Thursday, December 31, 2009

मनोगत २००९ चे


अगदी थोडाच वेळ राहिला. मग २०१० येऊन मला भोज्जा देईल. उद्यापासून आपण एक जुने कॅलंडर म्हणून भूतकाळ बनून भिंतीवर फडकत राहाणार. बरोब्बर वर्षापूर्वी ह्याच वेळी आपण २००८ ला भोज्जा देऊन कारभार आपल्या हाती घेतला होता. लोकं आपल्याबद्दल किती आशावादी होती. आज ही २०१० बद्दल सगळे आशावादी आहेत. तसे दरवर्षी असतात. भविष्याच्या कुशीत आपल्यासाठी काय दडलं आहे ह्याची उत्सुकता सगळ्यांनाच असते. तरीदेखील गेल्या वर्षीचा आशावाद काही वेगळाच होता. २००८ मध्ये आलेल्या आर्थिक मंदीमुळे जगभर नुसती वाताहात झालेली. बॅंका धडाधड बंद पडलेल्या. २००८ च्या उत्तरार्धात दिवससागणिक कंपन्या बंद पडून लोकांवर बेकारीची कुर्‍हाड कोसळत होती. शेअर मार्केट कोसळले होते. हे कमी की काय म्हणून २६/११ ला मुंबई बॉम्ब स्फोटांनी हादरली. आज २०१० च्या स्वागताला लोकांमध्ये उत्साह आहे. माझ्या स्वागताला देखील उत्साह होता पण कुठेतरी दुखाची आणि भीतीची किनार देखील होती. काहीश्या प्रतिकूल परिस्थितीतच माझे आगमन झालेले. परिस्थिती अशी चिघळलेली होती की त्यातून पूर्णपणे बाहेर पडणे मला एकट्याला शक्य नव्हते. २०१० ला देखील यात हातभार लावून परिस्थिती पूर्ववत आणण्यासाठी वेळ द्यावा लागेल.

माझ्या कारकिर्दीच्या सुरुवातीलादेखील सत्यम घोटाळ्याने आर्थिक जगताला आणखी एक जोरदार दणका दिला. हे असचं चालू राहाणारं की काय असं वाटत असतानाचं सुदैवाने काही काळाने सगळे सुरळीत झाले. मला आनंद ह्याच गोष्टींचा आहे की माझ्या कार्यकाळात २६/११ सारखा डाग नाही लागला. मला फार मोठ्या घटनांचा किंवा सुवर्ण क्षणांचा साक्षीदार होण्याचा बहुमान नाही मिळाला पण मी निदान २००८ सारख्या कटू आठवणी तरी सोडून नाही चाललो ह्याचं समाधान आहे. माझ्या कारकिर्दीत मंदीतून बर्‍यापैकी उभारी आली, शेअर मार्केट स्थिरावले, सोन्याने विक्रमी किंमत गाठली. मध्यमवर्गीय माणसाचे एके काळचे स्वप्न नॅनोच्या रूपात प्रत्यक्ष रस्त्यावर उतरले. परंतु दुष्काळ आणि महागाईने मात्र कहर केला. सर्वसामान्य माणसाच्या ताटातुन गरजेचे पदार्थ जवळपास गायब झाले. बाकी काही होवो न होवो मात्र २०१० मध्ये ही महागाई मात्र कमी होऊ दे. पाऊस पाणी वेळच्या वेळी पडू दे. माझ्या प्रमाणे २०१० वर सुका आणि ओला दुष्काळ पाहायची वेळ येऊ दे नको.

