Showing posts with label कोकण. Show all posts
Showing posts with label कोकण. Show all posts

Sunday, September 8, 2013

लगबग...


काय रे झाली काय तयारी. मखराचे पडदे नीट बांधा. समया, निरांजन आणि बाकी पूजेची भांडी लख्ख घासून पुसून घ्या.

आबांनी बाजारातून येऊन सामानाच्या पिशव्या खाली ठेवत ओटीवर बसल्या बसल्या चौकशी कम सूचना सुरू केल्या. आबांचा लेक सदा आणि पुण्याहून आलेले त्याचे दोन चुलत भाऊ देवघरात गणपतीसाठी मखर तयार करीत होते. तिथे बारीक चुका, खिळे, टेकस, कात्री, हातोडी, पक्कड, वायरी, टेस्टर, स्क्रु-ड्रायवर, फेविकल कॉल, सजावटीचे रंगीत कागद आणि काय काय असे सगळे सामान पडलेले होते. लहान मुले तिथे लुडबूड करायला बघत होती त्यामुळे अधूनमधून माजघरातून एखादा हात येऊन त्या चिल्ल्या-पिल्यांची गठली उचलून त्यांना आत नेत होता. पण गप्प बसतील ती चिल्ली-पिल्ली कसली. त्यामुळे थोड्या थोड्या वेळाने सगळीकडून त्यांच्या नावाने कल्ला सुरू होता. पडवीत आबांचे वडील नाना आराम खुर्चीत रेलुन पुन्हा पुन्हा तीच वर्तमान पत्रे आणि पुरवण्या चाळीत होते. नानी शाळेत जाणार्‍या नातवंडांबरोबर बसून दुर्वा नीट करीत होती. आजीने नीट केलेल्या दुर्वा मोजून नातवंडे बरोब्बर २१ दुर्वांची एक अश्या जुड्या बांधून त्या टवटवीत रहावया म्हणून तांब्याच्या पाणी भरलेल्या पेल्यात नीट उभ्या करून ठेवत होतीत. आबा येताच नातीने हातातील दूर्वाच्या जुडीचे काम झाल्यावर उठून सगळ्या पिशव्या माजघरात मोठ्या काकूकडे म्हणजे आबांच्या बायकोकडे म्हणजे वासंती काकूकडे नेऊन दिल्या. तिकडे माजघरात जावा जावा आणि त्यांच्या हाताखाली लेकी सुना राबत होत्या. घरात गॅस-सिलेंडर असला तरी माणसे वाढल्यामुळे माजघरातील चूलदेखील पेटलेली होती. त्यावर भात आणि आमटीचे टोप ठेवलेले होते. नविन आणि शहरी सुनांना चुलीची सवय नसल्याने चूल संभाळण्याचे काम अर्थातच वासंती काकूकडे होते.

आबा: तात्याची गाडी कुठपर्यंत आली?

सदा: मघाशी फोन केला तेंव्हा कशेळी घाटात होते म्हणजे येवा चिपळूणपर्यंत आले असतील.

आबा: अरे मुंबै सोडून आठ तास उलटून गेले नां त्यांना? अजुन चिपळूणातच. येवा घरात पोचूक हवो होतो. मखराचा सामान आणि लायटिंग घेवन येतोय तो. आत्ता सजावट करणार कधी?

सदा: ओ तात्या म्हायत हाय नां तुम्हाला? त्याका आधीच सांगितला होता की शुक्रवारी रात्रीच निघ नायतर शनवारी सकाळी तरी. पण नाय. हा आज रविवारी सकाळी निघाला. आज हायवे फुल्ल जाम. गेल्या वर्षी पिंट्या आणि मंडळी आदल्या दिवशी निघालेली ती गणपतीची स्थापना होऊन रात्रीची आरती झाली तरी आली नव्हतीत. मग रात्री चंद्र दिसेल म्हणून माना खाली घालून घरात आलीत.

आबा: मग हे तात्याला म्हायत नाय? जाव दे... तुम्ही मखर पुरा करून ठेवा. चौरंग मांडून घ्या. मग तात्या आला की काय ता लायटिंग लावा.

सदा: ओ तात्या कुणाचा ऐकता काय कधी? सगळीकडे आपला ता खरा. पुणेकरा कशी आंबा घाट उतरून शनवारी सकाळी हजर. मुंबैच्या लोकांक कोण सांगूक जायल. तरी नशीब आत्ता गाडी हाय त्याच्या धुंगणाखाली. नायतर दरवर्षी हा जायपर्यंत यसटी आणि रेल्वेचो बुकिंग फुल्ल झालेला असायचा आणि मग प्रायवेट नायतर ज्यादा गाडी पकडून चेंगरून यायचा.

आबा: मुंबैकरा लै शाणी. पडीचो हापूस साशे रुपये डझन घेवन् खातत. पण तात्याकं काय बोलूचा तर तो नानीचो लाडको लेक. आपण काय बोलणार. बरा ता जाव दे. भटाला किती वाजता बोलावलात हाय? आणि ढोलताशेवाल्याक सांगितला हायस नां. काय हाय, भट आणि वाजंत्रीवाले, उद्या दोघांच्या पण धंद्याचो दिवस. त्यांना पयला सांग. बाकी बघून घेता येता.

सदा: होय तर... भटाकं सकाळी धा वाजता बोलावलंय. ताशेवाला पेंटरच्या घराशी येतंय.

आबा: बरा आठवला. जमला तर संध्याकाळी पेंटरकडे एक फेरी मारुन येतो. गणपती तयार हाय की नाय बघूक हवो नाय तर गेल्यावर्षी सारखो नको. चतुर्थीला आपण गणपती आणूक गेलो तरी पेंटरचो पुतणो आपलो उंदीर रंगवताय.

नानी: सकाळी लवकर उठा. मी चार वाजता बंब पेटवन ठेवतो. आपला आणि आपापल्या कॅलेंडरांचा पटापट आवरा. आठच्या आत पेंटरकडे पोचूक हवा. आणि मिरवणूक काढा काय ती पण धाच्या आत घरी येऊक हवो. नायतर गेल्या वर्षी भट घरात वाट बघीत बसलेलो आणि तुम्ही घाटीत नाचित होतात. तुमची मिरवणुकीची हौस काय ती विसर्जनाच्या दिवशी भागवा. उद्या सगळा टायमात होऊक हवा. मिरवाणूकीसाठी गाड्या आणूक वाडीतली पोरा कधी जातायत् ता बघ.

