Monday, March 29, 2010

एक क्षण मोहाचा

गेले काही महिने रोज सकाळी हा मोहाचा क्षण येतो. रोज रात्री झोपताना न चुकता सकाळी सहा साडे-सहाचा गजर लावतो. का तर सकाळी उठून जॉगिंगला जायचे. कमरेभोवती साइकलचा टायर झालाय. म्हटलं त्याची स्कूटर आणि नंतर सुमो किंवा ट्रॅक्टरच्या टायरपर्यंत पदोन्नती व्हायच्या आत काही हालचाल करायला हवी. कोंबडी-बोकडाच्या रूपाने कॅलरी नित्यनेमाने शरीरात प्रवेश करत असतात आणि वर आम्ही निर्लजपणे दिवसभर कचेरित क्लिकक्लिकाट करीत बसलेले. त्यात शुक्रवार हा चिकन बिर्याणी आणि शोरमा रोल खाल्ल्याशिवाय जात नाही. असो ही पोस्ट खादडीवर नसून खादडीच्या दुष्परिणामांवर आहे त्यामुळे तोंड आवरतं घेतो. तर सांगायचा मुद्दा असा की सकाळी गजर झाला की हात आपसूक ताणला जातो आणि गजर बंद करण्यात येतो. रोज वेगवेगळी कारणं असतात. गुरुवार ते रविवार "आज कुठे सोमवार पासून जाऊ", सोमवारी "वीकेंडला जागरण झालाय. झोप पूर्ण करू. आज पासून पुन्हा काम करायचं आहे". मंगळवार बुधवार मनात येईल ते काही कारण. महिन्याच्या २० तारखेनंतर "अरे आत्ता कुठे १ तारखेपासून जाऊ." तरी नशीब मी पोर्णिमा-आमावस्या बघत नाही. डिसेंबर मध्ये नवीन वर्षाचा संकल्प करू असं म्हणून टाळलं आणि नवीन वर्ष सुरू झाल्यावर "आत्ता नवीन वर्षाच्या संकल्पवाल्यांची गर्दी असेल" म्हणून टाळलं. स्व:तच स्व:तला द्यायची असली तरी कारणे कशी स्व:तच्या मनाला पूर्णपणे पटतील अशी. उगीचच "आज कंटाळा आलाय", "आज नको उद्या जाऊ" अशी थातुर मातुर कारणे कधी नाही दिली.

तसा गेल्या वर्षी जून-जुलैपर्यंत जॉगिंगला जात देखील होतो पण ऑगस्टच्या दरम्यान बंगलोरला पाऊस जरा वाढला आणि जरा खंड पडला. मग काय आत्ता गणपतीला घरी जायचं आहेच मग ४ दिवस चुकेल, नंतर काय तर दिवाळीला घरी जायचं आहे मग ४ दिवस चुकेल म्हणून आत्ता घरी जाऊन आलो की मगच सुरू करू असा विचार करून गजर बंद करून पुन्हा घोरु लागायचो. गणपती दिवाळी चे ४ दिवस खंड पडेल असा सुद्न्य विचार करून ४ महिने मी जॉगिंगला गेलो नाही. दिवाळी तर काय थंडी घेऊन आली मग गुलाबी थंडीत गजर बंद करण्यासाठी देखील डोळे उघडत नव्हते तर उठून बाहेर पडायचा तर प्रश्नच नव्हता.

दुसरी गोष्ट म्हणजे त्याच दरम्यान ब्लॉगिंगचा पण नाद लागला. ब्लॉग वाचणे, प्रतिक्रिया देणे, आपण काहीतरी लिहण्याचा प्रयत्न करणे ह्यात रोजचे बारा वाजू लागले. वर आम्हाला "लवकर निजे लवकर उठे"पेक्षा "शरीराला किमान ८ तास झोप हवी" हे जास्त लक्षात राहते त्यामुळे रात्री किती ही उशीर झाला तरी किमान ८ तास झोप पूर्ण करण्याची नवीन चांगली सवय लागली. ह्या सवई नुसार सकाळचे सहा-साडेसहा म्हणजे मध्यरात्र की हो. मग माणूस कसा उठणार?

बरं मी जेंव्हा जॉगिंगला जायचो तेंव्हा देखील Motivation नाही हो. सकाळी पार्कात धावायला येणार्‍या मुलींमध्ये पण consistency म्हणून नाही. अशी एखादी कुणी नाही की जिच्यासाठी उठून जावे आणि ती बया नित्य नेमाने साडेसहाला पार्कात हजर होईल. कुणी दिसलीच आणि आम्ही पुढचे दोन दिवस आशेने पहाटे पहाटे उठून गेलो की दररोज न चुकता येणार्‍या जेष्ठ नागरिक संघाचे दर्शन घेऊन परत. कसं होणार ह्यां मुलींचं?

असो चला तर मग, आधीच बराच उशीर झालाय. झोपायला जातो. उद्या सकाळी ६ वाजता उठायचे आहे.

13 comments:

  1. एकदम जबरी-खबरी लिहिलंस...आणि खादाडीचं म्हणशील तर मासे खा. खरं सांगते....निदान ते तुझं टायर प्रकरण ट्रकोबा टायरपर्यंत नाही जाणार......

    ReplyDelete
  2. एकदम झकास. आमचही सेम असच आहे बाबा.

    ReplyDelete
  3. हे हे ... एकदम झकास !

    माझ्या मोबाईलवर गजर लावतांना त्याला नाव द्यायची सोय आहे ... मी सकाळी ६.३० चा गजर लावून त्याला ‘ऑप्टिमिस्टिक’ असं नाव दिलंय ... रोज `ऑप्टिमिस्टिक’ संपून ‘रियालिस्टिक’ वाजेपर्यंत डोळे उघडतच नाहीत :D

    ReplyDelete
  4. आयला ...होरे... असेच होते माझे सुद्धा बरेच वेळा. पण अरे खायचे कमी होता कामा नये म्हणून तरी जात जा रे!!! :D 'बंगलोर सर सुभेदार' आहेस तू आपल्या राज्याचा... :D

    ReplyDelete
  5. शेम टू शेम रे. . .फक्त आमचा टायर वगैरे काही झालेला नाही अजुन. . . मस्त लिहलय रे!!!

    ReplyDelete
  6. हे..हे.. खरंय सकाळी लवकर उठणे ही एक कला आहे...

    ReplyDelete
  7. अगदी अस्सच माझं पण झालं आणि वजन वाढलं २० किलो. एक वर्षात. :(

    ReplyDelete
  8. सत्यवचन मित्रा :)

    ReplyDelete
  9. च्यायला माझं उल्टं आहे. किती खाल्लं तरी वजन वाढतच नाही :( गेली कित्येक वर्षे ६५ किलोवर आहे. माझ्या उंचीला ७१ आदर्श वजन आहे. :(

    ReplyDelete
  10. मस्त लिहिलस..माझी अवस्था तुला माहित आहेच रे..

    ReplyDelete
  11. mi barech diwas jhala gym regular kartoy, tyacha phar faida jhalay, tu hi kar regular

    ReplyDelete
  12. Hehe... Mast ch lihilay...!!!
    Aani MULI suddha tumachyaya baddal asach wichar karat astil na..?? "Jarahi Consistancy mhanun nahi hya mulat!" ;aani tumhala baghayala mhanun aalelya tyanchi nirasha hot asel mhanun mag tyahi yet nastil regular... So tumhi regular hva mag tya sudha aapoaap regular hotil....!!! :)

    ReplyDelete

ShareThis