Friday, April 30, 2010

फसलेली खादडी

आजपर्यंत बर्‍याच खादडिच्या पोस्ट वाचल्या आणि तोंडाला पाणी सुटलं. किती ही निषेध नोंदवला गेला तरी तो निषेध म्हणजे प्रोत्साहन समजून जनतेने फोटोसकट खादडी महात्म्य सुरुच ठेवले. आज मी माझी खादडीची एक आठवण लिहितोय ज्यामुळे माझ्या तोंडाला पाणी सुटले नाही पण तोंडचे पाणी पळाले होते.

झालं काय तर अमेरिकेत असताना दर दुपारी जेवायला बाहेर जायचो. भारतातून गेलेले आम्ही दोघे, मी आणि चंद्रु, नेहमीच दुपारी बाहेर जायचो. दररोज टॅकोबेल, चिलीज्, पिझ्झाहट, बर्गर-किंग, चिपोटले, कधी चायनीज तर कधी जापनीज अश्या ठराविक ठिकाणी आलटून पालटून भेटी दिल्या जायच्या. शुक्रवारी ऑफीसचे इतर लोक देखील घरून लंचबॉक्स न आणता बाहेरच येत असतं. अश्याच एका शुक्रवारी आमच्या बरोबर आमच्या टीम मधले ३-४ अमेरिकन निघाले जेवायला. कुठे जायचं कुठे जायचं करता करता Joe's या इटालियन रेस्तोरंटला जायचे असे ठरले. तो पर्यंत मेक्सिकन, जापनीज चाखुन झालेच होते. आम्ही पण म्हटले चला आत्ता इटालियन होऊन जाऊ दे. Joe's ला गेलो. आत गेल्या गेल्या शोले स्टाइलमध्ये कितने आदमी है वैगरे विचारून झाल्यावर आम्ही सगळे मावू असे टेबल दिलं गेलं. मी, चंद्रु आणि टॉम असे तिघे बसलो. टॉम वेगन होता. हे वेगन लोकं म्हणजे नॉनव्हेज सोडाच पण दुधापासून बनलेले पदार्थ पण खात नाहीत. फक्त नैसर्गिकरित्या उपलब्ध असणारी घासपुस आणि त्यापासून बनणारे पदार्थ खातात म्हणे. इतर अमेरिकन जसे सकाळ संद्याकाळ कॉफीचा एक मोठा मग नाहीतर कोल्डड्रिंकचा टीन घेऊन फिरताना दिसायचे तिथे हा पठ्ठ्या केवळ पाणी प्यायचा. ऑफीसपार्टीला देखील डोनट सोडून कुठल्या चीज-बर्गर अश्या पदार्थांना देखील शिवायचा नाही. आधी टॉम वेगन आहे म्हणून हे सगळं खात नाही असं मला कळलं तेंव्हा वेगन म्हणजे काहीतरी रोग असावा असं मला वाटलं होतं पण वेगन हा रोग नसून तो डाएट आहे हे मला नंतर कुणीतरी सांगितलं. त्यात विकीपिडियावर वेगनबद्दल पहिल्या ओळीतच हा काय प्रकार आहे आणि मुख्य म्हणजे आपल्या पूर्णपणे विरुद्ध जीवनशैलीचा प्रकार आहे हे समजताच मी ते पेज बंद केलं. आपल्याला ज्या गावाला जायचंच नाही तिथला पत्ता कशाला शोधा... असो. तर असा हा टॉम (बिच्चारा!!! व्यर्थ ते जीवन) त्याच्या ह्या वेगन डाएटमुळे म्हणे त्याचे विमान प्रवासात हाल व्हायचे आणि ह्या एकाच कारणामुळे तो कधी अमेरिकेबाहेर गेला नव्हता.