सदा: गाड्या आणतो आम्ही पण तात्या म्हणीत होता की त्याच्या नवीन गाडीतून गणपती आणायचा म्हणून.

आबा: खुळावलाय काय तो? नविन गाडी घेतलान म्हणून बुजवताय वर्षभर. अरे आपल्या गणपतीचो पाट तरी त्याच्या गाडीच्या दरवाजातून आत जायल काय?

सदा: ता त्यास तुम्ही सांगा. गाडी घेवन येव दे त्यास म्हणजे तुम्ही तात्या आणि बापू अशी तिघा भावंडा तुमचे दुखरे गूढगे, मणके आणि मोतिबिंदू घेऊन त्यात बसून मिरवणुकीच्या मागंन या. नायतरी घाटी चढवत नाय तुमच्यान.

आबा: पेकटात लाथ घालीन माझ्या गूढग्याक काय बोललस तर. तुम्ही आपला बघा. दशावताराची आणि सत्यनारायणाची आरती सुरू झाली की नाल (आरतीच्या वेळी वाजवायचे ढोलके ) वाजवताना तुमच्या चडड्या पिवळ्या होतात. "घालिन लोटांगण" सुरू व्हायच्या आधी तुम्ही लोटांगण घातलेला असता.

सदा: लाथ घालायच्या फंदात पडू नका नायतर परत गूढगा धरून बसायला लागेल... ( देवघरातून तिघांच्या ख्या ख्या ख्या चा आवाज येतो )

नाना: तोंडाकडन् पुढे गेलीत कार्टी...

आबा: जाव दे नाना. काय बोलणार. आपल्याकडे बघूनच शिकलीत ती. (देवघराच्या दिशेने पहात) आणि रात्रीच्या आरत्यांना जास्ती उशीर करू नका. कोणाकडे कधी सत्यनारायण आहे ते विचारून भजनाचा ठरवा. नंतर लोकांची कीटकीट नको. आपल्याकडे गुरुवारी पूजा धरलेली आहे. बापूचा लेक आणि नवीन सूनबाई बसू दे पूजेला. काय नाना, बरोबर नाय?

हो हो... नवीन जोडाच बसू दे पूजेला... नानांची संमती.

अहो आणि बापू आला की त्याला आणि नातवाला सांगून टाका की पुढच्या गणपतीत अंगणात गोधड्या आणि लंगोट वाळताना दिसले पाहिजेत. ता काय ता प्ल्यानिंग बिनिंग करीत बसू नका... नानीने नातवासाठी डेडलाईन जाहीर करून टाकली.

आबा: होय ता पण बराबर. पुढच्या श्रावणात तुमचा सहस्त्र-चंद्रदर्शन सोहळा करायचा आहेच त्यात पणतू दर्शन कार्यक्रम पण करून टाकु. (सदाला उद्देशून देवघराच्या दिशेने पहात) बाकी पूजेचा सामान मी आणून ठेवलंय. उद्याच्या पूजेची तयारी चोख करून ठेवा, उगाच भटासमोर मला तोंड सोडायला लाव नका. पोरांना पाठव वाडीत आणि दुर्वा, शमी आणून ठेव. बाळा आणि राणीला सांगून ठेवलंय मी. रोज सकाळी लवकर उठून दुर्वा, शमी आणि पारिजातकाची फुले पुजेला आणून ठेवायची. दुर्वा नीट करून जुड्या करून ठेवा रोजच्या रोज. मी रोज सकाळी पूजेला बसलो की सगळ्या गोष्टी तयार हव्यात. हे दे ते दे नको. सगळं जागच्या जागी असु दे.

माजघरच्या दिशेने बघत... अहो सगळा जिन्नस आहे नां भरलेला? अगदी पापड लोणच्यापर्यंत सगळं एकदा तपासून पहा. नानी तू तांदूळ धुवून सुकवून दिले होतेस त्याचे पीठ आले का गिरणीतून. त्या बाजारच्या पीठाचे मोदक काही धड होत नाहीत.

नानी: हो रे बाबा. मोदक आणि घावण्याचा पीठ तयारा असा. मुंबैकरा आणि पुणेकरा रविवारी निघतील तेंव्हा त्यांच्यासाठी वड्याचा पीठ पण करून ठेवलाय. वडे सागूती खावन श्रावण सोडून जाव दे पोरा माझी.

नाना: ती श्रावण सोडायची राह्यलीत काय अजुन...

नानी: असू दे ओ. आत्ता आठवडाभर तरी उपास करतीलच नां. रविवारी सकाळ्ळच जेटीवर जा आणि ताजा फडफडीत म्हावरा घेवन ये. माझ्या धाकट्या नातवाक चुलित भाजलेलो बांगडो आवडता.

आबा: होय गो. ते पुढच्या रविवारचो बघू नंतर. आत्ता पासून म्हावर्‍याचो विषय नको. आत्ता सध्या मोदकाचा पीठ महत्वाचा. आणि लेकी सुनांना जरा मऊ हातान मोदक कसे करायचे ते शिकव. त्यांच्या हातचे ते राक्षसी मोदक खावत नायत. देवाच्या नेवेद्याच्या पानात तू केलेले मोदकच लाव.

पुन्हा एकदा माजघराच्या दिशेने... अहो परवाच्या ऋषिच्या भाजीसाठी बाजारातून मिळतील तितक्या भाज्या आणल्या आहेत. कणसे आणि शेंगापण मिळाल्या. उद्या घरोघरी गणपती बसणार त्यामुळे बाजारात भाजी पण भेटताना मुश्कील.

नानी: सगळ्या भाज्या कशाला आणल्यास. वासंतीने परसात वाली, अळु, पडवळ, भेंडा, कारली, दोडकी असा भाजीपाला केला आहे. यंदा पाऊस पण चांगला झाला त्यामुळे भाजीपाला, दुर्वा, शमी, फुले यांना तोटा नाही.

