Friday, April 22, 2011

देव दिवाळीगेल्या आठवड्यातच नायगावकर काका एका कार्यक्रमात म्हणाले की रमेश तेंडुलकरांनी देखील कधीतरी सचिनला म्हटले असेल "फटके दिले पाहिजेत" आणि तो इतका आज्ञाधारक की एवढा मोठा झाला तरी फटके देतोच आहे. अरे बहुतेक त्यांना "तुला फटके दिले पाहिजेत" असे म्हणायचे होते असेल रे पण तू फोडत बसलास गोलंदाजांना. लहानपणी शिवाजी पार्कवरचे चिल्ली पिल्ली गोलंदाज फोडणे ठीक आहे रे, पण अब्दुल कादिरपासून सुरूवात करून वकार, वसिम, वॉर्न, ली, मुरली ह्यांना पण फोडायचे? इथे पाचच लिहाले आहेत कारण नाही म्हटले तरी आमच्या सारख्यांनी पाहिलेले पहिले पाच उत्तम, दर्जेदार गोलंदाज म्हणायला हरकत नाही. बाकी तू हेन्री ओलोंगा वैगरेला (तोच तो हल्ली प्रेज़ेंटेशन सेरेमेनीमध्ये प्रश्न विचारत असतो तो) पण फोडला होतास. त्याची चुक काय तर ओळख नसताना (म्हणजे गोलंदाज म्हणून त्याला कुणी ही ओळखत नसताना) एका मॅचमध्ये त्याने तुझी विकेट काढली आणि मॅचनंतर प्रौढीच्या पिपाण्या वाजवल्या. मग काय पुढच्याच मॅचमध्ये तू त्याला फोडलास. असा तसा नाही तर उण्यापूर्‍या १९६ धावांचा पाठलाग करताना तू शतक ठोकलं होतसं. आयुष्यात पहिल्यांदा तू फोडलेल्या गोलंदाजांची मला दया आली होती. त्यामुळेच तर तो अजुन आमच्यासारख्यांच्या लक्षात. आजवर असे अनेक लुंगेसुंगे आपले लेंगे तुझ्याकडून ओले करून धुवून घेऊन गेले. त्यावेळी ठीक होतं रे, तू तरुण होतास म्हणजे तारुण्याच्या उंबरठ्यावर होतास, रक्त सळसळतं होतं. आजच्याच दिवशी तू एकट्याने कांगारूंना शारजाच्या वाळवंटात करपवलं होतंस आणि आपला वाढदिवस साजरा केला होतास. पण आज जवळपास १४ वर्षे झाली तरी वॉर्नने कितीही नाही म्हटलं तरी हल्लीच्या ताज्या फडफडीत लिज़ हुर्ले किंवा तत्सम स्वप्नसुंदरीआधी तू त्याच्या स्वप्नात जात असशील हे नक्की.

फार कमी गोष्टी अश्या आहेत की ज्याच्याबाबत मी ठाम आहे किंवा असेन. आत्ता धर्म, देश वैगरे बदलण्याचा प्रश्न येत नाही म्हणून त्या आपण सोडून देऊ. पण सध्या काम करीत असलेला प्रॉजेक्ट म्हणा, दर महिना पगार देणारी कंपनी म्हणा फार कशाला अगदी करियर म्हणा मी कश्याच्याही बाबतीत ठाम आहे असे मला तरी वाटत नाही. आमच्या धंद्यात तसे कुणीच ठाम नसते त्यामुळे ते सोडा. पण स्वता:ची अक्कल वापरायला लागल्यापासून केवळ तुझ्या बाबतीत मी ठाम आहे हे मी छातीठोकपणे सांगू शकतो. टेनिसला मराठीत बॅडमिंटन म्हणतात एवढी समज असलेल्या वयात केवळ तुला पीट सँप्रास आवडतो म्हणून तो माझाही आवडता टेनिस खेळाडू होता. आत्ता मोठेपणी टेनिस आणि बॅडमिंटन मधला फरक कळायला लागल्यावर आपल्या दोघांनाही फेडरर आवडतो हा योगायोगच म्हणायचा. थोडक्यात काय मला पण टेनिसमधलं बर्‍यापैकी कळू लागलं आहे. पूर्वी अतिरेकी खुळ्यासारखे जिहाद ह्या एका शब्दासाठी दुसऱ्याचा जीव घेतात कसा आणि आपला जीव देतात कशाला हे कळायचे नाही पण तुझा धर्म स्वीकारला आणि कट्टरता म्हणजे काय हे कळले. तुझ्या धर्मात आल्यामुळे तुझ्याविरुद्ध सॉरी आपल्याविरुद्ध बोलणारे नेहमी भेटटातच. आधी लय राडे व्हायचे, अगदी जिहाद. सुरुवात झाली ती शाळेत असताना शेजारच्या गोकुळबरोबर. पुर्वी गोकुळला मी त्यांच्या वयाला मान देऊन काका वैगरे म्हणायचो पण ते आपल्या धर्माच्या उगीचच विरोधात आहेत हे कळल्यापासून मी खाजगीत त्यांचा उल्लेख एकेरीत करतो. तर हा गोकुळ भारी खाजीव माणूस. तू भन्नाट खेळतोस तेंव्हा हा तुझ्याबद्दल चांगले चार शब्द न काढता समोरची गोलंदाजी कशी कचखाऊ होती ते बोंबलत बसतो. पण एकदा का तू आउट झालास की मात्र तू तो चेंडू कव्हर्सच्या ऐवजी सरळ किंवा थर्डमॅनच्या दिशेने कसा खेळायला हवा होतास हे अगदी साभिनय दाखवत बसतो. साला ह्या गोकुळला आपल्या घराच्यापाठी असलेल्या संडासचा पाइप कुठल्या दिशेला सोडला तर ते पाणी आपल्याच अंगणात येणार नाही हे गेली कित्येक वर्षे कळलेले नाही तो कव्हर्स, गली आणि थर्डमॅनबद्दल कसा बोलू शकतो हेच मला समजत नाही.

