Sunday, June 3, 2012

कोंबडी-बोकड चषक


काय म्हणतावं मंडळी?

गंपूशेटनी मामाच्या हाटेलात शिरता शिरता जमलेल्या लोकांना प्रश्न टाकला.

रविवारी रात्री जेवण खाण आटोपून सगळे म्हणजे बाबू तोडणकर, गेंगण्या, मास्तर आणि दोन चार इरसाल टाळकी मामाच्या हाटेलात बसली होती.

मामा : काय गंपूशेट आज लै म्हणजे लैच दिवसांनी आलात. म्हयनाभर तरी थोबाड दिसला नव्हतो. खै कडमडलो होतास?

गेंगण्या : ओ मामा, खै कडमडलो होतो म्हणजे? अवो गंपूशेटचो क्रिकेट प्रेम तुम्हाक म्हायत नसा? IPL सुरु असताना असलो फर्मास मनोरंजन सोडून गंपूशेट तुमच्या हाटेलात कशाक येल?

बाबू तोडणकर : नाय तर काय? मनोरंजन ता मनोरंजन आणि वरतून छक्को-चौको पडलो की नाचणाऱ्या त्या बाया पण असतात. असो सगळो टायम पास सोडून हयसर काय तुझ्या हाटेलातली झापा बघूक येतंय गंपूशेट? खानाची टीम जिंकली त्याची पार्टी करून आज आठवडाभरान गंपूशेट आपल्या अड्ड्यावर आलो.

ए गप्प बसा कि जरा. काय IPL IPL लावलाव हाय? माज क्रिकेट आवडता पण म्हणून काय IPL म्हणजे क्रिकेट नव्हे बघीत बसायला. खानाला एक कचकचीत शिवी हासडून गंपूशेट तोंड वाकडा करीत बोलले.

काय तरी काय बोलताव गंपूशेट?

काय तरी काय म्हंजे? जल्ला पैशाचा बाजार ता. कोण कोणाबरोबर आणि कोण कोणाविरुद्ध खेळताय हे कळेल तर शप्पथ.

गंपूशेट येवढा होता मग कशाक IPL बघूक होतात? गेंगण्या आपला ताच खरा धरून बसलेलो.

मी खै IPL बघीत होतो? माज काय कामा नसात? डॉनच्या पार्टीत नाचून पैसे कमावणारी खानासारखी लोकां दादासारख्याला खेळाडूकं नाचवतात. दारू विकून कोट्याधीश झालेली माणसा सट्टा लावतात तसा खेळाडूवर पैसो लावतात. करलो दुनिया मुठ्ठी में म्हणणारी लोका देवमाणसाकं पण मुठीत ठेवतंत. ह्यो खय्चो क्रिकेट? गंपूशेट करवादले.

खेळाडू विकत घेताल्यांनी म्हणून काय झाला? क्लब क्रिकेट ता. तिकडे असाच असता. आत्ता आपण नाय काय, कळीत नसला तरी अधनंमधनं ता इंग्लिश प्रिमिअर लीग म्हणजे खरोखुरो IPL बघाताव? तिकडे काय वेगळा असता? मामानं IPLची बाजू घेतालान.

हो. आणि आपल्या मोदीनं सुरु केलेले IPL पण त्या खऱ्याखुऱ्या IPL वरच आधारित आहे. मास्तरांनी अधिक माहिती पुरवली.

त्या फुटबॉल प्रिमिअर लीगबरोबर आपल्या IPLची तुलना करू नका मास्तर. त्याची बात वेगळीच असा.

कशी वेगळी बात. तिकडे पण खेळाडूचो लिलाव होता. तुका इंग्लिश चालते पण देशी नको? बाबू तोडणकरा आंगठा तोंडाजवळ नेत बोललो.

गेंगण्या : मेलो बेवडो आलो परत बाटली वर.

बाबू अरे इंग्लिश आणि देशीची कसली तुलना करतास? इंग्लिशचो स्टॅंडर्ड खै आणि देशीचो खै हे मी तुका सांगूक नको. गंपूशेटनी बाबूला झेपेल असा प्रश्न विचारालांनी.

ता बाकी बराबर बोललास. बाबू मनातल्या मनात कधी काळी ढोसलेल्या इंग्लिशची आठवण काढीत बोललो.

अस कसं गंपूशेट? अहो फक्त खेळ बदलला पण साचा तोच नां? तिकडे पण खेळाडू संघ बदलतात. जिथे जास्ती पैसे मिळतील त्या संघाबरोबर खेळतात. मास्तर आपल्या मुद्द्याला चिकटून.

हो मास्तर पण फरक आहेच ओ. आत्ता बघा तुम्ही जेम्स बॉंडचे पिक्चर बघाताव. आत्ता बॉंड हिरो म्हटल्यावर तो कैच्याकै कारनामे करतो. अगदी काय पण. ते सगला आपण लै भारी म्हणून कौतुकानं बघाताव कि नाय. होय कि नाय सांगा? गंपूशेटने आपला मुद्दा मांडण्यासाठी स्टार्ट घेतला.

हो हो.

पण तेच कारनामे आपलो देशी 'येजंट विनोद' करतो तेंव्हा ते इनोदी का वाटतात? गंपूशेटनी यॉर्कर टाकला.

अवो प्रत्येक गोष्टीचो एक स्टॅंडर्ड असता. बाबू अजूनही इंग्लिशच्या आठवणीतच रमला होता.

ता पण बराबर. बाबूच्या पाठोपाठ गेंगण्यानं गंपूशेटला पाठींबा दिलान.

गंपूशेटचा यॉर्कर ढेंगातून जावून आपल्या यष्ट्या उध्वस्त करून गेला आहे हे मास्तरांना कळून चुकले आणि अलीकडेच केबलवर लागलेला एजंट विनोद सिनेमा पाहून आपण चॅनेल बदलल्याचे झटकन आठवल्यामुळे मास्तरदेखील पुढे काही जास्ती बोलले नाहीत.

एव्हाना गंपूशेटनां आपली लाईन आणि लेंथ सापडली होती. ते फुल्ल फॉर्ममध्ये आले.

अवो तिकडे क्लब असले तरी त्यांनी खेळाचे नियम नाय बदलालांनी. फुटबॉल लीगमुळे मेन खेळाची मजा कधी कमी नाय झाली. फुटबॉल एक खेळ म्हणून आपल्या जागी अजून मोठोच असा. माडी-बिडी विकणारो कोण पण लुंगो-सुंगो पैशाच्या जोरावर तिकडे आंतरराष्ट्रीय खेळाडूकं कसा पण वागवीत नाय. मॅची संपल्या कि ते खेळाडू पण रेव्ह पार्टीत सापडीत नायत. आपली टीम जिंकली तर टीमचो मालक पैशाचो माज घेवन शिवीगाळ करीत, बिड्या फुकीत स्टेडीयमवर उंडारक्या नाय करीत. आधी मेजर राडे करून आणि मग चुक कबूल करून माफी मागण्याऐवजी "आमी मायनर, आमी मायनर" अश्या बोंबा मारीत फिरत नायत. गंपूशेट एकदम तावातावाने बोलले.

मामा : खरा असा रे गंपू.

गेंगण्या : पण हि एवढी फेमस खेळाडू लोकां. साला ह्या दिडदमडीच्या लोकांकडन अपमान कशाक करूक घेतंत? मी माझो लिलाव होवूक देणार नाय असो एक जण पण नाय बोललो. अगदी गेल्या वर्षी काळ्या कुत्र्यांन पण ह्यांका विचारल्यान नाय तरी हे परत पुढच्या वर्षी शोभा करून घेवक हजर.

बाबू तोडणकर : मंग नाय तर काय? सोताच सोताची लंगोटी अशी दुसऱ्याच्या हातात दिली कि दुसरा काय होणार? होती नव्हती ती इज्जत पण जाते.

गंपूशेट : काय नाय ओ साले पैशेवाल्यांचे नाय ते धंदे. अवो ह्या IPL आत्ता पाच वर्षापूर्वी आला. आमचो कोंबडी-बोकड चषक गेली कित्येक वर्ष सुरु असा. IPL पेक्षा भारी.

होय रे गंपू. आपलो कोंबडी-बोकड चषक म्हणजे लैच भारी. मामाचा दुजोरा.

क्काय? कोंबडी-बोकड चषक? हि काय नविन भानगड?

