Friday, January 14, 2011

टाइम मॅनेजमेंट



एखादी जॉब प्रोफाइल वाचताना टाइम/टास्क मॅनेजमेंट, मल्टी टास्किंग वैगरे शब्द हमखास वाचायला मिळतात. मिळालेली वेळ कामांचे महत्व पहाता त्या त्या कामांना विभागून देऊन त्यानुसार काम पुरे करणे ही झाली टाइममॅनेजमेंटची ऑफीसमधली व्याख्या. अगदी परफेक्ट नसेल. सांगायचा मुद्दा हा की ऑफीसमध्ये टाइम मॅनेजमेंट, टास्क मॅनेजमेंट वैगरे गोष्टी प्रॉजेक्ट प्लॅनिंगचा एक हिस्सा असतात. काम नेमुन देण्यासाठी आणि दिलेले काम होतं आहे की नाही हे पहाण्यासाठी मॅनेजर असतो. पण प्रॉजेक्ट म्हणजे टीमवर्क आलंच. इथे काही प्रॉब्लेम असतील, काही मदत हवी असेल तर टीम असते. प्रोजेक्ट मॅनेजमेंट आणि ट्रॅकिंग सिस्टमची निरनिराळी सॉफ्टवेअरस् वापरुन सगळी कामं (बहुतेकवेळा) नीट पार पडली जातात. त्यामुळे प्रोफेशनल लाइफमध्ये तरी डेड लाईन या ना त्या प्रकारे पाळली जाते किंबहुना काम करणार्‍या लोकांकडून (झक मारुन का होईना) पाळून घेतली जाते.

टाइम मॅनेजमेंटचा खरा प्रश्न सुरू होतो तो ऑफीस मधून बाहेर पडल्यावर. वैयक्तिक आयुष्यात आपण किती वेळा कामे आखून त्या नुसार काम करतो? माझ्या मते मी आत्ता आपण म्हणणे थांबवावे. मी माझ्यापासून सुरूवात करतो. ऑफीसच्या बाहेर किती कामे मी आखून त्या नुसार ती पार पाडतो? नक्की नाही सांगता येत. नक्की नाही म्हणजे आखणी होते. बहुतेक सगळ्या कामांची आखणी ही होतेच. ऑफीसप्रमाणे अगदी पद्धतशीर कागदोपत्री प्लॅनिंग नाही पण मनात कुठे तरी काही गोष्टी ठरवल्या जातात. अमुक तमुक गोष्ट करायची. आणि त्यासाठी एक ढोबळ वेळ/तारीख/महिना निश्चित करायचा. अजुन तरी मी कधी वर्ष वैगरे निश्चित नाही केलेलं कारण तेवढी दूरदृष्टी नाही. आधीच वेळ/तारीख/महिना असे जे काही मनात ठरवतो ते ढोबळ असते. हा ढोबळ शब्दच घात करतो.

जेंव्हा एखादी गोष्ट पुढे ढकलली तरी चालून जाते तेंव्हा ती गोष्ट माझ्या हातून कधी पूर्ण होईल सांगता येत नाही. सगळ्या सुविधा असतात पण जोवर ती करायचीच असा मनात ठाम निर्णय होत नाही तोवर हातून काहीच होत नाही. आत्ता टॅक्स सेव्हींग. हा दरवर्षीचा प्रकार आहे. दरवर्षी ठरवतो की डिसेंबरपर्यंत सगळी गुंतवणूक पूर्ण करून कागदपत्र तयार ठेवायची. एचआरचा मेल आला रे आला की दिली. पण नाही. मेल आला की शेवटची तारीख बघायची. मग त्याच्या आधीच्या वीकेंडला जाऊन पैसे भरायचे आणि पावत्या आणायच्या. बरं सगळी कागदपत्र तयार आहेत तर जमा करेन तर तेही नाही. दोन दिवस आधी एचआरचा Gentle Reminder म्हणून एक प्रेमळ मेल येतो पण आपण अगदी शेवटची तारीख उजाडेपर्यंत वाट पाहायची. तो दिवस आला तरी अगदी संध्याकाळ होण्याची वाट बघा. दुपारी जेवून वैगरे आलं की प्रिंटआऊट काढा आणि मग एकदाचा घरी जाता जाता एचआर कडे जायचे. तिथे आपली भावंडे उभी असतातच. एकदम कामाचा लोड पडू नये म्हणून त्या बिचार्‍या एचआरने महिनाभर आधी तारीख दिलेली असते तर माझ्यासारखी लोकं अगदी ती तारीख म्हणजे एक एकच आणि शेवटचा दिवस असल्यासारखे त्या दिवशी संध्याकाळी हजर. काही लोकं तर कुठे काही माहिती भरून आणतात. शेवटच्या दिवशी ह्यांच्या हजार शंका. नशिबाने मी इतका गया गुजरा नसल्याने ह्यांच्यामुळे आम्हाला उशीर ;-)