असे कित्येक गोकुळ भेटतात. काही जणांची त्यात देखील खासियत आहे बरं. त्यांच्या मते तू शतक लावलंस की भारत हरतो. बहुतेक तू शतक लावल्यानतर भारत ७०% सामने जिंकला आहे हे त्यांना माहीत नाही किंवा त्यांच्या गणिती ज्ञानानुसार ३०% म्हणजे उर्वरित ७०% पेक्षा मोठा भाग असावा. आत्ता ह्या लोकांना फुललेली कमळं पहाण्यापेक्षा चिखलात डुंबणे जास्त पसंत असेल तर नाईलाज आहे. अगदी परवा देखील टी-२० मध्ये तू पहिलंवहीलं शतक झळकावलस आणि मुंबई हरली तर ही जमात सुरू झाली, तू शतक केलं म्हणून मुंबई हरली. अरे मेल्यांनो मुंबई घ्या नाहीतर भारतीय संघ, तू शतक लावल्यावर उरलेली दहा लोकं काय माधुकरीचे वार लावल्यासारखे फुकटचे गिळायला ठेवलेले आहेत काय? अरे तुझ्या शतकानंतर देखील आपण हरत असु तर तो तुझा नाही तर इतर दहा जणांचा दोष आहे हे साधं सोप्प समीकरण मंद लोकांना कसं कळतं नाही कुणास ठाऊक. बाकी हल्ली ही विरोधी पक्षाची लोकं आपण विश्वकप जिंकल्यापासून जरा गप्प आहेत. आत आग-आग होतं असेल पण काय करणार? त्यात तू धावा काढण्यात पण आपल्या सगळ्यात पुढे त्यामुळे त्यांची पुरी बुच्च बसली आहे.

बाकी यंदाची देव दिवाळी अगदी स्पेशल आहे हे सांगायला नको. इतकी वर्षे वाट पाहायला लावून शेवटी विश्वकप तुझ्या हाती पहायला मिळाला. साखळी सामने सुरु असताना तू बाद झाल्यावर बाकीचे फलंदाज All Out लावल्यावर जसे डास मरतात तसे All Out होत होते ते पाहून यंदा पण येरे माझ्या मागल्या होणार आणि आपण उप-उपांत्य किंवा उपांत्य फेरीत गाशा गुंडाळणार हे स्पष्ट दिसत होते. राहून राहून २००७ मध्ये विश्वचषकातून बाहेर पडलो तेंव्हाचे तुझे पाणावलेले डोळे समोर दिसत होते. त्यावेळी निदान २०११ मध्ये तू पुन्हा खेळशील ही आशा होती. ह्यावेळी तू खेळत होतास. नुसता खेळत नव्हतास तर गेली २-३ वर्षे तू विश्वचषक हे एकच उद्दिष्ट डोळ्यासमोर ठेवून खेळत होतास हे ही कळत होतं. वर्षभरापूर्वीच एकदिवशीय सामन्यात द्विशतक झळकावून तू आपला फॉर्मपण दाखवून दिलास. तरी देखील बाकीच्या दहा लोकांवर भरोसा नव्हता. त्यात उप-उपांत्य फेरीतच समोर कांगारू. कांगारू नेहमीच्या औकातीत नसले तरी आपल्या लोकांचाच मला भरोसा नव्हता. पण सुदैवाने २००३ च्या अंतिम फेरीचा बदला उप-उपांत्य फेरीत घेतला गेला. नंतर पाकडे. पाकला विश्वचषकात आपण नेहमी कुटले असले तरी ते पाकडे आणि नाही म्हटलं तरी ते देखील जबरी खेळत होते पण २००३ मध्ये अक्रमच्या गोलंदाजीवर तुला एक जीवदान देवून त्यांचे समाधान झाले नव्हते त्यामुळे ह्यावेळी तुला पाच जीवदाने देवून ढेकर देत ते परत गेले.

