Monday, January 4, 2010

३ इडियट्स!!!

दिवसाढवळ्या चोरी. इथे बरेचसे चोर आहेत हे माहीत होतं पण माझ्या गेली साडेपाच सहा वर्ष बेस्टसेलर असलेल्या पुस्तकाची कथा कुणी चोरेल असं स्वप्नात देखील वाटलं नव्हतं. माझ्या कथेवर जवळपास पूर्ण सिनेमा बनवून वर माझी कथा फक्त ३ ते ५ टक्के वापरली म्हणे. तो "लूडबूड" तर म्हणे मी पुस्तकं देखील वाचलं नाही. अरे काय? मागे एकदा नुसत्या लुकसाठी त्याने निव्वळ मिशीवर किती मेहनत घेतली होती. तो त्याच्या भूमिकेविषयी किती जागरूक असतो हे दुनियेला माहीत आहे. असा हा माणूस म्हणे मी पुस्तकं वाचलं देखील नाही. कोण विश्वास ठेवेल. खरं तर त्याचा सिनेमा असेल तर दिग्दर्शनापासून ते पब्लिसिटीपर्यंत प्रत्येक कामात हा किती लूडबूड करतो हे जगाला ठाऊक आहे. इथे तर हा केवळ सिनेमाचा नायक आहे, निर्माता/दिग्दर्शकदेखील नव्हे. कथा, पटकथा ह्याच्याशी ह्याचा काडीचा देखील संबंध नाही. ह्याने सिनेमात काम केलं त्याबद्दल ह्याला त्याचे पैसे मिळाले. ह्याला मध्ये नाक खुपसायची काही गरज नव्हती. पण लूडबूड हा नाही करेल तर मग कोण करेल? जेंव्हा मी माझ्या कथेचं श्रेय मला मिळालं नाही असं म्हटलं तर हा का पेटला? निर्माता/दिग्दर्शकांनी बोलायला हवे होते तर ते आधी काहीच बोलले नाहीत. वर म्हणे की त्यांचा जो कुणी पटकथाकार आहे तो म्हणे माझ्यासारखा प्रसिद्ध नाही म्हणून कथेचं श्रेय त्याला जायला हवं. अरे काय? इथे काय दुष्काळग्रस्तांना मदत पुरवली जातेय काय की गरजवंत पाहून कथेचं श्रेय देताय. परवा तर पत्रकार परिषदेत कहर केला ह्या लोकांनी. पत्रकार परिषदेत हे लोकं कसे बोलत होते, काय भाषा वापरात होते हे सगळ्या जगाने पाहिलं. मी माझ्या लिखाणातून देश बदलावा म्हणून बँकेतलं चांगलं करियर सोडून पूर्ण वेळं लिखाण सुरू केलं तर च्यामारी इथे माझीचं कथा चोरून ह्यांनी माझाच गेम केला. सलाम आहे इथल्या लोकांना. आत्ता तो फरहान आपल्या 3 Mistakes of My Life पुस्तकावर सिनेमा बनवतोय, त्याच्याकडे आत्तापासून लक्ष ठेवायला हवे. चला. (Give me some sun shine, Give me some rain, Give me another chance, I wanna grow up once again गाणं गुणगुणत निघून जातो)

