आवडता उद्योग. बेकायदेशीर गोष्टींचा पुरस्कर्ता. एकाचे पासपोर्टचे काम सुरू होते. सगळे व्यवस्थित पार पडले होते. ज्याचे काम होते त्याने सगळे चौकटीमध्ये केले होते. पण हे साहेब काही मान्य करायला तयार नाहीत. "अबे तू पोलिसाना काहीतरी द्यायला हवे. नाहीतर ते तुला कुठेतरी अडकवतील. तुला द्यायचे नसतील तर नको देऊ, मी देतो." जणू काही कोप होईल आणि पासपोर्ट पचणार नाही. पण नाही... अशी कामे कायदेशीर होऊच शकत नाहीत. झाली तरी मी होऊ देणार नाही. हल्ली Dual सिम कार्डचे मोबाइल मिळतात, पण ह्या सदगृहस्थाकडे ही सिस्टम ४ वर्षापूर्वी अस्तित्वात होती. कुठून काळ्या कांड्या करून ह्याने तो सिम कार्ड स्विच आपल्या मोबाइल मध्ये अक्षरश: घुसुवन बसवला होता. बर दोन वेगळे नंबर असण्याची काही गरज नव्हती, पण...

झोल करायची इतकी आवड की मध्ये टेलिफोन डिपार्टमेंट मध्ये जागा भरायच्या होत्या. चांगली मोठी पोस्ट होती. साहेबाना कुठून तरी खबर लागली. भरला फॉर्म. त्यामध्ये नेमणुकीसाठी तीन पसंतीची ठिकाणे द्यायची होती. साहेबानी पहिली पसंती बिहारला दिली. का तर तिथे बेकायदीशीर कामा शिवाय काहीच होत नाही. क्रिकेट खेळणारा माणूस जसे लॉर्ड्स वर खेळण्याचे स्वप्न पाहत असेल तसे हे बिहार मध्ये जाउन भ्रष्टाचार करायला उतावळे झालेले.

कला क्रीडा साहित्य ह्या विभागांमध्ये अत्यानंद. कोणाची शेपूट कोणाला लावेल ह्याचा पत्ता नाही. मध्यंतरी ब्रायन लाराने ४०० धावा करून विश्वविक्रम नोंदवला. आम्ही त्याबद्दल बोलत होतो. साहेब पण आमच्या बरोबर होते. डोक्यामध्ये नेहमीप्रमाणे किडे वळवळ करत होते. आमच्या बोलण्याकडे पूर्ण लक्ष्य नव्हते. पण मध्येच काही तरी आपला सहभाग दाखवावा म्हणून "काय केले लारा दत्ता ने ?" असा प्रश्न टाकून दिला. उद्या अभिनव बिन्द्राने सचिन तेंडुलकरचा क्रिकेट मधला विक्रम ओलिंपिक मध्ये मोडला हे संगितल तरी तो माझ्याकडे विचित्र नजरेने बघणार नाही, उलट हे व्यवस्थित लक्ष्यात ठेवून उद्या दुसर्‍या कोणाला तरी ठसका लावेल ह्याची खात्री आहे. तसा तो कला क्रीडा साहित्या ह्या विभागामध्ये मलाच काय पण कुणालाही नडणार नाही. कारण ह्याला साप्ताहिक/मासिक/पेपर मध्ये भविष्य आणि पेज थ्री बातम्या आणि काही आकर्षक फोटो हे सोडून बाकी कश्याशी पडलेली नसते. राजकारणात थोडेफार स्वारस्य आहे पण ते राजकारणात नसून राजकारणामुळे मिळणार्‍या गोलमाल करण्याच्या ताकदीत आहे हे वेगळं सांगायला नको.