तर मूळ मुद्दा असा की मला आणि चंद्रुला दोघांना ही काय ऑर्डर कारायचं काहीच माहीत नव्हतं. इतर वेळी रेस्तोरंटमध्ये जायच्या आधी आम्ही लिंडाला विचारून अमुक अमुक ठिकाणी काय मागायचं ते विचारून जायचो आणि हाणून यायचो. आज बरोबर टीममधली लोकं असल्याने आम्ही लिंडाला काही न विचारता आलेलो. त्यामुळे सहाजिकच टॉमला तूच आमच्यासाठी (काहीतरी नॉनव्हेज) ऑर्डर दे असं सांगितलं. त्याप्रमाणे टॉमने सगळ्यांसाठी ऑर्डर दिली. साधारण १५-२० मिनिटांनी तो वेटर एका प्लेटमध्ये पालापाचोळा आणि एका परडीमध्ये बरेचसे पाव घेऊन आला. ते बघून आम्ही आधी "ह्याने काय होणार" या अर्थी एकमेकांच्या तोंडाकडे बघितलं आणि टॉमला तू सगळ्यांसाठी एकच डिश ऑर्डर केलीस का? असे विचारले. नंतर आम्हाला कळले की इटालियन रेस्तोरंट मध्ये गेलं की हा घास पूस प्रकार येतोच. मग आम्ही आपले चीज लावून दोन दोन पाव आणि ती कोवळी पाने खाल्ली आणि उरलेली भूक मुख्य ऑर्डरसाठी राखून ठेवली. थोड्या वेळाने वेटर उरलेले पाव आणि आमच्या रिकाम्या डिश घेऊन गेला आणि दुसर्‍याने ऑर्डर प्रमाणे प्रत्येका समोर मेन मेनू आणून ठेवला. आमच्या दोघांसाठी टॉमने पास्ता ऑर्डर केला होता. चंद्रुसाठी पेन्ने रिगाते आणि माझ्यासाठी असच एक अगम्य नाव असलेली डिश. चंद्रुची डिश निदान दिसायला तरी देखणी आणि आकर्षक होती. टॉमच्या पुढयात मात्र मागाच्याच घासपूसप्रमाणेच पण जरा अधिक चांगली दिसणारी डिश होती. पण माझ्या पुढयातील प्रकार पाहण्यालायक देखील नव्हता. माझ्यासाठी टॉमने काहीतरी चिकनची डिश ऑर्डर केलेली. चरबी किंवा पातळ मऊ रबराचा शोभेल असा एक सेंटिमीटर जाडीचा कसलासा थर होता, तो चमच्याने भोसकला तर रक्त यावं तसा लाल लाल जरा जरा घट्ट असा (टोमॅटो??) सॉस बाहेर आला. आत चमच्याने ढोसून पाहिलं तर काही तुकडे असावेत असा अंदाज आला. बहुतेक तेच चिकन असावं. स्मगलिंग केल्यासारखं चिकन त्या अगम्य थराखाली लपवून ठेवलं होतं. रेस्तोरंटमध्ये शिरल्या पासून जो एक प्रकारचा आंबट वास येत होता तो त्या सॉसचाच होता ह्याची खात्री पटली. जसं दुसर्‍याची बायको चांगली दिसते (असं म्हणतात बुवा, आम्हासनी काय बी ठावं नाय) तसं मला दुसर्यांच्या पुढयातल्या डिश चांगल्या वाटू लागल्या. चंद्रुच्या डिशमध्ये पिवळ्या रंगाच्या रेघा-रेघांच्या एक दीड इंच लांबीच्या लांब नळ्या होत्या. त्या पण रबरीच दिसत होत्या. काही माणसे कशी स्वभाव कळण्या अगोदरच प्रथम दर्शनीच मनातून उतरतात तशीच माझ्या पुढयातील डिशदेखील चाखण्याआधीच माझ्या जिभेवरून उतरली होती. पहिल्या प्रथम मी तो थर फाडून बाहेर आलेला चमचा भर सॉस घेतला. जसजसा तो तोंडाजवळ नेत गेलो तसतसा त्याचा वास (दर्प) अधिकच जाणवला. जिभेवर ठेवताच डिश जशी दिसते तशीच आहे ह्याची खात्री पटली. मी चंद्रुकडे पाहिलं तर तो