Wednesday, November 25, 2009

शहिदांना भावपूर्ण श्रद्धांजली...

स्वातंत्र्य दिन, प्रजासत्ताक दिन मग कारगिल दिवस आणि आत्ता २६/११. आज २६/११ ला एक वर्ष पूर्ण झालं. वर्षभर कसाबने पाहुणचार झोडला. नुकतचं महाराष्ट्र टाइम्स मध्ये वाचलं की कसाबची काळजी घेण्यासाठी सरकारी तिजोरीतून वर्षभरात तब्बल ३१ कोटी रुपये खर्च करण्यात आले आहेत. शहिदांच्या घरी मात्र मदत पोहोचली नसेल. त्याचबरोबर कसाबसोबत आलेल्या इतर अतिरेक्यांचे मृतदेह अजुन ममीसारखे जपून ठेवलेले आहेत. आपण अमराठी लोकांचा थारा करणार नाही असे म्हणतो पण हजारो रुपये खर्चून कडेकोट पहार्‍यात दहशतवाद्यान्चे मृतदेह मात्र बाळगून आहोत. २६/११ नंतर गृहमंत्री पदावरून पायउतार झालेले आर आर पाटील आज पुन्हा गृहमंत्री आहेत. हल्ल्यानंतर मंत्री बदलल्याने काय होते हे आजपर्यंत कळले नाही. अर्थात त्यांना दोष देण्यात काहीच अर्थ नाही, आपणच निवडून दिले आहे त्यांना.

भारताची राजनीति समजण्याला लागते
षंढता ही खूप, थोडी-थोडकी ना लागते
खूप केला यत्न आम्ही आम्हास नाही समजली
ना कळो आम्हास आहे पुष्काळांना समजली

इतके वर्ष अफजल गुरूला पोसतोय आत्ता कसाबला पोसू. त्यात काय एवढे? पाकिस्तानला अधून मधून पुरावे देत राहू. कालच प्रधानमंत्री की संरक्षण मंत्र्यानी २६/११ मधल्या गुन्हेगारांना शिक्षा होणारच असे ठामपणे सांगितले आहे. बस्स आणि काय पाहिजे?

आता कशाची लाज आता काश्मिरही देऊ आम्ही
काय त्याने भारताचे व्हायचे आहे कमी
दिल्ली जरी गेली तरीही हार ना आम्ही म्हणू
उंचावूनी लुंग्या स्वत:च्या 'जय जगत्' आम्ही म्हणू

२६/११ मुळे पोलिसांची सामान्य माणसाच्या मनातील प्रतिमा मात्र बदलली हे नक्की. २६/११ नंतरच्या दिवसात विजय साळस्कर, अशोक कामटे आणि हेमंत करकरे ह्या तिघा अधिकार्‍यांबद्दल जे वाचायला मिळाले त्यावरून आपण किती मोठे आणि कर्तव्यदक्ष अधिकारी गमावले हे कळते. कामटेनी सोलापूर मध्ये ज्या रीतीने काम केले होते त्यावरून ते किती मोठे होते ते कळते. एका पोलिस अधिकर्‍याच्या मृत्यूमुळे लोकानी उत्स्फूर्तपणे बंद पाळल्याचे माझ्या वाचण्यात नव्हते. एखाद्या हीरोला शोभेल असे व्यक्तिमत्व. पिळदार शरीरयष्टी. रात्री १० नंतर फटाके फोडले म्हणून आमदाराला भर रस्त्यावरून फटके मारुन पोलिस स्टेशनपर्यंत धिंड काढून नेलेला अधिकारी असा लौकिक. विजय साळस्करानी २४ वर्षाच्या कारकिर्दीत ७९ गुंडाना ढगात पोचवलेले. हेमंत करकरे ATS चीफ. व्यवसायाने मेकॅनिकल इंजिनियर पण पोलिस अधिकारी म्हणून कारकीर्द. सोप नाही. इंजिनियर झाल्यावर पुन्हा IPS वैगरे परीक्षा देऊन पोलिसाची नोकरी. हे सगळे नक्कीच स्पेशल होते.

