Saturday, October 31, 2009

यंदाची दिवाळी - भाग १

गुरुवारी १५ ऑक्टोबरला ऑफीसमधून चक्क पळ काढला आणि साडेआठची कोल्हापूरला जाणारी "ऐरावत" पकडली. कर्नाटक सरकार कढून काही घेण्यासारखे असेल तर त्यांची राज्य परिवहन मंडळाची सेवा. अगदी साध्या गाड्यांपासून ते वोल्वोपर्यंत पाहिजे त्या श्रेणीत उत्तम सेवा उपलब्ध आहे. पुन्हा ड्राइवर कंडक्टर (निदान वोल्वोच्या) लोकांना आपल्या ड्राइवर कंडक्टर सारखा माज नाही. नेहमीप्रमाणे बस वेळेवर सुटली. हलतडुलट शहरातील गर्दीतून बाहेर पडायला दोन तास गेले. सगळ सुरळीत सुरू होते आणि कंडक्टरने कधी नाही तो हिंदी ऐवजी चक्क कन्नड सिनेमा लावला. मला उगाचच कुणा एखाद्या कानड्या मुंबईमध्ये चोपला तर नाही ना असे वाटून गेले. मग गाडितला एक "मनसे"वाला पेटला. आपण स्वत: परराज्यात असल्याने त्याने अगदीच मराठीचा नाही तर हिंदीचा हट्ट धरला. पण कंडक्टरदेखील "कनसे"चा निघाला. त्याने मनसेच्या मागणीला फाट्यावर मारून तमाम जनतेला यन्डू सिनेमा पाहायला लावला. मी म्हटले चला कळले नाही तरी निदान नवीन सिनेमा बघायला मिळेल अशी स्वत: ची समजूत करून घेतली. मी इतका होमसीक झालेलो की मला तिथे त्या सिनेमाचा अनुवाद करून सांग असे सांगितले असते तरी मी अनुवाद केला असता. त्यामुळे ही बस कोल्हापूरला जाते आणि मला बुड टेकायाला जागा आहे ह्या दोन गोष्टीवर मी समाधानी होतो. सिनेमाची कथा समजून घेण्यात कुणाला कष्ट पडले नसावेत कारण एकदा का पडद्यावर दिसणार्‍या तमाम नमुन्यानंमधला हिरो कोण हे कळले की मग बाकी काही फारसे उरत नाही. तिथे हीरोइन, इतर पात्र, कथा अशा उगाच गोष्टींना स्थान नसते. तो so called हिरो जाता येता सगळ्याना बडवत असतो. अश्याच एका निरर्थक(?) हाणामारीनंतर सिनेमा संपतो. आत्ता आपल्याला भाषा कळतं नसल्यामुळे आपल्यासाठी तो अचानक संपतो. सुदैवाने गाडी जेवायला थांबल्यावर सिनेमा बंद करण्यात आला तो पुन्हा सुरू झाला नाही. पण मला कळलेल्या एकंदर कथेवरून मी पुढच्या घटनांचा अंदाज लावला होता आणि इथे परत आल्यावर कचेरितल्या कन्नड सहकार्‍याला माझी अंदाज कथा ऐकवली. ती ९०% बरोबर होती. असो...

सकाळी साडे-आठला कोल्हापूरला पोहोचलो. सामान होते बर्‍यापैकी त्यामुळे बाबा गाडी घेऊन कोल्हापूरला न्यायला आले होते. वोल्वो मधून उतरून म.रा.प.म.च्या लाल डब्यामध्ये बसणे म्हणजे रावाचा रंक होण्यासारखा प्रकार. बंगलोर-कोल्हापूर ६००+ किलोमीटरचा प्रवास दोनदा परवडला पण कोल्हापूर-रत्नागिरी १२५ किलोमीटर नकोसा होतो. त्यामुळे सामान गाडीत टाकले आणि महाराष्ट्रात दाखल झाल्याच्या आनंदात बटाटावडा खाऊन रत्नागिरीच्या दिशेने कूच केले. फार ट्रॅफिक नव्हते. छान गार वारा सुटला होता. यंदा पाऊस उशिरापर्यंत पडल्यामुळे अगदी रत्नागिरीपर्यंत नुसती शेतंच नव्हे तर माळरान देखील हिरवेगार होते. साधारण दसर्‍यानंतर ऑक्टोबर हीटमध्ये गवत सुकून जाते त्यामुळे मला दिवाळीला घरी जाताना असे हिरवेगार दृष्य कधीच दिसले नव्हते. जोन्धळ्याची गच्च भरलेली कणसे मस्त डोलत होती. दीड तासाने आंबा घाट लागला. घाटात वळणे घेताना लहानपणीच्या "आला खंडाळ्याचा घाट, तिथे गाडी झाली ताठ" ह्या मजेदार ओळी आठवल्या. आंबा घाटातलं सौंदर्य हिरवाईमुळे अजुनच खुललं होतं. नेमका ह्यावेळी मी कॅमरा घेऊन गेलो नव्हतो. खूप छान फोटो काढता आले असते. एरवी बसमधून जाताना कितीही वाटलं तरी उतरून काही बघता येत नाही. आत्ता गाडी होती तर कॅमेरा नाही. नशिबाने नेहमीप्रमाणे गेम दिलेला. म्हटलं चला पुढच्यावेळी काढू कारण आंबा घाटातनं दिसणारं दृष्य नेहमीच छान असतं फक्त जोन्धळ्याच्या कणसासाठी पुन्हा वर्षभर वाट पाहावी लागेल.