हि भानगड नाय मास्तर. कोंबडी-बोकड चषक म्हंजे क्रिकेटचीच स्पर्धा. आपल्याच गावात भरते. ती समुद्राजवल खलाशी लोकांची वस्ती हाय नां तिकडे भरते स्पर्धा. टेनिसबॉल क्रिकेट. मामान माहिती पुरवलानानं.

होय कि काय? कधी असते हि स्पर्धा.

गंपूशेट : मास्तर, फेब्रुवारी-मार्चमध्ये शिमग्याच्या आसपास तुम्ही वार्षिक परीक्षेचे पेपर छापायची तयारी करीत असता नां तेंव्हा शाळेतली बरीचशी पोरा शाळा चुकवन् समुद्राजवल सुकटा सुकिवतात नां त्या मैदानावर कोंबडी-बोकड चषक बघूक जमलेली असतात. काय समजलाव?

मास्तर : अरेच्चा. हे मला माहितीच नव्हते. हा काय प्रकार आहे?

मामा : अहो कोंबडी-बोकड चषक म्हणजे IPL सारखीच स्पर्धा. वीस-वीस ओवरची.

गेंगण्या : आणि हिची खासियत अशी कि नावाप्रमाणे कोंबडी आणि बोकड बक्षिस दिला जातो. म्हणजे विजेत्या टीमला अख्खो बोकड आणि उपविजेत्या टीमला कोंबड्या.

कोंबड्या म्हणजे ११ कोंबड्या. प्रत्येक प्लेअरला एक. बाबूनं अचूक माहिती दिलान.

मास्तर : हे भारीच आहे.

गंपूशेट : भारी आहेच ओ पण हि कोंबडी-बोकड चषक IPL पेक्षा पण भारी असते. कारण हिकडे एका टीमकडनं खेळणारा माणूस कायम त्याच टीमकडनं खेळताना दिसल. उगाच चार आठ आणे जास्ती मिळतंत म्हणून कोण टीम बदलणार नाय.

बाबू तोडणकर : कोणाची बिशाद हाय टीम बदलायची. आणि कोणी टीम बदललान तर लोकां टोमणे मारून मारून त्याचो जीना हराम नाय करतील?

मामा : अवो आणि IPLमध्ये कसो जास्ती छक्के मारल्यावर आणि लै भारी कॅच घेतली कि वेगळो अवार्ड असता तसा इथे पण वेगळो अवार्ड असता.

गेंगण्या : आणि ता पण प्रत्येक छक्या-चौक्याकं असता. काय असलं ओळख बघू मास्तर?

काय असते? मास्तर स्पर्धेचे स्वरूप ऐकून आधीच हबकले होते.

गेंगण्या : अवो प्रत्येक छक्या चौक्याकं आणि घेतलेल्या झेलाकं एक-एक कवाट बक्षिस मिळता.

गंपूशेट : कवाट म्हणजे काय ता मास्ताराक कळूचो नाय.

बाबू तोडणकर : मास्तर अवो कवाट म्हणजे अंडो. कोंबडीचो अंडो.

गंपूशेट : म्हणजे विचार करा. फायनल मारलाव तर मटणाची पार्टी!!!

गेंगण्या : आणि एकदा का टीम फायनलला गेली कि किमान कोंबडीची पार्टी नक्की. वरतून कवटा मिळतील ती वेगळीच.

आणि ह्या सगळ्याच्या जोडीला भन्नाट कोकणी कॉमेंट्री. यंव रे यंव. मास्तर अजूनही ह्या सगळ्याची कल्पनाच करीत होते.

मग काय म्हणतावं मास्तर? पुढच्या वर्षी IPL बघणार कि कोंबडी-बोकड चषक?

अर्थातच कोंबडी बोकड चषक. इति मास्तर...



Tuesday, January 17, 2012

उत्तरायण...


हुश्श्श्शsssssssss

गेले दोन महिने नाही नाही तब्बल साडेसात वर्षे ज्या दिवसाची वाट पहात होतो तो एकदाचा उजाडला. बंगलोरमध्ये आल्या दिवसापासूनच इथून परत पुण्याला कधी जाणार ह्याचाच विचार सुरु होता. बघता बघता साडेसात वर्षे गेली. शेवटी एकदा १५ नोव्हेंबरला, माझ्या आईच्या वाढदिवशी सगळे फायनल झाले आणि हातात ऑफर यायच्या आधीच तिला वाढदिवसाची भेट म्हणून पुणे परतीची खुष खबर दिली. अर्थात मधल्या काळात पुण्याला जायला मिळणार अश्या आशा खूप वेळा निर्माण झाल्या होत्या, पण जम्याच नही. पुण्याला यायला मिळावे म्हणून "मल्टी कलर सनफ्लॉवर प्रायव्हेट लिमिटेड" कंपनी पण जॉईन केली पण त्यांनी तर नुसत्या हुलकावण्या दिल्या. गेल्या वर्षी मार्चमध्ये तर पुण्याला प्रोजेक्ट मिळून देखील जाऊ दिले नाही. शेवटी जूनमध्ये एक वर्ष वाट पाहून "मल्टी कलर सनफ्लॉवरला" सोडचिठ्ठी देण्याचा निर्णय घेतला. सगळे जमून येईपर्यंत नोव्हेंबर उजाडलाच. हो नाही करीत करीत राजीनामा मंजूर झाला. तरी हलकट बॉस एवढा प्रोजेक्ट संपू दे (कधी ते माहीत नाही), मी स्वतः तुला पुण्यात प्रोजेक्ट मिळवून देतो, ते नाही तर निदान जानेवारी संपेपर्यंत थांब, निदान २६ जानेवारीचे झेंडा वंदन करून जा... एक ना दोन... कसला दीनवाणा चेहरा करून यायचा. लाईन चुकली बिचाऱ्याची. कुठल्याही सिग्नलवर नाव काढेल अशी (चेहऱ्याची) प्रोफाईल आहे. दीनवाणे प्रकार करून झाल्यावर अतिशय हीनवाणे प्रकार देखील झाले. असो त्यावर एक वेगळी पोस्ट लिहून मी पोस्टचा काऊंट वाढवेन :D. शेवटी हो ना करता करता मी दोन महिन्याचा कायदेशीर नोटीस पिरेड पूर्ण करून काल मोकळा झालो.


कितीही कंटाळलो असलो तरी आत्ता माझ्या आयुष्यातील एखादा कोपराच नाही तर चांगली मोठी खोलीच बंगलोरने व्यापली आहे. माझ्या आजच्या वयाचा विचार करता माझ्या जीवनातला चक्क एक चतुर्थांश भाग मी बंगलोरमध्ये काढलाय हे मला खरे वाटत नाही. (माझ्या वयाचा हिशोब करणे बंद करा, हि स्कॉलरशिपची बुद्धीमत्ता चाचणी नव्हे). मुन्नाभाई एम.बी.बी.एस. मधला सर्किटच्या तोंडी एक महान संवाद आहे "लाईफ में बहुत कुछ पहली बार होता है मामू"... तसेच काहीसे माझ्या आयुष्यातले बहुत कुछ पहली बारचे (तुमचा चार यारवाला बसायचा "बार" नव्हे) क्षण बंगलोरमध्ये आले. MNC कंपनीची पहिली ऑफर (आणि अर्थातच पहिला राजीनामा :D), पहिला विमान प्रवास, पहिला परदेश प्रवास. इंजिनीअरिंगमध्ये स्वतःची बाईक असण्याची पूर्ण झालेली इच्छा, दक्षिणेकडची भटकंती... एक ना अनेक गोष्टी. खादडीचे म्हणाल तर बंगलोरला येण्यापूर्वी दोन दशके मिळून न खाल्लेला भात बंगलोरमधल्या पहिल्या दोन वर्षात खावा लागला होता आणि हो दहीभात हा प्रकार देखील आयुष्यात पहिल्यांदा बंगलोर मध्येच खाल्ला. आत्ता मात्र आंध्रा रेस्टॉरंटमधला द्राक्ष, डाळिंबाचे दाणे टाकून मोहरीची फोडणी दिलेला दहीभात प्रचंड आवडतो. अस्मादिकांच्या पाक-कौशल्याला बहर देखील बंगलोरलाच आला. बाहेरच्या खाण्याला कंटाळून विकेंडला आमची पाककला पिठले, बटाट्याची भाजी अश्या गोष्टींपासून सुरु होवून थेट थालीपीठ, मासे, सी-फूड, बिर्याणी, चिकन, मटण, सुकटापर्यंत बहरली. चपाती बनवणे मात्र जमले नाही. दरवेळी नजर हटी, दुर्घटना घटी. पण इतर यशस्वी प्रयोग बरेच झाले. कधी पिझ्झ्यात टाकतात त्याप्रमाणे नाही नाही ते पदार्थ Toppings म्हणून ओम्लेटवर विराजमान झाले तर कधी पिठले शिजताना त्या बरोबर अंडीदेखील उकडली गेली (इंधन बचत). एकदा मसाला चायची हुक्की आली तेंव्हा नाना मसाले चहात टाकून पहिल्याच घोटात स्वतःचा आणि रूम पार्टनरचा घसा जाळण्याची घटना सोडता बाकी इतर सर्व प्रकार सामुदायिकरित्या पचवले गेले. बाकी बाहेर while(1) बोले तो अन लिमिटेड (भात) साऊथ इंडीयन मिल्स ह्या प्रकारात प्रथमच उकडलेल्या/शिजवलेल्या गाजर आणि बीटची भाजी देखील प्रथमच खाण्यात (आणि बंगलोरच्या उर्वरित मुक्कामात टाळण्यात) आली. आणि हो महत्वाचे राहिलेच... माझ्या ब्लॉगचा जन्मदेखील बंगलोरचाच.