ऐसे नव्हे की भारती या बुद्ध नुसता जन्मला
नुसताच नाही बुद्ध येथे आहे शिवाजी जन्मला
जन्माला जो जो इथे तो वीर आहे जन्माला
अध्यात्म ही या भारताचा युद्धात आहे जन्माला

आहे ध्वजा नक्कीच आमुची पिंडीवरी लहरायची
फक्त आहे देर त्यांनी समरी पुन्हा उतरायची
अरे कुठला हा पाक याचे नावही नव्हते कुठे
कळणारही नाही म्हणावं होता कुठे गेला कुठे...

२६/११ मध्ये बळी पडलेल्या तमाम निरपराध नागरिकांना आणि शहिदांना भावपूर्ण श्रद्धांजली...
========================================================================================
नोंदीमध्ये वापरलेली वरील शायरी भाऊसाहेब पाटणकर लिखीत "दोस्त हो!" ह्या पुस्तकातील आहे.

Saturday, November 14, 2009

मानाचा मुजरानेहमी प्रमाणे मास्तर, दत्त्या, गेंगण्या, बाबू तोडणकर, गंपू शेट अशी सगळी गँग मामाच्या हॉटेलमध्ये बसली होती. रविवार होता. सकाळची वेळ असली तरी बाबू नेहमी सारखा बर्‍यापैकी टूंन्न होता.
मास्तर: काय गंपू शेट आज हजामाती नाय वाटतं?
गंपू शेट: नाय ता काय मी आज काय दुकान उघडायचो नाय. येका कार्यक्रमाक जावचो असा.
दत्त्या: खैसर जावाळ करायचो असा काय?
गंपू शेट: नाय रे.
बाबू: मेल्या रविवारचो धंदो बंद करून खै चाललोस? असो खैचो काम उपटायाचो असा तुज?
गंपू शेट: आज क्रिकेटची मॅच असा.
सगळे: क्रिकेटची मॅच?
बाबू: तू काय थयसर दोनी टीमची भादरवूक जातस?
गंपू शेट: मेलो बेवडो. माका काय हजामाती सोडून बाकी काय दुसरो काम येत नाय असो वाटलो काय? माज्यासारखो अष्टपैलू खेळाडू आजुबाजूच्या गावात नव्हतो. काय समजलावं?

गंपू शेट तसे १०-१२ वर्षांपूर्वी गजालवाडित आलेले असल्यामुळे लोकांना त्यांच्या तरुणपणीचे पराक्रम फार माहीत नव्हते. एकेकाळी गंपूशेट म्हणजे मधल्या फळीतले चिवट फलंदाज आणि फिरकी गोलंदाज. गंपुशेट शब्द जसे गर्रकन फिरवतात तसे चेंडू पण फिरवू शकतात हे कोणाला सांगून खरे वाटले नसते. क्रिकेटबद्दल गंपू शेटना मजबूत प्रेम. आणि सचिन तेंडुलकर म्हणजे सर्व सामान्य क्रिकेटप्रेमींप्रमाणे गंपू शेटचा देव.

मास्तर: अहो गंपुशेट आज मध्येच हे मॅचचं कुठून काढलं नवीन?
गंपू शेट: ओ मास्तर आज तारीख काय?
मास्तर: तारीख? आज १५ नोव्हेंबर. त्यात काय? तारखेचा आणि तुमच्या मॅचचा काय संबंध?
गंपू शेट: ओ मास्तर ना तुम्ही? तरीच केलाव् काम बराबरं. पोरांना काय घंटा शिकिवनार? अहो आज तेंडुलकरच्या क्रिकेट कारकिर्दिला २० वर्षं झाली. त्या प्रित्यर्थ येक आत्ता अकरा वाजता सामना आयोजित केलेला आहे गावाच्या पोरांनी. तिकडंच जातोय मी.

तसे दुकानात सचिन तेंडुलकरची पोस्टर पाहून गंपुशेटना क्रिकेटमध्ये इंट्रेस्ट आहे हे लोकांना माहीत होतं पण गंपुशेट इतके तेंडुलकर प्रेमी असतील ह्याची कल्पना नव्हती.

