Saturday, September 24, 2011

पैचान कौन? (भाग-१)

टीप: खालील कथेतील पात्रं व प्रसंग पूर्णपणे काल्पनिक आहेत. कोणत्याही सत्य घटनेशी अथवा व्यक्तीशी अथवा कुणाच्या वर्तनाशी यात कमालीचे साम्य आढळल्यास तो केवळ योगायोग समजावा.


आज पुन्हा तो अजून एका ठिकाणी नकार ऐकून आला होता. नेहमीप्रमाणे त्याच्या प्रोजेक्टबद्दलच्या कल्पना 'अतिशयोक्ती' या नावाखाली हाणून पाडल्या गेल्या होत्या. सगळ्याच कंपन्या "Over Qualified for job" असे ठणकावून सांगून आपल्या तोंडाला पाने का पुसतात हे त्याला अजून हि कळले नव्हते. आत्ता तो देखील "ह्यांना आपली कदर नाही, आपली कदर करणारा कुणीतरी भेटेल" अशी दरवेळी स्वतःची समजूत करून तो कंटाळला होता. पण आपल्याला पारखण्यात लोकं नक्की कुठे चुकतात हे मात्र त्याला कळत नव्हते.

तसा लहानपणापासूनच तो चिकित्सक होता. अर्थात चिकित्सकपणा त्याच्या रक्तातच होता. त्याचे नाव चिंतन ज्ञानसागर. त्यांचे खरे आडनाव तसे कुणालाच माहीत नव्हते. फार पूर्वी त्यांच्या पूर्वजांनी कुणा राजा/बादशहाच्या दरबारी वेदशास्त्राच्या गाढ अभ्यासाने म्हणा, लेखणीच्या तलवारी चालवून किंवा देशोदेशीच्या विद्वानांना वाद-विवाद स्पर्धेत हरवून ज्ञानसागर हे आडनाव पदरात पाडून घेतले असावे आणि पुढच्या पिढीत सगळी पोरं बापाच्या वळणावर गेली असल्याने सहाजिकच आडनावाला साजेशी कामगिरी प्रत्येक पिढीच्या हस्ते घडली होती. घर-गृहस्थी, संसार ह्या इतर दुय्यम गोष्टीत घरातील स्त्रियांनी लक्ष घातल्यामुळे आजवर घराण्याचे दैनंदिन जीवन सुरळीत सुरु होते.या घराण्यातल्या कर्त्या पुरुषांनीदेखील आयुष्यभर अर्थार्जनापेक्षा कायम ज्ञानार्जनावरच भर दिला. पुस्तके, ज्ञान, शोधनिबंध यांच्या सदैव संपर्कात रहाता यावे म्हणून बहुतेकांनी शिक्षकी पेशा पत्कारला होता.

चिंतनच्या बाबतीत मात्र आपल्या मुलाने इतके ज्ञान मिळवलेच आहे तर त्याचा उपयोग अर्थाजनासाठी तरी करून घ्यावा असे त्याच्या आईचे ठोस मत होते. त्याने नोकरी धंद्यात यश मिळवून इतर मुलांप्रमाणे चार पैसे गाठीशी बांधावे, त्यातून ऐहिक सुखे अनुभवावी असे तिला वाटे. ती त्यासाठी कायम प्रयत्नात देखील असे. ह्याच कारणासाठी स्वतः फोन/SMS करून तिने मध्यंतरी लेकाला "कौन बनेगा करोडपती"मध्ये देखील पाठवले होते जेणेकरून तिथे करोड नाहीतर निदान काही लाख तरी पदरात पडतील आणि त्याला कामधंदा लागेपर्यंत तरी घरखर्चाचा प्रश्न सुटेल. पण चिंतनला विचारलेल्या प्रश्नाचे उत्तर चार पर्यायामधून बघून सांगणे म्हणजे आपल्या ज्ञानाचा अपमान वाटे. त्याच्या मते अशी पर्याय बघून उत्तर देणे म्हणजे परीक्षेत कॉपी करण्यासारखे होते. तरीदेखील घरून मारूनमुटकून KBCमध्ये भाग घेण्यासाठी पाठवलेला चिंतन पोहोचला मात्र "राज पिछले जन्म का"च्या सेट वर. त्याने KBCमध्ये महानायाकाची करंगळी धरून पुढे जाण्यापेक्षा स्वतःचा सिक्स्थ-सेन्स, आर्टिफिशीअल् इंटेलिजंन्स वापरून स्वतःच्या पूर्वजन्मात डोकावून पहाण्यात धन्यता मानली.