तर मधल्या काळात खूप बरे वाईट अनुभव आले. वेगवेगळी माणसे भेटली. आत्ता ह्या क्षणाला खूप साऱ्या गोष्टी डोळ्यासमोरून तरळून जात आहेत. नक्की काय लिहू ते कळत नाही. पोस्ट भरकटतेय... इलाज नाही. एअरपोर्टला न्यायला येणाऱ्या कॅबची वाट पहातोय. संध्याकाळी पुण्यात पोहोचेन. आत्ता यापुढे रत्नागिरीला जाण्यासाठी १८-१८ तासांचा प्रवास करावा लागणार नाही. दोन दोन बस बदलाव्या लागणार नाहीत. बायको तिला वाटेल तेंव्हा एकटी रत्नागिरीला जाऊ शकेल. रत्नागिरीहून निघताना दुपारचेच काय पण रात्रीदेखील पोटभर जेवून (पक्षी: मासे हाणून) निघता येईल. लॉंगविकेंड आला तर तडक घरी जाता येईल. प्रवासात ब्रेकफास्टला कांदापोहे, वडापाव, कांदाभजीदेखील मागवता येईल. बाकरवडी खाण्यासाठी पुण्याहून कुणी येतंय का याची वाट पहावी लागणार नाही. (दुपारी १ ते ४ मध्ये बाकर वाडी खावी वाटली तर मात्र इडलीच खायची तयारी ठेवली पाहिजे). ब्लॉगर मित्रमंडळी भेटतील. ट्रेकच्या अपलोडेड फोटोंमध्ये मी देखील असेन.

थोडक्यात काय तर थोड्याच वेळात घडणाऱ्या बंगलोर ते पुणे प्रवासामुळे, मकरसंक्रांतीनंतर दोन दिवसांनी का होईना, पण माझ्या आयुष्यातील दक्षिणायन संपून उत्तरायण सुरु होतेय...

Friday, December 30, 2011

मसाला चाय...

गेले काही दिवस थंडीचा कडाका वाढलेला. रोज घरी येताना कुडकुडत यावे लागतेय. आज तर कहरच झाला. तामिळनाडूत 'थेन' वादळ येवून गेले आणि त्याचा परिणाम म्हणून इथे बंगलोरमध्ये अचानक पाऊस सुरु झाला. संध्याकाळी ऑफिसमधून बाहेर पडलो तर आधीच थंडी त्यात रिमझिम पाऊस आणि त्यात भरीस भर म्हणून पावसामुळे अडलेल्या ट्राफिकमधला गारवा. घरी पोहोचेपर्यंत साडेसात वाजून गेलेले. वाटेत पूर्ण भिजायला झाले होतेच आणि ट्राफिकमध्ये रांगून रांगून थोडीफार भूक पण लागलेली. रात्रीच्या जेवणाला फार वेळ नसल्याने त्याआधी काही गरमा गरम करून मिळेल याची आशा नव्हती. थंडीतून आल्याने चहा तर हवाच होता. त्यामुळे चहा आणि भूक या दोन्हीवर एकच उपाय होता मसाला चहा...

मसाला चहाची कृती एकदम सोप्पी...

साहित्य :- एक कप दूध, एक टी-स्पून चहा पूड, एक चमचा साखर, लवंग, दालचिनी, काळी मिरी, वेलची, असे काय काय मिळतील ते मसाल्याचे प्रकार आणि हो सगळ्यात शेवटचे आणि सर्वात महत्वाचे म्हणजे फरसाण... तुमच्याकडे फरसाण नसेल तर घेवून या (गुजरात्याकडचे असेल तर अतिउत्तम) आणि जवळपास मिळत नसेल तर पुढे वाचू नका. निषेधाच्या फालतू प्रतिक्रिया स्वीकारल्या जाणार नाहीत.

कृती :- नेहमीप्रमाणे गॅसवर चहाच्या भांड्यात एक कप दूध, चहा पूड आणि साखर टाकून चहा बनवून घ्यावा. कुडकुडणार्‍या थंडीतून येवून तुम्ही हा चहा प्राशन करणार असल्याने उगाच माज दाखवण्यासाठी त्याला अमृततुल्य चहा असे संबोधावे. आत्ता मघाशी साहित्यामध्ये जमवलेले मसाले चहात टाकायचेच राहिले असे तुम्हांला आठवले असेल तर काळजी नसावी. त्या मसाल्याचे खरे काम चहा उकळल्यानंतरच आहे. तर उकळलेला अमृततुल्य चहा, ओट्यावर न सांडता, नीट कपात गाळून घ्यावा. एका छानश्या ट्रेमध्ये हा चहाचा कप आणि मघाचचे मसाले नीट मांडावे. ह्या सगळ्या साहित्याचा 'मसाला चहा' ह्या सदरात टाकण्यासाठी एक छानसा फोटो काढावा. झाले... मसाल्याचे काम संपले. आत्ता हा काढलेला मसाला म्हणजे लवंग, दालचिनी, काळी मिरी, वेलची इत्यादी इत्यादी ज्या छोट्या छोट्या तोंडांच्या पिशव्यांमधून काढला असेल त्या छोट्या छोट्या पिशव्यांच्या छोट्या छोट्या तोंडातून पुन्हा भरून ठेवावा (हे लै वेळ काढू आणि कटकटीचे काम आहे, पण नाही केले तरी कटकट होईलच त्यामुळे कुठली कटकट जास्त सोईची हे तुमचे तुम्ही ठरवा. मी मुळातच व्यवस्थित आणि टापटीप असल्याने मी नेहमीच पहिला पर्याय स्वीकारतो)

तर आत्ता लागलेली सौम्य भूक आणि थंडी यावर उतारा म्हणून अमृततुल्य चहाचे मसाला चहामध्ये रूपांतर करायला घ्यावे. सगळ्यात आधी थंडीचा कडाका कमी व्हावा म्हणून दोन घोट चहा पिऊन घ्या. त्यामुळे थोडी हुशारी येईलच पण अजून एक फायदा म्हणजे मघाशी साहित्यात गोळा केलेला महत्वाचा पदार्थ म्हणजे फरसाण चहाच्या कपात टाकण्यासाठी थोडी जागा देखील होईल. आत्ता थोडीफार भूक लागलेली भूक भागेल आणि रात्रीचे जेवण होईपर्यंत तग धरता येईल अश्या हिशोबाने फरसाण चहात मिक्स करा.

चमच्याने ते फरसाण चहात नीट बुडवून घ्या आणि नीट फुंकर मारून चहा गार होण्याआधी चवीचवीने मिटक्या मारीत खावे. फरसाण खावून झाले की उरलेल्या चहावर छानसा मसालेदार तवंग आलेला दिसेल. अश्या प्रकारे तुम्ही बनवलेला अमृततुल्य चहा मसाला चहामध्ये परिवर्तीत होवून तुमच्या हातातील कपात अवतरलेला दिसेल.

Wednesday, November 23, 2011

एकशिपी

साहित्य :- एक शेर तसरे मुळे (एक शिपी), कांदा-सुके खोबरे वाटण १ वाटी, आले लसूण पेस्ट १ चमचा, लसूण पाकळ्या ३-४, लाल तिखट ३ चमचे, हळद १/४ चमचा, मीठ (चवीनुसार), गरम मसाला १/२ चमचा, कोथिंबीर (आवडीनुसार), फोडणीसाठी तेल.