मामा: असो नाय, मग बरा झाला दुकान बंद ठेवलास ता. नायतर ते चॅनेलवाले दिवसभर तेंडुलकरच्या बालपणापासून ते आजपर्यंत काय काय झाला ता दाखवत बसतील आणि गंपुशेट ता बघता बघता लोकांचे कान मान कापून टाकायचो.
गेंगण्या: नाय तर काय? येकदा गंपूशेट मॅच बघता बघता फाफ्या कदमाची दाढी करीत व्हते. तिकडे तेंडुलकरने ष्ट्रेट द्राइव्ह मारल्यानं आणि इकडे गंपुशेटनी ष्ट्रेट फाफ्याची अर्धी मिशी उडवल्यानी.
बाबू: नायतर काय. अरे तिकडे तेंडुलकर ठोकूक लागलो की गंपु आपल्या हातात वस्तरा हाय हे विसरून जाता. अशीच येकदा कैचीची कट लागून गेली कानास माझ्या. तेवापासून परत कधी मॅचच्या दिवशी हजामात करुक गेलो नाय गंपू शेटकडे.
मास्तर: अहो त्यात काय? हेल्मेट घालून जायचं की?
गंपू शेट: मेलो बेवडो. अरे मी कट कशाक मरूक हवी. झिंगीत तुझोच मस्तक डूलत असता.
मास्तर: ते जाऊ दे ओ गंपुशेट. त्या तेंडुलकरच्या कारकिर्दिला २० वर्षे पूर्ण झाली त्यात काय एवढे? तुम्ही धंदा बंद करून तुम्हाला काय मिळणार?
गंपू शेट: मास्तर सोडून द्या. तुम्हांस नाय कलायचा ता. तुमची कारकीर्द २० वर्ष्याची झाली की तुम्ही शिकवलेली किती पोरा तुमची आठवन काढतात ता बघा. काय समजलावं?
मामा: अरे मास्तर बरोबर बोलततं. अरे तो खेळलो तरी आपण मॅच जिंकत नाय. तो खेळलो की भारत हरलोच समजायचो. तू कशाक खै कडमडूकं जातंस?
गंपू शेट: मामा काढलीस ना सोताची लायकी? ह्याच कलता ना तुला क्रिकेटमधला? बेवड्या सांग बरे सचिनची वन डे मधली शतका किती असतं?
बाबू: ४५.
गंपू शेट: आणि त्याताल्या ३२ शतकानी संघाक विजय मिळवून देलानी. मास्तरांनू काढा टक्केवारी आणि घाला मामाच्या घश्यात.
मास्तर: ४५ पैकी ३२ म्हणजे ७० टकक्याहून जास्त.
गंपू शेट: मंग? आत्ता बोल मामा? वाचा बसली नां तुझी? अरे मेल्यानू तो खेळला तरी बोंबलताव आणि नाय खेळला तरी बोंबलताव . आत्ता परवा येकट्यानं केलानं नां १७५. अवो सोन्याचो भाव आणि तेंडुलकरची येक येक धाव म्हंजे रोज एक नवो शिखर. दोघांनी कसो हातात हात घालून १७ हजारी टप्पा पार केल्यानी.
मामा: पण शेवटी झालो काय आपण मॅच हरलो नां?
गेंगण्या: आत्ता तो बाद झाल्यावर ढुन्गणाकडचे लोग हगले त्याला तो काय करील?
गेंगण्याने अचानक टीम बदलली आणि गंपू शेटला जॉइन केले
गंपू शेट: मागे येकदा मद्रासला पण पाकिस्तान बरोबरच्या कसोटीत तो बाद झाला तेंव्हा १६ रन्स हवे होते? किती १६ आणि आपले ४ जन शिल्लक होते. आणि निकाल विचारा. भारत १२ रन्स ने हरला व्हता. आत्ता तो काय फेडररसारखो एकेरी सामने नाय खेळत जो जाता येता येकट्यानं जिंकवून् देल.