टॅक्स सेव्हींगचे उदाहरण हे वार्षिक श्रेणीमध्ये मोडते. मासिकश्रेणीमध्ये लाईटबिल येते. लाईटबिल साधारण दर महिन्याच्या ४-५ तारखेला हातात पडते. बरं इथे बिल भरण्याची शेवटची तारीख १८ असते. बिल भरण्याचे ठिकाण देखील ५ मिनिटांवर आणि रोजच्या जाण्यायेण्याच्या वाटेवर आहे पण बिल हातात मिळाल्यापासून वीकेंडला भरू, वीकेंडला भरू असे करता करता १७ तारीख उजाडते. वीकेंडला आठवण असते, नाही असे नाही पण सकाळी वाटते आत्ता गेलो तर गर्दी असेल. लोकं उन्हातून बाहेर पडत नाही तेंव्हा आपण १२-१२:३०च्या आसपास जाऊ पण दुपारी ऊन्हातून किती लोकं बाहेर पडतात हे पाहायला मी आजपर्यंत बाहेर पडलो नाही. १७ तारखेला नेहमीप्रमाणे ऑफीसला जायला उशीर झालेला असतो त्यामुळे उद्या शेवटचा दिवस आहे ह्या भरोश्यावर बिल भरायला १८ तारीख उगवतेच. आत्ता १८ शेवटची तारीख असल्याने दंड भरावा लागू नये म्हणून झक मारत त्या दिवशी बिल भरायला जावं तर नेमका त्या दिवशी तिथे प्रिंटर बिघडलेला असतो. आणि बहुतेक प्रत्येक महिन्यात १८ लाईट बिल भरण्याची शेवटची तारीख असल्याने आपली 'वेळेचा सदुपयोग करणारी भावंडे'देखील त्याच दिवशी गर्दी करून रांगेत उभी असतात. पण गर्दी पाहून दुपारी/संध्याकाळी येऊ म्हणाव तर शक्य नसतं त्यामुळे तिथे रांगेत उभं राहून वीकेंडला आलो असतो तर बर झालं असतं असं वाटून जातं. आत्ता बिल मिळालं की पहिल्याच वीकेंड्ला भरून टाकायचे असं ठरवतो पण हाच निश्चय पुन्हा पुढच्या महिन्यात १७-१८ तारखेला केला जातो.

ही झाली दोन ठळक उदाहरणे. पण सध्या बर्‍याचश्या गोष्टी ह्या अश्या ढोबळ कारभारावर सुरू आहेत. काही ठिकाणी गोष्टी अडून बसल्या आहेत तर काही ठिकाणी सगळ्या चाव्या माझ्या हाती असून केवळ नियोजनाचा अभाव आणि कंटाळा ह्यामुळे मी स्व:त सगळ्या गोष्टी अडकवून ठेवल्या आहेत. जेवढ्या लवकर टाइम मॅनेजमेंटच्या घड्याळात मी सेल्फ स्टार्टची चार्ज झालेली बॅटरी टाकेन तितक्या लवकर गोष्टी टिक-टिक करीत पुढे सरकतील.