साधारण एखाद्या वर्ष भरात आंतरराष्ट्रीय, राजकीय, सामाजिक किंवा कलाक्रीडा क्षेत्रात जश्या बर्‍यावाईट घडामोडी घडतात तश्या माझ्या कारकिर्दीत देखील घडल्या. राज ठाकरेंचा गाजावाजा झाला तर अडवाणींसाठी मी म्हणजे कारकिर्दीचा शेवट. चित्रपट जगतात रहेमानने ऑस्कर जिंकून भारतीयांची मान उंचावली. सायना नेहवालसाठी मी सुखद ठरलो तरी टायगर वुड्समात्र माझी आठवण देखील काढणार नाही. क्रीडाक्षेत्रासाठी मात्र मी क्रांतिकारक ठरलो ऐवढ मात्र नक्की. भारताने क्रिकेटबरोबरच बॅडमिंटन, बॉक्सिंग या प्रकारात देखील जागतिक पातळीवर नेत्रदीपक कामगिरी केली. मला निरोप देता देता कसोटी क्रिकेटमध्ये अग्रमानांकन मिळवले. क्रीडाक्षेत्रातली हीच प्रगती उत्तरोत्तर वाढून २०१० मध्ये दिल्लीत होणारी कॉमनवेल्थ स्पर्धा व्यवस्थित पार पडो हीच सदिच्छा.

बाकी कित्येक वर्ष सरकार दरबारी खितपत पडलेले अनेक प्रश्न सालाबाद प्रमाणे मी जसे २००८ कडून उचलले तसेच २०१० च्या हवाली करणार. नुकताच तेलंगणाचा ताजा प्रश्नदेखील त्याच्याकडे सोपवून जाऊ. २००८ ने जाता जाता आपल्याकडे सोपवलेल्या कसाबला मात्र आपण पूर्ण १२ महिने पोसून शिक्षा न देता २०१० च्या हवाली करतोय ह्याचं वाईट वाटतं. त्याला शिक्षा झाली असती तर मी इतिहासात अमर झालो असतो. असो त्यात फार वाईट वाटून घेण्यासारखे नाही कारण भारतात तरी अतिरेक्यांच्या शिक्षा अंमलात आणलेल्या तारखा अंगावर मिरवण्याचे भाग्य अजुन कुणाला लाभलं नाही. २०१० ला तरी ते लाभावं असा आशावाद धरून आपण ही २०१० चं स्वागत करणार्‍या लोकांमध्ये सामील होऊ या.

Wednesday, December 30, 2009

हुश्श!!! माझापण टॅग...

सगळ्यांची टॅगा-टॅगी वाचून झाली होती. सगळे टॅगा-टॅगी करून मोकळे झाले होते. मला मात्र निमंत्रण मिळाले नव्हते. २४ तारखेला कोकणात जायचे होते. आठवणीतला नाताळ पोस्ट केले आणि प्रतिक्रियेमध्ये कांचनने तुला टॅगलय म्हणून सांगितले. ऑफीसमधले काम संपवून रात्रीची बस पकडायची होती. ऑफीसमधल्या लोकांची नजर चुकवून लिहायला सुरूवात केली पण कसलं काय? मनाप्रमाणे लिहिता येतं नव्हतं. म्हटलं जाऊ दे. आल्यावर पूर्ण करू. तर आज टॅगतोय. हा विषय शिळा झाला आत्ता पण काय करणार Better late than absent. आत्ता वाचा तुम्ही कारण शिक्षा आहे तुम्हाला, मला वेळेवर न टॅगण्याची :-)

1. Where is your cell phone?
पडला आहे बाजुला.

2. Your hairs?
हल्ली गळतात अशी भिती वाटते.

3. Your Mother?
माझ्या सगळ्यात जवळची व्यक्ति

4.Your Father?
माझा आदर्श

5. Your favorite food?
समुद्रात मिळणारे आणि शिजवून/तळून झाल्यावर ताटातून पोटात जाणारे काय पण.

6. Your dream last night?
मी झाडावर चढलो आहे. खुप वर आणि मला उतरता येत नाही ये. मला उंचीची भिती वाटते.

7. Your favorite drink?
कैरी पन्हे

8. Your Dream/Goal
काहीतरी हटके, एकदम ढासू करून दाखवायचे आहे. काय ते आत्ताच नाही सांगत.

9. What room you are in?
हॉल कम बेडरूम

10. Your hobby?
आत्ता पटकन सांगणे अवघड आहे पण पहिल्या पाचात खाणे, स्पोर्ट्स, वाचन, भटकणे आणि लोकांना हसवणे. वेळेनुसार क्रम बदलतो.

