Tuesday, January 17, 2012

उत्तरायण...


हुश्श्श्शsssssssss

गेले दोन महिने नाही नाही तब्बल साडेसात वर्षे ज्या दिवसाची वाट पहात होतो तो एकदाचा उजाडला. बंगलोरमध्ये आल्या दिवसापासूनच इथून परत पुण्याला कधी जाणार ह्याचाच विचार सुरु होता. बघता बघता साडेसात वर्षे गेली. शेवटी एकदा १५ नोव्हेंबरला, माझ्या आईच्या वाढदिवशी सगळे फायनल झाले आणि हातात ऑफर यायच्या आधीच तिला वाढदिवसाची भेट म्हणून पुणे परतीची खुष खबर दिली. अर्थात मधल्या काळात पुण्याला जायला मिळणार अश्या आशा खूप वेळा निर्माण झाल्या होत्या, पण जम्याच नही. पुण्याला यायला मिळावे म्हणून "मल्टी कलर सनफ्लॉवर प्रायव्हेट लिमिटेड" कंपनी पण जॉईन केली पण त्यांनी तर नुसत्या हुलकावण्या दिल्या. गेल्या वर्षी मार्चमध्ये तर पुण्याला प्रोजेक्ट मिळून देखील जाऊ दिले नाही. शेवटी जूनमध्ये एक वर्ष वाट पाहून "मल्टी कलर सनफ्लॉवरला" सोडचिठ्ठी देण्याचा निर्णय घेतला. सगळे जमून येईपर्यंत नोव्हेंबर उजाडलाच. हो नाही करीत करीत राजीनामा मंजूर झाला. तरी हलकट बॉस एवढा प्रोजेक्ट संपू दे (कधी ते माहीत नाही), मी स्वतः तुला पुण्यात प्रोजेक्ट मिळवून देतो, ते नाही तर निदान जानेवारी संपेपर्यंत थांब, निदान २६ जानेवारीचे झेंडा वंदन करून जा... एक ना दोन... कसला दीनवाणा चेहरा करून यायचा. लाईन चुकली बिचाऱ्याची. कुठल्याही सिग्नलवर नाव काढेल अशी (चेहऱ्याची) प्रोफाईल आहे. दीनवाणे प्रकार करून झाल्यावर अतिशय हीनवाणे प्रकार देखील झाले. असो त्यावर एक वेगळी पोस्ट लिहून मी पोस्टचा काऊंट वाढवेन :D. शेवटी हो ना करता करता मी दोन महिन्याचा कायदेशीर नोटीस पिरेड पूर्ण करून काल मोकळा झालो.


कितीही कंटाळलो असलो तरी आत्ता माझ्या आयुष्यातील एखादा कोपराच नाही तर चांगली मोठी खोलीच बंगलोरने व्यापली आहे. माझ्या आजच्या वयाचा विचार करता माझ्या जीवनातला चक्क एक चतुर्थांश भाग मी बंगलोरमध्ये काढलाय हे मला खरे वाटत नाही. (माझ्या वयाचा हिशोब करणे बंद करा, हि स्कॉलरशिपची बुद्धीमत्ता चाचणी नव्हे). मुन्नाभाई एम.बी.बी.एस. मधला सर्किटच्या तोंडी एक महान संवाद आहे "लाईफ में बहुत कुछ पहली बार होता है मामू"... तसेच काहीसे माझ्या आयुष्यातले बहुत कुछ पहली बारचे (तुमचा चार यारवाला बसायचा "बार" नव्हे) क्षण बंगलोरमध्ये आले. MNC कंपनीची पहिली ऑफर (आणि अर्थातच पहिला राजीनामा :D), पहिला विमान प्रवास, पहिला परदेश प्रवास. इंजिनीअरिंगमध्ये स्वतःची बाईक असण्याची पूर्ण झालेली इच्छा, दक्षिणेकडची भटकंती... एक ना अनेक गोष्टी. खादडीचे म्हणाल तर बंगलोरला येण्यापूर्वी दोन दशके मिळून न खाल्लेला भात बंगलोरमधल्या पहिल्या दोन वर्षात खावा लागला होता आणि हो दहीभात हा प्रकार देखील आयुष्यात पहिल्यांदा बंगलोर मध्येच खाल्ला. आत्ता मात्र आंध्रा रेस्टॉरंटमधला द्राक्ष, डाळिंबाचे दाणे टाकून मोहरीची फोडणी दिलेला दहीभात प्रचंड आवडतो. अस्मादिकांच्या पाक-कौशल्याला बहर देखील बंगलोरलाच आला. बाहेरच्या खाण्याला कंटाळून विकेंडला आमची पाककला पिठले, बटाट्याची भाजी अश्या गोष्टींपासून सुरु होवून थेट थालीपीठ, मासे, सी-फूड, बिर्याणी, चिकन, मटण, सुकटापर्यंत बहरली. चपाती बनवणे मात्र जमले नाही. दरवेळी नजर हटी, दुर्घटना घटी. पण इतर यशस्वी प्रयोग बरेच झाले. कधी पिझ्झ्यात टाकतात त्याप्रमाणे नाही नाही ते पदार्थ Toppings म्हणून ओम्लेटवर विराजमान झाले तर कधी पिठले शिजताना त्या बरोबर अंडीदेखील उकडली गेली (इंधन बचत). एकदा मसाला चायची हुक्की आली तेंव्हा नाना मसाले चहात टाकून पहिल्याच घोटात स्वतःचा आणि रूम पार्टनरचा घसा जाळण्याची घटना सोडता बाकी इतर सर्व प्रकार सामुदायिकरित्या पचवले गेले. बाकी बाहेर while(1) बोले तो अन लिमिटेड (भात) साऊथ इंडीयन मिल्स ह्या प्रकारात प्रथमच उकडलेल्या/शिजवलेल्या गाजर आणि बीटची भाजी देखील प्रथमच खाण्यात (आणि बंगलोरच्या उर्वरित मुक्कामात टाळण्यात) आली. आणि हो महत्वाचे राहिलेच... माझ्या ब्लॉगचा जन्मदेखील बंगलोरचाच.