आत्ता पोरीबाबत. ह्या बाबतीत ह्यानी आध्यात्मिक पातळी गाठलेली. M G रोड वर आढळणार्‍या सगळ्या पोरी xxx हा नियम. एखादी मुलगी ही मैत्रीण वैगरे असूच कशी शकते? एक मुलगा आणि एक मुलगी एकत्र आले म्हणजे केवळ "लफडं"च असू शकते. त्याला दुसरे नाव असूच शकत नाही. पोरी बरोबर मैत्री करून काय करणार? हा वरती भाबडा (?) प्रश्न. वरतीअमुक एक मुलगा एका मुलीबरोबर बोलतो तरी पण त्या दोघांमध्ये "तसलं" काही नाही मग काय आहे? दुसर असूच काय असु शकत? बरं आमची पण कोणी खास मैत्रीण नव्हती, त्यामुळे आम्हीही कधी समाधानकारक उत्तर देऊ शकलो नाही. तसही उत्तर देऊन काही फरक पडणार नाही ह्याची खात्री अजूनही आहे. नशीब माणसाने "दोस्ताना" नाही पहिलाय. आम्ही कोणी त्याला बघावा म्हणून आग्रह ही करणार नाही. ह्याची केमिस्ट्री बदलून "गे"मिस्ट्री व्हायला नको. आमचे जिणे मुश्कील होऊन जाईल. ह्याचे फंडे बदलले म्हणजे ह्याच्या समोर मित्राबरोबर जायची/फिरायाची पण चोरी होईल. रूम पार्ट्नर बरोबर पण रहता येणार नाही. हा माणूस सगळ्याना वाळीत टाकेल. अजुन एक आठवल. वळू पिक्चर बद्दल बोलणे सुरू होते. मध्येच एकाने ह्याला खोचकपणे विचारले "वळू म्हणजे काय माहीत आहे?" उत्तर: "अबे हा वळू धड बैल ही नसतो धड गाय ही नसते... मधलाच असतो... काही कामाचा नसतो मग त्याला सोडून देतात गावभर, त्याला वळू म्हणतात..." साहेबाना सर्वसामान्य स्त्रीलिंग व्यर्ज आहे. त्यांच्यासाठी तीन लिंग. पुल्लिंग, डार्लिंग आणि नपूसक लिंग.

हे सगळे फंडे असून माणूस शेवटी एक दिवस प्रेमात पडला. पडला म्हणजे कोसळला. पोरीबद्दल जे फंडे होते ते विसरला. पोरगी बरोबर लफडं सोडून नुसतं प्रेम देखील करू शकतो हे साहेबाना समजले. सध्या साहेब प्रेमात गुंतलेले आहेत. आणि त्यामुळे जरा नॉर्मलला आलेले आहेत. पण आमचे वांदे झालेत. आमच्या आयुष्यातली मज्जा निघून गेली आहे. बघू प्रकरण किती आणि कसे पुढे जाते.

हा माणूस म्हणजे आमच्या अळणी आणि बेचव आयुष्यामधले मीठ आहे. ह्याच्यामुळे कित्येकदा आम्ही मनापासून खळखळून हसलो आहोत. एकदा एकदा सगळ्याना वाटता ह्याचे फंडे समजले. आत्ता हा माणूस आपल्याला कळला पण नाही. साहेबाकडे फंडे अनलिमिटेड. ह्याच्याबद्दल लिहावं असं कधीपासून मनात होत. शेवटी लिहलं एकदाचं. काय काय आणि किती लिहावं कळतं नव्हतं. काही गोष्टी आठवल्या पण नाहीत. ह्या माणसाला कागदावर उतरवणे सोप नाही.

~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
अशीच काही मला भेटलेली माणसं
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~