फोटो गूगलवरुन साभार

Monday, January 10, 2011

देवबाग बीच रिसॉर्ट

३१ डिसेंबर विकांताला लागून येत असल्याने कुठेतरी बाहेर जायचे हे नक्की ठरवले होते. केरळला जायचे कधी पासून मनात होते म्हणून कोट्टयाम-आलप्पी येथे हाउसबोटवर ३१ची रात्र घालवण्याचा प्लॅन केला. पण ख्रिसमस आणि वर्षअखेर असल्याने केरळचे बुकिंग ४ महिने आधीच फुल्ल होते. आत्ता कुठे जायचे असा विचार सुरू होता. एका मित्राकडून देवबाग बीच रिसॉर्टबद्दल ऐकून होतो. तिथेदेखील हाउसबोट उपलब्ध असते असे कळले पण केरळच्या बॅक-वॉटर इतकी मज्जा नाही पण प्रत्यक्ष बीच रिसॉर्टचा रिव्यू चांगला होता. बुकिंग तसं महाग होतं आणि त्यात हे रिसॉर्ट कर्नाटक सरकारद्वारा चालवले जाते म्हणून कसं असेल ह्याबद्दल मन जरा साशंकच होतं. नेट वर पाहिलं तर रिव्यू चांगला होता. अर्थात काही ठिकाणी under utilize असा उल्लेख होता पण बहुतेक सर्व लोकांनी या ठिकाणाला पसंती दर्शवली होती. म्हटलं तसं ही काही मिळत नाही तर करून टाकु बुकिंग. ऑनलाइन बुकिंग सेवा आहे आणि अगदी तत्पर. मी तिथे चौकशीची नोंद केल्यावर काही तासात त्यांनी फोन करून शेवटची काही कॉटेज शिल्लक आहेत असं कळवलं. मी पण फार आढे वेढे न घेता त्याच दिवशी बुकिंग करून टाकलं.

ठरल्याप्रमाणे ३०च्या रात्री बंगलोरहून आम्ही निघालो. देवबाग कारवारमध्ये आहे. दुसर्‍या दिवशी सकाळीच आम्ही कारवारला पोहोचलो. चेकईन दुपारी बारा वाजताचे होते. आत्ता इतका वेळ काय करायचे हा प्रश्न. मला वाटले होते की कारवार बर्‍यापैकी मोठे शहर असेल. सकाळी फ्रेश होऊन आजूबाजूला काही भटकण्यासारखे असेल तर चक्कर मारू. पण कसलं काय? तिथे धड बस स्टॅंड देखील नव्हता. ब्रेकफास्ट करावा तर धड नीट हॉटेल नाही. शेवटी एक बर्‍यापैकी हॉटेल दिसले तिथे टिपिकल डोसा वैगरे खाऊन घेतला. तिथे जवळपास काही बघण्यासारखे आहे का अशी चौकशी केली तर कारवार बीच सोडून दुसरं काही ऐकू आले नाही. आत्ता इतक्या सकाळी बीचवर खो-खो खेळायला बसलेली लोकं थोडीच पाहायची होतीत?