तर मधल्या काळात खूप बरे वाईट अनुभव आले. वेगवेगळी माणसे भेटली. आत्ता ह्या क्षणाला खूप साऱ्या गोष्टी डोळ्यासमोरून तरळून जात आहेत. नक्की काय लिहू ते कळत नाही. पोस्ट भरकटतेय... इलाज नाही. एअरपोर्टला न्यायला येणाऱ्या कॅबची वाट पहातोय. संध्याकाळी पुण्यात पोहोचेन. आत्ता यापुढे रत्नागिरीला जाण्यासाठी १८-१८ तासांचा प्रवास करावा लागणार नाही. दोन दोन बस बदलाव्या लागणार नाहीत. बायको तिला वाटेल तेंव्हा एकटी रत्नागिरीला जाऊ शकेल. रत्नागिरीहून निघताना दुपारचेच काय पण रात्रीदेखील पोटभर जेवून (पक्षी: मासे हाणून) निघता येईल. लॉंगविकेंड आला तर तडक घरी जाता येईल. प्रवासात ब्रेकफास्टला कांदापोहे, वडापाव, कांदाभजीदेखील मागवता येईल. बाकरवडी खाण्यासाठी पुण्याहून कुणी येतंय का याची वाट पहावी लागणार नाही. (दुपारी १ ते ४ मध्ये बाकर वाडी खावी वाटली तर मात्र इडलीच खायची तयारी ठेवली पाहिजे). ब्लॉगर मित्रमंडळी भेटतील. ट्रेकच्या अपलोडेड फोटोंमध्ये मी देखील असेन.

थोडक्यात काय तर थोड्याच वेळात घडणाऱ्या बंगलोर ते पुणे प्रवासामुळे, मकरसंक्रांतीनंतर दोन दिवसांनी का होईना, पण माझ्या आयुष्यातील दक्षिणायन संपून उत्तरायण सुरु होतेय...

6 comments:

  1. "मल्टी कलर सनफ्लॉवर प्रायव्हेट लिमिटेड"... हा हा हा... कोड समजला बरं का. असेच शेंडी लावणारे लोक आहेत. बरं झालं तू मल्टीकलरच्या जंजाळातून टू-कलरच्या चायनिज-जापनीज सिंबॉलसारख्या कंपनीत आलास. आता पुण्यात मस्त धमाल करु. बाकी सगळं आपल्या रात्रीच्या चॅट्प्रमाणे "यवस्ता" करु.

    ReplyDelete
  2. ज्जे ब्बात्त !
    इस्मायल भाय हमारे नजदिक आगयले है ये देखकर बहोत अच्छा लगा !
    ए चार व्हाया, चार खारी, चार मावा समोसा, चार खारा बिस्कुट इस्मायल भाय के टेबल पे! पैसे बाद में देते ! इस्मायल भाय के पठ्ठे है !
    खूप बरं वाटलं भावा.. आता धम्म्ला उडवून देउ. ट्रेक्स, खदाडी आणि वैगरे वैगरे ...

    ReplyDelete
  3. मल्टीकलर सनफ्लॉवरवाले टांग देण्यात चांगलेच एक्सपर्ट आहेत !! स्वानुभव आहे :(

    चला पुण्यात आलास तर !! आता मुंबईहून कधीही भेटायला येता येईल. (अर्थात आमचा मुंबईत येण्याचा योग आल्यानंतर)

    सहीये. लगे रहो !

    ReplyDelete
  4. सही है...बाकी तू पुण्यात यायला एवढे पापड लाटले असशील असं वाटलं नव्हत रे....(आता इतक्या खादाडी गोष्टी पोस्ट मध्ये टाकल्या की प्रतिक्रियेत एक तरी टाकावी लागणारच ना )
    मग आता काय आम्हाला पण बाकरवडी मागवाविशी वाटली तर एक हाक मारली तरी लगेच मुंबईहून कुणी येत असेल त्यांच्याबरोबर मिळेल आणि मुख्य तिकडे असलो तर तुमच्या लॉंग वीकेंडच्या कोकणस्वारीत आम्ही पण स्वार होऊन ताजे मासे, हापूस इ.इ. चा समाचार घेऊ शकू...
    या वर्षी तुझा पोस्टचा कौंट वाढणार तर आहे पण आमचा निषेधाचा वाढू नये इतकच नाही तर तुझी खादाडी आमच्या जीवावर उठायची....आणि हो तू ती बंगलोरला शेवटची एक खरेदी ट्रीप करयला सांगितली होती ती केलीस की नाही??? (आता मला हमखास शिव्या)

    ReplyDelete
  5. मी मध्येच बझ केले होते.. तेंव्हा पण एकदा पोस्ट भरकटली असेल... :)

    तू पुण्यात आला आहेस याचा आम्हाला देखील लैच आनंद झालाय.. आता आपली भेट व्हणार नक्की... :) ये धम्माल... :D

    ReplyDelete
  6. Yelcome Yelcome

    Aata FB chya Lock madhye ya.
    Tula phone kartoy kenvhacha band aahe.mail kar tuza number mla lavakar bhetu sagle.

    ReplyDelete

ShareThis