Showing posts with label लेखन. Show all posts
Showing posts with label लेखन. Show all posts

Saturday, January 9, 2010

मराठी ब्लॉग विश्ववरील वाढत्या चोर्‍या

काळ दुपारी मराठी ब्लॉग विश्वला भेट दिली. पहिल्याच पानावर "कशी मुलगी पाहिजे?" ह्या शीर्षकाने लक्ष वेधून घेतले. आत्ता हल्ली लग्न हा जिव्हाळ्याचा विषय असल्याने लगेचच त्या लिंक वर क्लिक करून वाचू लागलो. पहिल्या चार ओळी वाचताच हे आधी कुठेतरी वाचलय हे जाणवले. मध्यंतरी अजयने मुली, लग्न ह्या विषयांवर लिहलं होतं ते आठवलं म्हणून त्याचा ब्लॉग चाळला पण मला हवी असलेली पोस्ट त्याच्या ब्लॉग वर नाही मिळाली म्हणजे अजयच्या ब्लॉगवरुन कुणी कॉपी केलं नव्हतं. अजुन नेहमीचे काही ब्लॉग पाहिले. तिथेही काही नाही सापडलं. मग शेवटी डिटेक्टिव गूगलची मदत घेतली. गूगलमध्ये मराठी भाषा हा पर्याय निवडून "कशी मुलगी पाहिजे?" शोधलं तर मी डिसेंबरमध्ये वाचलेली लिंक मिळाली. म्हटलं चला ह्या ब्लॉगवाल्याला कळवू की तुमचा लेख चोरी झालाय पण त्याच वेळी अजुन एका लिंकने लक्ष वेधून घेतलं. तिथे जाऊन पाहिलं तर अगदी तीच पोस्ट २००७ साली पोस्ट केलेली होती. म्हटलं साला आपण डिसेंबर मध्ये जी वाचली ती देखील चोरीचीच होती. आणि आज ज्याने पोस्ट केली त्याने माहीत नाही कुठून उचलली? मूळ ब्लॉग वरुन की चोराकडून? हा दुसरा चोर म्हणजे आधुनिक श्रीकृष्णच म्हणा ना. कृष्णाने लहानपणी गोकुळात "नंदा"घरी राहून दूध-दही चोरले आणि हा कलियुगातला कृष्ण लोकांचे लेख चोरतोय. ते देखील असे लेख जे मराठी ब्लॉग विश्ववर पोस्ट करून महिना देखील झाला नाही. पहिल्याने निदान थोडं तरी डोकं वापरलं. त्याने अडीज वर्षापुर्वीची पोस्ट ब्लॉगवर टाकली पण हा तिसरा तर चोरावर मोर. आधी मला देखील वाटलं आपण हे लिहतोय खरं पण ही एकच व्यक्ती तर नसेल? जुन्या ब्लॉगवर काही प्रॉब्लेम आला असेल म्हणून नवीन ब्लॉग सुरू केला असेल आणि एक चांगली पोस्ट म्हणून "ती" पोस्ट पुन्हा प्रकाशित केली असेल. पण सगळी खात्री करून पाहिली पण मला तरी ह्या तीन वेगवेगळ्या व्यक्ती आहेत ह्याची खात्री वाटते. आत्ता कुणाला मल्टिपल पर्सनॅलिटी डिसॉर्डर सारखा रोग असेल आणि तो रोगी हे धंदे करत असेल तर त्याला काही इलाज नाही. पुढे सगळ्या लिंक देतोय, पहा तुम्हीच तुम्हाला काय वाटते?

मूळ लेख
पहिली कॉपी
दुसरी कॉपी

आत्ता काय माहीत त्यांनी संबधित लेखकांची परवानगी घेतली देखील असेल. असं असेल तर माझे आरोप पूर्ण चुकीचे आहेत हे मी मान्य करेन पण मला तरी तशी नोंद कुठेही आढळली नाही.