गेंगण्या: २००३ चो वर्ल्डकप आठवा. येकट्यान काढलान सगल्या मॅची.
गंपू शेट: मंग? विसरलाव? आज त्याची हर एक रन्स वर्ल्ड रेकॉर्ड हाय. काय समजलावं? अरे नुसती बॅटिंग करून थांबलोय काय? मोइन खानला जावन् विचारा. त्याच्या ढेन्गातून बॉल गेलो कधी नि दांडके पडले कधी त्याचो त्यालाच नाय कळलो. परवा १७५ रन करून देलान ना तोंडात रिटायर हो, रिटायर हो म्हणून बोंबलनार्‍या लोकांच्या. अरे ती शारजातली मॅच आठवा. वादाल येवन् गेल्यावर शेन वार्नची जी काय पिसा काढल्यान् व्हती की तो अजुन आठवण काढतो आणि जल्ली मामा सारखी लोका विसरतात.
दत्त्या: अहो क्रिकेट जगतातले म्हातारे कोतारे पण त्याच्या पेक्षा बाकी कोण कोण श्रेष्ट हे किती वेळा बोंबलले. तो १९४ असताना आपल्याच लोकांनी डाव सोडल्यानी पण कधी कोणाकं एका शब्दानं तरी बोलल्याचो आठवताय? असो सभ्य खेळाडू दिसता कोन दुसरो तुम्हास?
गेंगण्या: हल्ली ताजो ताजो त्या विनोद कांबळ्यान् उगाच काय तरी बोलायचो म्हणून बोलल्यान् आणि सोताच्या तोंडाक काला फासल्यान्. आपल्या मच्छिन्द्र कांबळ्यान् जा काय नाव कमावल्यान् ता विनोद कांबळ्यान् घालवल्यान्.
बाबू: "हा म्हणजे बिशन सिंग बेदीन् कमावलेलो नाव येकट्या मंदिरा बेदीन् घालवल्यान् तसलो प्रकार झालो." बाबूला बर्‍याच वेळांन किक आली.
गंपू शेट: आज काल कोन पन ट्वेंटी ट्वेंटी खेलता पण २० वर्षे कसोटी, वन डे क्रिकेट कोण खेलेल हे सांगा? अरे लोका पुर्‍या कारकिर्दीत १०-१२ शतका झाली तरी धन्य मानतात. पण हा आपल्या कारकिर्दीत १६ वेळा नव्वदित बाद झालो. नाय तर १०० शतकांचा आकडो कधीच पार झालो असतो
मास्तर: होय होय ते पण खरचं. पुर्वी पासून क्रिकेट भारतात लोकप्रिय होत पण आज क्रिकेट म्हणजे पैश्याची गंगा झालीय, लोक आपल्या मुलाला क्रिकेटर म्हणून पाहु लागली आहेत, क्रिकेट एक करियर म्हणून विचार करावा इतकं पुढे गेलय. क्रिकेट आता व्यवसाइक झालाय. ह्याच सगळ्यात जास्त श्रेय सचिनलाच जातं हे कोणीही मान्य करेल.
मामा: अरे ता सगला मान्य पण वर्ल्डकपचो काय?
गंपू शेट: हा तेवडो मात्र खरां. २००३ ला त्यानं एकट्याच्या जिवावर वर्ल्ड कप आणल्यांनचं होतो पण शेवटची फाइनल फसली. नायतर आज त्याची कारकीर्द कशी झलालून दिसली असती. तेवढि येकच कमी राह्याली हाय आत्ता. त्यासाठीच मी जातय म्हांराजाकं गार्‍हानं घालूक...