कृती :- प्रथम मुळे धुवून घेऊन विळीवर उभे चिरून (दुभागून) घ्यावेत. शिपी चिरल्यावर त्यातून पांढरऱ्या रंगाचे पाणी (काट) येईल ते टाकून देवू नये.
त्याची एक शिपी काढून घ्यावी (शिपीच्या आतील मांस एकाच शिपीला आले पाहिजे. त्यासाठी शिपी कशी फिरवावी ते बरोबरच्या व्हिडीओ मध्ये दाखवले आहे). नीट केलेल्या शिप्या (काटसकट) एकत्र कराव्यात.



कांदा आणि सुक्या खोबऱ्याचे वाटण करून घ्यावे. एका कढईमध्ये फोडणीसाठी तेल गरम करून त्यात लसूण पाकळ्या चिरून टाकाव्यात, लालसर झाल्यानंतर त्यात कांदा-सुक्या खोबऱ्याचे वाटण टाकावे आणि ते परतत राहावे.
परतून झाल्यानंतर त्यात आले लसूण पेस्ट, हळद, मीठ, लाल तिखट क्रमाने टाकावे. हे सगळे मिश्रण (कढईला करपू न देता) व्यवस्थित शिजले की नीट केलेली एकशिपी त्यात टाकावी आणि त्यात प्रमाणानुसार पाणी घालावे. वरती झाकण ठेऊन मंद आचेवर शिजवावे. आवडीनुसार गरम मसाला टाकून पुन्हा थोडे शिजू द्यावे. शेवटी कोथिंबीर पेरून गरमागरम वाढावे.


शिजण्यासाठी लागणारा वेळ :- १५-२० मिनिटे

ता.क. - चिरण्याआधी सुरुवातीलाच मुळे एकदा चांगले धुवून घ्यावेत. एक शिपी काढून झाल्यावर शिजायला टाकताना त्यात जे पाणी (काट) आले असेल व्यवस्थित गाळून शिजायला टाकावे नाहीतर शिपीचा कच (शिपीचे बारीक तुकडे) त्यात जाण्याची शक्यता असते.
'मोगरा फुलला २०११' च्या ई-दीपावली अंकात पूर्वप्रकाशित

Saturday, September 24, 2011

पैचान कौन? (भाग-१)

टीप: खालील कथेतील पात्रं व प्रसंग पूर्णपणे काल्पनिक आहेत. कोणत्याही सत्य घटनेशी अथवा व्यक्तीशी अथवा कुणाच्या वर्तनाशी यात कमालीचे साम्य आढळल्यास तो केवळ योगायोग समजावा.


आज पुन्हा तो अजून एका ठिकाणी नकार ऐकून आला होता. नेहमीप्रमाणे त्याच्या प्रोजेक्टबद्दलच्या कल्पना 'अतिशयोक्ती' या नावाखाली हाणून पाडल्या गेल्या होत्या. सगळ्याच कंपन्या "Over Qualified for job" असे ठणकावून सांगून आपल्या तोंडाला पाने का पुसतात हे त्याला अजून हि कळले नव्हते. आत्ता तो देखील "ह्यांना आपली कदर नाही, आपली कदर करणारा कुणीतरी भेटेल" अशी दरवेळी स्वतःची समजूत करून तो कंटाळला होता. पण आपल्याला पारखण्यात लोकं नक्की कुठे चुकतात हे मात्र त्याला कळत नव्हते.

तसा लहानपणापासूनच तो चिकित्सक होता. अर्थात चिकित्सकपणा त्याच्या रक्तातच होता. त्याचे नाव चिंतन ज्ञानसागर. त्यांचे खरे आडनाव तसे कुणालाच माहीत नव्हते. फार पूर्वी त्यांच्या पूर्वजांनी कुणा राजा/बादशहाच्या दरबारी वेदशास्त्राच्या गाढ अभ्यासाने म्हणा, लेखणीच्या तलवारी चालवून किंवा देशोदेशीच्या विद्वानांना वाद-विवाद स्पर्धेत हरवून ज्ञानसागर हे आडनाव पदरात पाडून घेतले असावे आणि पुढच्या पिढीत सगळी पोरं बापाच्या वळणावर गेली असल्याने सहाजिकच आडनावाला साजेशी कामगिरी प्रत्येक पिढीच्या हस्ते घडली होती. घर-गृहस्थी, संसार ह्या इतर दुय्यम गोष्टीत घरातील स्त्रियांनी लक्ष घातल्यामुळे आजवर घराण्याचे दैनंदिन जीवन सुरळीत सुरु होते.या घराण्यातल्या कर्त्या पुरुषांनीदेखील आयुष्यभर अर्थार्जनापेक्षा कायम ज्ञानार्जनावरच भर दिला. पुस्तके, ज्ञान, शोधनिबंध यांच्या सदैव संपर्कात रहाता यावे म्हणून बहुतेकांनी शिक्षकी पेशा पत्कारला होता.

चिंतनच्या बाबतीत मात्र आपल्या मुलाने इतके ज्ञान मिळवलेच आहे तर त्याचा उपयोग अर्थाजनासाठी तरी करून घ्यावा असे त्याच्या आईचे ठोस मत होते. त्याने नोकरी धंद्यात यश मिळवून इतर मुलांप्रमाणे चार पैसे गाठीशी बांधावे, त्यातून ऐहिक सुखे अनुभवावी असे तिला वाटे. ती त्यासाठी कायम प्रयत्नात देखील असे. ह्याच कारणासाठी स्वतः फोन/SMS करून तिने मध्यंतरी लेकाला "कौन बनेगा करोडपती"मध्ये देखील पाठवले होते जेणेकरून तिथे करोड नाहीतर निदान काही लाख तरी पदरात पडतील आणि त्याला कामधंदा लागेपर्यंत तरी घरखर्चाचा प्रश्न सुटेल. पण चिंतनला विचारलेल्या प्रश्नाचे उत्तर चार पर्यायामधून बघून सांगणे म्हणजे आपल्या ज्ञानाचा अपमान वाटे. त्याच्या मते अशी पर्याय बघून उत्तर देणे म्हणजे परीक्षेत कॉपी करण्यासारखे होते. तरीदेखील घरून मारूनमुटकून KBCमध्ये भाग घेण्यासाठी पाठवलेला चिंतन पोहोचला मात्र "राज पिछले जन्म का"च्या सेट वर. त्याने KBCमध्ये महानायाकाची करंगळी धरून पुढे जाण्यापेक्षा स्वतःचा सिक्स्थ-सेन्स, आर्टिफिशीअल् इंटेलिजंन्स वापरून स्वतःच्या पूर्वजन्मात डोकावून पहाण्यात धन्यता मानली.

तर असा हा चिंतन ज्ञानसागर. आपले ते खरे करणारा. प्रत्येक गोष्ट आपल्या ज्ञानाच्या आधारे पडताळून पहायला बघणारा. आज देखील एका फार मोठ्या कंपनीमध्ये मुलाखत देवून आलेला. आलेली संधी त्याच्यासाठी आणि त्याच्या भावी संशोधनासाठी फारच उपयोगी होती. ती मल्टी नॅशनल कंपनी सागरी संशोधनासाठी प्रसिध्द होती. चिंतननेदेखील लहानपणापासुनच पाणी आणि पाण्याखालचे जीवन यावर खूप अभ्यास केला होता. त्याचा हा अभ्यास देखील तसा अपघातानेच सुरु झाला होता. शाळेतून जाता येता वाटेत नदीतल्या पाण्यात दगड भिरकावणे हा सगळ्या मुलांचा चंद. पण नुसता दगड भिरकावून पुढे जायला चिंतन हा काही इतरांसारखा सामान्य मुलगा मुळीच नव्हता. पाण्यात दगड भिरकवल्यानंतर पाण्यावर उठणाऱ्या तरंगांनी त्याचे लक्ष वेधून घेतले. पुढे सहाव्या की सातव्या इयत्तेच्या विज्ञान विषयात पाण्यात वस्तू टाकली की पाण्यावर उठणारे तरंग आणि त्यांची वारंवारता ह्यावर एक धडा होता. तिसरीत असला तरी चिंतनने दिवाळी आणि में महिन्याच्या सुट्टीत शेजारपाजारच्या घरात घुसून दहावीपर्यंतची सगळी पुस्तके चाळून काढली होतीत. जे मिळेल ते अधाश्यासारखे वाचणे हा वडिलोपार्जित गुण असल्याने इतक्या लहान वयातदेखील त्याला वाचायला पुस्तके पुरत नसत.