पहिल्या कॉपीवाला ब्लॉग जरा नीट बघा. २००९ मध्ये ४३४ पोस्ट केल्या आहेत. आत्ता त्यातल्या किती खर्‍या किती खोट्या कुणास ठाऊक? मी काही मराठी ब्लॉगवरचे झाडून सगळे ब्लॉग वाचत नाही पण मला त्यात अजुन एक पोस्ट आढळली जी पंकजच्या ब्लॉगवर, २० जून २००९ ला पोस्ट केलेली होती, ती जशीच्या तशी उचललेली आहे. त्याने आपल्या ब्लॉगवर "मित्रानो ..तुमच्याकडे जर मराठी साहित्य असेल, तर ते मला पाठवा...मी ते ह्या ब्लॉग वर पब्लिश ...तुमच्या नावाबरोबर..मग वाट कसली बघताय ?? इथे द्या पाठवून लवकर" असे आश्वासन दिले आहे पण "कशी मुलगी पाहिजे?" आणि पंकजच्या कॉपी केलेल्या पोस्टवर तरी कुणाचंच नाव दिलेलं नाही. आत्ता "कशी मुलगी पाहिजे?" आणि पंकजची "मी फिदा आहे" पोस्ट ह्या दोन्ही मराठी ब्लॉग विश्ववर प्रकाशित झालेल्या आहेत. मग जो कुणी मराठी ब्लॉगवर आपले पोस्ट पब्लिश करत असेल तर एखाद्याला मेल करून पुन्हा तीच पोस्ट मराठी ब्लॉग विश्ववर कशाला पब्लिश करेल?

महेन्द्र काकांच्या ब्लॉगची एका साप्ताहिक पुरवणीने केलेल्या चोरीची घटना सगळ्यांना ठाऊक आहेच. गेल्याच आठवड्यात हेरंबने देखील त्याच्या ब्लॉगवरच्या चोरीबद्दल लिहलं होतं. ब्लॉगवरचे लेख ईमेल मधून forward होणे अश्या घटना देखील सर्रास घडतात. आता ही कालची घटना असो वा आधीच्या, हे चोर जेंव्हा लेख कॉपी करतात तेंव्हा ह्यांना लेखकाचं नाव कॉपी करायला काय जातं? मी काही लेखनाचा वरदहस्त लाभलेला माणूस नव्हे. मी जेंव्हा ही माझ्या ब्लॉगवर लिहतो तेंव्हा माझे निदान दोन तीन तास तरी नक्की खर्ची होतात आणि जर कुणी ctrl+c, ctrl+v ही चार बटणं दाबून ते लिखाणं आपल्या नावावर खपवतं असेल तर ते खपवून घेणं शक्य नाही. ह्या चोर्‍या कशा थांबवाव्यात ह्यावर सध्या तरी आपल्या ब्लॉगवरुन right click->copy हा option disable करणे हाच एक रामबाण उपाय दिसतो. त्याचबरोबर अशी चोरी आढळून आल्यास आपल्या ओळखीतल्या ब्लॉगर मित्र-मैत्रिणी आणि Twitter वरील लोकांना कळवून जास्तीत जास्त जणांमार्फत त्या चोराच्या पोस्टला प्रतिक्रिया म्हणून मूळ ब्लॉगची लिंक देणे हा एक मार्ग आहे. भले तो ती प्रतिक्रिया स्वीकारो अथवा न स्वीकारो, निदान आपली चोरी पकडली गेली, किंवा आपल्यावर कुणी लक्ष ठेवून आहे हे तरी त्याच्या लक्षात येईल आणि कदाचित अश्या चोर्‍या कमी होतील. जमल्यास पुढच्या रविवार पुण्यात होणार्‍या पुणे ब्लॉगर्स स्नेह मेळाव्यामध्ये हा मुद्दा देखील चर्चिला जावा. त्यातून अजुन काही उपाय सुचल्यास आपण सर्व मिळून तो अंमलात आणू शकतो.

तर गाववाल्यांनू मराठी गूगलवर जावा आणि आपली एखादी आवडीने वाचली गेलेली पोस्ट शोधून बघा, कदाचित चोरीला गेलेली असु शकते...

ShareThis