Thursday, December 31, 2009

मनोगत २००९ चे


अगदी थोडाच वेळ राहिला. मग २०१० येऊन मला भोज्जा देईल. उद्यापासून आपण एक जुने कॅलंडर म्हणून भूतकाळ बनून भिंतीवर फडकत राहाणार. बरोब्बर वर्षापूर्वी ह्याच वेळी आपण २००८ ला भोज्जा देऊन कारभार आपल्या हाती घेतला होता. लोकं आपल्याबद्दल किती आशावादी होती. आज ही २०१० बद्दल सगळे आशावादी आहेत. तसे दरवर्षी असतात. भविष्याच्या कुशीत आपल्यासाठी काय दडलं आहे ह्याची उत्सुकता सगळ्यांनाच असते. तरीदेखील गेल्या वर्षीचा आशावाद काही वेगळाच होता. २००८ मध्ये आलेल्या आर्थिक मंदीमुळे जगभर नुसती वाताहात झालेली. बॅंका धडाधड बंद पडलेल्या. २००८ च्या उत्तरार्धात दिवससागणिक कंपन्या बंद पडून लोकांवर बेकारीची कुर्‍हाड कोसळत होती. शेअर मार्केट कोसळले होते. हे कमी की काय म्हणून २६/११ ला मुंबई बॉम्ब स्फोटांनी हादरली. आज २०१० च्या स्वागताला लोकांमध्ये उत्साह आहे. माझ्या स्वागताला देखील उत्साह होता पण कुठेतरी दुखाची आणि भीतीची किनार देखील होती. काहीश्या प्रतिकूल परिस्थितीतच माझे आगमन झालेले. परिस्थिती अशी चिघळलेली होती की त्यातून पूर्णपणे बाहेर पडणे मला एकट्याला शक्य नव्हते. २०१० ला देखील यात हातभार लावून परिस्थिती पूर्ववत आणण्यासाठी वेळ द्यावा लागेल.

माझ्या कारकिर्दीच्या सुरुवातीलादेखील सत्यम घोटाळ्याने आर्थिक जगताला आणखी एक जोरदार दणका दिला. हे असचं चालू राहाणारं की काय असं वाटत असतानाचं सुदैवाने काही काळाने सगळे सुरळीत झाले. मला आनंद ह्याच गोष्टींचा आहे की माझ्या कार्यकाळात २६/११ सारखा डाग नाही लागला. मला फार मोठ्या घटनांचा किंवा सुवर्ण क्षणांचा साक्षीदार होण्याचा बहुमान नाही मिळाला पण मी निदान २००८ सारख्या कटू आठवणी तरी सोडून नाही चाललो ह्याचं समाधान आहे. माझ्या कारकिर्दीत मंदीतून बर्‍यापैकी उभारी आली, शेअर मार्केट स्थिरावले, सोन्याने विक्रमी किंमत गाठली. मध्यमवर्गीय माणसाचे एके काळचे स्वप्न नॅनोच्या रूपात प्रत्यक्ष रस्त्यावर उतरले. परंतु दुष्काळ आणि महागाईने मात्र कहर केला. सर्वसामान्य माणसाच्या ताटातुन गरजेचे पदार्थ जवळपास गायब झाले. बाकी काही होवो न होवो मात्र २०१० मध्ये ही महागाई मात्र कमी होऊ दे. पाऊस पाणी वेळच्या वेळी पडू दे. माझ्या प्रमाणे २०१० वर सुका आणि ओला दुष्काळ पाहायची वेळ येऊ दे नको.

साधारण एखाद्या वर्ष भरात आंतरराष्ट्रीय, राजकीय, सामाजिक किंवा कलाक्रीडा क्षेत्रात जश्या बर्‍यावाईट घडामोडी घडतात तश्या माझ्या कारकिर्दीत देखील घडल्या. राज ठाकरेंचा गाजावाजा झाला तर अडवाणींसाठी मी म्हणजे कारकिर्दीचा शेवट. चित्रपट जगतात रहेमानने ऑस्कर जिंकून भारतीयांची मान उंचावली. सायना नेहवालसाठी मी सुखद ठरलो तरी टायगर वुड्समात्र माझी आठवण देखील काढणार नाही. क्रीडाक्षेत्रासाठी मात्र मी क्रांतिकारक ठरलो ऐवढ मात्र नक्की. भारताने क्रिकेटबरोबरच बॅडमिंटन, बॉक्सिंग या प्रकारात देखील जागतिक पातळीवर नेत्रदीपक कामगिरी केली. मला निरोप देता देता कसोटी क्रिकेटमध्ये अग्रमानांकन मिळवले. क्रीडाक्षेत्रातली हीच प्रगती उत्तरोत्तर वाढून २०१० मध्ये दिल्लीत होणारी कॉमनवेल्थ स्पर्धा व्यवस्थित पार पडो हीच सदिच्छा.

बाकी कित्येक वर्ष सरकार दरबारी खितपत पडलेले अनेक प्रश्न सालाबाद प्रमाणे मी जसे २००८ कडून उचलले तसेच २०१० च्या हवाली करणार. नुकताच तेलंगणाचा ताजा प्रश्नदेखील त्याच्याकडे सोपवून जाऊ. २००८ ने जाता जाता आपल्याकडे सोपवलेल्या कसाबला मात्र आपण पूर्ण १२ महिने पोसून शिक्षा न देता २०१० च्या हवाली करतोय ह्याचं वाईट वाटतं. त्याला शिक्षा झाली असती तर मी इतिहासात अमर झालो असतो. असो त्यात फार वाईट वाटून घेण्यासारखे नाही कारण भारतात तरी अतिरेक्यांच्या शिक्षा अंमलात आणलेल्या तारखा अंगावर मिरवण्याचे भाग्य अजुन कुणाला लाभलं नाही. २०१० ला तरी ते लाभावं असा आशावाद धरून आपण ही २०१० चं स्वागत करणार्‍या लोकांमध्ये सामील होऊ या.

6 comments:

  1. सिद्धार्थ, खरोखरिच सुरेख. २००९ चा आढावा त्याच्याच शब्दात मस्तच...
    नविन वर्षाच्या हार्दीक शुभेच्छा!!

    ReplyDelete
  2. आनंद, प्रतिक्रियेबद्दल धन्यवाद आणि नविन वर्षाच्या खूप खूप शुभेच्छा.

    ReplyDelete
  3. खुप छान पोस्ट आहे. बऱ्याच गोष्टी तर विसरल्या सारख्या झाल्या होत्या. :) नविन वर्षाच्या शुभेच्छा..

    ReplyDelete
  4. सिद्धार्थ या मनोगतामुळे तुझं अंतर्मुख होणं कळलं. छान पोस्ट आहे.

    ReplyDelete
  5. @kayvatelte - काका तुमच्या २६/११ च्या पोस्टवरुन प्रेरणा घेऊन लिहलं आहे.

    @कांचन कराई - प्रतिक्रियेबद्दल धन्यवाद.

    तुम्हा दोघांना नविन वर्षाच्या खूप खूप शुभेच्छा.

    ReplyDelete
  6. २००९ प्रथम पुरुषी एकवचनात !! वा वा.. मस्तच !!

    ReplyDelete

ShareThis