सहाजिकच दगड टाकल्यावर पाण्यावर उठणारे तरंग मोजण्याचा नविन चिंतनला लागला. पुढे कमी-अधिक आकारमानाचे दगड, मग दगडाऐवजी मातीचे ढेकूळ, लाकडाचा तुकडा, शाळेतल्या खडूचा तुकडा आणि नंतर निरनिराळ्या धातूचे तुकडे असे काय हाताला मिळेल ते पाण्यात टाकणे आणि पाण्यावर उठणाऱ्या तरंगांचे निरीक्षण नोंदवणे अशी सवयच त्याला लागून गेली. घरात आणि आजूबाजूच्या परिसरात सहज उपलब्ध असणाऱ्या गोष्टी आणि धातूच्या तुकड्यांची निरीक्षणे झाल्यावर या अकाली शास्त्रज्ञाने एकदा थेट बापाची दोन तोळ्याची सोन्याची अंगठी घरून आणून पाण्यात फेकली आणि सोने या नविन धातूचे निरीक्षण नोंदवले. यथावकाश हि गोष्ट घरी समजली. बापाला अर्थातच काही फरक पडत नव्हता पण चिंतनाच्या आईने मात्र आकाश पाताळ एक केले. तेंव्हा ती अंगठी परत आणण्यासाठी चिंतनने पहिल्यांदा पाण्यात उडी मारली. पण पाण्यात शिरताच पाण्याखालचे जग पाहून चिंतन इतका हरखून गेला की अंगठी शोधण्याचे विसरूनच गेला. पूर्वी कधीही पाण्यात न पडलेला चिंतन केवळ "पोहायला शिका" या कधीतरी वाचलेल्या पुस्तकात लिहिल्याप्रमाणे हात पाय हलवून लगेचच पोहू लागला. त्यासाठी त्याला सुका नारळ वा टायर कमरेभोवती बांधून बिलकुल सराव करावा लागला नाही. अर्थात इतरांसाठी हे भारी प्रकरण असले तरी चिंतनला मात्र आपण पहिल्यांदाच पाण्यात पडलो आहोत आणि पोहू लागलो आहोत हे कळले देखील नाही. तो आपला सराईतपणे पोहत आपल्या समोर नव्यानेच उघडलेले जग आणि त्यातील जलचर न्याहाळण्यात मग्न होता.

तसंही त्याच्या हुशार आणि चिकित्सक स्वभावामुळे बरोबरची मुले त्याला कधीच आपल्या बरोबर सामावून घेत नसत. खरे तर मुलांची पण चूक नव्हती. ती सुद्धा सुरुवातीला चिंतनला बरोबर घेत असत. त्याचे वेगळेपण कळल्यावर त्याला एक हुशार मुलगा म्हणून मान देत असत. पण पुढे पुढे त्यांना चिंतनचा त्रास व्हायला लागला जेंव्हा एखादा प्रश्न किंवा शंका विचारल्यानंतर त्याचे उत्तर खूप खोलात जावून ऐकावे लागे. 'त' वरून तपेलं अश्या अपेक्षेने चिंतनला काही विचारावे तर तो तपेल्याबरोबर 'त' वरून ताट, तांब्या, तराजूपासून सुरुवात करे तो थेट 'ट' वरून टमरेल पर्यंत जाई. परीक्षेत देखील एका वाक्यात उत्तरे द्या हा प्रश्न चिंतनला जाचक वाटे. जिथे लोकं त्याच्या पासून पळायला बघत तिथे लोकांना चार गोष्टी जास्त कळल्या तर काय बिघडलं असा प्रश्न चिंतनला पडे. मुलांबरोबर खेळायला गेला तरी गणित/विज्ञान हे विषय त्याला खेळातल्या आनंदापेक्षा वेग, दिशा, वस्तुमान ह्या गोष्टींकडे पहायला लावीत. क्रिकेट खेळताना स्ट्रेट-ड्राईव्ह सरळ रेषेत, कव्हर-ड्राईव्ह ४५ अंशात तर स्क़्वेअर कट ९० अंशातच असला पाहिजे याबद्दल तो आग्रही असे. सहाजिकच चिंतनला खेळात घेण्याऐवजी घासू, पुस्तकी किडा, लाल्या अश्या अनेक उपाध्या बरोबर देवून पोरांनी त्याला वाळीत टाकले होते. ह्या अश्या मिळणाऱ्या वागणुकीमुळे चिंतन बहुतेक वेळा एकटाच असायचा. त्यालाही बाहेरच्या जगाचा तसा कंटाळाच आलेला. तो रहात होता तिथे भौगोलिक, ऐतिहासिक, सामाजिकदृष्टया वा अन्य कुठल्याही प्रकारे आकलन करण्यासारखे त्याच्या दृष्टीने काहीच उरले नव्हते. त्यामुळे अपघाताने का होईना पाण्यात पडल्यानंतर आपोआपच त्याच्यासाठी अभ्यासाचे एक नविन दालन उघडले होते. त्याच्या बुद्धीला एक नविन खाद्य मिळाले होते. त्याकाळी डिस्कवरी, अनिमल प्लॅनेट अश्या वाहिन्या नसल्याने चिंतन हे सर्व पहिल्यांदाच पहात होता. त्या घटनेनंतर त्याचे आयुष्यच जलमय झाले. बरोबरची सामन्य मुले जेंव्हा सूर्यकिरणे पाण्यात शिरली की प्रकाश किरणांचा कोन बदलतो हे बालबुद्धीस किचकट विज्ञान लक्षात ठेवण्यासाठी डोकेफोड करीत होतीत तेंव्हा चिंतन मात्र जास्तीत जास्त वेळ श्वास रोखून पाण्याखाली कसे रहाता येईल या प्रयत्नात असायचा.

क्रमशः

(पुढील भागात - चिंतन आणि अजून काही व्यक्तिरेखा टीव्हीवरच्या "पैचान कौन" या कार्यक्रमात...)

Saturday, July 30, 2011

बब्याचो बंदोबस्त

बब्या महाडिक... ह्याच्या अंगात लहानपणापासनच हाडका कमी आणि काल्याकांड्या जास्ती. वय वाढलो, मिसरूड फुटलो तशी तोंडाक बाटली लागली अन् ह्याचो अजूनच डोक्यास ताप झालो. आख्ख्या गावात ह्याच्याबद्दल कोण चांगला बोलील तर शप्पथ. ह्याचे घरचे लोकं पण ह्याच्या विरुद्धच असतले. बब्या खै गेलो आणि राडे केलान नाय असा फार कमी वेळा झालो असेल. गावच्या देवळातले पूजा नायतर हरिनामसप्ता असे कार्यक्रम सोडले तर बाकी सगळीकडे हा हजर. बरेचदा टाम् असात म्हणून की देवाक घाबरता म्हणून, पण बब्या तसो देवळात पाऊल नाय टाकणार. पण पालखी बाह्यर पडली की ह्यो आलो ढोल ताशे घेवन. बाकी पूर्वी पासन गावासाठी काय उपयोगाचो काम केलान असेल तर ढोल बनवायचो. बकऱ्याची कातडी आणून सुकवन् त्याचे ढोल ताशे बनवायचो. मग काय शिमाग्याक बब्या म्हणजे हिरो. कोणाक् ढोल ताशे वाजवायचो असाल तर बब्याक् कटवूक लागायचो. बब्या सांगेल त्याचो पयलो चान्स. अगदी झेपा जात आला तरी ढोला जवलन् हलणार नाय. धा वर्षापूर्वी त्यानं बापाच्या नावान् गावच्या देवळाकं नविन स्टायलचे ढोल घेवन देलान.