11. Your fear?
आपलं स्वप्न कधीच पूर्ण नाही झालं तर?

12. Where do you want to be in next 6 years?
अशा ठिकाणी जिथे मला दर आठ्वड्याला स्टेटस रिपोर्ट विचारणारे कुणी नसेल.

13. Where were you last night?
कोल्हापूर-बंगलोर बसमध्ये, हाइवे NH4 वर

14. Something you aren't diplomatic?
कुटुंबीय

15. Muffins?
Question out of syllabus.

16. Wish list item?
खुप आहेत... सुरुवात गर्ल-फ़्रेन्डपासुन करावी का? नको गर्लफ़्रेन्डला आयटम म्हणणे योग्य नाही. :-) असो सध्या विशलिस्टमध्ये नवीन ऑफर लेटर सर्वात वरती आहे. ते मिळालं की बाकी लिस्ट आपोआप वाढेल.

17. Where did you grow up?
रत्नागिरी

18. Last interesting thing you did?
ऑफीसमधून पळालो.

19. What are you wearing?
टी-शर्ट आणि शॉर्ट

20. Your TV?
स्पोर्ट्स, म्यूज़िक आणि बातम्या

21. Your pets?
नाही.

22. Friends?
मित्र परिवार खूप आहे पण निस्वार्थी असे ४ मित्र आणि ३ मैत्रिणी आहेत.

23. Your life?
खूप सारी आणि अपूर्ण स्वप्न. Dreams unlimited and incomplete....

24. Your mood?
नेहमीप्रमाणे आरामात.

25. Missing someone?
हो. कुणाला ते लिहीन कधीतरी पोस्ट मध्ये.

26. Vehicle?
पल्सर १५० आणि मारुती अल्टो

27. Something you aren't wearing?
चष्मा, कारण अजुन तरी लागला नाही...

28. Your favorite store?
क्रॉसवर्ड

29. Your favorite color?
क्रीम कलर

30. When was the last time you laughed?
दुपारी मित्राशी फोनवर बोलताना.

31. Last time you cried?
२६ डिसेंबर २००८ एक वर्ष होऊन गेलं.

32. Your best friend?
रोहन आणि माझा मावस भाऊ स्वप्निल

33. One place you go to over and over?
हॉटेल फिश् लँड (apart from Office and Toilet :-))

34. One person who mails me regularly?
बरेच आहेत.

35. Favorite place to eat?
हॉटेल फिश् लँड आणि शोरमा रोलसाठी कबाब मॅजिक.

बोअर झालातं ना? इलाज नाही ओ. मी विशूभाऊ आणि फोटोग्राफर पप्पूला टॅगतोय.

Wednesday, December 23, 2009

आठवणीतला नाताळ

गेल्या दिवाळीत अमेरिकेला गेलो होतो. जानेवारीपर्यंत तिकडेच मुक्काम होता त्यामुळे दिवाळी चुकली तरी नाताळची मज्जा अनुभवता आली. कॅलिफोर्नियाला पोहोचल्याबरोबर कॅब पकडून ऑफीस गाठलं. आयुष्यात पहिल्यांदाच परदेशात पाउल टाकलेले. तिकडे कसे होईल, लोकं कसे असतील, काम पूर्ण होईल की नाही असे असंख्य प्रश्न मनात होते. तिथे आगमनाची वर्दि देताच आतून साधारण साठीकडे झुकलेली अमेरिकन बाई हसत मुखाने माझ्या स्वागताला बाहेर आली. लिंडा जॉनसन. "हे सिद्धार्थ यु आर लुकिंग सो हॅंडसम" पहिलाच यॉर्कर, मी क्लीन बोल्ड. आजवरच्या आयुष्यात समस्त स्त्रीवर्गा कडून आलेली अशी ही पहिलीच प्रतिक्रिया. भारतातल्या मुलींचा सेन्स चांगला नाही ह्या वर अमेरिकेत आल्या आल्या शिक्का मोर्तब झाले. किंवा बहुतेक २४ तासाहून जास्त प्रवास केल्यानंतर (पूर्ण प्रवासात मी २० तास तरी झोप काढली) कदाचित आपण हॅंडसम दिसत असु असे वाटून गेले. अशी होती माझी लिंडाशी पहिली भेट.