तर असा हा चिंतन ज्ञानसागर. आपले ते खरे करणारा. प्रत्येक गोष्ट आपल्या ज्ञानाच्या आधारे पडताळून पहायला बघणारा. आज देखील एका फार मोठ्या कंपनीमध्ये मुलाखत देवून आलेला. आलेली संधी त्याच्यासाठी आणि त्याच्या भावी संशोधनासाठी फारच उपयोगी होती. ती मल्टी नॅशनल कंपनी सागरी संशोधनासाठी प्रसिध्द होती. चिंतननेदेखील लहानपणापासुनच पाणी आणि पाण्याखालचे जीवन यावर खूप अभ्यास केला होता. त्याचा हा अभ्यास देखील तसा अपघातानेच सुरु झाला होता. शाळेतून जाता येता वाटेत नदीतल्या पाण्यात दगड भिरकावणे हा सगळ्या मुलांचा चंद. पण नुसता दगड भिरकावून पुढे जायला चिंतन हा काही इतरांसारखा सामान्य मुलगा मुळीच नव्हता. पाण्यात दगड भिरकवल्यानंतर पाण्यावर उठणाऱ्या तरंगांनी त्याचे लक्ष वेधून घेतले. पुढे सहाव्या की सातव्या इयत्तेच्या विज्ञान विषयात पाण्यात वस्तू टाकली की पाण्यावर उठणारे तरंग आणि त्यांची वारंवारता ह्यावर एक धडा होता. तिसरीत असला तरी चिंतनने दिवाळी आणि में महिन्याच्या सुट्टीत शेजारपाजारच्या घरात घुसून दहावीपर्यंतची सगळी पुस्तके चाळून काढली होतीत. जे मिळेल ते अधाश्यासारखे वाचणे हा वडिलोपार्जित गुण असल्याने इतक्या लहान वयातदेखील त्याला वाचायला पुस्तके पुरत नसत.

सहाजिकच दगड टाकल्यावर पाण्यावर उठणारे तरंग मोजण्याचा नविन चिंतनला लागला. पुढे कमी-अधिक आकारमानाचे दगड, मग दगडाऐवजी मातीचे ढेकूळ, लाकडाचा तुकडा, शाळेतल्या खडूचा तुकडा आणि नंतर निरनिराळ्या धातूचे तुकडे असे काय हाताला मिळेल ते पाण्यात टाकणे आणि पाण्यावर उठणाऱ्या तरंगांचे निरीक्षण नोंदवणे अशी सवयच त्याला लागून गेली. घरात आणि आजूबाजूच्या परिसरात सहज उपलब्ध असणाऱ्या गोष्टी आणि धातूच्या तुकड्यांची निरीक्षणे झाल्यावर या अकाली शास्त्रज्ञाने एकदा थेट बापाची दोन तोळ्याची सोन्याची अंगठी घरून आणून पाण्यात फेकली आणि सोने या नविन धातूचे निरीक्षण नोंदवले. यथावकाश हि गोष्ट घरी समजली. बापाला अर्थातच काही फरक पडत नव्हता पण चिंतनाच्या आईने मात्र आकाश पाताळ एक केले. तेंव्हा ती अंगठी परत आणण्यासाठी चिंतनने पहिल्यांदा पाण्यात उडी मारली. पण पाण्यात शिरताच पाण्याखालचे जग पाहून चिंतन इतका हरखून गेला की अंगठी शोधण्याचे विसरूनच गेला. पूर्वी कधीही पाण्यात न पडलेला चिंतन केवळ "पोहायला शिका" या कधीतरी वाचलेल्या पुस्तकात लिहिल्याप्रमाणे हात पाय हलवून लगेचच पोहू लागला. त्यासाठी त्याला सुका नारळ वा टायर कमरेभोवती बांधून बिलकुल सराव करावा लागला नाही. अर्थात इतरांसाठी हे भारी प्रकरण असले तरी चिंतनला मात्र आपण पहिल्यांदाच पाण्यात पडलो आहोत आणि पोहू लागलो आहोत हे कळले देखील नाही. तो आपला सराईतपणे पोहत आपल्या समोर नव्यानेच उघडलेले जग आणि त्यातील जलचर न्याहाळण्यात मग्न होता.