बरोबर एक वाजता घरी पोहोचलो. गेल्याबरोबर पटकन आंघोळ उरकली. घरी एक बरं असतं की जर सकाळी ९-१० नंतर आंघोळ करायची झाली तर चुलीवर पाणी तापवायला लागत नाही. गच्चीवरच्या टाकीतलं पाणी बर्‍यापैकी गरम असतं. आणि तिकडच्या हवेत इतका दमटपणा आहे की गार पाण्याच्या आंघोळीला देखील ना नसते. आंघोळ झाल्याझाल्या लगेच जेवायला बसलो. रिज़र्वेशन केलं त्या दिवशीच बाबांना मला कुठले कुठले मासे आणि Sea Food खायला हवे ते सांगून ठेवले होते. सकाळी मला आणायला कोल्हापूरला जायचं म्हणून बाबांनी आदल्या दिवशीच मासे आणून ठेवले होते. बरेचसे मच्छीमार बांधव मुस्लिम असल्यामुळे शुक्रवारी बाजारात मासे कमी आणि किंमती जास्त असे वातावरण असते. त्यामुळे बाबांना गुरुवारीच मस्त ताजे मासे शुक्रवार/रविवारच्या तुलनेत निम्म्या दारात मिळाले होते. मस्तपैकी कोकेरी आणि म्हाकूल मिळाला होता. कोकेरीचं कालवण + फ्राय आणि म्हाकलाचे मटण होतं. म्हाकूल हा इतर माश्यांप्रमाणे तळून किंवा कालवण करून खाण्याचा प्रकार नाही. त्याचे चिकन सारखे छोटे छोटे तुकडे करून मटणासारखा प्रकार केला जातो. म्हाकूल सहसा मिळत देखील नाही. आणि मुबलक मिळाला तर स्थानिक बाजारात न विकता एक्सपोर्ट केला जातो. चांगली किंमत येते. मला आठवते मी शाळेत असताना माझ्या वर्गातली मच्छीमारांची मुले म्हाकूल मिळायला लागला की रात्री कंदील घेऊन मासेमारीला जायची. हा मासा कंदीलाच्या उजेडाला आत्कृष्ट होऊन येतो आणि लावलेल्या गरीला अडकतो असं ते सांगायचे. आत्ता हा कंदील कसा प्लँट केला जायचा हे माहीत नाही पण ही मुले सीज़नमध्ये म्हाकूल विकून सात-आठशे रुपये कमवायची. त्या स्व:कमाईमधून जीन्स पॅंट, टी-शर्ट अशी खरेदी व्हायची. (मला त्या वेळी आपण फुकट आहोत आणि ह्या पुस्तकांच्या रगाड्यात आपला अमुल्य वेळ घालवतो आहोत असे वाटायचे. आज देखील हीच भावना ऑफीस, काम आणि अश्या अनेक निरर्थक गोष्टी बद्दल टिकून आहे. मी नक्की काय करू शकतो हे मलाच नक्की माहीत नाही त्यामुळे देश एका चांगल्या "कोणाला" तरी मुकला एवढचं सांगू शकतो) इतर वेळी हीच कमाई पडलेल्या कैर्‍या आंबे विकून आंब्याच्या सीज़नमध्ये देखील होते. आणि ह्या म्हाकूल/आंब्याच्या व्यवसायामध्ये स्पर्धा ही घरातच असते. आयस, बापूस आणि मुलं हे सगळे एकमेकांचे प्रतिस्पर्धी. कदाचित त्यामुळे अंबानी-बंधू वाद वैगरे प्रकरणं हे लोक चघळत बसत नाहीत असे मला विश्वसनीय सूत्रांकडून कळले. एकमेकांपासून लपूनछपून, कुरघोडी करून "माल" जमा करणे आणि विकणे. प्रत्येकाचे कस्टमर वेगळे. तर ही झाली म्हाकूल नामक माशाची पाककृतीपासून सुरू झालेली शिकार, शिकारी, मार्केटिंग ते विक्री अशी (उगाच लांबलेली) सुफल संपूर्ण कथा. सांगण्याचा मूळ मुद्दा हा की झक्कासपैकी भाकरी, कोकेरीचे फ्राय + कालवण, म्हाकलाचे मटण आणि भात असे स्वर्गीय भोजन हाणलं. एव्हाना प्रोजेक्ट, स्टेटस, डेडलाइन अश्या क्षुद्र आणि यश्किंचित गोष्टींचा कधीच विसर पडला होता. भ्रमण ध्वनी बंद झाला होता. पुढील १० दिवसाच्या इनिंगची ओपनिंग कोकेरी आणि म्हाकुलाच्या झणझणीत भागीदारीने झाली होती. Non-vegसाठी वखवखलेल्या जिभेला येणार्‍या दिवसात काय काय चाखायला मिळणार याची नांदी मिळाली होती.

