Sunday, March 13, 2011

रत्नागिरीतला शिमगा - लहान होळी

शिमगा आणि गणेशोत्सव म्हणजे कोकणातले दोन मुख्य सण. सध्या शिमगा सुरू आहे. आज होळी. मुंबई तसेच उत्तर भारतात होळी म्हणजे रंगांची उधळण पण कोकणात रंगाचा सण रंगपंचमीला म्हणजे होळी नंतर पाच दिवसांनी साजरा केला जातो. लहानपणी माझी मुंबईची भावंडे होळी दिवशीच रंगपंचमी खेळलो, गच्चीतून फुगे फेकून मारले असे सांगायचीत तेंव्हा मला आश्चर्य वाटायचे. मग मी खुळ्यासारखे अरे रंगपंचमीला वेळ आहे अजून असे म्हणायचो. आम्हाला होळी, धुलीवंदन (धूळवड्) आणि मग पाच दिवसांनी रंगपंचमी अश्या आठवड्यात मस्त ३ दिवस सुट्ट्या मिळत. आजची पोस्ट शिमगा स्पेशल. कोकणात शिमगा म्हणजे मस्त बोंबाबोंब. खरोखरच्या चोर्‍या. चोर्‍या म्हणजे लाकूडफाटा वैगरे. अगदीच पोचलेले टवाळ असतील तर डायरेक्ट कोंबडासुद्धा चोरायला कमी नाही करत.

कोकणात शिमगा निरनिराळ्या पद्धतीने साजरा होतो. प्रत्येक गावागावात वेगळी पद्धत पण मुख्यत: बर्‍याच गावात पालखी असते. रत्नागिरीचे ग्राम दैवत म्हणजे देव भैरी. होळीच्या दिवशी भैरी पालखी बाहेर पडते आणि पाच दिवस आजूबाजूच्या मुख्य वाड्यांमध्ये फिरून रंगपंचमीपर्यंत झाडगावात सहाणेवर बसते. तिथे सूरमाडाची होळी असते. ह्या काळात निरनिराळ्या गावाचे मानकरी येऊन पालखी नाचवण्याचा कार्यक्रम असतो. कधी दोन लोकं तर कधी एकटा माणूस डोक्यावर ती भली मोठी पालखी घेऊन नाचवतो. मज्जा येते पहायला. पुढे कधी तरी शिमग्यात सुट्टी काढून ह्या सगळ्याचे रेकॉर्डिंग केले पाहिजे. दूरदर्शनच्या काळात जयू भाटकरांनी रत्नागिरीमधला शिमग्यावर एक कार्यक्रम करून प्रक्षेपित केला होता.

आमच्या गावात मात्र शिमगा होळीच्या दहा दिवस आधीपासून सुरू होतो. गावात लहान मुलांची आणि मोठ्या लोकांची होळी चक्क वेगवेगळी असते. होळीच्या होमाची एक ठरलेली जागा आहे. तिथे दोन खड्डे पाडले जातात. त्या बाजूला होलदेवाच्या (होळीचा देव) मूर्त्या मांडलेल्या असतात. होळीचा सण झाला की पाडव्या दिवशी हे होलदेव पुन्हा त्या खडड्यांमध्ये ठेवून खड्डे पुन्हा पुढच्या होळीपर्यंत बुजवले जातात. लहान मुलांच्या होळीचा खडडा गूढगाभर खोल तर मोठ्या (गावाच्या) होळीचा खडडा चांगला पुरूषभर खोल असतो. होळीच्या सणाच्या दहा दिवस आधी लहान मुलांची होळी सुरू होते. इथे खडडा खणण्यापासून सगळी कामे लहान मुलेच करतात. लहान म्हणजे ६-७ पर्यंत कारण गावातली शाळा सातवीपर्यंतच आहे. आठवीसाठी शहरातल्या शाळेत जावे लागते आणि शहरातल्या शाळेत जाणारी मुले लहान मुलांच्यात जास्त मिक्स होत नाहीत. थोडक्यात गावातली शाळा आणि होळी एकदमच सुटते. तर लहान मुलांची होळी म्हणजे रोज शाळा सुटली की गावातून किंवा आजूबाजूच्या परिसरातून एरंडाचे एखादे झाड तोडून आणायचे. होळी आणाताना 'हाय रे हाय आणि xxxच्या जिवात काय नाय रे' आणि इथे देता येणार नाहीत अश्या फाका घालायचे.