Saturday, January 9, 2010

मराठी ब्लॉग विश्ववरील वाढत्या चोर्‍या

काळ दुपारी मराठी ब्लॉग विश्वला भेट दिली. पहिल्याच पानावर "कशी मुलगी पाहिजे?" ह्या शीर्षकाने लक्ष वेधून घेतले. आत्ता हल्ली लग्न हा जिव्हाळ्याचा विषय असल्याने लगेचच त्या लिंक वर क्लिक करून वाचू लागलो. पहिल्या चार ओळी वाचताच हे आधी कुठेतरी वाचलय हे जाणवले. मध्यंतरी अजयने मुली, लग्न ह्या विषयांवर लिहलं होतं ते आठवलं म्हणून त्याचा ब्लॉग चाळला पण मला हवी असलेली पोस्ट त्याच्या ब्लॉग वर नाही मिळाली म्हणजे अजयच्या ब्लॉगवरुन कुणी कॉपी केलं नव्हतं. अजुन नेहमीचे काही ब्लॉग पाहिले. तिथेही काही नाही सापडलं. मग शेवटी डिटेक्टिव गूगलची मदत घेतली. गूगलमध्ये मराठी भाषा हा पर्याय निवडून "कशी मुलगी पाहिजे?" शोधलं तर मी डिसेंबरमध्ये वाचलेली लिंक मिळाली. म्हटलं चला ह्या ब्लॉगवाल्याला कळवू की तुमचा लेख चोरी झालाय पण त्याच वेळी अजुन एका लिंकने लक्ष वेधून घेतलं. तिथे जाऊन पाहिलं तर अगदी तीच पोस्ट २००७ साली पोस्ट केलेली होती. म्हटलं साला आपण डिसेंबर मध्ये जी वाचली ती देखील चोरीचीच होती. आणि आज ज्याने पोस्ट केली त्याने माहीत नाही कुठून उचलली? मूळ ब्लॉग वरुन की चोराकडून? हा दुसरा चोर म्हणजे आधुनिक श्रीकृष्णच म्हणा ना. कृष्णाने लहानपणी गोकुळात "नंदा"घरी राहून दूध-दही चोरले आणि हा कलियुगातला कृष्ण लोकांचे लेख चोरतोय. ते देखील असे लेख जे मराठी ब्लॉग विश्ववर पोस्ट करून महिना देखील झाला नाही. पहिल्याने निदान थोडं तरी डोकं वापरलं. त्याने अडीज वर्षापुर्वीची पोस्ट ब्लॉगवर टाकली पण हा तिसरा तर चोरावर मोर. आधी मला देखील वाटलं आपण हे लिहतोय खरं पण ही एकच व्यक्ती तर नसेल? जुन्या ब्लॉगवर काही प्रॉब्लेम आला असेल म्हणून नवीन ब्लॉग सुरू केला असेल आणि एक चांगली पोस्ट म्हणून "ती" पोस्ट पुन्हा प्रकाशित केली असेल. पण सगळी खात्री करून पाहिली पण मला तरी ह्या तीन वेगवेगळ्या व्यक्ती आहेत ह्याची खात्री वाटते. आत्ता कुणाला मल्टिपल पर्सनॅलिटी डिसॉर्डर सारखा रोग असेल आणि तो रोगी हे धंदे करत असेल तर त्याला काही इलाज नाही. पुढे सगळ्या लिंक देतोय, पहा तुम्हीच तुम्हाला काय वाटते?

मूळ लेख
पहिली कॉपी
दुसरी कॉपी

आत्ता काय माहीत त्यांनी संबधित लेखकांची परवानगी घेतली देखील असेल. असं असेल तर माझे आरोप पूर्ण चुकीचे आहेत हे मी मान्य करेन पण मला तरी तशी नोंद कुठेही आढळली नाही.

पहिल्या कॉपीवाला ब्लॉग जरा नीट बघा. २००९ मध्ये ४३४ पोस्ट केल्या आहेत. आत्ता त्यातल्या किती खर्‍या किती खोट्या कुणास ठाऊक? मी काही मराठी ब्लॉगवरचे झाडून सगळे ब्लॉग वाचत नाही पण मला त्यात अजुन एक पोस्ट आढळली जी पंकजच्या ब्लॉगवर, २० जून २००९ ला पोस्ट केलेली होती, ती जशीच्या तशी उचललेली आहे. त्याने आपल्या ब्लॉगवर "मित्रानो ..तुमच्याकडे जर मराठी साहित्य असेल, तर ते मला पाठवा...मी ते ह्या ब्लॉग वर पब्लिश ...तुमच्या नावाबरोबर..मग वाट कसली बघताय ?? इथे द्या पाठवून लवकर" असे आश्वासन दिले आहे पण "कशी मुलगी पाहिजे?" आणि पंकजच्या कॉपी केलेल्या पोस्टवर तरी कुणाचंच नाव दिलेलं नाही. आत्ता "कशी मुलगी पाहिजे?" आणि पंकजची "मी फिदा आहे" पोस्ट ह्या दोन्ही मराठी ब्लॉग विश्ववर प्रकाशित झालेल्या आहेत. मग जो कुणी मराठी ब्लॉगवर आपले पोस्ट पब्लिश करत असेल तर एखाद्याला मेल करून पुन्हा तीच पोस्ट मराठी ब्लॉग विश्ववर कशाला पब्लिश करेल?