दुसरा काही मार्ग नव्हता म्हणून सरळ देवबाग बीच रिसॉर्टच्या ऑफीसला फोन लावला. तर त्यांनी ऑफीसला या असे सांगितले. म्हटले चला इथे तिथे भटकत बसण्यापेक्षा सरकारी कचेरीतल्या बाकड्यावर बसून मख्ख चेहरे पाहत बसू. मग रिक्षा करून देवबाग बीच रिसॉर्टच्या ऑफीसला गेलो. शहरापासून ५-६ किलोमीटर आहे. तिकडे पोहोचल्यापासून एक एक सुखद अनुभव यायला सुरूवात झाली. त्यांचे ऑफीस कारवारबीच जवळ एका बंगल्यात होते. आजूबाजूला मस्त नारळ पोफळीची झाडे. आत गेलो तर सकाळ असून ऑफीसची पुरेशी लोकं होती. चौकशी केल्यावर समजलं की ते लोकं शिफ्टमध्ये काम करतात आणि ऑफीस कायम उघडे असते. आमचे वाऊचर पाहून आधी आमची आल्याची नोंद केली आणि लगेचच आम्हाला बारा वाजेपर्यंत रहाण्यासाठी त्याच बंगल्यात वरच्या मजल्यावरची एक सुसज्ज रूम दिली. चेक-ईन/चेक-आउट हे दुपारी बारा वाजता असल्याने आणि शहरातील असुविधांचा विचार करून पर्यटकांसाठी ही सोय केलेली होती. जाताना देखील दुपारपासून ते रात्री तुमची बस/ट्रेनची वेळ होईपर्यंत तुम्ही इथे आराम करू शकता. आधीच रात्री बसमध्ये झोप नीट झाली नव्हती त्यात सरकारी कचेरीतल्या बाकड्या ऐवजी बेड मिळाल्यावर आम्ही मस्त ताणून दिली. दोन-अडीज तास झोप पूर्ण केल्यानंतर आंघोळ वैगरे करून आम्ही रिसॉर्टला जायला तयार झालो. तोवर इतर लोकं देखील आली होती. मग तिथून बोटीत बसून आम्ही रिसॉर्टला जायला निघालो. रिसॉर्ट म्हणजे तसं पूर्ण बेटावर वसलेलं नाही. एका बाजूने जमिनीला जोडलेले आहे. पण शहराच्या दिशेने पाहिलं की दर्शनी भागाकडून ते पाण्यात आहे असे वाटते. त्यात बोटराइडचा आनंद मिळावा म्हणून पर्यटकांना बोटीने रिसॉर्टला घेऊन जातात. १५-२० मिनिटांच्या बोटराइड नंतर आम्ही तिकडे पोहोचलो.

बोटीतून खाली उतरल्या उतरल्या सुरुची दाट झाडी सुरू होते. सुरुवातीलाच जंगल लॉजेस अँड रिसॉर्टचा फलक आहे. सुरूच्या बनातून एक पायवाट आत जाते. समुद्रावरचा वारा सुरुच्या झाडामधून वाट काढत सूss सूss आवाज करत जात होता. आजूबाजूचे वातावरण पाहाता सगळे अपेक्षेपेक्षा चांगले अनुभवायला मिळत होते. ८-१० वर्षा पुर्वी रत्नागिरीलादेखील भाट्ये समुद्रकिनारी असलेल्या नारळ संशोधनकेंद्रासमोर समुद्रावरुन येणार सोसाट्याचा वारा अडावा म्हणून दाट सुरूची झाडी होती. पण तिथे येणार्‍याजाणार्‍यावर बंधन नसल्याने ती हळू हळू कमी झाली. येणारे जाणारे ह्यामध्ये सुरुबनात चाळे करायला येणार्‍या लोकांचाच जास्त भरणा होता. त्यात पावसाळ्यात वादळाने पडलेली झाडे जवळपासची लोकं जळणासाठी लाकूडफाटा म्हणून वापरु लागली. पुढे पुढे तर लोकांनी जळणासाठी झाडे तोडून देखील नेली पण पुन्हा झाडे लावण्याचे कुणाच्या मनात आलेले नाही. त्या दृष्टीने कर्नाटक सरकारने देवबागला सुरुबनाचा पर्यटनासाठी खूप चांगला वापर करून घेतला आहे. असो...

१०-१५ मिनिटे चालल्यानंतर कॉटेज दिसू लागली. सुरुवातीला काही चिरेबंदी कॉटेज लागली. ती बहुतेक नवीन बांधलेली दिसत होती. तिथे एकूण १५ कॉटेज आहेत. सर्व एसी. पुढे गेलो तशी पुर्वी बांधलेली, जमिनीपासून उंचावर असलेली लाकडी कॉटेज होती. प्रत्येक कॉटेजसमोर सुरूच्या झाडामध्ये बांधलेला झुला. आमच्या सुदैवाने आम्हाला वुडन फ्लोअर असलेलं लाकडी कॉटेज मिळालं. कॉटेज देखील आतमधून एकदम प्रशस्त आणि सुसज्ज. सगळी सोय बघून इथे येण्याचा खेळलेल्या जुगारातून जॅकपॉट लागल्याचे समाधान मिळाले. बरं बायकोला नेहमीप्रमाणे काहीच न सांगितले असल्याने तिच्यासाठी तर मस्त सरप्राइज होते. खरं तर मला देखील आधी काय आणि कसं असेल ह्याची काहीच माहिती नसल्याने माझ्यासाठीसुद्धा मोठे सरप्राइजच होते.