बब्याचो बाप मास्तर महाडिक. दुसरी तिसरीतच लेकाची प्रगती बघून आपला पोर काय दिवे लावायचो नाय म्हणून मास्तरान गावाची पोरा शिकवता शिकवता आपल्या पोराला, बब्याला मात्र पाचवीत जायच्या आधीच शाळेतना भायर काढलान् आणि सरळ दोन म्हशी घेतालान. पहाटे उठून दूध काढून गावात विकायचा आणि दिवसभर म्हशीकां चरायंक् न्यायाचा, गोठा साफ करायचा अशी कामा बब्याच्या मांग लागली. म्हशी चरवता चरवता गाव भटकूकं मिळायचो म्हणून बब्या पण खुष. मास्तर सोताच्या पोरांक अगदी नीट वळखून होता. बब्या मोठा झालो तसा त्याचा लगीन लावन् दिलान आणि बरोबर हापूसची धा कलमं पण घेवन दिलान. बब्याच्या अंगात किती पन् काल्या कांड्या असल्या तरी मास्तर बापापुढे बब्या वचकून असायचो. मास्तरान पण जीता असे पर्यंत बब्याच्या हातात कधी व्येवार दिलान नाय. मास्तर मजुरी दिल्यासारखा बब्याला आठवड्याला चार-पाच रुपये द्यायचा आणि बब्यापन् गप्-गुमान आपली विडीकाडी त्यात भागवायचा. मास्तर असेपर्यंत गावाकपण बब्याचो तसो त्रास कधी नव्हतो. पण चांगली तीस-बत्तीस वर्षा पेन्शन खावंन् मास्तर खपलो आणि बब्यान् पण कात टाकल्यान. जणू मास्तर आणि बब्या दोघांचे आत्मे कसे एकदम मोकळे झाले. एकीकडं मास्तरान् जाता जाता बब्याच्या उरलेल्या आयुष्याची पन् सोय लावलान् होती. बब्याकं पन् त्याची जाणीव होती पण मास्तराच्या रूपात एक प्रकारचा धाक-दडपन् होता, ता गेला म्हणून बब्याकं कसो मोकळा मोकळा वाटला. आत्ता मास्तराच्या उपकाराची जाणीव म्हणा की तो खपल्याचा आनंद म्हणून म्हणा, पण मास्तर खपल्या खपल्या बब्यान् आधी मास्तराच्या नावान् गावच्या देवळाला ढोल देलान्.

मास्तर अगदी जुन्या हाडाचो त्यामुळे तो खपेपर्यंत बब्यान् पण पन्नाशी पार केलान् होती. नोकरीक् अस्ता तर बब्या पेन्शनीत गेला असता. मास्तरानं अख्खो आयुष्य पांढरा शर्ट आणि खाकी हाफ प्यांट घालून काढलान्. म्हातारपणी डोळ्याला चष्मा आणि आधाराकं घेतलेली काठी हीच काय ती चैन केलान् असेल. करमणूक म्हणजे रोजचो रत्नांग्री टायम्स मोठ्यान वाचायचो. नाय म्हणायाला मास्तरान नंतर ब्लाक अन् व्हाईट टीवी घेतालान पण केबलबिबल घ्यायच्या भानगडीत न् पडता दूरदर्शनवरच भागावाल्यान. म्हावरा बब्याच गरवन आणायचो समुद्रावरून. सांगायचा मुद्दा काय तर घरात पैसा असून सुदिक म्हाताऱ्यामुळे बब्याक् त्याचो कधी उपभोग घेवूक मिळालो नसा. त्यामुळे मास्तर खपल्या खपल्या उभ्या आयुष्यभर सायकलवर फिरून दारोदार दूध घातलेला, चार-पाच रुपयात सगळी चैन भागवलेला बब्या रातोरात राजा झाला. उशिरा का व्हयनां पण बब्याच्या हातात पैसा आला. मग काय बब्यान् आधी दुधाचा धंदा आणि कलमाची कामा करायसं दोन गडी लावलान् आणि आपण सोता इतकी वर्षे आत दाबून ठेवलेल्या काल्याकांड्यांची जादू गावाक् दाखवायक् बाह्यर पडला. घरात कलर टीवी आली, सायकलच्या ऐवजी बुडाखाली फटफटी आली आणि पूर्वी शिमग्याला, गटारीला मिळणारी पहिल्या धारेची आत्ता रोजची झाली. बब्या गावाबाहेरच्या खोपटाचा रोजचा गिऱ्हायक आणि त्याच बरोबर गावातल्या लोकांक् एक नविन ताप झालो.

शिमग्यातले राडे काय गावाक् नविन नवते. शिमग्यात गाऱ्हानां घालायचो काम कैक वर्ष मास्तरांन केलेला त्यामुळे मास्तराच्या पाटी गाऱ्हानां घालायचो मान बब्यास हवो होतो. मन्या गुरवानं अगदी कडकडून विरोध केलान. गावकऱ्यांनी कसो बसो आवरल्यानी बब्याक्. पुऱ्या गावासमोर मन्या गुरवानं केलेल्या विरोधाचा बदला म्हणून बब्यान् हापूसचा सिझन यायच्या आतच आपले गडी लावन् गुरुवाच्या कलमावर लागलेल्या सगळ्या तयार झालेल्या कैऱ्या काढून रातोरात लोणची करणाऱ्या व्यापाऱ्याला जावन् विकलान्. आत्ता हे काम बब्याचाच हे गुरवाला आणि गाववाल्यांना पण ठावक होता पण पुरावा नसल्याने बब्याच्या नादी कोन लागणार म्हणून सगळे गप्प बसले. त्यानंतर बब्यान् पुढचो किडो रंगपंचमीस केलान. रंगपंचमीस गावातली पोरा रंग घेवन गावभर फिरतात आणि जो भेटील त्यास रंगवितात. बब्यान् काय केलान तर तेच्या घरासामोरच्या म्हशीनां पाणी पिवूच्या हौदात चार दिवस आधीपासना शेण कालवन् ठेवल्यान. अगदी सारवान घालायला करतात तसो आणि रंगपंचमीक् जवा गावातली पोरा बब्याच्या घरा समोरून जावक् लागली तेवा अचानक पाटन् येवन पटकन तिघा चौघांना उचलून त्या शेणाच्या हौदात टाकल्यान. बेवडो आणि दिसायाक किडकिडीत, काटक असलो तरी लहानपणी पासन् अंगमेहनतीची कामा करून बब्यात ताकत चांगलीच होती. त्याच्यासमोर पोरा दिसायला वजनदार असली तरी शेवटी वडापाव-मिसळपाव खाल्लेली पोरा ती. त्यांच्यान् काय बब्या आवरला नाय. दोघजण बब्याक पकडूक् गेले आणि आयते त्याच्या तावडीत गावले. बब्यान् त्या दोघांक् पण उचलून हौदात टाकल्यान. पोरांचे अवतार बघवत नव्हते. चांगला चार दिवस कुसवलेला शेण ता, पाच पाच वेळा आंघोळी करून पण पोरांच्या अंगाचो वास जायत नव्हतो.

नंतर बब्याचो अवतार दिसलो दहीकाल्यास्. ह्या वेळी बब्यान् हंडी बांधल्यान पण दोरी दोनीकडे पक्की न बांधता दुसऱ्या बाजूला सोता दोरीचो एक टोक हातात धरून झाडावर जावन् बसलो. पोरा हंडी फोडायस् आली, मनोरा रचल्यांनी. जशी पोरा हंडीच्या जवल जायची बब्या दोरी ताणून हंडी वर घ्यायचो. पोरा पडली की परत हंडी खाली. लै झुंजवल्यान् पोरांना. शेवटी पोरा कंटाळून गेली मग बब्यान् हंडी खाली करून अगदी दुसरी-तिसरीतल्या बारक्या बारक्या पोरांकडन् फोडून घेतल्यान् आणि वर मोठ्या बाप्या लोकांनां "बारक्या पोरांनी हंडी फोडलांनी पण तुमच्या बुडात दम नाय. थू तुमच्यावर" असो बोंबलत गावभर फिरलो.

हळू हळू बब्याचो तरास वाढू लागलो. पूर्वी पौर्णिमा अमावास्येला म्हणजे अधनंमधनं ह्याच्या अंगात यायचो, पण नंतर जवळपास रोजचाच झाला. त्याचो तरास ह्याच्या शेजाऱ्यापाजाऱ्यांनां आणि घरच्यांना जरा जास्तीच होता. बब्यान् म्युजिक सिष्टीम घेतलान् आणि मग कधी मनात येल तेवा मोठ्या आवाजात गाणी लावन् डोस्की फिरवायला लागला. शेजारीच काय तर आख्ख्या वाडीतल्या लोकांचे कान किटले. पोरांना अभ्यास करणे आणि म्हाताऱ्या कोताऱ्यांना दुपारी वामकुक्षी आणि रात्रीची झोप कठीण होवून बसली. ह्या सगळा कमी की काय म्हणून बब्यान् रोज झिंगून आल्यावर वाटेत पारावर बसलेल्या पोरांना शिव्या द्यायस् सुरुवात केलेली. पोरा बिचारी दिवसभर कामधंद्या वरून आल्यावर जेवन-खावंन् जरा पारावर गजाल्या मारायास बसायची तर हा तिकडे जावन् त्यांच्या कुरापती काढायचा. सगळे बब्याला वैतागले होते. शेवटी पोरांनी बब्याचा गेम करायचाच असा ठरवल्यांनी. पप्या मांडवकराच्या डोक्यात एक आयडिया आली, पोरा पण तयार झाली.