सगळे: आमी पण येतो. आमी पण येतो.

रे म्हांराजा !!!!!
बारा राटीच्या, बारा वहिवाटीच्या म्हांराजा !!!!! तुका आज गार्‍हाणं घालतायं रे म्हांराजा !!!

तेंडुलकरांच्या सचिनने आज कारकिर्दीक २० वर्षे पुरी केल्यान्.
व्हयं म्हांराजा !!!

आजपर्यंत धावांचो डोंगर उभा केल्यान्.
व्हयं म्हांराजा !!!

जगातल्या सगल्या बोलर लोकांकं धडकी भरवल्यान् आनी फील्डर लोकांकं सैरभैर करून सोडल्यान् .
व्हयं म्हांराजा !!!

जाता-येता विक्रम मोडल्यान्... नवीन नवीन विक्रम आपल्या नावावर केल्यान्.
व्हयं म्हांराजा !!!

तर ह्याच्या पुडे पण त्याच्या हातान् अशीच कामगिरी होत रवांदे.
व्हयं म्हांराजा !!!

त्याचो खेळ असोच बहरत जावांदे.
व्हयं म्हांराजा !!!

आनी २०११ चो विश्वकप भारतात येवांदे...
व्हयं म्हांराजा !!!

Saturday, November 7, 2009

यंदाची दिवाळी - भाग २

भाग एक पासून पुढे चालू

दिवाळी दिवशी साडेपाचला उठलो. घरातली मोठी माणसे कधीच ४-४ १/२ पासून उठून तयारीला लागली होतीत. मस्त नारळाच्या रसात भिजवलेल्या ऊटण्याचा छान वास येत होता. आई, बाबा, काका, काकू, भाऊ, वहिन्या ह्यांच्या आंघोळी देखील आटोपल्या होत्या. देवपूजेची तयारी सुरू होती. देवाला देखील ऊटणे लावून पूजेची सुरूवात झाली. तोवर आजूबाजूच्या मुलांनी दणके बाज फटाके फोडले. त्या आवाजाने आमच्या घरातले बाळगोपाळदेखील उठले आणि फटाके फोडण्यासाठी धावले. सगळ्यात लहान सिद्धी फटक्याच्या आवाजाने दचकून उठली आणि फुल्ल भोकाड पसरले. मी देखील ऊटणे लावून आंघोळ करून घेतली. दिवाळी दिवशी आई, काकी, आत्ये अशा सगळ्या आम्हा भावंडांना ऊटणे लावतात. आमच्या वेळी असं नव्हतं असे म्हण्याची अजुन गोष्ट म्हणजे दिवाळीतली थंडी. लहानपणी खूप थंडी असायची. कधी एकदा सगळ्याजणी आपल्याला ऊटणे लावतात आणि कधी एकदचा गरम पाण्याचा तांब्या अंगावर घेतो असे व्हायचे. थंडी नक्की कोणत्या दिवाळीत गायब झाली आठवत नाही पण गायब झाली हे मात्र नक्की. हल्ली दिवाळी मे महिन्यात येते की काय असे वाटते. आपल्या नकळत सगळं किती भराभर बदलतं नां. आंघोळीनंतर तुळशी समोर कारेट फोडलं. ही प्रथा कुठे कुठे पाळतात हे ठाऊक नाही म्हणून लिहितो. कारेट नावाचं एक अंड्याच्या आकाराचे फळ रानात किंवा डोंगरावर मिळते. नरकचतुर्थी दिवशी नरकासूर समजून डाव्या पायाच्या अंगठ्याने हे कारेट तुळशीसमोर फोडायाचे. लहानपणी मला केवळ पायाच्या अंगठ्याने हे फोडता नाही यायचे. मग पूर्ण पाय द्यायचो आणि कारेट चपटून टाकायचो. घरातल्या सगळ्यांच्या आंघोळी झाल्यानंतर पुढच्या ओटीवर सगळे एकत्र फराळाला बसलो. देवपूजा आटोपली होती. दिवाळी दिवशी देवाला दूध पोह्याचा नेवैद्य दाखवतात. मस्त फराळ आणि दूधपोह्यावर ताव मारला. छोट्या मुलांना सतावणे वैगरे सुरू होतेच. आमचं झाल्यावर लेडीजची बॅच फराळाला बसली. नंतर शेजारच्या घरात फराळची देवाणघेवाण सुरू झाली. पप्या वाडीतल्या गँगचा म्होरक्या झालाय. हल्ली बरीचशी मुलं नोकरीशिक्षणानिमित्त घराबाहेर असल्याने पप्या आणि समस्त गँग दसरा, कोजागिरी साजरी करू शकले नव्हते. त्यामुळे दिवाळी दिवशी सगळे एकत्र येऊन सगळ्या घरात जाऊन दिवाळी शुभेच्छा देत फिरत होते. गँगचा दिवाळीच्या शुभेच्छांबरोबर दुसर्‍या दिवशी गणपतीपुळे ट्रिपचा प्रस्ताव देखील होता. मे महिन्यानंतर झालेले वाढदिवस आणि कोजागिरी हातखंब्याजवळच्या धाब्यावर चिकन हाणून साजरे करण्याचा प्लान होता. (हातखंबा हे मुंबई-गोवा हाइवे वरचे एक गाव. सुजाण वाचकांनी हात खंबा अशी शब्द फोड करू नये.) आत्ता मी सतत बाहेरच चिकन खात असल्याने रविवार घरीच साजरा करणार होतो. त्यामुळे पप्या आणि कंपनीचा प्रस्ताव साहजिकच धुडकावून लावला आणि मी मंदिरात जाण्यासाठी बाहेर पडलो. दिवाळी दिवशी भल्या पहाटे मुले देखील न चुकता मंदिरात जातात ह्याचे कारण सांगायची गरज नाही. त्या दिवशी इतक्या छान छान मुली पाहायला मिळतात की काय बोलावे. मला जरा उशीरच झाला पण Better late than Absent या सदाबहार सुविचारला धरून मी हजेरी लावून आलो. पदरी अगदीच निराशा नाही पडली.

