Wednesday, September 2, 2009

एक उनाड दिवस

आज पहिल्यांदा ऑफीसला दांडी मारुन घरी बसलो होतो... तशी उगाच दांडी नाही मारली. काल येताना भिजून आलो. रात्री बर्‍यापैकी थंडी पण होती. रात्री कधी कोणास ठाऊक पण जरा अंग दुखु लागले. सकाळी उठावेसे वाटत नव्हते. उगाचच किंचित अशक्त झालोय असे वाटून गेले. उठून पाणी अंगावर घ्यावे असे बिलकुल वाटत नव्हते. म्हटलं जाऊ दे.... आज आराम करू. तसही कालच टेस्टटीमने वेचून काढलेला संगणक प्रणालीतला एक मोठा सूर्याजी पिसाळ(Bug) ठेचून मारला होता. मग काय ह्या आठवड्याच्या स्टेटस रिपोर्टची सोय झाली होती. पडल्या पडल्या गेल्या वर्षी पाहिलेला अशोक सराफचा "एक उनाड दिवस" चित्रपट आठवला. त्यात म्हटल्याप्रमाणे आयुष्यात एक दिवस वेगळे जगून बघावे, आयुष्य पाच वर्षानी (की दिवसांनी???) वाढते म्हणे. म्हटले चला मारू दांडी... आयुष्य वाढो वा न वाढो आज जरा मज्जा करू. तसाच पडून जरा टी व्ही पहिला. मग आरामात उठून बाहेर जाऊन दूध, पाव, अंडी आणि बारीक-सारिक सामान घेऊन आलो. बाहेर अजूनही पावसाळी वातावरण आणि थंडी होतीच. मस्त ओम्लेट पाव आणि हळद टाकून ग्लासभर गरमा गरम दूध असा मस्त नाश्ता झाला. टाइम्स वाचून झाल्यावर आंतर जाला वर मटा आणि लोकसत्ताचे वाचन झाले. बुधवारचा Times Ascent पण चाळून झाला. साला अजुन मार्केटमध्ये अंबूजा सिमेंट (बोले तो जान) नाही आलेली. जोपर्यंत ईंन्फोसिसची चार थोबाडं पहिल्या किंवा शेवटच्या पानावर दिसत नाहीत तोपर्यंत मार्केट काही स्थिरस्तावर होत नाही. मग मराठी ब्लॉग वर चक्कर टाकली. गेले आठवडाभर तसं सवडीने काही वाचता आलं नव्हतं. आज मस्त निवांतपणे नवे जुने ब्लॉग वाचून काढले.
मग पुन्हा एकदा बल्लव अंगात संचारला आणि मटार भाताचा कूकर लावला. एकदाच दोन वेळा पुरेल इतकी सामुग्री कूकर मध्ये कोंबली. रात्रीच्या जेवणाचा ताप नको, अगदीच मूड आला तर कूळथाचे पीठले करू असा दूरदर्शी विचार त्यामागे होता. दुपारी पहिल्या ट्वेंटी ट्वेंटी विश्वचषकामधला भारत इंग्लंड सामन्याचे पुन: प्रक्षेपण सुरू होते. मटारभाताबरोबर युवराज सिंगच्या ६ चेंडुत ६ षटकारांची मेजवानी घडली. नंतर थोडी फार ताणून दिली. संध्याकाळ मात्र जरा बोरं गेली. इतर वीकेंड प्रमाणे कोणी गर्लफ्रेंड असती तर बरे झाले असते असे आजदेखील वाटून गेले. तरी बाहेर जरा फेर फटका मारुन आलोच. लहानपणी आजारपणाचे कारण सांगून शाळा चुकवली की दुपारी जेवणाच्या वेळी आणि संध्याकाळी शाळा सुटताना आपण कोणाला दिसणार नाही ह्याची खबरदारी घ्यावी लागत असे. शाळा अगदी २ मिनिटांच्या अंतरावर होती. शाळेतली मुले आणि शिक्षक आमच्या घरावरूनच पुढे जात त्यामुळे त्यांना जाता येता आपण दृष्टीस पडू नये ही धडपड असायची. आत्ता मात्र ऑफीस जवळ असले तरी ही चिंता नाही. त्यामुळे मनमोकळेपणाने भटकता आले. आल्यावर पुन्हा टी व्ही. त्यात दुपारपासून आंध्र प्रदेशच्या मुख्यमंत्र्यांचे हेलीकॉपटर सकाळपासून गायब असल्याच्या बातम्या येऊ लागल्या. ही ब्रेकिंग न्यूज़ जरा नवीन आणि हटके असल्यामुळे प्रत्येक न्यूज़ चॅनेलवाले वेगळ्या प्रकारे न्यूज़ कव्हर करण्याचा केविलवाणा प्रयत्न करत होते. दुपारपर्यंत आंध्रप्रदेशपर्यंत सीमित असलेली बातमी संध्याकाळपर्यंत राष्ट्रीय बातमी होऊन गेलेली त्यामुळे जरा गांभीर्य वाढले होते. पुन्हा एकदा देशातील सुरक्षाव्यवस्था आणि तांत्रीक बाबतीतील प्रगती ह्यावर प्रश्नचिन्ह उभे राहीले. आजपर्यंत सामान्य माणूस भोगत होता पण आत्ता हे मुख्यमंत्र्यांच्या स्तराला पोहचले आहे. अजुन तरी काही तपास लागलेला नाही. त्यातल्या त्यात सत्तधारी पक्षाने ही विरोधी पक्षाची चाल आहे अशी वक्तवे केली नाहीत हे नशीब. असो ह्यावर एक वेगळी नोंद होईल.
बाकी सध्या श्रीलंका-न्यूझीलंड ट्वेंटी-ट्वेंटी सामना पाहतो आहे. रात्री पुन्हा ऑस्ट्रेलिया-इंग्लंड ट्वेंटी ट्वेंटी सामना होईलच. मधल्या वेळेत दुपारच्या मटारभाताचा समाचार घेऊन गादीवर टेकलो की कुठेही उनाडक्या न करता साजरा केलेल्या एका उनाड दिवसाची सांगता होईल.

1 comment:

  1. मस्त रे.. छान केलेस ते काही नाही केलेस.
    मी दर वेळा काही करायचे नाही, नुसता आराम करायचा म्हणुन सुट्टी घेतो आणि उगाच गाव-भर फिरुन मग थकवाच येतो. मग परत `ओफीस म्हणल्यावर सकाळी तोंड वाकडेच.

    "काहीही न करणे ही सुध्दा एक कलाच आहे बरं का "

    ReplyDelete

ShareThis