आबा: हो घरची भाजी वापरा. मी पण आपली आणून ठेवली बाजारातून. आत्ता एवढी सगळी मंडळी येणार. ऋषिच्या भाजीत नाही तर दुसर्‍या दिवशीला होईल.

वासंती काकू: सगळं आहे व्यवस्थित. फक्त लेक येणार आहे सासरहून आणि तिचे हौसे आहेत यंदा. त्यासाठी सुपल्या आणि बाकीचे साहित्य आणायचे आहे. आज संध्याकाळी आणून ठेवा. नानी सांगतील काय काय आणायचे आहे ते.

आबा: अरे हो. ता राह्यलाच. गेल्यावर्षी हौसे नव्हते त्यामुळे लेकिचे लग्नानंतर पहिल्या वर्षीचे सगळे सण झाले तरी हा कार्यक्रम बाकी आहे. बरं त्यात तुमच्या जावयाचे काही लाड करायचे नाहीत नां? काय गो नानी?

नानी: नाय रे. जावयाला काय देऊचा नसता.

आबा: नाय मी आपला विचारून घेतला. आमच्या वेळी माज पण काय मिळालो नव्हतो. तरी पण जावयाचो काय मान असात तर मी पण माझ्या सासरी वसुलीकं गेलो असतो.

नानी: जल्ला... तुझा आपला काय तरीच...

आबा: चला. तर सगळी तयारी झाली. आत्ता उद्या मंगल मूर्तीचे आगमन झाले की पुढचे पाच दिवस कसे मंगलमय आणि आनंदाचे जातील.

नानी: होय रे बाबा. मोरया मोरया मंगल मूर्ती मोरया...

=========================================================

उद्या गणेश चतुर्थी. कोकणातला सगळ्यात मोठा उत्सव. कोकणातील बहुतेक सगळ्या घरात पुण्या-मुंबईचा चाकरमानी पोहोचतोय. मंगलमूर्तीच्या आगमनाची तयारी जवळ जवळ पूर्ण होत आलीय. घराघरातील ही सगळी लगबग आणि उत्साह शब्दात मांडण्याचा हा प्रयत्न...

Sunday, October 7, 2012

भाजीपाला

साधारण जूनचे पहिले दोन आठवडे चांगला पाऊस पडून गेला की बाबा उन्हाळ्यात सुकवून ठेवलेलं बी-बियाण बाहेर काढतात. त्यात फुले, फळे, भाजीपाला अश्या सगळ्या प्रकारचे बी असते. नातेवाईक मित्रमंडळीपासून ते आजुबाजूच्या शेतकर्‍यापर्यंत, असे सगळ्याकडून वर्षभर जमवून ठेवलेले. कुठे कुठला भाजीपाला पेरायचा, नवीन फूलझाडे आणि फळझाडे कुठे लावायची हे सगळे त्यांनी आधीच ठरवलेले असते. मग एकाद्या सुट्टीच्या दिवशी किंवा पावसाने जरा उघडीप दिली की हातात पारय (पहार) घेऊन पावसाने नरम झालेल्या मातीत मारायची आणि त्या खड्ड्यात एक-एक बी टाकायचे. पावसाळा सुरू होण्याआधीच पडवळ, दुधी-भोपळा, तोंडली, कारली अश्या भाज्यांसाठी मांडव तयार असतो. काकडी, चिबूड, भोपळ्याच्या वेली पसरण्यासाठी नीट उताराची जागा केलेली असते. भेंडा, वाली, वांगी, मिरच्या आणि पालेभाजीसाठी छोटे छोटे वाफे तयार करून ठेवलेले असतात. सुरुवातीच्या पावसामुळे त्या वाफ्यातील मातीत असलेले बीज म्हणजे गवत आणि तण आधीच उगवलेले असते. ते साफ करून टाकले की पुन्हा त्या मातीत रानगवत उगवण्याची शक्यता नसते. भाजीपाला लावायला वाफा तयार. अळूवडी आणि फतफत्याच्या भाजीसाठी सालाबादप्रमाणे ठरलेल्या जागी अळूदेखील उगवतो. शेवग्याचे झाड तर असतेच.

पडवळ

दुधी-भोपळा


अशी सगळी पेरणी झाली की मग महिनाभर फार काही काम नाही. फक्त बी रुजून आले की त्यावर लक्ष ठेवायचे. अधून-मधून रोपांच्या वाढीला जोम यावा म्हणून खताचा डोस द्यायचा तो देखील अगदी चिमुटभर. मुळाशी मुंग्या लागू नये म्हणून पावडर मारायची. पुरेसे पाणी मिळावे म्हणून मुळाशी नीट आळी करायची. पाऊस मध्येच गायब झाला तर ह्या वेलांनां आणि नव्या झाडानां पाणी घालायचे तसेच पावसाचा जोर जास्ती असेल तर पाण्याचा नीट निचरा होतो आहे की नाही त्याकडे लक्ष द्यायचे. नाहीतर खास करून भाज्यांच्या वेली अती पाण्याने कुसण्याची भीती असते. शेतीची कामे सुरू असताना विहिरीवर पाणी आणायला येणारे शेतकरीदेखील अधून-मधून पहाणी करून जातात. त्यांच्या डोळ्याला काही तण, गवत दिसले तर काढून टाकतात. पानाला किड दिसली तर पाने खुडून टाकतात.