सकाळी सगळे लवकर उठलेले त्यामुळे जेवणं झाल्या झाल्या सगळे पटापट झोपी गेले. २-३ तासाच्या विश्रांती नंतर चहापान झाल्यावर सगळे पुन्हा फ्रेश झाले. संध्याकाळी लक्ष्मी पूजन होते. दिवेलागणी बरोबर पुन्हा एकदा कंदील, पणत्या आणि त्याचबरोबर फटाके फोडणार्‍या बाल-गोपाळ मंडळींवर लक्ष्य ठेवणे हे काम माझ्याकडे आले. मोठी माणसे लक्ष्मी पूजनाच्या तयारीला लागली. वहिनीने पिवळ्या आणि केशरी गोंड्या च्या पाकळ्यांची छान रांगोळी काढली होती. छान प्रसन्न वातावरणात लक्ष्मी-पूजन पार पडले. गोड शिरा आणि श्रीखंड पूरीचा नेवैद्य झाला. सगळं आटपेपर्यंत साडेआठ वाजून गेले. पुन्हा थोड्या गप्पाटप्पा नंतर जेवण करून दिवाळीच्या पहिल्या दिवसाची सांगता झाली.

दुसर्‍या दिवशी रविवार. साहजिकच पुन्हा एकदा मच्छीमार्केटची वाट धरण्यात आली. रविवार चिंगळ(Prawns), कालव्, तिसरे मुळे (एक शिंपी) यापैकी काहीतरी अशी माझी फर्माईश होती. कालव् आणि तिसरे मुळे मिळणे कठीण आहे हे माहीत होतं. प्लान के मुताबिक चिंगळ आणि जोडीला गावठी चिकन. आमच्याकडे होळीच्या दुसर्‍या दिवशी धुलीवंदनाला कोंबडी-बोकडाचे गावजेवण असते. गावाचे लोक होळीला ईच्छेनुसार कोंबडी-बोकड किंवा नाराळाचा नवस बोलतात. हे मटण गावाचे पुरूष शिजवतात. ह्याला कसलेही वाटप किंवा स्पेशल चिकन मसाला वैगरे लावत नाहीत. फक्त नवसाचे नारळ आणि कांदा वापरुन केलेले असते. आम्ही ह्याला सुक्क मटण म्हणतो. त्या दिवशी घरी चिंगळाबरोबर तसं सुक्क चिकन शिजलं होतं. मी रेसिपी लिहून आणली आहे. एक दोन आठवड्यात करून पाहीन एखाद्या रविवारी.