काट्या-चमच्यामध्ये त्या नळ्या पकडून गिळण्यात रमला होता. मला वाटलं नळ्या दिसतात त्या प्रमाणे चांगल्या असाव्या. टॉम नेहमीप्रमाणे प्रसन्न वदनाने वदनी केवळ पाला पाचोळा घेत होता. बहुतेक माझाच गेम झालाय असं मला वाटलं आणि मी पण माझं थोबाड् शक्य तितकं प्रसन्न ठेवत आणखी दोन चमचे ओरपले. गिळायला होईना. त्या सॉसचा वास तर नाकात घुमत होता. शेकडो मैल दूर असून देखील मला अचानक कोल्हापूर-रत्नागिरी बसमध्ये आंबा घाट लागल्यावर मुलं ओकली की जो वास येतो तो आठवला आणि अजुन कसतरीच झालं. मग पटकन पाण्याचा ग्लास तोंडाला लावून सॉस गिळला. मग म्हटलं चला काहीच नाही तर चिकनचे तुकडे हाणू म्हणून सॉसमध्ये चमच्याने शोधाशोध करून दोन तुकड्यामध्ये चमचा खुपसला आणि मोठ्या अपेक्षेने स्वाहा केले तर इथेही त्या तुकड्यानां लागलेला सॉस आपली चव पुन्हा उतरवून गेला. चिकन देखील चिकन नसून कसल्याश्या कंदमुळाचे उकडलेले तुकडे असावे असे वाटले. इथेही पचका. जिथे भरोश्याच्या चिकनने ऐनवेळी घात केला तिथे त्या रबरी थराकडून काडीची देखील अपेक्षा नव्हती आणि त्याने अपेक्षेप्रमाणे ती खरी केली. बहुतेक मैद्याचा थर असावा, मला तो घास गिळल्यावर आठवडाभर दररोज १-२ किमी धावलो तरच हा थर आपल्या पोटातून निघून जाईल असे वाटले. एखाद्या दिवशी सगळ्या गोष्टी तुमच्या विरुद्ध जातात (मुंबई इंडियन्स फाइनल हारल्यावर सच्चुपण असचं म्हणाला होता) तसा माझ्या आयुष्यातला तो दिवस होता.चंद्रुदेखील आधी आवडीने खातो आहे असं मला वाटलेलं पण तो देखील जरा थंडावला होता. पण त्याने कसं बसं का होईना बर्‍याचश्या नळ्या घश्याखाली उतरवल्या होत्या. मी त्याच्याकडून स्फूर्ती घेऊन आपण पण डोळे मिटून गिळून टाकु म्हणून पुन्हा माझ्या डिशकडे वळलो आणि सॉस, चिकन, रबर असे जे काय मिळेल ते एकत्र चमच्यात उचललं आणि मुखी लावलं. म्हटलं एक एक डिश खाण्याची ठराविक पद्धत असते, हे सगळं एकत्र चांगलं लागत असेल. जशी म.रा.प.म.च्या बस स्टॅंडवर सगळे टाकाऊ पदार्थ एकत्र करून त्यावर रस्सा ओतला की कशी मिसळ बनते आणि समस्त जनता ती कशी आवडीने खाते. तिथेही जर एक एक टाकाऊ पदार्थ वेगळा खायला गेलं तर त्याला घंटादेखील चव नसते पण बाकीच्या टाकाऊ पदार्थंबरोबर कसं 'मिले सूर मेरा तुम्हारा तो सूर बने हमारा' होतं. म्हटलं तसं करून पाहू पण नाही. तिथे ही आधी सॉसचा वास, मग सॉसची चव आणि मग कंदमुळं अश्या क्रमाने पुन्हा सगळं पाण्याच्या घोटाबरोबर माझ्या पोटात गेलं. त्या रबराला रंग रूप सोडलं तर वास, चव आणि इतर काहीच गुणधर्म नव्हते. त्या क्षणी टॉमकडे पाहून मलादेखील आपण वेगन बनून पालापाचोळा खावा असे वाटून गेले. बहुतेक टॉमने लहानपणी हीच डिश खाल्ली असावी आणि त्या घटनेने त्याला आयुष्यभरासाठी वेगन डाएटची दीक्षा घेण्यास प्रवृत्त केले असावे.