ऑफीस मधून आपल्या गाडीतून ती मला माझ्या अपार्टमेंटला घेऊन गेली. तिथल्या ऑफीसमध्ये सगळ्या औपचारिक बाबी संपल्यानंतर आम्ही माझ्या अपार्टमेंट मध्ये गेलो. मस्त आलिशान २ बेडरूमची जागा. आत सगळ्या सोयी. तिथे गेल्यावर मला तिथला इलेक्ट्रिक गॅस, डिश वॉशर, वॉशिंग मशीन, हीटर आणि इतर सगळ्या गोष्टी कश्या वापरायच्या याच प्रात्यक्षिक दाखवलं. नंतर मला पोटापाण्याच्या जरूरी वस्तू घेऊन देण्यासाठी डिपार्टमेंटल स्टोरला घेऊन गेली. जाता जाता कुठे कसं जायचं, रस्त्याने किंवा पार्किंगमध्ये चालताना कुठले नियम पाळायाचे हे सगळं समजावून झालं. एव्हाना नवखेपणाची भावना आणि इथे आपलं कसं होणार ही भीती कुठल्या कुठे पळून गेली होती. तासाभारातच मी देखील आपण लिंडाला गेली अनेक वर्षे ओळखतो इतका comfortable झालो. दुसर्‍या दिवशी देखील ऑफीसमध्ये ती ज्या प्रकारे माझी सगळ्यांशी ओळख करून देत होती तेंव्हा मला क्षणभर असे वाटले की जणू ही मला माझ्या लहानपणापासून ओळखते.

आधी वाटलं की कदाचित आपण इथे नवे आहोत म्हणून आपल्याला कंफर्ट वाटण्यासाठी ही असे बोलत असेल. पण काही लोकंच अशी असतात की ते जसे वागतात तसे ते खरोखरच आहेत, उगाच आव आणत नाहीत हे कळून येते. लिंडा ही त्यातलीच एक होती. मला तरी असे लोकं फार कमी भेटले. नाहीतर आपल्याकडे HR मध्ये काम करणारी लोकं. जेव्हा तुम्ही एखादी कंपनी जॉइन करता तेंव्हा आणि पहिले काही दिवस नुसते गुळ, साखर, मैसूर-पाक(बंगलोरमध्ये) तोंडात ठेवूनच बोलत असतात. एकदा का तुमची नवखेपणाची एक्सपाइरी डेट संपली की मग तुम्ही फाट्यावर. हा असला अनुभव गाठिशी असल्याने ही बया देखील २ दिवसांनी आपल्या कामाशी काम ठेवून राहील असे वाटले. पण नाही. तिथल्या वास्तव्यामधील प्रत्येक दिवशी गुड मॉर्निंग बरोबरच माझ्या मूड किंवा कपड्यावर एखादी तरी टीपण्णी असायचीच. फार बरं वाटायचं. किती छोट्या छोट्या गोष्टी असतात ज्या आपल्याला किंवा दुसर्‍याला नकळत आनंद देऊन जातात.