चिबडाचे फूल

चिबूड

चिबूड

तयार चिबूड

श्रावणाची चाहूल लागली की नवीनच खेळ सुरू होतो. रोजच्या रोज सकाळ संध्याकाळ त्या झाडे वेलींकडे बारकाईने पाहण्याचा. मग एखाद्या दिवशी भेंड्याच्या झाडाचा पानाचा देठ आणि झाडाच्या खोडामधून एक छोटीशी कळी दिसून येते. भोपळा, कारली, चिबूड, पडवळांचे वेलदेखील पांढर्‍या पिवळ्या फुलांनी डवरतात. भेंड्याचे एक बरे असते. एकदा कळी आली की हमखास भेंडा लागतो पण बाकीचे वेल मात्र असंख्य फुले देत असले तरी ठराविक फुलेच गळून जाण्यापुर्वी देठाशी फळ सोडून जातात. त्यामुळे ही फुले पूर्ण फुलली की प्रत्येक फुलाचा देठ बारकाईने पाहावा लागतो. त्याच्या देठाशी जर का बारीक मण्याएवढा फुगवठा दिसला की समजायचे ह्यातून फळ मिळणार. मग वेलाचा तो भाग लक्षात ठेवायचा, खास करून चिबूड, काकडी आणि भोपळ्याचा वेळ असेल तर कारण ते वेल जमिनीवर पसरलेले असतता. पडवळ, दुधी, कारली वैगरे मांडवावर असल्याने भाजी वाढीस लागली की हमखास दिसून येते पण चिबूड, काकडी, भोपळा जमिनीवर असल्याने ती फळे वजनाने खाली मातीला टेकतात. वेलाखाली लपून बसतात. ह्या वेलांची पाने देखील मोठी त्यामुळे चिबूड, भोपळा मोठा फोफावला तरी दिसून येत नाही. त्यामुळे ह्या वेलांवर नीट लक्ष ठेवावे लागते.

वाली

भेंडा

ही नवीन फळे शोधण्यात देखील गंमत असते. आम्ही शाळेत होतो तेंव्हा मज्जा असायची. फुलाला लागलेला भोपळा, चिबूड सगळ्यात आधी कुणी पाहिला? ज्याने पाहिला तो इतरांना सांगणार. भोपळ्याचा/चिबडाचा त्या वर्षीचा काउंट एकाने वाढणार. फळ पहिल्यांदा जो पाहील त्याच्याकडे त्या फळाची जबाबदारी आपोआप जाते मग तो भोपळा असो, काकडी असो वा पडवळ, कारली. ते फळ दिसल्यापासून ते घरात आणेपर्यंत मधल्या वेळात त्याची वाढ नीट होते आहे की नाही, जमिनीवर त्याला किड-मुंगी तर लागली नाही, पावसाने कुसत तर नाही वा उन्हाने करपत तर नाही अश्या बारीकसारिक कामांची जबाबदारी. भेंडे, वांगी, मिरच्या जून व्हायच्या आत वेळच्या वेळी काढायाच्या. काकड्या नीट कोवळ्या बघून घ्यायच्या... इत्यादी, इत्यादी.

मिरच्या
वांगी
अळू

भाज्या तयार झाल्या की मग मॅनेजमेंट. एक एक भाजी तयार झाली की घरच्या भाजीचे नवं करायचे. चिबूड, काकडी चवीने खायची. ह्या भाज्या एकदा पडायला (तयार व्हायला) लागल्या की मग नियमीत लक्ष ठेवून वेळच्या वेळी तोडून घरात आणायच्या. मग त्यात सख्या शेजार्‍याचा, नातेवाईकांचा वाटा करायचा. बीयाणे दिलेल्या शेतकर्‍याला आठवणीने भाजी पाठवायची. आत्येला, मावशीला, सासरी गेलेल्या ताईला त्यांच्या दारात स्वस्त भाजी मिळत असली तरी रिक्षाला जास्ती पैसे घालून आपल्या दारातील भाजी कौतुकाने त्यांच्याकडे पोचती करायची. बाजारात सगळ्या भाज्या मुबलक मिळत असल्या तरी गणपतीत ऋषिपंचमी दिवशी ऋषिच्या भाजीत परसात पिकवलेली प्रत्येक भाजी असेल अश्या रीतीने भाजी झाडावर शिल्लक ठेवायची. आणि महत्वाचे म्हणजे सगळ्या प्रकारातील एक-एक फळ तसेच झाडावर ठेवायचे. ते उन्हात पूर्ण सुकले की त्यातील बी काढून पुढच्या वर्षी रुजत घालण्यासाठी.

Tuesday, June 7, 2011

७ जूनच्या आठवणी

आज ७ जून. ७ जून ह्या तारखेला लहानपणापासून मनात एक खास स्थान आहे. ७ जूनला शनिवार रविवार नसेल तर ह्याच दिवशी शाळा सुरू व्हायची. दीड-दोन महिन्याची सुट्टी, मुंबईहून आलेले पाहुणे, सुट्टीत रत्नागिरीत आलेल्या माझ्या चुलत भावाबरोबर केलेली धमाल आणि आंबे, फणस, काजू असं सगळंच मे महिन्याअखेर संपून जायचे. माझ्या भावाचीदेखील शाळा सुरू होणार असल्याने तो मे महिन्याअखेर परत मुंबईला जायचा. मग शाळा सुरू होईपर्यंतचा एक आठवडा खायला उठायचा. काय कारायचे कळायचे नाही. घरचे लोकं पावसाळ्यात चुलीला आणि आंघोळीसाठी असलेल्या बंबात टाकायला लाकडे जमा करून ठेव, लाकडे साठवण्याच्या खोपटाला पावसाचे पाणी आत जाऊ नये म्हणून माडाच्या झावळ्यानीं नीट शाकारून ठेव अश्या कामात मग्न असत. मी काडी पैलवान असल्यामुळे श्रम पडतील अश्या कामात माझा सहभाग नसायचा. त्याकाळी टीव्हीची इतकी क्रेझ नव्हती. केवळ दूरदर्शन असल्यामुळे कार्यक्रमदेखील जास्त नसायचे. त्यामुळे कधी एकदा शाळा सुरु होते आहे असे व्हायचे.