एव्हाना आज उपाशी राहावं लागणार हे समजून चुकलं होतं. भूक तर काहीच भागलेली नव्हती. मनातून सारखं त्या वेटर ला बोलावून "अरे ते माघाचचे पाव घेऊन ये रे जरा" असे सांगावेसे वाटत होते. टॉमदेखील माझ्या डिशकडे "Sid didn't like it huh?" पाहून असं म्हणाला. मी कसबसा हसलो. कारण नाही नाही, मला आवडली, ठीक आहे असं काही म्हणणं शक्य नव्हतं. चार पाच चमचे सोडले तर ती डिश जशीच्या तशी होती. मी देखील प्रथमच असं अन्न टाकून उठनार होतो. पण काही इलाज नव्हता, मी माझ्या परीने प्रयत्न केला होता. वेटरने देखील पॅक करून देऊ का? असं विचारलं. मी नको म्हटलं आणि आम्ही बिल वैगरे भरून तीकडून बाहेर पडलो. ऑफीसला आल्यावर जवळची सगळी चिल्लर वेंडिंग मशीन मध्ये टाकून वेफर्स, कूकीज, चॉक लेट्स असं जे मिळेल ते खाल्लं आणि वरुन पाणी प्यायलो. त्या दिवसापासून संकटकाळी बाहेर पडण्याचा मार्ग म्हणून ऑफीसच्या बॅगेत मॅगीचं एक पॅकेट ठेवू लागलो. लिंडाला देखील माझा कसा पोपट झाला ते सांगितलं पण झालं भलतचं. तिला इटालियन खूप आवडायचं आणि ती आत्ता पुढच्या वेळी मी तुम्हाला घेऊन जाते असं म्हणाली. गेम झाला. लिंडाला नाही म्हणणं शक्य नव्हतं त्यामुळे पुन्हा आम्ही Joe'sच्या वारीला गेलो. ह्या वेळी मात्र भविष्यातली गुंतवणूक म्हणून मी आधीच ५-६ पाव आणि सगळा पाला पाचोळा साफ करून टाकला. मागच्या वेळी चंद्रु "इतक्या काही खास नसतात पण गिळण्यालायक असतात" असं म्हणाला होता म्हणून मी त्याच्या अनुभवावरून ह्या वेळी त्या पिवळ्या नळ्या ऑर्डर केल्या होत्या. त्याने सांगितल्या प्रमाणे त्या नळ्या गिळण्याइतपतच बर्‍या होत्या आणि ऑफीसमध्ये मॅगीचे पॅकेट असल्याने चिंता नव्हती. पण तेंव्हापासुन कानाला खडा लावला आणि पुन्हा कधी इटालियन रेस्तोरंटचं नाव देखील काढलं नाही.