रत्नांग्रीत रेल्वे आली पण त्याच्याबरोबर रेल्वे स्टेशनच्या भागात चोऱ्या पण वाढल्या. रेल्वेस्टेशन जवळची घरफोडी, दुकाने छोट्या-मोठ्या टपऱ्या फोडून चोर रातोरात रेल्वेनेच पसार व्हायचे. गावातली पोरा आत्ता अशीच एखादी चोरी होतेय का त्याची वाट बघीत होते. सगळी व्यवस्था तयार करून ठेवलेली होती. आता सगळी पोरा फक्त योग्य संधीची वाट बघीत बसली होतीत. तशी संधी महिना भरात मिळाली पण. कोणीतरी रेल्वेस्टेशन जवळची चायनीजची गाडी फोडलान्. तशी किरकोळ चोरी होती, नुकसान जास्त झाला नव्हता. पैसा अडका चोरीला गेला नव्हता केवळ भांड्याकुंड्यावर निभावले होते. पोरांना पण असाच कायतरी हवा होता जेणेकरून पोलिसांची भानगड जास्ती नसेल. चोरी झाल्याच्या दुसऱ्याच दिवशी पोरं संध्याकाळपासून बब्यावर पाळत ठेवून होतीत. बब्यानेहमी प्रमाणे संध्याकाळी टामकावायाला गावाबाहेर गेला आणि दोघे जण थोड्या वेळानं त्याच्या मागावर गेले. बब्या एकटोच पायी चालत जायचो त्यामुळे अजून कोण बघील अशी काही भीती नव्हती. बब्या टामकवून झाल्यावर झेपा टाकत यायला निघाला तसा एका ठिकाणी झाडी बघून पोरांनी पाटना येवन बब्यावर घोंगडं टाकलानी आणि तो बोंबलायच्या आत त्याच्या मुसक्या बांधून तिकडेच आत रानात आडवाटेला ठेवून दिलांनी. रात्रीची जेवणा आटपून पप्या मांडवकर, सुन्या, दादू असे दोघे तिघे बब्याचा बोचका घेवन् नानाच्या रिक्षान् रेल्वे-स्टेशनला गेले. बब्या टाम् होताच त्यामुळे त्यान काय जास्ती त्रास दिलान नाय. रेल्वेस्टेशनवर जावन् पप्या आणि दादू त्या चायनीजवाल्याला भेटले आणि तुमची गाडी फोडलान् तो चोरटा आमच्याच गावातला असा, त्याका घेवन् इलोय असा सांगितल्यानी. तो तसो भुरटो चोर असा, म्हणून पोलिसात न् देता तुमच्या ताब्यात द्यायला आलो. आम्ही गेल्यावर तुम्ही काय ती वसुली करा असे सांगून पोरा परत घरी आली आणि शांत झोपली.

तिकडे चायनीजवाल्याकं पण चोरी करणारा कोन तो भेटला नव्हताच. पोरा काय खरा-खोटा सांगून गेली ते बघुया आणि अगदीच काय नाय तर हा जो कोन भुरटा चोर हाय त्याच्याकडून निदान भांडी तरी घासून घेवया म्हणून त्यानं बब्याचो बोचको सोडल्यान. तोपर्यंत बब्याची पण जरा उतरली होती. हे काम गावातल्याच पोरांचे हे बब्याला माह्यत होता त्यामुळे घोंगड्याच्या बाह्यर आल्या आल्या बब्यान् समोर कोन हाय कोन नाय ते न् बघता घोंगडं काढणाऱ्या चायनीजवाल्याच्याच कानाखाली एक सणसणीत ठेवन् दिल्यान्. वरतून तोंडातन् नाय नाय त्या शिव्या सुरु होत्याच. आत्ता मघापासनं हा माणूस कोन हाय, ह्याने चोरी केलान हाय की नाय अश्या सगळ्याच बाबतीत संभ्रम असलेला चायनीजवाला बाकायदा कानाखाली खाल्ल्यामुळे पिसाळला. मग त्याने आणि आजूबाजूच्या गाडीवाल्यांनी बब्याला असा काय कुटलानी की बास रे बास. पावसाळी दिवस त्यात त्यांनी बब्याला धुतल्यावर त्याचे कपडे काढून हाफ प्यांटवर सोडून दिलानी. आत्ता अश्या अवस्थेत परत घरी जायचा तर रिक्षाला पैसे पण नाहीत. एवढ्या रात्री चालत जायचा तर शरीराचो जो भाग हलतो तो ठणकत होतो, अशा अवस्थेत मार खावंन् सुजलेल्या बब्यान् उघड्या अंगाने तिकडेच एका बस स्टापवर भिकाऱ्यांच्या बाजूला पुरी रात्र कुडकुडत काढलान् आणि दुसऱ्या दिवशी मेनरोड सोडून आडवाटेनं, कातळावरून, शेतीच्या बांधांच्या आडोशाला लपत बब्या कसाबसा दुपारी घरी आला. मुको मार तर इतको पडलो होतो की बब्याक बरा होवूक आटवडो लागलो. झाल्या प्रकारानं बब्यानं गावातल्या पोरांची अशी काही धास्ती घेतलानं की बाहेर जावन् कोणाला जाब विचारायची पण त्याची हिंमत व्हत नव्हती आणि हिंमत व्हयल तरी कशी कारण त्या गाडीवाल्याच्या ताब्यात द्यायचा आधी, पप्या घोंगडीत बांधलेल्या बब्याच्या कानात पुटपुटला होतो...

"आज नुसतीच तुका कुटायची सुपारी दिलीय, पण परत फिरून काल्याकांड्या करशील तर पुढच्या वेळी किल्ल्यावरच्या लाईट हावसवर नेवन् दरीत ढकलून देव. काय समजलास?"

Tuesday, June 7, 2011

७ जूनच्या आठवणी

आज ७ जून. ७ जून ह्या तारखेला लहानपणापासून मनात एक खास स्थान आहे. ७ जूनला शनिवार रविवार नसेल तर ह्याच दिवशी शाळा सुरू व्हायची. दीड-दोन महिन्याची सुट्टी, मुंबईहून आलेले पाहुणे, सुट्टीत रत्नागिरीत आलेल्या माझ्या चुलत भावाबरोबर केलेली धमाल आणि आंबे, फणस, काजू असं सगळंच मे महिन्याअखेर संपून जायचे. माझ्या भावाचीदेखील शाळा सुरू होणार असल्याने तो मे महिन्याअखेर परत मुंबईला जायचा. मग शाळा सुरू होईपर्यंतचा एक आठवडा खायला उठायचा. काय कारायचे कळायचे नाही. घरचे लोकं पावसाळ्यात चुलीला आणि आंघोळीसाठी असलेल्या बंबात टाकायला लाकडे जमा करून ठेव, लाकडे साठवण्याच्या खोपटाला पावसाचे पाणी आत जाऊ नये म्हणून माडाच्या झावळ्यानीं नीट शाकारून ठेव अश्या कामात मग्न असत. मी काडी पैलवान असल्यामुळे श्रम पडतील अश्या कामात माझा सहभाग नसायचा. त्याकाळी टीव्हीची इतकी क्रेझ नव्हती. केवळ दूरदर्शन असल्यामुळे कार्यक्रमदेखील जास्त नसायचे. त्यामुळे कधी एकदा शाळा सुरु होते आहे असे व्हायचे.