महेन्द्र काकांच्या ब्लॉगची एका साप्ताहिक पुरवणीने केलेल्या चोरीची घटना सगळ्यांना ठाऊक आहेच. गेल्याच आठवड्यात हेरंबने देखील त्याच्या ब्लॉगवरच्या चोरीबद्दल लिहलं होतं. ब्लॉगवरचे लेख ईमेल मधून forward होणे अश्या घटना देखील सर्रास घडतात. आता ही कालची घटना असो वा आधीच्या, हे चोर जेंव्हा लेख कॉपी करतात तेंव्हा ह्यांना लेखकाचं नाव कॉपी करायला काय जातं? मी काही लेखनाचा वरदहस्त लाभलेला माणूस नव्हे. मी जेंव्हा ही माझ्या ब्लॉगवर लिहतो तेंव्हा माझे निदान दोन तीन तास तरी नक्की खर्ची होतात आणि जर कुणी ctrl+c, ctrl+v ही चार बटणं दाबून ते लिखाणं आपल्या नावावर खपवतं असेल तर ते खपवून घेणं शक्य नाही. ह्या चोर्‍या कशा थांबवाव्यात ह्यावर सध्या तरी आपल्या ब्लॉगवरुन right click->copy हा option disable करणे हाच एक रामबाण उपाय दिसतो. त्याचबरोबर अशी चोरी आढळून आल्यास आपल्या ओळखीतल्या ब्लॉगर मित्र-मैत्रिणी आणि Twitter वरील लोकांना कळवून जास्तीत जास्त जणांमार्फत त्या चोराच्या पोस्टला प्रतिक्रिया म्हणून मूळ ब्लॉगची लिंक देणे हा एक मार्ग आहे. भले तो ती प्रतिक्रिया स्वीकारो अथवा न स्वीकारो, निदान आपली चोरी पकडली गेली, किंवा आपल्यावर कुणी लक्ष ठेवून आहे हे तरी त्याच्या लक्षात येईल आणि कदाचित अश्या चोर्‍या कमी होतील. जमल्यास पुढच्या रविवार पुण्यात होणार्‍या पुणे ब्लॉगर्स स्नेह मेळाव्यामध्ये हा मुद्दा देखील चर्चिला जावा. त्यातून अजुन काही उपाय सुचल्यास आपण सर्व मिळून तो अंमलात आणू शकतो.

तर गाववाल्यांनू मराठी गूगलवर जावा आणि आपली एखादी आवडीने वाचली गेलेली पोस्ट शोधून बघा, कदाचित चोरीला गेलेली असु शकते...

Monday, January 4, 2010

३ इडियट्स!!!

दिवसाढवळ्या चोरी. इथे बरेचसे चोर आहेत हे माहीत होतं पण माझ्या गेली साडेपाच सहा वर्ष बेस्टसेलर असलेल्या पुस्तकाची कथा कुणी चोरेल असं स्वप्नात देखील वाटलं नव्हतं. माझ्या कथेवर जवळपास पूर्ण सिनेमा बनवून वर माझी कथा फक्त ३ ते ५ टक्के वापरली म्हणे. तो "लूडबूड" तर म्हणे मी पुस्तकं देखील वाचलं नाही. अरे काय? मागे एकदा नुसत्या लुकसाठी त्याने निव्वळ मिशीवर किती मेहनत घेतली होती. तो त्याच्या भूमिकेविषयी किती जागरूक असतो हे दुनियेला माहीत आहे. असा हा माणूस म्हणे मी पुस्तकं वाचलं देखील नाही. कोण विश्वास ठेवेल. खरं तर त्याचा सिनेमा असेल तर दिग्दर्शनापासून ते पब्लिसिटीपर्यंत प्रत्येक कामात हा किती लूडबूड करतो हे जगाला ठाऊक आहे. इथे तर हा केवळ सिनेमाचा नायक आहे, निर्माता/दिग्दर्शकदेखील नव्हे. कथा, पटकथा ह्याच्याशी ह्याचा काडीचा देखील संबंध नाही. ह्याने सिनेमात काम केलं त्याबद्दल ह्याला त्याचे पैसे मिळाले. ह्याला मध्ये नाक खुपसायची काही गरज नव्हती. पण लूडबूड हा नाही करेल तर मग कोण करेल? जेंव्हा मी माझ्या कथेचं श्रेय मला मिळालं नाही असं म्हटलं तर हा का पेटला? निर्माता/दिग्दर्शकांनी बोलायला हवे होते तर ते आधी काहीच बोलले नाहीत. वर म्हणे की त्यांचा जो कुणी पटकथाकार आहे तो म्हणे माझ्यासारखा प्रसिद्ध नाही म्हणून कथेचं श्रेय त्याला जायला हवं. अरे काय? इथे काय दुष्काळग्रस्तांना मदत पुरवली जातेय काय की गरजवंत पाहून कथेचं श्रेय देताय. परवा तर पत्रकार परिषदेत कहर केला ह्या लोकांनी. पत्रकार परिषदेत हे लोकं कसे बोलत होते, काय भाषा वापरात होते हे सगळ्या जगाने पाहिलं. मी माझ्या लिखाणातून देश बदलावा म्हणून बँकेतलं चांगलं करियर सोडून पूर्ण वेळं लिखाण सुरू केलं तर च्यामारी इथे माझीचं कथा चोरून ह्यांनी माझाच गेम केला. सलाम आहे इथल्या लोकांना. आत्ता तो फरहान आपल्या 3 Mistakes of My Life पुस्तकावर सिनेमा बनवतोय, त्याच्याकडे आत्तापासून लक्ष ठेवायला हवे. चला. (Give me some sun shine, Give me some rain, Give me another chance, I wanna grow up once again गाणं गुणगुणत निघून जातो)