शेवटी अंतिम सामान्यासाठी मुरली, मलिंगा, मेंडीस, मॅथ्युज हा 'M' Factor होताच पण आपल्या बाजूनेदेखील मोटेरा, मोहाली आणि मुंबई असा 'M' Factor असल्याने चिंता थोडी कमी होती. तरी देखील अंतिम सामन्याच्या दिशेने आपण जसे एक-एक पाऊल टाकत होतो तसतशी बेचैनी वाढत होती. उगीचच डॉन ब्रॅडमनचे शेवटच्या सामन्यात शून्यावर बाद होवून १०० च्या सरासरीपासून वंचित रहाणे किंवा पीट सँप्रासने शेवटपर्यंत फ्रेंच ओपन जिंकू न शकणे असल्या गोष्टी सतत आठवत होत्या. तू प्रयत्नांमध्ये काही कसर सोडली नसलीस तरी नियतीची भीती वाटत होती. एक विश्वचषक सोडून तुझ्याकडे सगळं काही आहे आणि नियती तो तुझ्या हातून हिरावून तर घेणार नाही अशी धास्ती मनात सतत होती. त्यात माजोरी जात तू टी-२० विश्वचषकात न खेळल्यामुळे आपण जिंकलो होतो आणि आत्ता तुझ्यामुळे हरणार अश्या पुड्या सोडत बसलेली होतीच. आठवडाभर धड झोप लागली नव्हती. इंजिनिरिंगला असताना Engineering Mechanicsचा पेपर तीनदा दिला होता पण तिन्ही वेळा पेपरच्या आदल्या रात्री Mechanicsचा पेपर सोड पण पूर्ण अभ्यासक्रमातली साधी २ मिलीमीटरची आकृतीदेखील कधी माझ्या झोपेची तटबंदी भेदू शकली नव्हती.(Mechanicsचा पेपर चार वर्षातून एकदा येण्याऐवजी निर्लज्जासारखा दर सहा महिन्यांनी येत असल्यामुळे असेल कदाचित) पण तुझ्यासाठी मात्र ही जवळपास शेवटचीच संधी होती. विश्वचषक जिंकायचा जसा तुला ध्यास लागला होता तसा तो तुझ्या हाती पहायचा ध्यास आम्हाला लागला होता. शेवटी दीड वर्षापूर्वी म्हांराजाला घातलेलं गार्‍हाणं म्हांराजानं ऐकलान आणि आपण जिंकलो. तुझ्या हाती विश्वचषक पाहिला तेंव्हा मात्र केवळ समाधान सोडून इतर काहीच वाटलं नाही. मनातल्या मनात तो विश्वचषक तुझ्या हाती अनेक वेळा पाहिल्यामुळे असेल कदाचित. तुझ्यासाठी अभिनंदनाची पोस्ट लिहिणार होतो पण काही सुचलंच नाही. संपूर्ण समाधान आणि तृप्तीचे असे ते क्षण होते. मनात साठवून ठेवले आहेत. आयुष्यभरासाठी...

लहानपणापासून मराठी पंचांगाप्रमाणे वर्षभरात सगळ्यात शुभ असे साडेतीन मुहूर्त असतात असे ऐकून होतो. गेल्या काही वर्षापासून माझ्यासाठी ते साडेचार मुहूर्त झालेत. आजचा दिवस म्हणजे गुढीपाडवा आणि अक्षय तृतीयेच्यामध्ये येणारा अजुन एक शुभ मुहूर्त. आमच्यासाठी देव दिवाळी. लहानपणी काही वर्षे फटाके म्हणजे दिवाळीतच वाजवायचे असतात अशी संकुचित विचारसरणी होती. पण तुझ्यामुळे आम्ही भर शिमग्यातच नव्हे तर सणासूदीचे दिवस नसताना देखील दिवाळीच नाही तर विजयादशमी देखील फटाके लावून साजरी केली. आज तुझा वाढदिवस. तुला मी काय शुभेच्छा देणार? उलट मीच तुझ्याकडे मागणे मागेन की माझ्या नशिबात कधी भाग्योदय लिहलेला असेल तर त्यात एखादा दिवस तरी तुला तुझ्या आवडीच्या कोलंबी, कुर्ल्यांचा नैवेद्य दाखवण्याचे भाग्य मला लाभू दे.

ShareThis