Monday, February 28, 2011

ट्रॅफिकमधला गारवा

काल सकाळी ३५ मिनिटांचा रस्ता पार करून ऑफीसला पोहोचायला तब्बल दीड तासांहून अधिक वेळ लागला. गाडी चालू बंद करून करून कंटाळा आला. अश्याच एका निवांत क्षणी मोबाईलवर गाणी लावून ईअर् फोन कानात घातले आणि पहिलच गाणं लागलं ते म्हणजे मिलिंद इंगळेचे गारवा. त्यातल्या पहिल्याच "ऊन जरा जास्तच आहे" ह्या ओळी कानावर पडल्या आणि पुढचं विडंबन सुचले. तसं पाहिलं तर कविता करणे, कवितेचा आस्वाद घेणे (अर्थात संदीप खरेच्या कविता आणि बझ्झवरच्या चारोळ्या, दिपोळ्या, आपोळ्या असे काही सन्माननीय अपवाद वगळता) वैगरे दूरच पण यमक जुळवणेदेखील मुश्कील अशी माझी अवस्था. त्यामुळे भर उन्हात त्या ट्रॅफिकमधल्या परिस्थितीला गांजून माझ्यातल्या कोकणी भाषेला 'भ'हर आलेला असताना सुचलेला हा ट्रॅफिक मधला गारवा तुमच्यासाठी. तसं पाहायला गेलं तर हे विडंबन ब्लॉगवर पोस्ट करण्याच्या लायकीचं नाही तरी माझ्यासारख्या पद्य विभागातल्या माठ माणसाकडून त्या रखरखीत परिस्थीत का होईना चुकुन जुळले गेलेले यमक (जे पुन्हा घडण्याची तीळमात्र शक्यता नाही) तुमच्या समोर यावे म्हणून हा खटाटोप.

मी माझ्या परीने धोक्याचे इशारे दिले आहेत. एका टुकार काव्यापासून स्व:ताला वाचवण्याची तुम्हाला ही शेवटची संधी. अजूनही मागे फिरा. मनस्तापातून जन्माला आलेल्या काव्यापासून केवळ मनस्तापच होऊ शकतो आणि त्या मनस्तापला कविवर्य(?) जबाबदार राहाणार नाहीत.


ट्रॅफिक जरा जास्तच आहे, दररोज वाटतं,
भर गर्दीत मोकळ्या रस्त्याचे चित्र मनात दाटतं,
लोकं चालत रहातात, गाडी मात्र चालत नाही,
गर्दीमध्ये हॉर्नशिवाय कुणीच बोलत नाही,
तितक्यात कुठून एक पांडू सिग्नल समोर येतो,
ट्रॅफिक मधला चालू भाग हाताखाली घेतो,
गियर ऊनाड मुलासारखा सैरावैरा पडू पहातो,
न्यूट्रल सोडून उगीचच फर्स्ट सेकंडवर पडून पाहतो,
क्लच सोडताच वेगाचा सुरू होतो पुन्हा खेळ,
पुढचा सिग्नल मिळेपर्यंत कुणाकडेच नसतो वेळ,
मघाचचाच मोकळा रस्ता अचानक गजबजून जातो,
पुन्हा लाल होण्यासाठी सिग्नल हिरवा होतो.


तुम्हाला झालेला मानसिक त्रास ही श्रींची इच्छा. तरीही ह्या मनस्तापाला निमित्तमात्र झाल्याबदल आपण प्रतिक्रीयेमध्ये वरचा 'भ' देऊन अस्मादिकांनीं तुमच्यावर केलेल्या अन्यायाची परतफेड करू शकता.

11 comments:

  1. जमलंय जमलंय कविवर्य!! ;)

    ReplyDelete
  2. ट्राफिकमध्ये बऱ्याचदा दिमाख चांगलाच खराब होतो ......
    पण तुझा एकदम तेज झाला रे ....

    मस्त जमलंय विडंबन. झकास.

    ReplyDelete
  3. वाह सिद्धू..एकदम फॉर्मात बर...मस्त जमलीय.
    आवडेश :)

    ReplyDelete
  4. अहाहा!! काय मस्त गारवा आहे !
    जाम आवड्या रे !! :)

    ReplyDelete
  5. अ-फ-ला-तू-न
    अजून काही नाही बोलणार.

    ReplyDelete
  6. ऑफिसच्या वाटेवर असा ट्रॅफिक जॅम वरचेवर होऊ देत असं म्हणू का? ;)

    ReplyDelete
  7. सिद्धूचा आणखी एक षटकार....:)

    आज सोमवारची नीळ काढून काढून दमले होते.... हे वाचल ...(वाचून दाखवलं) आणि दोघांनीही आपापली दमणूक कमी केली...

    रच्याक तुला तो आपला मावशीबोलीवाला खो दिला नसेल तर मी आता देते...होऊन जाऊदे आणखी एक....

    ReplyDelete
  8. अरे बापरे.. चक्क कविता?? पण ठिक आहे.. जमली :)
    वरचा "भ" तुला हवा होता नां???? नाही देत जा!!!

    ReplyDelete
  9. मस्तच रे , झकास जमले विडंबन !!! आवडले. येऊ देत अजून...

    ReplyDelete
  10. जबरा... मिलिंद इंगळेला पाठव.. तो पुढच्या वेळी जेव्हा ट्रॅफिकमधे अडकेल तेव्हा इअरफोन कानात घालून नक्की हे विडंबन ऐकेल याची खात्री!! :)

    आणि गौरी +१

    ReplyDelete
  11. प्रतिक्रियेबद्दल सर्वांचे आभार.

    कुणीही वरचा 'भ' न दिल्याने कविवर्य नाउमेद झाले असून ह्यापुढे कवितेच्या वाटेला जातील असे वाटत नाही. ;-)

    ReplyDelete

ShareThis