~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~

चला सलग तिसर्‍या वर्षी आपण अभिनय केलेल्या चित्रपटाने आठवडाभरात १०० करोडहून अधिक गल्ला जमवला. इंडस्ट्रीने वर्षभरात कमावलेला गल्ला एकीकडे आणि आपल्या एका चित्रपटाचा गल्ला एकीकडे. सगळं कसं सुरळीत सुरू होतं आणि ह्या भगताच्या अंगात आलं. काय काय बरळू लागलाय. आपल्या बहुतेक प्रत्येक चित्रपटाच्या वेळी हे होतचं म्हणा. दोन वर्षापुर्वी त्या अमोल गुप्तेला कसा खड्यासारखा बाजूला केला. गेल्या वर्षीदेखील आपण सोडून गजिनीची बहुतेक टीम तीच होती. तो दिग्दर्शक, नायिका, खलनायक सगळे गजिनी मध्ये दुसर्‍यादा काम करत होते पण गाजावाजा फक्त आपला. आणि का होऊ नये? मी माझ्या प्रत्येक चित्रपटामध्ये इतका झोकून देतो. सगळं कसं मला माझ्या मनासारखं हवं असतं. तर लोकं मी दुसर्‍याच्या कामात ढवळाढवळ करतो म्हणतात. आत्ता मी काम केलेला प्रत्येक चित्रपट २५०, ३०० कोटींचा व्यवसाय करत असेल तर मी केलेली ढवळाढवळ काय वाईट आहे? आणि मी त्याचं श्रेय घेतलं तर काय बिघडलं? बाकी कुणाचे चित्रपट कमावतात का इतका पैसा? पण पोटात दुखत लोकांच्या. आत्ता ह्या भगताचंच घ्या. ह्याच्याच पुस्तकावर आधारित तो सल्लूचा चित्रपट आला होता ना? कुणी बघितला तरी का तो? तेंव्हा कुणी गेलं होतं का भगताकडे की भगत त्या पडलेल्या चित्रपटाचं श्रेय घेत फिरला? आत्तादेखील चित्रपट प्रदर्शित झाल्यानंतर पहिला आठवडा हा काहीच बोलला नाही. आठवड्या भरात १०० कोटींचा आकडा पार झाल्याचं पाहून ह्याला अचानक कथेचं श्रेय हवं झालं. आत्ता त्याचं म्हणण कितीही खरं असलं तरी ह्याला खोटंचं ठरवायला हवं. पण ह्या आधी आपण अशी प्रकरण पचवली असली तरी हे प्रकरण तितकं साधं नाही. हा भगत आपल्याला भारी पडणार असं दिसतं. ह्याच्यावर लिंबू-मिरचीचा साधा उतारा उपयोगी नाही, काहीतरी मजबूत तोडगा काढला पाहिजे. पाहु जे काय करायचं ते आपल्यालाचं लवकरात लवकर करायला हवं नाहीतर तो भगत डोक्यावर बसायचा.

~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~

स्थळं: राजूचं ऑफीस. VVC आणि राजू मस्तं टामकवतं सेलिब्रेट करतं होते.

राजू: चला मुन्नाभाई नंतर बरेच दिवसांनी आपला चित्रपट मजबूत चालतोय.
VVC: आणि खोर्‍याने कमावतोय देखील. चिअर्स!!!
राजू: बस्स, स्साला हे कॉपीराइटचं लफडं मध्ये उपटायला नको होतं.
VVC: ते जाऊ दे रे. आपण ह्यावेळी त्या चरस्याला घेऊन मुन्ना भाई नाय बनवलाय. आपण त्या मि. परफेक्टला चित्रपटासाठी साइन केला ना तिथेचं आपलं काम संपलं. आत्ता फक्त बसून पैसे मोजायचे. जी काय लफडी उपटली आहेत ती तो खान बघून घेईल.
राजू: हो ते पण खरं आहे. कारण ह्यावेळी मी नावालाच दिग्दर्शक होतो. सेटवर त्याचाच आवाज होता.
VVC: वर आपलं पब्लिसिटीचं काम पण त्यानेचं केलं. कुणी तुमच्या कामात ढवळाढवळ केलेली चालतं असेल तर डोळे झाकून त्याला घ्यावं.
राजू: हो रे जिथे तिथे हा कडमड्त होता. म्हणून ह्याच्याबरोबर बहुतेक कुणी परत काम करायला मागत नाही. आणि हा बाहेर उगाचच मी कुणाबरोबर दुसर्यांदा काम करीत नाही म्हणून बढाया मारत फिरत असतो.
VVC: सोड ना आपल्याला कुठे त्याच्या बरोबर परत काम करायचंय. आत्ता ते सगळं जाऊ दे. कुणी कशाचं किती श्रेय घ्यावं ते तो लेखक, तो मि. परफेक्ट आणि पब्लिक बघून घेतील. तेवढीच चित्रपटाची पण पब्लिसिटी होईल आणि गल्ला वाढेल. आपण लांबून मज्जा बघू.
राजू: हे म्हणजे दोघांचं भांडण आणि तिसर्‍याचा लाभ म्हणतात तसं झालं. आपल्यासाठी आपला खान, तो लेखक आणि प्रेक्षक म्हणजे "३ इडियट्स" ठरले की.