~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~

चला सलग तिसर्‍या वर्षी आपण अभिनय केलेल्या चित्रपटाने आठवडाभरात १०० करोडहून अधिक गल्ला जमवला. इंडस्ट्रीने वर्षभरात कमावलेला गल्ला एकीकडे आणि आपल्या एका चित्रपटाचा गल्ला एकीकडे. सगळं कसं सुरळीत सुरू होतं आणि ह्या भगताच्या अंगात आलं. काय काय बरळू लागलाय. आपल्या बहुतेक प्रत्येक चित्रपटाच्या वेळी हे होतचं म्हणा. दोन वर्षापुर्वी त्या अमोल गुप्तेला कसा खड्यासारखा बाजूला केला. गेल्या वर्षीदेखील आपण सोडून गजिनीची बहुतेक टीम तीच होती. तो दिग्दर्शक, नायिका, खलनायक सगळे गजिनी मध्ये दुसर्‍यादा काम करत होते पण गाजावाजा फक्त आपला. आणि का होऊ नये? मी माझ्या प्रत्येक चित्रपटामध्ये इतका झोकून देतो. सगळं कसं मला माझ्या मनासारखं हवं असतं. तर लोकं मी दुसर्‍याच्या कामात ढवळाढवळ करतो म्हणतात. आत्ता मी काम केलेला प्रत्येक चित्रपट २५०, ३०० कोटींचा व्यवसाय करत असेल तर मी केलेली ढवळाढवळ काय वाईट आहे? आणि मी त्याचं श्रेय घेतलं तर काय बिघडलं? बाकी कुणाचे चित्रपट कमावतात का इतका पैसा? पण पोटात दुखत लोकांच्या. आत्ता ह्या भगताचंच घ्या. ह्याच्याच पुस्तकावर आधारित तो सल्लूचा चित्रपट आला होता ना? कुणी बघितला तरी का तो? तेंव्हा कुणी गेलं होतं का भगताकडे की भगत त्या पडलेल्या चित्रपटाचं श्रेय घेत फिरला? आत्तादेखील चित्रपट प्रदर्शित झाल्यानंतर पहिला आठवडा हा काहीच बोलला नाही. आठवड्या भरात १०० कोटींचा आकडा पार झाल्याचं पाहून ह्याला अचानक कथेचं श्रेय हवं झालं. आत्ता त्याचं म्हणण कितीही खरं असलं तरी ह्याला खोटंचं ठरवायला हवं. पण ह्या आधी आपण अशी प्रकरण पचवली असली तरी हे प्रकरण तितकं साधं नाही. हा भगत आपल्याला भारी पडणार असं दिसतं. ह्याच्यावर लिंबू-मिरचीचा साधा उतारा उपयोगी नाही, काहीतरी मजबूत तोडगा काढला पाहिजे. पाहु जे काय करायचं ते आपल्यालाचं लवकरात लवकर करायला हवं नाहीतर तो भगत डोक्यावर बसायचा.

~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~

स्थळं: राजूचं ऑफीस. VVC आणि राजू मस्तं टामकवतं सेलिब्रेट करतं होते.