शेवटी एकदाचा ७ जून उजाडायचा. ७ जून म्हणजे नव्या कोऱ्या वह्या पुस्तकांचा वास. एखाद्या वर्षी नवीन गणवेश. पुढच्या शैक्षणिक वर्षात गेल्यामुळे नविन वर्ग. नविन वर्गशिक्षक. वर्ग् शिक्षकांकडे हजेरीचा नविन कॅटलॉग. हजेरीसाठी नवा पट क्रमांक. नविन वर्गात नविन जागा. बसायला भारतीय बैठकच असे. वर्गात लाकडी बाके वैगरे इंग्रजी माध्यमांच्या शाळेतच असतात असे ऐकून होतो. कुणीही कुठेही बसण्याची मुभा असल्याने आपल्या मित्र मंडळींबरोबर बसून घ्यायचे. अगदीच उंच मुलांना शिक्षक मागे बसवायचे. टगी मुलं टेकायला भिंत असावी म्हणून मागेच बसायची. पहिल्या दिवशी एखाद्या ठिकाणी बस्तान मारले की जोपर्यंत गडबड करणे किंवा अन्य काही कारणाने शिक्षकांनी तुम्हाला उठवले नाही तर वर्षभर तीच तुमची जागा. गावात नगरपरिषदेची शाळा होती. सकाळी १० वाजता भरायची. आजूबाजूच्या वाड्यांमधून मुले घोळक्याने चालत यायची. काही एकएकटी. माझे घर शाळेपासून फक्त २ मिनिटांच्या अंतरावर होते. शाळेत शिपाई वैगरे कुणी नसायचा त्यामुळे शाळा भरायच्या आधी पहिली पंधरा मिनिटे सफाईसाठी असत. शाळेभोवतीचा भाग प्रत्येक वर्गाला वाटून दिलेला असायचा. त्या भागात पडणारा पालापाचोळा त्या त्या वर्गाने जमा करून एका ठराविक ठिकाणी जमा करायचा. साफसफाई करताना मुलांवर लक्ष ठेवण्यासाठी प्रत्येक वर्गात वर्गमंत्री, क्रीडामंत्री अश्या मानाच्या पदांबरोबर सफाईमंत्री देखील असे. सफाई झाली सगळी मुले पाचवीच्या वर्गात जमत. पाचवीचा वर्ग म्हणजे शाळेतला सगळ्यात मोठा वर्ग. पहिली ते सातवीची सगळी मुले त्या वर्गात मावत. आत्ताच्या काळात त्याला हॉल म्हटले तरी चालेल. त्या वर्गाच्या बाहेर एक लांबलच्चक वर्‍हाडा. तिथे सगळ्यांनी आपले चप्पल काढून ठेवायचे आणि ओळीने आत जायचे. तिथे मग प्रतिज्ञा, राष्ट्रगीत मग प्रार्थना आणि दिवसाचे पंचांग असे कार्यक्रम ठरलेले असायचे. पहिल्या दिवशी सगळी मुले एकदम उत्साही असत, सगळं कसं अगदी खणखणीत आवाजात.

बहुतेक वेळा १ जूनला केरळमध्ये दाखल झालेला मान्सून बरोब्बर ७ जूनला कोकणात पोहचायचा. त्यामुळे ७ जूनला शाळेच्या पहिल्याच दिवशी पहिला पाऊस देखील पडायचा. पावसाची पहिली सर वर्गाच्या खिडकीतून बघायला मज्जा यायची. सकाळी घरून निघताना पावसाची काही लक्षणे नसल्यामुळे छत्री वैगरे जवळ नसायचीच. शाळेचा पहिलाच दिवस असल्याने पाऊस आला तर शिक्षक चक्क शाळा सोडून द्यायचे. मग पहिल्या पावसात मस्त भिजत घरी जायचे. पुढे देखील कधी गडगडाटी वादळी पाऊस झाला आणि गावातले आजूबाजूचे नाले, वहाळ भरून वाहू लागले की लगेच शाळा सुटायची. रस्त्यावर वाहणारे पाण्याचे छोटे छोटे ओहोळ तुडवत जायला मज्जा यायची. काही मुलं प्लास्टिकचे मोठे काळे बूट ज्यांना गमबूट म्हणायचे ते घालून यायची. त्या बुटात देखील पाणी भरायचे आणि चालताना एक वेगळाच पच्याक पच्याक असा गमतीशीर आवाज यायचा. तसे गमबूट आपल्याकडे देखील असावे अशी खूप इच्छा व्हायची पण जेंव्हा शाळेतली बरीचशी मुलं अनवाणी यायची ते पाहून आपण शाळेत चपला घालून जातो हेच अपराध्यासारखे वाटायचे.

खूप पाऊस पडला, वारे सुटले की कुठेतरी झाडे पडणे, दरड कोसळणे असे प्रकार हमखास व्हायचे. लाईट जायची. मग घरी रात्री कंदील, मेणबत्तीच्या प्रकाशात कामकाज चाले. रात्रभर लाईट येणार नाही अशी पक्की खबर असेल तर घराच्या माळ्यावर ठेवलेली पेट्रोमॅक्सची बत्ती पेटवली जायची. बाहेर सोसाट्याचा वारा सुटलेला असायचा. घराच्या आजूबाजूचे माड समुद्रावरून येणाऱ्या वाऱ्यावर हेलकावे घ्यायचे. त्या हलत्या माडांच्या आकृत्या अंधारात खूप भीतीदायक वाटायच्या. माड आपल्या घरावर पडतात की काय अशी भीती वाटायची. वाऱ्यामुळे नारळ, झावळी पडून कधी कधी कौले फुटायची. लाईट गेली मज्जा व्हायची. घरच्या अभ्यासाला सुट्टी मिळायची. अगदी परीक्षा असेल तरच आम्ही दिव्याच्या प्रकाशात अभ्यास करायचो. (दिव्याच्या प्रकाशात रोज अभ्यास केला असता तर मी थोरा-मोठ्यांच्या पंगतीत जावून बसलो असतो हा पांचट विनोद आवरावा असं मनापासून वाटल्यामुळे आवरतोय :D). मग अशावेळी मेणबत्ती बरोबर खेळ सुरु व्हायचे. मेणबत्तीतून सांडणारे गरम गरम मेणाचे थेंब बोटावर जमा करून चिमटीत पकडून आपल्या हाताचे ठसे त्यावर घेणे हा आवडता खेळ असायचा. टीव्हीवर लागणाऱ्या एक शून्य शून्य, हॅल्लो इन्स्पेक्टर, व्योमकेश बक्षी ह्या धारावाहिक मालिकांचा तो परिणाम होता. त्याचप्रमाणे मेणबत्तीतून सांडलेले मेण गोळा करून शिवण कामाच्या रिकाम्या रिळाच्या पुठ्ठ्याच्या नळीत भरून त्यामध्ये दोरा टाकून एक नवी मेणबत्ती बनवणे हा ही पावसाळ्यातला अजून एक हंगामी उद्योग. मेणबत्तीशी खेळल्यामुळे बरेचदा ओरडा मिळायचा. मग मेणबत्तीच्या उजेडात बोटांचे निरनिराळे आकार करून भिंतीवर ससा, हरीण अश्या प्राण्यांच्या सावल्या बनवत बसायचो. अजून एक आवडता उद्योग म्हणजे चपातीच्या पिठाचा एक गोळा घेवून त्यापासून टीव्हीवर लागणाऱ्या कार्टूनप्रमाणे सुपरमॅन, स्पायडरमॅनच्या प्रतिकृती बनवणे. सुपरमॅन, स्पायडरमॅन उभे रहावे म्हणून त्यांच्या हातापायात आधारासाठी उदबत्तीच्या काड्या घालणे. ही सुपरमॅन स्पायडरमॅन मंडळी मी झोपेपर्यंत माझ्याबरोबर असत पण सगळे झोपले की घरातले उंदीर बिचार्यांचा फडशा पाडत.