आता अशा जेवणा नंतर पुन्हा झोप ओघानेच आली. झोपून उठल्यावर चहा वैगरे घेऊन झाल्यावर बाजारात जाऊन कागद आणि गोंद घेऊन आलो. महेंद्र्जींनी केलेला कंदील पाहिल्यापासून यंदा आपण देखील कंदील करावा हे मनात आले होते. लहानपणीचे दिवस आठवले. लहानपणी दिवाळीची सुट्टी पडली की कंदील आणि मातीचा किल्ला करणे ही दोन कामे दिवाळीच्या दिवसाआधी उरकणे ही मोठी जबाबदारी असायची. मोठ्या कंदीलाबरोबर १०-१२ छोटे कंदील ही करावे लागत. शेजारच्या काकांकडून सिगारेटची रिकामी पाकिटे आणून ती मधून कापून त्यावर कागदी करंज्या आणि शेपूट लावली की झाला कंदील. आत्ता मात्रा कागदी करंज्यांचाच पण एकच मोठा कंदील करायचे ठरवले. जवळपास १४-१५ वर्षांनी कंदील करत होतो. पुतणे आणि भाचे मंडळी कुतुहलाने बघत होते. कंदीलाचा सांगाडा बनवायला ड्रेसच्या खोक्याचा पुट्ठा वापरला. दोन तासात कंदील झाला. मला कंदील करताना बघून बाबा पण मदतीला आले. बाबांनी प्रत्येक करंजीच्यामध्ये सोनेरी कागद कापून नाजूक ठिपके लावले. दिवाळीला नाही तरी भाऊबीजेआधी कंदील अंगणात लागला. ऑफीसचे बेचव काम सोडून आपल्याला अजुन काही येते ह्याचा उगाचच अभिमान वाटला. पुन्हा एकदा कॅमरा न आणल्याचा पस्तावा झाला. मला साधाच मोबाईल आवडतो पण आपल्या मोबाईल मध्ये कॅमेरा नाही ह्याच त्यावेळी पहिल्यांदा वाईट वाटलं. दादाच्या मोबाईलवर फोटो काढला पण नंतर कॉपी करायाचा राहिला. नंतर चार दिवसांनी संध्याकाळी अचानक पावसाची बर्‍यापैकी मोठी सर आली त्यात कंदीलाचा काही भाग भिजला.

दुसर्‍या दिवशी भाऊबीज. त्या दिवशी दिवाळीसारखचं बहिणींनी उटण लावलं. आंघोळी नंतर ओवाळणी. मला मोठ्या बहिणीने भाऊबीजेला एक छोटी कढई दिली. माझ्याकडे इथे कढई नव्हती म्हणून मी तिला आधीच सांगून ठेवले होते. फ्रायपॅनमध्ये अंडा बुर्जी तितकीशी चांगली होतं नाही आणि शिवाय डीपफ्राय करण्यासारखं काहीच करता येत नाही. आत्ता कढई आलीय मग अंडा बुर्जी, कांदा-भजी, बेसनचा सुका झुणका, हरा-भरा कबाब हे सगळं बनवता येईल. बनवेन लवकरच. माझ्या स्वयंपाक घरातल्या करमती आणि पाक कौशल्यावर एक पोस्ट होईलच कधी तरी. पाहु लिहायला लवकरच वेळ मिळो. असो तर गोडाधोडाचं खाऊन भाऊबीज साजरी झाली. माझ्या वहिन्याचे भाऊ पण भाऊबीजे निमित्त आपल्या बहिणींकडे म्हणजे आमच्या घरी आले होते. आईला भेटायला माझा मामा देखील आलेला. त्या निमित्ताने आमची पण भेट झाली. भाऊबीज संपली. दिवाळीचे सगळे मुख्य कार्यक्रम पार पडले. आत्ता मस्त आराम. म्हणजे मी गेले चार दिवस फार काम उपसले अश्यातला भाग नव्हता. पण तरी आपलं म्हणायचं. सकाळ संध्याकाळ ब्रेकफास्टपासून रात्रीच्या जेवणापर्यंत काय काय पाहिजे ते फर्मान सोडायाचे आणि हादडायचे हाच एक कलमी कार्यक्रम. अगदीच हुक्की आली तर बाजारात फेरफटका मारायचा. दोन दिवस संध्याकाळी छोटे कंपनीला घेऊन मांडवी बंदरला जाऊन आलो. वाळूत किल्ले बांधले. पुन्हा कॅमेरा नाही!!! भेळ, आइस्क्रीम, कटलेट चोपले. बाकी वडापाव, ढोकळा, मिक्स-भजी ह्या सगळ्यांचा आस्वाददेखील घेऊन झालाचं होता. भावाची छोटी मुलगी होती. तिच्या बरोबर खेळण्यात वेळ चटकन निघून जात होता. ह्या आधी तिला पहिल्यांदा पहिली तेंव्हा ती सहा महिन्यांची होती. नुकतीच बसू लागली होती. आत्ता तर ती दूडू-दूडू धावू लागली होती. वेळ किती भुर्रकन निघून जातो नाही? भाऊ, काका, मामा अशी सगळी नातेवाईक मंडळी मुंबई किंवा पुण्याला. त्यामुळे अधूनमधून त्यांच्या भेटीगाठी आणि रत्नागिरीला येणं जाणं सुरूचं असतं. आम्ही दक्षिणेकडे जाऊन पडावं ही श्रींची इच्छा त्यामुळे मी एकटा तिकडे बंगलोरमध्ये. मुंबईला अगदी जवळचं कुणाचं लग्न असेल तरच जाणं होतं. त्यामुळे गणपती, दिवाळी किंवा मे महिन्यामध्ये जाणं झालं तरच माझी इतरांशी भेट होते. नाहीतर सहा सहा महिने दर्शन नसतं. बघू पुण्याला कधी येणं होतं?