एरंडाचेच झाड का? ह्याबद्दल काही माहिती नाही पण बहुतेक ही झाडे पुष्कळ आहेत आणि दुसरे म्हणजे हे कुणाच्याही आवारातून परवानगी शिवाय तोडून आणले तरी चालते. अजुन एक म्हणजे पाचवी-सहावीच्या मूलानां हे तोडून खांद्यावरुन मिरवत आणण्यासारखे असते. कधी कधी मुले जास्त असतील किंवा लहानांची होळी आणायचा शेवटचा दिवस असेल तर मजबूत असे एरंडाचे झाड निवडले जाते. ते घेऊन पूर्ण गावभर 'होळी ओ' करत, मिरवत अगदी काळोख पडून गेल्यावर होमाच्या ठिकाणी आणून ते एरंडाचे झाड खड्ड्यात मधोमध उभे केलं जातं. मग आजूबाजूचा किंवा गावातून जमवून आणलेला झाडांचा सुकलेला पाचोळा (पातेरा), झावळ्या, काटक्या असं काय मिळेल ते सगळं त्या खड्ड्यात भरून होम केला जातो. गावात सागाची आणि माडाची खूप झाडे असल्याने रोज बसल्या जागी ४-५ टोपल्या पातेरा, झावळ्या सहज मिळायचा. अजुन ही मिळतो. पुर्वी म्हणजे अगदी १०-१२ वर्षापूर्वी देखील बरीचशी लोकं चुलीवरच जेवण करायची. आज ही गावातल्या उत्सवांच्यावेळी किंवा लग्नकार्यात गाव जेवणासाठी लाकूड फाटाच वापरला जातो.

होमाच्यावेळी तथाकथित मोठी झालेली म्हणजे आठवी-नववीतील मुले (ज्यांना मोठे आपल्यात घेत नसत) देवळातून ढोल-ताशे घेऊन यायचे आणि मोठ्या होळीच्या मिरवणुकीसाठी ढोल-ताशे वाजवण्याची जोरदार प्रॅक्टिस चालायची. मी लहान होतो म्हणजे पाचवी सहावीपर्यंत घरचे मला गावातल्या इतर मुलांबरोबर होळी आणायला पाठवत नसत. तोपर्यंत मी इतर मुले होळी आणेपर्यंत पातेरा गोळा करून ठेवण्याचे काम इमानेइतबारे बजावले होते. मी पाचवी आणि सहावीत असताना २ वर्षे अगदी सुरुवातीपासून शेवटपर्यंत लहान मुलांच्या होळीत पूर्ण सहभागी होतो. सहावी पास झाल्यावरच मी हायस्कूलला प्रवेश घेतल्यामुळे सहाजिकच मी एक वर्ष आधीच 'मोठा' झालो त्यामुळे आपोआपच लहान होळीची मज्जा एक वर्ष कमी झाली. तेंव्हा होळी कुठून आणायची, एरंडाचे कुठले झाड निवडायचे, होळी आणाताना शेंड्याकडे कोण? मुद्याकडे (खोडाकडे) कोण? हे ठरवणारी मुले म्हणजे आमच्यासाठी हीरो असायची. अर्थात सगळ्यात अंगापींडाने जो जास्त दणकट आणि त्यात शाळेत नापास वैगरे झालेला असतो त्यालाच हा मान आपोआप मिळतो. मी ह्या दोन्ही गोष्टींमध्ये प्रचंड मागासलेला असल्याने मी नेहमी हुकुमाची अंमलबजावणी करणार्‍यांमध्ये राहिलो. मला त्यातल्या त्यात मानाचे काम म्हणजे होळी तोडण्यासाठी बरोबर नेलेला कोयता सांभाळणे हेच असायचे कारण बाकीच्या अवलादिंच्या हाती कोयता वैगरे देणे म्हणजे जिकीरीचे असायचे.