त्या काळी दळणवळणाची साधने आजच्या इतकी जलद नसल्याने मुंबईत छापले जाणारे लोकसत्ता, महाराष्ट्र टाईम्स, नवाकाळ हे पेपर रत्नागिरीत संध्याकाळनंतरच मिळत. मोठा भाऊ ऑफिसमधून येताना पेपर घेवून येई. तेंव्हा मुंबई आणि महाराष्ट्रातल्या ताज्या बातम्या रात्री वाचल्या जात. गावात आजूबाजूला खूप सारी दाट झाडे असल्याने उन्हाळ्यातदेखील फार उकडत नसे. पावसात तर गारठा पडे. अश्या गार वातावरणात भाकरीबरोबर माश्याचे कालवण किंवा मातीच्या मडक्यात शिजवलेली चिंगळे, कुर्ल्यांचा रस्सा नाहीतर साधं कुळथाचे गरमा गरम पिठलं आणि उन्हाळ्यात केलेल्या पापड, फेण्या, सांडगी मिरची हाणण्यात अवर्णनीय आनंद मिळायचा.

पुढे सातवीपासून रत्नागिरीमधल्या हायस्कूलला जायला लागलो. त्या शाळेतली दरवर्षीची आठवण म्हणजे शाळा आणि पावसाळा सुरु झाला की शाळेच्या आवारात फुलणारा गुलमोहर. तो गुलमोहर फुलांनी असा काही डवरलेला असायचा की पहातच रहावं. आज ही तो गुलमोहर पावसाच्या आणि लहानपणीच्या भरगच्च आठवणी घेवून मनाच्या एका कोपऱ्यात आहे.

Sunday, March 13, 2011

रत्नागिरीतला शिमगा - लहान होळी

शिमगा आणि गणेशोत्सव म्हणजे कोकणातले दोन मुख्य सण. सध्या शिमगा सुरू आहे. आज होळी. मुंबई तसेच उत्तर भारतात होळी म्हणजे रंगांची उधळण पण कोकणात रंगाचा सण रंगपंचमीला म्हणजे होळी नंतर पाच दिवसांनी साजरा केला जातो. लहानपणी माझी मुंबईची भावंडे होळी दिवशीच रंगपंचमी खेळलो, गच्चीतून फुगे फेकून मारले असे सांगायचीत तेंव्हा मला आश्चर्य वाटायचे. मग मी खुळ्यासारखे अरे रंगपंचमीला वेळ आहे अजून असे म्हणायचो. आम्हाला होळी, धुलीवंदन (धूळवड्) आणि मग पाच दिवसांनी रंगपंचमी अश्या आठवड्यात मस्त ३ दिवस सुट्ट्या मिळत. आजची पोस्ट शिमगा स्पेशल. कोकणात शिमगा म्हणजे मस्त बोंबाबोंब. खरोखरच्या चोर्‍या. चोर्‍या म्हणजे लाकूडफाटा वैगरे. अगदीच पोचलेले टवाळ असतील तर डायरेक्ट कोंबडासुद्धा चोरायला कमी नाही करत.

कोकणात शिमगा निरनिराळ्या पद्धतीने साजरा होतो. प्रत्येक गावागावात वेगळी पद्धत पण मुख्यत: बर्‍याच गावात पालखी असते. रत्नागिरीचे ग्राम दैवत म्हणजे देव भैरी. होळीच्या दिवशी भैरी पालखी बाहेर पडते आणि पाच दिवस आजूबाजूच्या मुख्य वाड्यांमध्ये फिरून रंगपंचमीपर्यंत झाडगावात सहाणेवर बसते. तिथे सूरमाडाची होळी असते. ह्या काळात निरनिराळ्या गावाचे मानकरी येऊन पालखी नाचवण्याचा कार्यक्रम असतो. कधी दोन लोकं तर कधी एकटा माणूस डोक्यावर ती भली मोठी पालखी घेऊन नाचवतो. मज्जा येते पहायला. पुढे कधी तरी शिमग्यात सुट्टी काढून ह्या सगळ्याचे रेकॉर्डिंग केले पाहिजे. दूरदर्शनच्या काळात जयू भाटकरांनी रत्नागिरीमधला शिमग्यावर एक कार्यक्रम करून प्रक्षेपित केला होता.