जेवणानंतर गप्पा मारत सगळे जरा लवंडलो. आमचं एकत्र कुटुंब असल्यामुळे घरी जाम धमाल असते. विशेष करून गणपतीत तर नोकरी-व्यवसाया निमित्त बाहेर गेलेले सगळे झाडून घरी असतात. २५-३० जण सहज असतात. यंदा प्रथमच मी गणपतीत घरी गेलो नव्हतो. २ दिवसासाठी कशाला जा जा आणि ये ये असं म्हटलं. बंगलोरवरुन घरी जायचं म्हणजे दीड-दीड दिवस प्रवासातच जातो. अमेरिकेतून यायचो तेंव्हा देखील जवळपास तेवढाच वेळ लागायचा. त्यात गणपतीत स्वाइन फ्लूचं प्रस्थ होतं. म्हणून तेंव्हाच दिवाळीत जाऊ चांगली लांबलच्चक सुट्टी घेऊन असे ठरवले होते. नंतर गणपतीच्या दिवसात फार चुकल्यासारखे वाटले ते वेगळे. शेवटी शिमगा, गटारी आणि गणपती ह्या सणांचा आनंद कोकणातला माणूस बाहेर करोडो रुपये खर्चून देखील साजरा करू शकत नाही. आत्ता देखील आईने ह्यापुढे २ दिवस का होईना पण ये, गणपती चुकवू नको असे बजावून ठेवले आहे आहे. संध्याकाळ तशी चकाट्या पिटण्यात गेली. शेजारचा पप्यापण हल्ली शिक्षणानिम्मित्त पुण्याला असतो. तो नुकताच घर सोडून बाहेर पडलाय. त्यामुळे तो तसा महिन्यातून २ फेर्‍या मारतोच. लहानपणापासून घरी मासे-मटण आणि बटाट्याची भाजी ह्याशिवाय काही खाल्लेले नाही. घरात रोज बाकी काही शिजल तरी ह्याच्यासाठी बटाट्याची भाजी. अश्या "राजविलासी आणि घोडा पलंगाशी" थाटात वाढलेला थेट पुण्यात जाऊन पडला. मासे-मटण सोडाच बटाट्याची भाजी देखील दुर्मिळ अशी अवस्था. हल्ली रोज दह्या बरोबर जेवून दिवस काढतो. त्यात गणपतीनंतर मित्राला भेटायला मिरजला गेलेला. नेमकी त्याचवेळी तिकडे दंगल झाली आणि करफ्यु लागल्यानंतर साहेबांनी एक दिवस शिल्लक असलेला चिवडा आणि एक दिवस पूर्ण उपाशी असे दिवस काढले. त्याच्या ह्या सगळ्या कहाण्या ऐकण्यात मस्त टाइम पास झाला. त्या सगळ्यावर कहर म्हणून मी जाऊन काकूना "तुम्ही लहानपणापासून खाण्याच्या बाबतीत ह्याचा जरा छळ केला असतात तर आज ही वेळ आली नसती. आत्ता देखील ह्याला बटाटा सोडून बाकी भाज्या खायला घाला" असे सांगून आलो. बिचारा पप्या माझ्याकडे "साल्या तुला काय माझे चार दिवस सुखात गेलेले बघवत नाय काय" अश्या नजरेने बघत होता. संध्याकाळी मग दिवेलागणी झाल्यावर छोटे कंपनी बरोबर पणत्या वैगरे लावल्या. रात्री पुन्हा उरलेल्या माश्यांना मोक्षप्राप्ती घडवून दिवाळी दिवशी लवकर उठण्यासाठी झोपी गेलो.