कॉटेजमध्ये फ्रेश होऊन आजुबाजूला काय काय आहे त्यावर नजर टाकतो तोच जेवणाची वर्दि घेऊन एक जण आला. अरे हो एक सांगायाचेच राहीले. इथले लोकं कोंकणी भाषा बोलतात. कन्नड पण चालते पण आम्ही सकाळपासून लोकांचे बोलणे ऐकत होतो ते यंडूगुंडू नव्हते. बर्‍यापैकी कळत होते. त्यांना पण आम्ही आपापसात काय बोलतो ते थोडे फार कळत होते. कॉटेज दाखवायला जो मुलगा आमचे सामान घेऊन आला आमच्या बरोबर आलेला तोच पुन्हा जेवाणाचा निरोप घेऊन आलेला. आम्हाला मराठीत बोलताना ऐकले असल्याने त्याने सरळ "१ वाजल्या पासून गोलघरमध्ये जेवण सुरू होते" असा शुद्ध मराठीत निरोप दिला. सुरूबनात मधोमध गोलघर आहे. नावाप्रमाणेच गोलबांधणीचे. तिथे डायनिंगची सोय आहे. सगळं बुफे पद्धतीने. दुपारचे जेवण आणि संध्याकाळी स्नॅक्स/चहापाणी गोलघरमध्ये. स्नॅक्सनंतर समुद्रात तासाभराची बोटराइड, रात्री बार्बीक्‍यू, ड्रिंक्स आणि जेवण समुद्रकिनारी वाळूत कॅंपफायरमध्ये. भल्या सकाळी ६:३० वाजता Nature Walk आणि त्यानंतर पुन्हा गोलघरमध्ये ब्रेकफास्ट आणि दुपारी चेकआउट असा २४ तासांचा कार्यक्रम होता जो दुपारच्या जेवणापासून सुरू होतो.



भुका लागल्याच होत्या. नॉनव्हेज मेनुमध्ये फिश् फ्राय आणि मटण होते. भौगोलिक दृष्ट्या पाहिलं तर कोकण किनारपट्टी आणि मंगलोर, कारवारमध्ये काही फरक नाही. फक्त मंगलोर, कारवार कर्नाटकात येत असल्याने भाषा सोडली तर जेवणाखाण्याच्या पद्धती बर्‍याचश्या सारख्या आहेत. निदान फिश्-फ्राय, माश्याचे कालवण ई प्रकार तरी अगदी रत्नागिरी सारखे. इथली लोकं देखील तांदळाची भाकरी खातात, तांदळाच्या भाकरीला अक्की रोटी म्हणतात इतकचं. देवबाग समुद्र किनारीच मग काय मासा एकदम ताजा होता. भुकेच्या गडबडीत कॉटेज सोडताना कॅमेरा विसरलो. तसं ही मच्छी पुढयात आली की फोटो वैगरे काढायचे लक्षात राहात नाही. जेवाणात इतरही प्रकार होते पण नेटवरच्या रिव्यूप्रमाणे जेवणात (नॉनव्हेज सोडता) जरा सुधारणा करायला वाव आहे. आम्ही सगळ्याची थोडी थोडी चव घेऊन मुख्य:त फिश्-फ्राय आणि चपात्या हाणल्या. जेवण जरा जडच झाले म्हणून आजूबाजूला फेर फटका मारायला निघालो. गोल घराला लागूनच टीव्ही रूम आहे. ती देखील गोल घरासारखीच गोल. एकीकडे टीव्ही आणि समोर गोलाकार मांडलेल्या खुर्च्या. गोलघर आणि टीव्हीरूम लाकडी पुलाने जोडलेली आहे. टीव्ही पहात जेवायची सवय असेल तर जेवण घेऊन इथे बसू शकता.