शेवटी एकदाचा ७ जून उजाडायचा. ७ जून म्हणजे नव्या कोऱ्या वह्या पुस्तकांचा वास. एखाद्या वर्षी नवीन गणवेश. पुढच्या शैक्षणिक वर्षात गेल्यामुळे नविन वर्ग. नविन वर्गशिक्षक. वर्ग् शिक्षकांकडे हजेरीचा नविन कॅटलॉग. हजेरीसाठी नवा पट क्रमांक. नविन वर्गात नविन जागा. बसायला भारतीय बैठकच असे. वर्गात लाकडी बाके वैगरे इंग्रजी माध्यमांच्या शाळेतच असतात असे ऐकून होतो. कुणीही कुठेही बसण्याची मुभा असल्याने आपल्या मित्र मंडळींबरोबर बसून घ्यायचे. अगदीच उंच मुलांना शिक्षक मागे बसवायचे. टगी मुलं टेकायला भिंत असावी म्हणून मागेच बसायची. पहिल्या दिवशी एखाद्या ठिकाणी बस्तान मारले की जोपर्यंत गडबड करणे किंवा अन्य काही कारणाने शिक्षकांनी तुम्हाला उठवले नाही तर वर्षभर तीच तुमची जागा. गावात नगरपरिषदेची शाळा होती. सकाळी १० वाजता भरायची. आजूबाजूच्या वाड्यांमधून मुले घोळक्याने चालत यायची. काही एकएकटी. माझे घर शाळेपासून फक्त २ मिनिटांच्या अंतरावर होते. शाळेत शिपाई वैगरे कुणी नसायचा त्यामुळे शाळा भरायच्या आधी पहिली पंधरा मिनिटे सफाईसाठी असत. शाळेभोवतीचा भाग प्रत्येक वर्गाला वाटून दिलेला असायचा. त्या भागात पडणारा पालापाचोळा त्या त्या वर्गाने जमा करून एका ठराविक ठिकाणी जमा करायचा. साफसफाई करताना मुलांवर लक्ष ठेवण्यासाठी प्रत्येक वर्गात वर्गमंत्री, क्रीडामंत्री अश्या मानाच्या पदांबरोबर सफाईमंत्री देखील असे. सफाई झाली सगळी मुले पाचवीच्या वर्गात जमत. पाचवीचा वर्ग म्हणजे शाळेतला सगळ्यात मोठा वर्ग. पहिली ते सातवीची सगळी मुले त्या वर्गात मावत. आत्ताच्या काळात त्याला हॉल म्हटले तरी चालेल. त्या वर्गाच्या बाहेर एक लांबलच्चक वर्‍हाडा. तिथे सगळ्यांनी आपले चप्पल काढून ठेवायचे आणि ओळीने आत जायचे. तिथे मग प्रतिज्ञा, राष्ट्रगीत मग प्रार्थना आणि दिवसाचे पंचांग असे कार्यक्रम ठरलेले असायचे. पहिल्या दिवशी सगळी मुले एकदम उत्साही असत, सगळं कसं अगदी खणखणीत आवाजात.

बहुतेक वेळा १ जूनला केरळमध्ये दाखल झालेला मान्सून बरोब्बर ७ जूनला कोकणात पोहचायचा. त्यामुळे ७ जूनला शाळेच्या पहिल्याच दिवशी पहिला पाऊस देखील पडायचा. पावसाची पहिली सर वर्गाच्या खिडकीतून बघायला मज्जा यायची. सकाळी घरून निघताना पावसाची काही लक्षणे नसल्यामुळे छत्री वैगरे जवळ नसायचीच. शाळेचा पहिलाच दिवस असल्याने पाऊस आला तर शिक्षक चक्क शाळा सोडून द्यायचे. मग पहिल्या पावसात मस्त भिजत घरी जायचे. पुढे देखील कधी गडगडाटी वादळी पाऊस झाला आणि गावातले आजूबाजूचे नाले, वहाळ भरून वाहू लागले की लगेच शाळा सुटायची. रस्त्यावर वाहणारे पाण्याचे छोटे छोटे ओहोळ तुडवत जायला मज्जा यायची. काही मुलं प्लास्टिकचे मोठे काळे बूट ज्यांना गमबूट म्हणायचे ते घालून यायची. त्या बुटात देखील पाणी भरायचे आणि चालताना एक वेगळाच पच्याक पच्याक असा गमतीशीर आवाज यायचा. तसे गमबूट आपल्याकडे देखील असावे अशी खूप इच्छा व्हायची पण जेंव्हा शाळेतली बरीचशी मुलं अनवाणी यायची ते पाहून आपण शाळेत चपला घालून जातो हेच अपराध्यासारखे वाटायचे.

खूप पाऊस पडला, वारे सुटले की कुठेतरी झाडे पडणे, दरड कोसळणे असे प्रकार हमखास व्हायचे. लाईट जायची. मग घरी रात्री कंदील, मेणबत्तीच्या प्रकाशात कामकाज चाले. रात्रभर लाईट येणार नाही अशी पक्की खबर असेल तर घराच्या माळ्यावर ठेवलेली पेट्रोमॅक्सची बत्ती पेटवली जायची. बाहेर सोसाट्याचा वारा सुटलेला असायचा. घराच्या आजूबाजूचे माड समुद्रावरून येणाऱ्या वाऱ्यावर हेलकावे घ्यायचे. त्या हलत्या माडांच्या आकृत्या अंधारात खूप भीतीदायक वाटायच्या. माड आपल्या घरावर पडतात की काय अशी भीती वाटायची. वाऱ्यामुळे नारळ, झावळी पडून कधी कधी कौले फुटायची. लाईट गेली मज्जा व्हायची. घरच्या अभ्यासाला सुट्टी मिळायची. अगदी परीक्षा असेल तरच आम्ही दिव्याच्या प्रकाशात अभ्यास करायचो. (दिव्याच्या प्रकाशात रोज अभ्यास केला असता तर मी थोरा-मोठ्यांच्या पंगतीत जावून बसलो असतो हा पांचट विनोद आवरावा असं मनापासून वाटल्यामुळे आवरतोय :D). मग अशावेळी मेणबत्ती बरोबर खेळ सुरु व्हायचे. मेणबत्तीतून सांडणारे गरम गरम मेणाचे थेंब बोटावर जमा करून चिमटीत पकडून आपल्या हाताचे ठसे त्यावर घेणे हा आवडता खेळ असायचा. टीव्हीवर लागणाऱ्या एक शून्य शून्य, हॅल्लो इन्स्पेक्टर, व्योमकेश बक्षी ह्या धारावाहिक मालिकांचा तो परिणाम होता. त्याचप्रमाणे मेणबत्तीतून सांडलेले मेण गोळा करून शिवण कामाच्या रिकाम्या रिळाच्या पुठ्ठ्याच्या नळीत भरून त्यामध्ये दोरा टाकून एक नवी मेणबत्ती बनवणे हा ही पावसाळ्यातला अजून एक हंगामी उद्योग. मेणबत्तीशी खेळल्यामुळे बरेचदा ओरडा मिळायचा. मग मेणबत्तीच्या उजेडात बोटांचे निरनिराळे आकार करून भिंतीवर ससा, हरीण अश्या प्राण्यांच्या सावल्या बनवत बसायचो. अजून एक आवडता उद्योग म्हणजे चपातीच्या पिठाचा एक गोळा घेवून त्यापासून टीव्हीवर लागणाऱ्या कार्टूनप्रमाणे सुपरमॅन, स्पायडरमॅनच्या प्रतिकृती बनवणे. सुपरमॅन, स्पायडरमॅन उभे रहावे म्हणून त्यांच्या हातापायात आधारासाठी उदबत्तीच्या काड्या घालणे. ही सुपरमॅन स्पायडरमॅन मंडळी मी झोपेपर्यंत माझ्याबरोबर असत पण सगळे झोपले की घरातले उंदीर बिचार्यांचा फडशा पाडत.

त्या काळी दळणवळणाची साधने आजच्या इतकी जलद नसल्याने मुंबईत छापले जाणारे लोकसत्ता, महाराष्ट्र टाईम्स, नवाकाळ हे पेपर रत्नागिरीत संध्याकाळनंतरच मिळत. मोठा भाऊ ऑफिसमधून येताना पेपर घेवून येई. तेंव्हा मुंबई आणि महाराष्ट्रातल्या ताज्या बातम्या रात्री वाचल्या जात. गावात आजूबाजूला खूप सारी दाट झाडे असल्याने उन्हाळ्यातदेखील फार उकडत नसे. पावसात तर गारठा पडे. अश्या गार वातावरणात भाकरीबरोबर माश्याचे कालवण किंवा मातीच्या मडक्यात शिजवलेली चिंगळे, कुर्ल्यांचा रस्सा नाहीतर साधं कुळथाचे गरमा गरम पिठलं आणि उन्हाळ्यात केलेल्या पापड, फेण्या, सांडगी मिरची हाणण्यात अवर्णनीय आनंद मिळायचा.

पुढे सातवीपासून रत्नागिरीमधल्या हायस्कूलला जायला लागलो. त्या शाळेतली दरवर्षीची आठवण म्हणजे शाळा आणि पावसाळा सुरु झाला की शाळेच्या आवारात फुलणारा गुलमोहर. तो गुलमोहर फुलांनी असा काही डवरलेला असायचा की पहातच रहावं. आज ही तो गुलमोहर पावसाच्या आणि लहानपणीच्या भरगच्च आठवणी घेवून मनाच्या एका कोपऱ्यात आहे.

ShareThis