12 comments:

 1. ही माशांची नांवं खुपच वेगवेगळी वाटताहेत. गोव्याला गेलो की माझा एक मित्र आहे पैआंगले म्हणुन, तो नेहेमी असेच चित्रविचित्र नांवं ( माझ्या दृष्टीने... कारण मी मुळचा शिवराक जेवणारा नां म्हणुन.. ) असलेले मासे खाउ घालतो. त्याच्या मुळेस खरं तर मासे खाण्याची आवड निर्माण झाली. तसं गोव्याला गेलो की तिकडले कोंकणी स्टाइलचे रवा फ्राय किंग फिश आवडतं मला. आणि शेल फिश.. स्टार्टर म्हणुन क्रिस्पी फ्राय केलेलं अप्रतिम.. पुढल्या वेळेस गोव्याला गेलो की खादाडी वर एक लेख टाकतो. तुम्ही तर काय सध्या घरीच.. मग काय नुसती मज्जा.. करुन घ्या लाड .. घरी असे पर्यंत.. आणि जमलं तर मस्तपैकी खादाडी पोस्ट टाका एखादं... तेवढंच आम्हालाही समाधान... :)

  ReplyDelete
 2. मस्त आहे रे... च्यायला... तोंडाला पाणी सुटलं ना इकडे.

  ReplyDelete
 3. @Mahendrakaka - काका मला ह्या माशांची इंग्रजी नावे माहीत नाहीत. कोकेरी, म्हाकुल ही स्थानिक नावे आहेत. गोवा कशाला सिंधुदुर्गात पण हेच मासे वेगळ्या नावाने ओळखले जातात. मी आणि माझा मालवणचा मित्र माश्यांची नावे वेगळी घ्यायचो आणि वर्णन एकच करायचो. तेंव्हा आम्हाला कळले. फक्त पापलेट, सरंगा, सूरमई, बांगडा ही नावे कॉमन असतात. माझ कधी गोव्याला जाणे नाही झाले. पण उडुपी मंगलोर फिरलो. तिकडे एक भाषा सोडली तर माश्यांच्या आणि मासे बनविण्याच्या बाबतीत काहीच फरक नाही. इथे देखील मी दर रविवारी फिश् लँड म्हणून मंगलोरि हॉटेल आहे तिकडे जातो जेवायला. त्यावर टाकणार आहे पोस्ट. आणि घरी एकच आठवडा होतो. गेल्या सोमवारीच परत आलो. घरी रत्नागिरीला नेट नाही त्यामुळे काही लिहिता नाही आले. आत्ता कामाच्या रगाड्यातून बाहेर पडून लिहिला वीकेंडला.

  ReplyDelete
 4. @Pankaj - काल शनिवारी तुम्ही बटर चिकन आणि मासे खाऊन मला जळवळत ना? म्हणून जमेल तेवढं रसभारित वर्णन केलं मी. Nonvegच्या बाबतीत अपूनसे नो पंगा...

  ReplyDelete
 5. What an amazing post Sid. गावाची आठवण झाली. गेल्या ४-५ वर्षात जाता आल नाहीय. या डिसेंबर ला २ आठवड्यासाठी येतोय भारतात, १ दिवस का होईना, गावाकडे जाऊन येणारच. The credit goes to your post. माझ गाव तळेरे, मुंबई-गोवा महामार्गावर असलेले. माहीत असेल बहुतेक.

  ReplyDelete
 6. "मासे बनविण्याच्या बाबतीत काहीच फरक नाही."