होम लागेपर्यंत साधारण सात-साडेसात वाजायचे. त्याचवेळी कामधंद्याला बाहेर गेलेली लोकं पण परत येत असायची मग कधी सगळ्या मुलांना जवळच्या गादीवरच्या लिमलेटच्या गोळ्या किंवा तळलेल्या पिवळ्या नळ्या असा खाऊ मिळायचा. इथे पुन्हा माझ्या अंगच्या प्रामाणिकपणामुळे खाऊवाटपामधले संभाव्य घोटाळे टाळण्यासाठी ते काम बहुतेक वेळा मीच करायचो. पण काही असो मज्जा यायची. होळी आणणे असो की पातेरा जमवणे, कोयता सांभाळणे असो किंवा खाऊवाटप, आपण एक जबाबदारीचे काम पार पाडतोय असं एक प्रकारचे समाधान असायचे जे आत्ता मोठेपणी खूप दुर्मिळ झाले आहे.

10 comments:

 1. मागासलेला सिद्धार्थ जास्त समाधानी होता का रे?? (हा प्रश्न फ़क्त तुलाच नाही लहानपणी अशा सार्‍या छोट्या छोट्या गोष्टीत मज्जा करणार्‍या तुला.मला सर्वांना आहे रे.........)
  तुझी यावेळची स्पेशल होळी आहे...खूप खूप शुभेच्छा...
  यावेळची होळी जरा सभ्य असणारे का??....:P

  ReplyDelete
 2. हो, यंदा पहिल्यांदा बंगलोरमध्ये होळी दिवशी घरी पुरणपोळी खाण्याचा योग आहे त्यामुळे स्पेशल म्हणायला हरकत नाही आणि अरे ओ, होळी असो वा दिवाळी मी नेहमीच सभ्य आणि प्रामाणिक असतो ;-) त्यामुळे गावातली मुले आज पण मला कुठे नेत नाहीत.

  ReplyDelete
 3. कोयता सांभाळणे, खाऊवाटप..... लयच ज्यंटलमन होऊन राहिला ना भाऊ ;)

  ReplyDelete
 4. कोयत्याच्या अनुभवावरच बंगलोरचे ग्रीन कार्ड मिळाले नां भाऊ.

  ReplyDelete
 5. मस्त मजा आली वाचून... तू अन प्रामाणिक.. लई भारी :D

  ReplyDelete
 6. बाबा रे लोकांना वाटते. मी काय करू? मी माझी मते तर त्यांच्यावर लादू शकत नाही नां?

  ReplyDelete
 7. होळीची जवळपास पद्धत सारखीच आहे. थोडा फार फरक असेल. लहानपणीची होळी मी अजूनही मिस करतो.
  होळीची खरी गम्मत या पिढीला कळणारच नाही.. होळी म्हणजे फक्त दारू पिणे आणि मटन खाणे.. इतकंच राहिल काही वर्षानंतर!

  ReplyDelete
 8. हो ना रे..कसले दिवस होते आधी. आता फक्त दारू आणि खाणे म्हणजे होळी :(

  ReplyDelete
 9. @ महेंद्रकाका आणि सुहास - खरं आहे. हल्ली होळी आणि ३१ डिसेंबरमध्ये काही फरक नाही. गावाकडे देखील लोक खाणे आणि पिणेच पहातात.

  ReplyDelete
 10. आयला आमच्या वेंगुर्ल्यात पण अशीच होळी ! ५ दिवस शिमग्याची धम्माल! शिमगा, आणि गावची जत्रा आणि दशावतार गेली १० वर्षे मिसतोय !! :):)

  ReplyDelete

ShareThis