आमच्या गावात मात्र शिमगा होळीच्या दहा दिवस आधीपासून सुरू होतो. गावात लहान मुलांची आणि मोठ्या लोकांची होळी चक्क वेगवेगळी असते. होळीच्या होमाची एक ठरलेली जागा आहे. तिथे दोन खड्डे पाडले जातात. त्या बाजूला होलदेवाच्या (होळीचा देव) मूर्त्या मांडलेल्या असतात. होळीचा सण झाला की पाडव्या दिवशी हे होलदेव पुन्हा त्या खडड्यांमध्ये ठेवून खड्डे पुन्हा पुढच्या होळीपर्यंत बुजवले जातात. लहान मुलांच्या होळीचा खडडा गूढगाभर खोल तर मोठ्या (गावाच्या) होळीचा खडडा चांगला पुरूषभर खोल असतो. होळीच्या सणाच्या दहा दिवस आधी लहान मुलांची होळी सुरू होते. इथे खडडा खणण्यापासून सगळी कामे लहान मुलेच करतात. लहान म्हणजे ६-७ पर्यंत कारण गावातली शाळा सातवीपर्यंतच आहे. आठवीसाठी शहरातल्या शाळेत जावे लागते आणि शहरातल्या शाळेत जाणारी मुले लहान मुलांच्यात जास्त मिक्स होत नाहीत. थोडक्यात गावातली शाळा आणि होळी एकदमच सुटते. तर लहान मुलांची होळी म्हणजे रोज शाळा सुटली की गावातून किंवा आजूबाजूच्या परिसरातून एरंडाचे एखादे झाड तोडून आणायचे. होळी आणाताना 'हाय रे हाय आणि xxxच्या जिवात काय नाय रे' आणि इथे देता येणार नाहीत अश्या फाका घालायचे.

एरंडाचेच झाड का? ह्याबद्दल काही माहिती नाही पण बहुतेक ही झाडे पुष्कळ आहेत आणि दुसरे म्हणजे हे कुणाच्याही आवारातून परवानगी शिवाय तोडून आणले तरी चालते. अजुन एक म्हणजे पाचवी-सहावीच्या मूलानां हे तोडून खांद्यावरुन मिरवत आणण्यासारखे असते. कधी कधी मुले जास्त असतील किंवा लहानांची होळी आणायचा शेवटचा दिवस असेल तर मजबूत असे एरंडाचे झाड निवडले जाते. ते घेऊन पूर्ण गावभर 'होळी ओ' करत, मिरवत अगदी काळोख पडून गेल्यावर होमाच्या ठिकाणी आणून ते एरंडाचे झाड खड्ड्यात मधोमध उभे केलं जातं. मग आजूबाजूचा किंवा गावातून जमवून आणलेला झाडांचा सुकलेला पाचोळा (पातेरा), झावळ्या, काटक्या असं काय मिळेल ते सगळं त्या खड्ड्यात भरून होम केला जातो. गावात सागाची आणि माडाची खूप झाडे असल्याने रोज बसल्या जागी ४-५ टोपल्या पातेरा, झावळ्या सहज मिळायचा. अजुन ही मिळतो. पुर्वी म्हणजे अगदी १०-१२ वर्षापूर्वी देखील बरीचशी लोकं चुलीवरच जेवण करायची. आज ही गावातल्या उत्सवांच्यावेळी किंवा लग्नकार्यात गाव जेवणासाठी लाकूड फाटाच वापरला जातो.

होमाच्यावेळी तथाकथित मोठी झालेली म्हणजे आठवी-नववीतील मुले (ज्यांना मोठे आपल्यात घेत नसत) देवळातून ढोल-ताशे घेऊन यायचे आणि मोठ्या होळीच्या मिरवणुकीसाठी ढोल-ताशे वाजवण्याची जोरदार प्रॅक्टिस चालायची. मी लहान होतो म्हणजे पाचवी सहावीपर्यंत घरचे मला गावातल्या इतर मुलांबरोबर होळी आणायला पाठवत नसत. तोपर्यंत मी इतर मुले होळी आणेपर्यंत पातेरा गोळा करून ठेवण्याचे काम इमानेइतबारे बजावले होते. मी पाचवी आणि सहावीत असताना २ वर्षे अगदी सुरुवातीपासून शेवटपर्यंत लहान मुलांच्या होळीत पूर्ण सहभागी होतो. सहावी पास झाल्यावरच मी हायस्कूलला प्रवेश घेतल्यामुळे सहाजिकच मी एक वर्ष आधीच 'मोठा' झालो त्यामुळे आपोआपच लहान होळीची मज्जा एक वर्ष कमी झाली. तेंव्हा होळी कुठून आणायची, एरंडाचे कुठले झाड निवडायचे, होळी आणाताना शेंड्याकडे कोण? मुद्याकडे (खोडाकडे) कोण? हे ठरवणारी मुले म्हणजे आमच्यासाठी हीरो असायची. अर्थात सगळ्यात अंगापींडाने जो जास्त दणकट आणि त्यात शाळेत नापास वैगरे झालेला असतो त्यालाच हा मान आपोआप मिळतो. मी ह्या दोन्ही गोष्टींमध्ये प्रचंड मागासलेला असल्याने मी नेहमी हुकुमाची अंमलबजावणी करणार्‍यांमध्ये राहिलो. मला त्यातल्या त्यात मानाचे काम म्हणजे होळी तोडण्यासाठी बरोबर नेलेला कोयता सांभाळणे हेच असायचे कारण बाकीच्या अवलादिंच्या हाती कोयता वैगरे देणे म्हणजे जिकीरीचे असायचे.

होम लागेपर्यंत साधारण सात-साडेसात वाजायचे. त्याचवेळी कामधंद्याला बाहेर गेलेली लोकं पण परत येत असायची मग कधी सगळ्या मुलांना जवळच्या गादीवरच्या लिमलेटच्या गोळ्या किंवा तळलेल्या पिवळ्या नळ्या असा खाऊ मिळायचा. इथे पुन्हा माझ्या अंगच्या प्रामाणिकपणामुळे खाऊवाटपामधले संभाव्य घोटाळे टाळण्यासाठी ते काम बहुतेक वेळा मीच करायचो. पण काही असो मज्जा यायची. होळी आणणे असो की पातेरा जमवणे, कोयता सांभाळणे असो किंवा खाऊवाटप, आपण एक जबाबदारीचे काम पार पाडतोय असं एक प्रकारचे समाधान असायचे जे आत्ता मोठेपणी खूप दुर्मिळ झाले आहे.

Monday, June 14, 2010

सुट्टी संपली!!!