सुरुवातीचे काही दिवस मी कॅबने ऑफीसला येत जात होतो. नंतर तिने माझ्यासाठी कार बुक केली. मग मला तिथल्या वाहतूकीच्या नियमांची सवय व्हावी म्हणून पुढचे २-३ दिवस रोज ती आणि मी लंच टाइममध्ये आणि ऑफीस सुटल्यावर ऑफीस ते अपार्टमेंट आणि आजूबाजूच्या भागात ड्राइविंग करण्यासाठी जात असु. मला तिथल्या वातावरणात व्यवस्थित कार चालवायला जमते ह्याची खात्री झाल्यानंतरच तिने मला एकट्याला कार चालवायची परवानगी दिली. खरं तर ती आमच्या ऑफीस मधली Senior Admin होती. आमच्या रहाण्याची बुकिंग करणे आणि दर आठवडा आमचे पे चेक देणे हे तिचे नेमुन दिलेले काम होते. ह्याव्यतिरिक्त आम्ही काय करतो किंवा आमचे कसे चालू आहे ह्याच्याशी तिला काही घेणे देणे नव्हते. पण तीने मला अडीअडचणीच्या वेळी गरज पडली तर तिच्या घरचा फोन नंबर, स्वत:चा मोबाइल नंबर असे सगळे नंबर देऊन ठेवले होते. माझ्यानंतर आठवड्याभरात भारतातून अजुन दोन जण तिकडे पोहोचले. त्यांना देखील हाच अनुभव आला. लिंडाशिवाय आमचे पान हलत नसे. आज जेवायला कुठे जाणार, कुठे काय छान मिळतं, कुठल्या रेस्तोरंट मध्ये काय मागवायचे? काय स्पाइसी, काय मीडियम स्पाइसी ऑर्डर करायचे हे सगळं सांगायची. आमच्या बरोबर यायला जमलं नाही तर रेस्तोरंटचा मॅप आणि काय मागवायचे ह्याची लिस्ट आम्हाला न मागता मिळत असे.

वीकेंडला तिच्या घरी हमखास बोलावणे असायचे. तिच्या घरी तिच्या नवर्‍याची ऑल्टन जॉनसनशी भेट झाली. तो लिंडापेक्षा ८-९ वर्षानी मोठा. दोघांचेही हे दुसरे लग्न होते. त्यांना एक मुलगा आणि एक मुलगी. मुलगी नर्स होती आणि एका डॉक्टराबरोबर लग्न करून नुयोर्क ला स्थायिक झालेली. मुलगा टेक्सासला एका मोठ्या कंपनीचा CEO होता. हे दोघे अधून मधून तिला भेटायला जायचे. उन्हाळी सुट्टीत, नाताळमध्ये मुलगा मुलगी नातवंडांना घेऊन यायचे. अमेरिकन संस्कृती प्रमाणे लिंडा आणि ऑल्टन एकटेच राहात होते. हेच कशाला आजही ऑल्टनची ९८ वर्षांची आई नेवाडा राज्यात एकटी रहाते हे ऐकून आम्हाला धक्काच बसला होता. पण अमेरिकेत हे अगदी कॉमन आहे.