  असहमत... मी गोव्याला गेलो होतो... म्हणजे अस्सल दक्षिण गोव्यात.... बागा आणि कलंगुटच्या पंजाबी गोव्याला नाही. तिथे माशांची "आंबटतिख" नावाची रेसिपी बनते. ती कुठेच सापडली नाही मला कोकणात. आणि "रेषाद" नावाचा मसाला असतो. त्या मसाल्यामध्ये मासे मॅरिनेट करून बनवतात... एकदम स्वर्गीय पोर्तुगीज रेसिपी आहे ती... व्हिनेगार वापरुन केलेली. नक्की ट्राय कर. इथे तुला त्याचे फोटो आणि वर्णन मिळेल.
  http://www.pankajz.com/2009/01/susegad-in-prestine-authentic-south-goa.html

  ReplyDelete
 7. @Photographer Pappu!!! - धन्यवाद पप्पूशेट. बरेच दिवसांनी काही लिहलं. तुम्हा सगळ्यांच्या प्रतिक्रिया पाहून बरं वाटलं. गावी तळेरेला नक्की जाऊन या.

  ReplyDelete
 8. सारखं बटर चिकन, बटर चिकन काय? रोज मटण, चिकन खावं लागणा-या माझ्यासारख्या ’व्हेज’ मुलीला वरण-भात, साजूक तूप, पापड, दही, बटाट्याची शेंगदाणे घालून केलेली भाजी असला मेनू पाहून किती गहिवरून येत असेल, याची तू कल्पनाच करू शकणार नाही. मासे आणि माझं काही जमत नाही बॉ! तशी सासूबाईंनी बनविलेली सुरमई फ्राय खाल्ली एकदा. मस्तच होती. सी फूड मधे मला मनापासून आवडते ती कोलंबी. परमेश्वराच्या पहिल्या अवताराचं तू इतकं रसभरीत वर्णन केलं आहेस की तोंडाला पाणी सुटलं. आई कोलंबी घालून जो भात बनवते त्याची आठवण झाली. नव-याने स्वत: बनवून खिलवलेली पात्रानी मच्छी आठवली. पण माशांची तू दिलेली नावं माझ्यासाठी सुद्धा नवीनच आहेत. कॅमेरा न घेऊन गेल्याबद्दल तुझा निषेध, निषेध, निषेध!!!

  "इथे परत आल्यावर कचेरितल्या कन्नड सहकार्‍याला माझी अंदाज कथा ऐकवली. ती ९०% बरोबर होती." - अरे, संगीताला आणि मारामारीला भाषेचं बंधन नसतं. पुढच्या वेळेस गजाल्या करताना फोटो द्यायला विसरू नकोस.

  ReplyDelete
 9. This comment has been removed by the author.

  ReplyDelete
 10. @कांचन कराई - प्रतिक्रियेबद्दल आभार. कॅमेरा न नेल्याचं दुख: आहेच. त्यामुळे पोस्ट सुनी सुनी झाली हे खरं आहे.
  सध्या मी नॉनवेज खाऊन इतका तृप्त आहे की वरण-भात, साजूक तूप, पापड, दही, बटाट्याची शेंगदाणे घालून केलेली भाजी हा मेनु वाचून माझ्या तोंडाला पाणी सुटले. पण आत्ता घरी जाताना भाजी(मिळेल ती) चपातीवर भागवावे लागणार.

  ता. क. साक्षात सासूबाई आणि पती परमेश्वर आपल्या सेवेत आहेत हे वाचून आनंद झाला.

  ReplyDelete
 11. कांचन
  कोलंबी साठी ( म्हणजे बॉम्बे डक नां?) ते बेलार्ड पिअरचं ब्रिटानिका मस्त आहे बरं कां. जरुर ट्राय करा. आणि नंतर तिथे मिळणारं कार्मेल कस्टर्ड मस्त असतं.. आणि हो .. सध्या मी तापात असल्याने सौ. ऑफिस ला जातांना सांगुन गेली आहे , की फक्त दही भात, वरण भात असंच काहीतरी खा म्हणुन.. :(

  ReplyDelete
 12. ही आणि या नंतरची दोन्ही पोस्ट झकास आणि एकदम तोंडाला पाणी सुटतंय म्हणून एकच प्रतिक्रिया देतेय....:)
  महेन्द्रकाका, कोलंबी म्हणजे प्रॉन्स आणि बॉंबे डक बोंबिल...
  हाय इथे फ़क्त कोलंबी आणि तीपण ठार फ़्रोजन मिळते.....बोंबिल खायला आता म्हमईत यावं लागणार....
  दिवाळी असली तरी अस्सल मांसाहारी शेवटी मासे, कोंबड्या खाऊनच तृप्त होणार नाही का???

  ReplyDelete

ShareThis