Wednesday, August 25, 2010

श्रावण, शाकाहार आणि आम्ही

सोमवारी रत्नागिरीच्या भैरीचा (रत्नागिरीचे ग्रामदैवत श्री देव भैरी) श्रावणातला हरीनाम सप्ताह संपला आणि आज तब्बल दोन आठवड्यानी नॉनव्हेज खाल्ले. सतत उसळी, पालेभाज्या खाऊन पोटावर अमानुष अत्याचार झाले होते. श्रावण महिना म्हणजे आमच्यासारख्यांना काळ्या पाण्याची शिक्षा. आमच्या घरी रविवार, बुधवार आणि शुक्रवार हे मांसाहार करण्याचे तीन दिवस. त्यापैकी बुधवार, शुक्रवार आणि रविवार हे कसे एकदिवासाआड येतात. रविवारनंतर बुधवारची तब्बल दोन दिवस चातकाप्रमाणे वाट पाहाणारे आम्ही, आमच्यासाठी श्रावणाचा पूर्ण महिना पाळणे म्हणजे जिभेची आणि पोटाची काय अवस्था होत असेल बरे? लहानपणापासून घरची वडीलधारी माणसे (पक्षी: महिला वर्ग) घरातल्या सगळ्यांनी (म्हणजे मुख्यत: आम्ही लहान मुलांनी, कारण मोठी माणसे (पक्षी: पुरूष वर्ग) त्यांचे ऐकत नसत) श्रावण पाळावा असा आग्रह धरत असत. आपल्या मुलाबाळानां थोडेफार पुण्य लागावे असं त्यांना वाटायचे. पण श्रावण पाळण्यावरून ह्या दोन्ही वर्गाचे (आजतागायात) कधीही एकमत न झाल्याने आणि आम्हा मुलांचा पुरूषवर्गाला मूक आणि बिनशर्त पाठिंबा असल्याने ग्रामदेवतेचा हरीनाम सप्ताह संपेपर्यंत तरी शाकाहार करावा असा एक अघोषित कायदा आमच्याकडे पाळला जातो.

हरीनाम सप्ताहादरम्यान आठ दिवस देवळात अखंड भजन सुरू असते. आत्ता आमचे ग्राम दैवत भैरी म्हणजे शंकराचे एक रूप. त्यामुळे त्याचा सप्ताह श्रावणातल्या पहिल्या सोमवारी सुरू होऊन दुसर्‍या सोमवारी म्हणजे आठ दिवसांनी संपतो. त्यामुळे शाकाहाराचा हा अघोषित नियम केवळ सोमवार ते सोमवारच्या साप्ताहा दरम्यान पाळायचा की श्रावण महिना सुरू झाल्यापासून ते श्रावणातल्या दुसर्‍या सोमवारपर्यंत पाळावा ह्यावर आजही दुमत आहे. वर वर जरी हा प्रश्न अत्यंत साधा दिसत असला तरी खोलवर विचार करता तो गहन आहे. उदाहरणार्थ यंदा श्रावण मंगळवारी सुरू झाला म्हणजे श्रावणाचा पहिला सोमवार उजाडला तेंव्हा श्रावणातले पहिले ७ दिवस उलटून गेले होते. याचाच अर्थ आमच्या घरी बुधवार, शुक्रवार आणि रविवार हे तिन्ही हक्काचे दिवस फुकट गेले. म्हणजेच हरीनाम साप्ताहातले बुधवार, शुक्रवार आणि रविवार धरून एकूण दोन आठवडे शाकाहारी. याउलट श्रावण जर का सोमवारीच सुरू झाला तर मोजणी पहिल्या दिवसापासूनच सुरू होईल आणि एका आठवड्यात 'जन'जीवन पूर्व पदावर येईल. आत्ता ह्या विचार सरणीस आमचे आजोळ जबाबदार आहे कारण मामा मंडळी (स्त्रीवर्ग धरून बरं का) केवळ सोमवार ते सोमवार श्रावण पाळतात.

यंदा शाकाहाराचे दोन आठवडे पाहाता गटारी आमावस्येच्या (पुण्य?) दिवशी आमच्या मामामंडळीच्या पावलावर पाऊल ठेवून आपणही केवळ हरीनाम सप्ताहादरम्यान, म्हणजे सोमवार ते सोमवार श्रावण पाळावा असा प्रस्ताव संबंधित मंडळींनी मांडला होता परंतु तो प्रस्ताव गृहखात्याने गटारीच्या मटणाच्या उरलेल्या हाडकांबरोबर केराच्या टोपलीत टाकला. उलट यंदा तसेही दोन आठवडे श्रावण पाळता आहातच तर अजुन दोन आठवडे कळ काढा आणि गौरी विसर्जनानंतरच सगळे मिळून उपवास सोडू असा उलटा प्रस्ताव मांडण्यात आला. तो प्रस्ताव आज मासे खाऊन आम्ही Dustbin मध्ये (ऑफीसमध्ये असल्याने) टाकला हे सांगायलाच नको. असो पुढील वर्षी मामा मंडळीचा पाठिंबा घेऊन पुन्हा हा प्रस्ताव गृहखात्याकडे पाठवायचा मनसुबा आहे. मामा लोकं बिनशर्त पाठिंबा देतीलच पण तरी देखील त्यांच्याकडून अधिक जोर लागण्यासाठी पुढील आषाढात कोलंबी, पापलेट, सरंगा, बांगड्याच्या उपस्थितीत त्यांच्याशी पुन्हा एकदा बोलणी करून घेऊ म्हणतो. तूर्तास पुढील गटारीपर्यंत नियमीतपणे रविवार, बुधवार आणि शुक्रवारची वाट बघणे.

ShareThis