तसंही त्याच्या हुशार आणि चिकित्सक स्वभावामुळे बरोबरची मुले त्याला कधीच आपल्या बरोबर सामावून घेत नसत. खरे तर मुलांची पण चूक नव्हती. ती सुद्धा सुरुवातीला चिंतनला बरोबर घेत असत. त्याचे वेगळेपण कळल्यावर त्याला एक हुशार मुलगा म्हणून मान देत असत. पण पुढे पुढे त्यांना चिंतनचा त्रास व्हायला लागला जेंव्हा एखादा प्रश्न किंवा शंका विचारल्यानंतर त्याचे उत्तर खूप खोलात जावून ऐकावे लागे. 'त' वरून तपेलं अश्या अपेक्षेने चिंतनला काही विचारावे तर तो तपेल्याबरोबर 'त' वरून ताट, तांब्या, तराजूपासून सुरुवात करे तो थेट 'ट' वरून टमरेल पर्यंत जाई. परीक्षेत देखील एका वाक्यात उत्तरे द्या हा प्रश्न चिंतनला जाचक वाटे. जिथे लोकं त्याच्या पासून पळायला बघत तिथे लोकांना चार गोष्टी जास्त कळल्या तर काय बिघडलं असा प्रश्न चिंतनला पडे. मुलांबरोबर खेळायला गेला तरी गणित/विज्ञान हे विषय त्याला खेळातल्या आनंदापेक्षा वेग, दिशा, वस्तुमान ह्या गोष्टींकडे पहायला लावीत. क्रिकेट खेळताना स्ट्रेट-ड्राईव्ह सरळ रेषेत, कव्हर-ड्राईव्ह ४५ अंशात तर स्क़्वेअर कट ९० अंशातच असला पाहिजे याबद्दल तो आग्रही असे. सहाजिकच चिंतनला खेळात घेण्याऐवजी घासू, पुस्तकी किडा, लाल्या अश्या अनेक उपाध्या बरोबर देवून पोरांनी त्याला वाळीत टाकले होते. ह्या अश्या मिळणाऱ्या वागणुकीमुळे चिंतन बहुतेक वेळा एकटाच असायचा. त्यालाही बाहेरच्या जगाचा तसा कंटाळाच आलेला. तो रहात होता तिथे भौगोलिक, ऐतिहासिक, सामाजिकदृष्टया वा अन्य कुठल्याही प्रकारे आकलन करण्यासारखे त्याच्या दृष्टीने काहीच उरले नव्हते. त्यामुळे अपघाताने का होईना पाण्यात पडल्यानंतर आपोआपच त्याच्यासाठी अभ्यासाचे एक नविन दालन उघडले होते. त्याच्या बुद्धीला एक नविन खाद्य मिळाले होते. त्याकाळी डिस्कवरी, अनिमल प्लॅनेट अश्या वाहिन्या नसल्याने चिंतन हे सर्व पहिल्यांदाच पहात होता. त्या घटनेनंतर त्याचे आयुष्यच जलमय झाले. बरोबरची सामन्य मुले जेंव्हा सूर्यकिरणे पाण्यात शिरली की प्रकाश किरणांचा कोन बदलतो हे बालबुद्धीस किचकट विज्ञान लक्षात ठेवण्यासाठी डोकेफोड करीत होतीत तेंव्हा चिंतन मात्र जास्तीत जास्त वेळ श्वास रोखून पाण्याखाली कसे रहाता येईल या प्रयत्नात असायचा.

क्रमशः

(पुढील भागात - चिंतन आणि अजून काही व्यक्तिरेखा टीव्हीवरच्या "पैचान कौन" या कार्यक्रमात...)

ShareThis