राजू: चला मुन्नाभाई नंतर बरेच दिवसांनी आपला चित्रपट मजबूत चालतोय.
VVC: आणि खोर्‍याने कमावतोय देखील. चिअर्स!!!
राजू: बस्स, स्साला हे कॉपीराइटचं लफडं मध्ये उपटायला नको होतं.
VVC: ते जाऊ दे रे. आपण ह्यावेळी त्या चरस्याला घेऊन मुन्ना भाई नाय बनवलाय. आपण त्या मि. परफेक्टला चित्रपटासाठी साइन केला ना तिथेचं आपलं काम संपलं. आत्ता फक्त बसून पैसे मोजायचे. जी काय लफडी उपटली आहेत ती तो खान बघून घेईल.
राजू: हो ते पण खरं आहे. कारण ह्यावेळी मी नावालाच दिग्दर्शक होतो. सेटवर त्याचाच आवाज होता.
VVC: वर आपलं पब्लिसिटीचं काम पण त्यानेचं केलं. कुणी तुमच्या कामात ढवळाढवळ केलेली चालतं असेल तर डोळे झाकून त्याला घ्यावं.
राजू: हो रे जिथे तिथे हा कडमड्त होता. म्हणून ह्याच्याबरोबर बहुतेक कुणी परत काम करायला मागत नाही. आणि हा बाहेर उगाचच मी कुणाबरोबर दुसर्यांदा काम करीत नाही म्हणून बढाया मारत फिरत असतो.
VVC: सोड ना आपल्याला कुठे त्याच्या बरोबर परत काम करायचंय. आत्ता ते सगळं जाऊ दे. कुणी कशाचं किती श्रेय घ्यावं ते तो लेखक, तो मि. परफेक्ट आणि पब्लिक बघून घेतील. तेवढीच चित्रपटाची पण पब्लिसिटी होईल आणि गल्ला वाढेल. आपण लांबून मज्जा बघू.
राजू: हे म्हणजे दोघांचं भांडण आणि तिसर्‍याचा लाभ म्हणतात तसं झालं. आपल्यासाठी आपला खान, तो लेखक आणि प्रेक्षक म्हणजे "३ इडियट्स" ठरले की.

हा हा हा... दोघं बराच वेळं हसत रहातातं.

Friday, January 1, 2010

नवं वर्षाची पहाटपंकज भटक्‍याकडून भटकंती पंथाची दीक्षा घेतल्यामुळे यंदाचे नवं वर्ष नेहमीप्रमाणे ३१ डिसेंबरची रात्र न जागवता नववर्षाचा सूर्योदय पाहून करावी असं ठरवलं होतं. आमचा स्कंधगिरीचा प्लॅन कित्येक दिवस ठरत होताच मग तो थर्टी फर्स्टच्या रात्रीच करावा असे ठरले. ग्रूपमधले कुणी "डोलकर" पार्टीतले नसल्याने पोट्टे देखील तयार झाले. काल रात्री पावणे बाराच्या दरम्यान १२ जणांनी बंगलोर सोडले. पोलिसांनी ४ निरनिराळ्या ठिकाणी थांबवून कुणी आचंमन केलेले नाही नां? ह्याची खात्री केली. जवळपास ७५ किलोमीटरचा पल्ला गाठून आम्ही २ च्या आसपास स्कंधगिरीच्या पायथ्याशी पोहोचलो.

२ वाजता स्कंधगिरीची चढाई सुरू केली. मस्त पोर्णिमेचे टिपुर चांदणे होते. संध्याकाळी मुसळधार पाऊस पडून गेल्याने रस्ता जास्तचं निसरडा झाला होता. त्यामुळे हळूहळू वर चढलो. पावसामुळे थंडी आणखीनच वाढली होती. मध्येच काळोखात रस्ता चुकला, तो शोधण्यात अर्धा-पाउण तास गेला. पहाटेची वेळ जशी जवळ येऊ लागली तसे धुके वाढले आणि २ फुटांवरचे देखील दिसेनासे झाले. स्कंधगिरीवर पोहचेपर्यंत पावणे-सहा झाले. पश्मिमेकडे पोर्णिमेचा चंद्र अस्ताला जात होता थोड्यावेळातच पूर्वेकडून सुर्य नारायणाचे आगमन होणार होते. किंचित प्रकाश पसरला तेंव्हा आजूबाजूला ढग सोडून काही दिसत नव्हते. तांबडे फुटल्यानंतर ते पूर्ण सूर्योदय होईपर्यंत जे काही अनुभवायला मिळाले त्याचे मी वर्णन करू शकत नाही. खाली फोटो देतोय.

खाली उतरल्यानंतर स्कंधगिरीचा पायथ्याकडून काढलेला फोटो.
लहानपणापासून कोकणात निरनिराळ्या ऋतूमध्ये सूर्यास्ताच्या असंख्य छटा पाहिल्या आहेत. या आधीचा आठवणीतला सूर्योदय मात्र एकदाच पॉंन्डीचेरीमध्ये अनुभवला होता आणि त्या नंतर आज. छान प्रसन्न वाटलं. आजवर जागवलेल्या थर्टी फर्स्टच्या सर्व रात्री ह्या एका पहाटेवर ओवाळून टाकाव्यात अशी ही नवं वर्षाची पहाट.

ShareThis