जवळच काही अंतरावर टेंट ठोकलेले दिसले. जेंव्हा कॉटेज फुल्ल होतात किंवा जे कुणी ८-१० च्या ग्रूपने येतात त्यांची सोय टेंटमध्ये केली जाते. हे टेंट देखील अगदी सुसज्ज आहेत. आतमध्ये डबल बेड, छोटे टेबल, सामान ठेवायला खण. तीन बेड असलेले देखील २-३ टेंट होते. ह्या टेंटचा दुसरा उपयोग म्हणजे दुपारी १२ वाजता चेक-आउट केल्यानंतर जर का तुम्हाला संध्याकाळपर्यंत बीचवर वेळ घालवायचा असेल तर कॉटेज मधून तुम्हाला टेंटमध्ये शिफ्ट करून देतात. तेदेखील विनामूल्य.

बीचवर काही वेळ भटकून आम्ही पुन्हा कॉटेजवर परतलो. ४ वाजता चहा घेऊन बोटराइडचा प्लान होता. तासाभराच्या बोटराइडमध्ये बीचजवळ समुद्रात आत ३ छोटी बेटे आहेत त्याला फेरी मारुन आणतात. त्या बेटांच्या थोडं पुढे खोल समुद्रात डॉल्फिनचे दर्शन देखील होते. मधूनच पाण्यावर येणारे काही डॉल्फिन दिसायचे पण 'तो बघ', 'तिकडे बघ' असे म्हणे पर्यंत ते पटकन गायब व्हायचे. बरेचदा सूर मारल्यानंतरच्या त्यांच्या शेपट्याच दिसायच्या. बरोबर गाईड होता. तो इंग्रजी, हिंदी, कन्नड अश्या प्रत्येकाच्या सोयीनुसार सगळ्या भाषेत माहिती देत होता. जर कधी वारे जोरात वहात असतील तर ही बोटराइड दुसर्‍या दिवशी सकाळी ठेवतात किंवा रद्द देखील करतात. आमच्या नशिबाने त्या वेळी वातावरण खूप छान होते. बोटराइड वरुन परत आल्यावर आम्ही पुन्हा बीचच्या दिशेने निघालो. येणार्‍या जाणार्‍या लोकांवर निर्बंध असल्याने बीच एकदम स्वच्छ आहे. कुठे ही फोडलेल्या बाटल्या, प्लास्टिक, समुद्रातून वहात आलेला कचरा नाही. सरकारी काम असलं तरी सगळी व्यवस्था चोख होती. कॉटेज आणि गोल घर ही बांधकामे सोडली तर तिथे बाकी काही विशेष बदल केलेले नाहीत. त्यामुळे च तिथे त्या नैसर्गिक वातावरणाचा जास्त आनंद मिळतो. उगीचच उंट घोडे आणून, पाळणे लावून तिथे कमर्शियलगिरी केलेली नाही. मी समुद्र किनारीच लहानचा मोठा झाल्याने बीच वैगरे गोष्टींचे मनाला फार कौतुक वाटत नाही पण तरीदेखील व्यापारीकरणापासून अलिप्त असा तो शांत आणि स्वच्छ देवबाग बीच भावला एवढे मात्र नक्की.