तर ही होती माझ्या फ़सलेल्या खादडीची कहाणी.

(ता. क. भारतात परत येताना फ़्लाइटमध्ये एअरहोस्टेसने जेवणासाठी माझ्यापुढे पास्ता धरला त्याच वेळी माझ्या MP3 प्लेअरवर "भय इथले संपत नाही" हे गाणं सुरु झालं हा योगायोग असावा.)

15 comments:

 1. हा...हा... निषेध त्या इटालियन फुडचा.. ह्या वेळी खर्‍या अर्थाने निषेध

  ReplyDelete
 2. खरे आहे आनंद. आधी मला वाटले होते की निषेध न नोंदवला जाणारी ही पहिली खादडी पोस्ट असेल पण नाही खरा खुरा निषेध नोंदवला जाणारी ही पहिली खादडी पोस्ट ठरली. ह्या साठी मला स्व:तचा अभिमान वाटत राहिल ;-)

  ReplyDelete
 3. खरच खराखुरा निषेध
  तुझा हा किस्सा वाचून हम दिल दे चुके सनम मधला अजय-ऐश्वर्या चा सीन आठवला.

  ReplyDelete
 4. @canvas - प्रतिक्रियेबद्दल आभार. "हम दिल दे चुके सनम" नीट पाहिला नाही कधी त्यामुळे अजय-ऐश्वर्याचा किस्सा माहीत नाही. आत्ता कधी लागला तर पाहिन नक्की.

  ReplyDelete
 5. तुझ्या फसलेल्या खादाडीची गोष्ट वाचून मी आजच (फक्त) एक मुर्ग कबाब चिकन दम बिर्याणी खाल्ले त्याचे थोडे का होईना मनात समाधान वाटले.

  ReplyDelete
 6. @Pankaj - मी देखील ही पोस्ट टाकल्यावर रविवारच्या प्रथेप्रमाणे फिश् लँडला जाऊन मासे खाऊन आलो आणि फसलेल्या खादडीच्या आठवणी पुसून टाकण्यासाठी वर एकशिंपी पण खाल्ली.

  ReplyDelete
 7. खूप भूक लागलेली असताना जिभेवर आणि पोटावर असा अन्याय म्हणजे जाम वाईट प्रकार. पास्ता खाऊन पस्तावायला झालं तुला एकूण. मी देखील या अनुभवातून गेले आहे. फरक इतकाच की ते आपलं भारतीय जेवण होतं. लग्नाच्या पंगतीत बसून - ’सगळं संपवायचं बरं का! लाजायचं नाही, मागून घ्या.’ अशा गोऽड आर्जवांपुढे मला ते पाण्याच्या घोटाबरोबर गिळावं लागलं होतं.

  ReplyDelete
 8. @कांचन - माझी परिस्थिती बरी होती म्हणायची कारण मी निदान तो अत्याचार थांबवु तरी शकलो पण लग्नात आप्त् स्वकियांच्या "गोड" आर्जवांपुढे गिळावंच लागतं. तिथे हे बांधून द्या असं सांगता येत नाही ;-).

  आणखी एक - "लाजू नका, मागू नका, पोटभर जेवा" अशी सूचना पण असते बरं का कधी कधी. फक्त ती समजून घेता आली पाहिजे. कोकणात लग्नाच्या किंवा अश्याच एखाद्या समारंभात एखादा पदार्थ मागितला आणि तो आणायला गेलेला माणूस पुन्हा फिरकला नाही की समजायचं की पदार्थ संपला आहे किंवा "बास झालं उठा आत्ता" ;-)

  ReplyDelete
 9. खादाडी फसलेली असली तरी पोस्ट मात्र एकदम झक्कास जमलेली आहे.. जाम हसलो वाचून. !!

  ReplyDelete
 10. आभार हेरंब. बघ जमलं तर जाऊन ये इटालियन खायला ;-)

  ReplyDelete
 11. Baap re... Jibhevar, potavar sagalyavarach atyachaar zale ho tumachya....!!! Baaki post kharech mast zaliye...Aani ho Taja kalam ekdam bhaarriii... :)

  ReplyDelete
 12. मैथिली प्रतिक्रियेबद्दल आभार.

  ReplyDelete
 13. हा हा हा...सॉलिड झालीय खादाडी पोस्ट....तुमच्या इथला मेन्यु माहित नाही पण मला इटालियन ’ऑलिव्ह गार्डन’ आवडतं...पुन्हा कधी इटालियनमध्ये जावंच लागलं तर पाला आणि पावाबरोबर सुप मागव (मला त्यांचं मिनेस्ट्रॉम सुप चांगलं वाटतं आणि पोटभरीचंही) आणि काय रे कुणी तुला त्यांचं डेझर्ट नाही सजेस्ट केलं..निदान तिरामिसुतरी खायचास...तुमच्या लिंडानेपण पोपट केला छ्या...आता तुला परत जायलाच हवं एकदा तरी....:)

  ReplyDelete
 14. अरेरे... पण पास्ता साला मला पण नाही आवडत... पण एकदा शमिकाने फोडणी देऊन बनवला होता घरी... चवीने खाल्ला होता... :)

  ReplyDelete
 15. Jhakaas..

  Aavadale jaam..

  ReplyDelete

ShareThis