तिकडे कोकणात मस्त पाऊस सुरू झालाय. मुलांच्या शाळा पण आजच सुरू झाल्या. शेतकरी नांगरणीच्या कामाला लागले आणि मी पण मानेवर जोत घेऊन कामाला जुंपून घ्यायला परत आलो. गेला महिनाभर ईमेल, प्रोजेक्ट, ब्लॉग, बझ्झ सोडाच पण कंप्यूटरचा पण थोबाड बघितलं नाही. नुसतं उठा, फर्माईशी करा, आंबे चोखा, कोंबडी, बोकड, कुर्ल्या, कालव्, एक शिंपी, मासे .... हाणा आणि पुन्हा ताणून द्या. पोट भरलं की झोपा आणि भूक लागली की उठा असा साधा सोपा मार्ग होता. आणखी खूप काही लिहायचे आहे पण आत्ता पुर्वी सारखी सवय नाही राहिली. चार ओळी लिहून दमलो... गेल्या महिन्याभरात जे काय चार फोटो मारले ते पहा आणि गोड मानून घ्या...



Saturday, February 13, 2010

मेरा पहेला प्यार!!!

कधी तुम्हा कुणाला बोललो नाही. तशी गरज देखील वाटली नाही. पण माझ्या एकंदरीत बोलण्यावरून सॉरी लिहण्यावरून कदाचित तुमच्या पैकी काही जणांनी ओळखलं देखील असेल की I am engaged. हो आहे माझं प्रेम तिच्यावर आणि तेदेखील लहान पणापासून. जेंव्हा फार काही समजण्याची अक्कल नव्हती तेंव्हापासून. खरं तर तिची ओळख घरच्यांनीच करून दिली त्यामुळे आमच्या प्रेमाला विरोध वैगरे कधी झालाच नाही. आत्ता घरच्यांनी विरोध नाही केला त्यामुळे समाज काय म्हणेल वैगरे फालतू विचार मी कधी केला नाही. त्यामुळे माझे तिच्यावर किती प्रेम आहे आणि मी तिच्याशिवाय कसा राहू शकत नाही ह्याचा बभ्रा करत मी दुनिया फिरलोय.

तिचा विरह तर मी दोन दिवस देखील सोसू शकत नाही. आत्ता मी कोकणात असताना ती मला जशी मनमोकळे पणाने भेटायची तशी पुण्यात असताना आणि आत्ता बंगलोरला नाही भेटत. खरं तर आधी मी बंगलोरला आलो तेंव्हा तर फार हाल झाले हो. अगदी जिकडे पाहावं तिकडे सारखे तीचेच भास व्हायचे. भेट होणार नाही हे माहीत असल्यामुळे निदान तिला पर्याय शोधण्यासाठी तरी मी वीकेंडला नाना ठिकाणी भटकायचो. अर्थात तिला पर्याय शोधत होतो म्हणजे माझं तिच्यावरचं प्रेम कमी झालं असं समजू नका. उलट तिला दुसर्‍या रूपात स्वीकारण्याची ती तडजोड होती. अखेर एक दिवस केरळी वेषात मला तशीच स्वप्न-सुंदरी भेटली देखील. ही खोबरेल तेल लावून यायची पण आत्ता विरहच सहावेसा झाल्यानंतर खोबरेल तेल तर खोबरेल तेल, मी परिस्थितीला सामोरे जाण्याचं ठरवलं. इतक्या दूर बंगलोर सारख्या ठिकाणी आपल्याला आपलं प्रेम मिळतय ह्यातच मी खुश होतो. बाकी सणासुदीला घरी गेलो की ती भेटतच होती. त्या दोन चार दिवसात आमच्या प्रेमाला नुसतं उधाण येत असे. नंतर एके दिवशी मला बंगलोरला तिच्यासारखीच अगदी हुबेहुब दुसरी बसस्टॅंड जवळच्या कामातांकडे दिसली. मला तर अगदी "अगर सच्चे दिल से किसी को चाहो तो पुरी कायनात उसे तुमसे मिलाने के लिये जूट जाती है" चा याची देही याची डोळा प्रत्यय आला. ही अस्सल सारस्वत घराण्यातील होती. मी तर बेह्द्द खुश. सारस्वतांबद्दल ऐकून होतो पण आत्ता तर प्रत्यक्ष अनुभवायला मिळत होते. घरापासून इतक्या दूर मला माझे प्रेम पुन्हा मिळाले होते. तेंव्हापासून खोबरेल तेल लावून भेटायला येणारीचं तोंड देखील पाहिलं नाही. चालतं तेवढं. प्रेमात आणि युद्धात सगळं क्षम्य असतात म्हणे. आजकाल रविवार दुपारी १५ किलोमीटर अंतर तुडवून मी कामातांकडे जातो. आठवड्यात एखाद्या दिवशी सुट्टी मिळाली तर ती देखील सत्कारणी लावतो. हिच्यासोबत घालवलेल्या रविवारच्या आठवणीत आणि येणार्‍या रविवारच्या भेटीची स्वप्न बघत उरलेला आठवडा कंठतो. खरं प्रेम असेल तर कुठेही भेटतं कारण परदेशी गेलो तेंव्हा मला तिच्या सारख्याच एकीची ओळख झाली. ही जापनीज होती पण किती 'सुशी'ल. आजही तिच्या आठवणीने मनाचा कोपरा हळवा होतो.

आज वॅलिंटाइन डे. शुक्रवारी शिवरात्रीची सुट्टी होती म्हणून खास लॉंग वीकेंडला जोडुन सोमवारी सुट्टी घेऊन आज वॅलिंटाइन डेला हिला भेटायला खासं घरी आलोय. म्हटलं आज वॅलिंटाइन डे हिच्याबरोबर घरी साजरा करू. चला तर मंडळी मी तिला घरी घेऊन जायला आलोय. आत्ता मी तिची एवढी स्तुती केलीय तर तिचे फोटो पण देतो. मला खात्री आहे तुमच्यापैकी बरेच जण तिला जवळून ओळखत असतील, कदाचित माझ्यप्रमाणे तिच्यावर जीव ओवाळून देखील टाकत असतील. ती आहेच तशी प्रेमात पडण्यासारखी आणि प्रेमात पडल्यावर पुन्हा न विसरण्यासारखी... माझी प्रिय मासोळी...

ShareThis