२०१० च्या शेवटच्या सुर्यास्ताचा आनंद घ्यायला सगळे किनार्‍यावर जमले होते. बहुतेक सगळ्या फॅमिलीज होत्या. थोड्याच वेळाने मघाशीच फिरून आलेल्या त्या छोट्या छोट्या बेटांच्या पाठीमागे सुर्यनारायण मावळतीला आला. १०-१५ मिनिटे सूर्यास्ताच्या मस्त वेगवेगळ्या छटा पाहायला मिळाल्या. सूर्यास्तानंतर किनार्‍यालगत एका ठिकाणी कॅम्पफायरची तयारी सुरू झाली. बाजूलाच बार्बीक्‍यूसाठी निखारे फुलू लागले होते. दुपारचे जेवण अजुन जिरले नव्हते पण बार्बीक्‍यूची तयारी पाहून पुन्हा हाणायला तयार होण्यासाठी आम्ही त्या संधीप्रकाशात पुन्हा बीचवर भटकून घेतले. फेरफटका मारुन परत आलो तर कॅंपफायर धगधगत होते. आजुबाजूला गोलाकार खुर्च्या मांडल्या होत्या. स्नॅक्स तयार होता. ज्यांना ड्रिंक्स हवीत त्यांच्यासाठी एका बाजूला वेगळी सोय होती. एकंदरीत नवीन वर्षाच्या स्वागतासाठी मस्त माहौल तयार झाला होता.

तश्या सगळ्या फॅमिलीज असल्याने ३१ डिसेंबरच्यावेळी असतो तसा फार धांगड धिंगा नव्हता. एकमेकांशी फार ओळख नसल्याने सगळेजण आपल्या आपल्या ग्रूपमध्ये होते. लवकरच मिक्स भजी, चिकन चिली, व्हेज ६५ असा रुचकर आणि अप्रतिम स्नॅक्स सर्व्ह केला गेला. हळू हळू गारठा वाढु लागला तस तसे सगळे खुर्च्या ओढून कॅम्पफायरच्या जवळ येऊ लागले. जवळच समुद्राच्या लाटांचा संथ आणि लयबद्ध आवाज येत होता. एकदम परफेक्ट अशी संध्याकाळ आम्ही अनुभवत होतो. ३१ डिसेंबरच्या निमित्ताने तिथे काही वेगळे होते अश्यातला भाग नाही. तिथल्या कर्मचार्‍यासाठी तो रूटिनचा भाग होता. एका अर्थी सरकारी आळस किंवा निष्क्रियाता का काय ती थोडीफार जाणवली. कदाचित ३१ डिसेंबरच्या मुहूर्तावर नेहमी दिसणारा झगमगाट आणि गोंधळ तेथे नव्हता म्हणून देखील असं वाटलं असण्याची शक्यता आहे. अधून मधून ते कॅम्पफायरमध्ये लाकडे लावून जात होते. चांदणे फार नव्हते त्यामुळे कॅंप फायरच्या उजेडातच सगळे व्यवहार सुरू होते. थोड्यावेळाने काही लोकं आपापल्या कॉटेजच्या दिशेने पांगली आणि कपडे वैगरे बदलून पुन्हा रात्रीच्या जेवणासाठी तिथेच एकत्र जमली. जेवण दुपारपेक्षा छान होते. आलू-पालक तर अप्रतिम होता. कदाचित दुपार पासून यथेच्छ नॉनव्हेज खाऊन झाले असल्याने आम्हाला तो पालक रुचकर लागला असेल. असो जेवणानंतर पुन्हा बीचवर जवळच फेर फटका मारुन नंतर कॅम्पफायरमधली लाकडे वर खाली करत शेकोटी करीत बसलो होतो. कॅम्प फायरची मज्जा लुटण्याचे खूप जुने स्वप्न पूर्ण झाले होते. कोकणातले शिमग्याचे दिवस, समुद्र, काळोख आणि घनदाट सुरूबन यावरून लहानपणीच्या भुताखेतांच्या गोष्टी असे करता करता बारा वाजले. नाही म्हणायला त्या दिवशी देवबाग बीचवर देखील थोडी आतषबाजी केली गेली. हॅपी न्यू ईअरचा नारा झाला. फोनाफोनी सुरू झाली. त्या शांततेत वेगवेगळ्या रिंगटोनचे आवाज येऊ लागले. बीचवरुन समोरच कारवार शहरातून आकाशात सोडले जाणारे फटाके दिसत होते. ती रोषणाई बघून साधारण १ च्या सुमारास आम्ही सगळे आपापल्या कॉटेजवर परतलो. सकाळी लवकर उठून सुर्योदयाबरोबर नवीन वर्षाचे स्वागत करायचे होते नां!!!

ShareThis