हा हा हा... दोघं बराच वेळं हसत रहातातं.

13 comments:

 1. एकदम झक्कास. पण भगत आणि खान दोघेही या (अप) प्रसिद्धी तंत्रात सामील आहेत असं मला तरी वाटतं..

  ReplyDelete
 2. हो मलाही त्यांची मिली "भगत" असावी असे वाटते. पब्लिसिटीसाठी लोकं कुठल्याही थराला जाऊ शकतात. पण काही का असेना झाल्या प्रकारामुळे आमिर खान मात्र मनातून उतरला.

  ReplyDelete
 3. एकदम झाक जमले आहे रे

  प्रसिद्धीसाठी यांनी या आधीही अशी बरीच थेरे केलेली असतात
  बाकी काही का असेना सिनेमा मस्त आहे बुआ

  ReplyDelete
 4. मस्त रे!!!! एकदम भन्नाट झाली आहे पोस्ट!!!

  ReplyDelete
 5. @विक्रम @मनमौजी - प्रतिक्रियेबद्दल धन्यवाद.

  ReplyDelete
 6. chhan shere odhale aahet tumhi. Mi pustak wachalay aani cinema pan baghitalay. pustaka peksha cinemat bharpoor badal aahet. Rancho che character cinemat phar glorify kele aahe. Artaht
  producer aani chetan yancha ha stunt ch watato akheris.

  ReplyDelete
 7. हा.. हा.. छान आहे.
  चेतन भगतला ग्लोरीफ़ाय करुन उपयोग नाही..तो सुद्धा याच माळेचा मणी आहे....

  ReplyDelete
 8. एकदम बेश्ट जमलंय.. तंबीआठवला.. :)

  ReplyDelete
 9. अमीर खान नट म्हाणून चांगला असेल पण माणूस म्हणूण खरंच हरामखोर आहे.

  ReplyDelete
 10. @माधुरी - "माझ्या गजाल्या" ब्लॉगवर स्वागत. प्रतिक्रियेबद्दल धन्यवाद. मलाही त्यांची मिली भगत असावी असे वाटते.

  @आनंद - मला चेतन भगत एक सभ्य माणूस वाटतो पण ह्या सध्या जे काही सुरू आहे त्याबद्दल काहीच सांगू शकत नाही.

  ReplyDelete
 11. @kayvatelte - काका प्रयत्न करून पाहिला. तंबीची स्टाइल डोळ्यासमोर ठेवूनच लिहलं होतं. म्हटलं पाहु जमतं का?

  @साधक - सहमत. आमिरकडून ही अपेक्षा नव्हती.

  ReplyDelete
 12. सिद्धार्थ, हा बघ मिली-'भगत' चा पुरावा.
  http://maharashtratimes.indiatimes.com/articleshow/5414451.cms

  ReplyDelete
 13. मला ही तेच वाटतय चेतन भगत ला त्याच्या वाट्याचे पैसे मिळाले आणि हे सुद्धा खुश झालेत. दोघांचा फायदा आपण मात्र बसायचा यांची भांडण बघत.
  छान झालाय लेख, उशीरा कमेंटल्याबद्दल शरमिंदा आहे

  -अजय

  ReplyDelete

ShareThis