सुट्टीच्या दिवसांपैकी एक दिवस निवडणूक निकालांचा होता. पप्याचा जनसंपर्क एकदम चांगला आहे. गावात कुणाकडे ही अडल्या नडल्यावेळी हा हजर त्यामुळे तो पुण्यात गेल्या पासून त्याची उणीव हल्ली सगळ्यांनाच जाणवते. पोरगं राजकारणात शिरलं तर चांगलं नाव काढेल. तसा तो active आहे सुद्धा. निवडणुकीच्या धामधुमी आधी राष्ट्रवादी आणि शिवसेनेमध्ये स्पर्धा निर्माण करून रस्त्याचे काम करून घेण्यात पप्याचा हात होता. साहजिकच निकालादिवशी पप्या सकाळपासून गायब. मतमोजणी केन्द्रावर हजर होता. रत्नागिरीतून अपेक्षेप्रमाणे राष्ट्रवादीचे उदय सामंत निवडून आले. कार्यकर्ता म्हणून साहजिकच पप्याला पार्टीला आमंत्रण होते. गुहागरला रामदास कदम, विनय नातू आणि भास्कर जाधव ह्या तीन त्रिमूर्तीची चार दिवसापासून फार चर्चा होती. निकालादिवशी भास्कर जाधवांनी बाजी मारली. गुहागर मतदारसंघ फेररचनेमुळे कुणाचं कसे नुकसान झाले, मुंबईत शिवसेनेचे कसे हाल झाले, मनसेने कसा दणका दिला ह्याचीच दोन दिवस चर्चा होती.

ह्या सगळ्या मौजमजेत अचानक एक दिवस उद्या आपल्याला निघायचे आहे हे आठवले. मग फराळाचे पॅकिंग सुरू झाले. काय आहे ना घरी असल्याने नॉन-व्हेज आणि बंगलोरला न मिळणार्‍या गोष्टी खाण्यावार मी भर देतो आणि फराळ वैगरे टिकाऊ पदार्थ घेऊन बंगलोरला येतो म्हणजे इथल्या इडली-वड्यापासून काही दिवस सुटका होते. ऑफीसमधल्या मित्रांसाठी भाकर-वडी आणि कोहाळे पाक घेतला. रविवारी दुपारचा मस्त्याहार करून नेहमीप्रमाणे मनात नसताना दुपारच्या कोल्हापूर गाडीने रत्नागिरी सोडले. कोल्हापूरहून पुन्हा बंगलोरची वोल्वो पकडली. पुन्हा कन्नड चित्रपट. बहुतेक क.रा.प.मंने फक्त कन्नड चित्रपटचं लावायचे ठरवलेले दिसते. परतीच्या प्रवासाबद्दल बाकी काही फार लिहाण्यासारखं नाहीए. हा प्रवास जरा उदासवाणाच असतो. बराचसा झोपेतच जातो.

अश्या प्रकारे यंदाची दिवाळी मस्त खादडण्यात आणि मौज-मजेत गेली. इतकी मोठी पोस्ट होईल असे वाटलेच नव्हते. दिवाळीपेक्षा मत्स्याहाराचीच जास्त चर्चा झाली हा भाग वेगळा. लिहायला बसलो आणि बरचं काही काही सुचतं गेलं. वाटलं तसं लिहीत गेलो. पहिल्यांदाच एवढ्या मोठ्या पोस्ट लिहाल्या आहेत. पहिल्या पोस्टला बर्‍यापैकी प्रतिक्रिया मिळाल्या. बरे वाटले. थोडा हुरूप आला लिहण्याचा. बोअरिंग झाले नसेल अशी आशा बाळगतो.

ShareThis