लिंडा आणि ऑल्टनचं घरं म्हणजे आलिशान महालापेक्षा कमी नव्हतं. पूर्ण घरात गुबगुबीत गालीचा, सगळ्या अत्याधुनिक सुखसोयी, घराबाहेर स्विम्मिंग पूल. अनेक छान छान गोष्टींनी सारे घर भरलेलं होतं. गर्भश्रीमंत म्हटलं तर वावगं ठरणार नाही. ऑल्टन व्यवसायाने सिव्हील इंजिनीअर होता त्याच बरोबर त्याला फोटोग्राफीचा छंद देखील होता. त्यामुळे सहाजिकच सारं घर फोटो फ्रेमनी भरलेलं होतं. आमच्या ऑफीसच्या कुठल्याही पार्टीमध्ये ऑल्टन कॅमेरामन म्हणून यायचा. त्याला पूर्ण ऑफीस ओळखायचे. लिंडा आणि ऑल्टन पूर्ण परिवाराबरोबर जवळपास पूर्ण अमेरिका आणि युरोपचा काही भाग फिरलेले. तरुणपणी ऑल्टनचं स्वत:चं चक्क २ सीटचं छोटसं विमान होतं. आत्ता बोला. लिंडा देखील स्वत: स्काइ डाइविंग करायची. या वयातही ती आम्हाला स्काइ डाइविंगला घेऊन गेली होती. माझी तर विमानातून उडी मारताना नुसती बोबडी वळली होती. पण तो अनुभव आयुष्यातला एक अविस्मरणीय अनुभव होता. Admin म्हणून काम करण्यापुर्वी लिंडा स्विमिंग ट्रेनर होती. एप्रिल-मेमध्ये पुन्हा अमेरिकेत जाणं झालं तेंव्हा वीकेंडला आम्ही त्यांच्या घरी स्विमिंगपूलमध्ये पडिक असायचो. आम्ही नदीत आणि समुद्रात पोहलेली माणसं. मग पोहताना तू किती आवाज करतोस, तुझे स्ट्रोक कसे चुकीचे आहेत अश्या प्रतिक्रिया यायच्या. तिने आम्हाला डाइविंग पॅडवरुन पाण्यात सूर मारायला देखील शिकवलं. त्याच दरम्यान त्यांच्या घरच्या बागेत एक बदक आपली पिल्ल घेऊन मुक्कामाला आलं होतं. काही दिवस स्विमिंग पूल बदकांसाठी राखीव होता. त्या पिल्लाना खाऊ घालण्यासाठी लिंडा जेवणाच्या सुट्टीत घरी जायची. दररोज आम्हाला त्या पिल्लाच्या गोष्टी ऐकायला मिळायाच्या. एके दिवशी पिल्ले मोठी झाल्यावर लिंडा आणि ऑल्टन त्या सगळ्या बदकाच्या कुटुंबाला जवळच्या मोठ्या तळ्यावर सोडून आले. पुढे काही दिवस रोज ती बदकांची पिल्ले कुठे दिसतात का हे पाहायला ती दोघं तळ्यावर जात होतीत. त्यांच्या घरी एक मांजर देखील होते. त्याचे देखील घरातीलच एका सदस्या प्रमाणे मजबूत लाड व्हायचे.

एवढं सगळं ऐश्वर्य, डामडौल असूनही लिंडा आणि ऑल्टनचा स्वभाव इतका आपुलकीचा होता की आम्हाला कधीही तिथे दबून गेल्या सारखे वाटले नाही. आम्ही तिथे अक्षरशः दंगा करायचो. लिंडा आणि ऑल्टनदेखील आमच्यात सामील असायचे. अधून मधून पाहुण्यांचाही राबता असायचा. त्यावेळी देखील आम्हाला आमंत्रण असायचे. कुठेही काहीही आडपडदा नाही, भेदभाव नाही. आम्ही देखील दरवेळी मस्तपैकी वाईन आणि केक घेऊन त्यांच्या घरी पोहचायचो. आम्हाला देखील काहीतरी नवीन चाखायला मिळायचे. त्या पदार्थांच्या पाककृतीबद्दल चर्चा व्हायच्या. सुट्टीत घरी आलेल्या नातवंडांचे आजी आजोबा जसे प्रेमाने लाड करतात तसेच काहीसे आमचे देखील लाड व्हायचे. आम्ही देखील त्यांना आपला कडक, ताजा, उकळी काढलेला कटिंग चहा पाजायचो. एकदा मुर्गी पण चाखवली. त्यांना तिखट लागली पण तरी देखील त्यांनी आवडीने खाल्ली. लिंडाच्या घरी गेल्यावर आणखी एक हमखास होणारी गोष्ट म्हणजे रमी क्यूबचा डाव. हा पत्त्यांप्रमाणेच एक खेळ आहे. नियम थोडे वेगळे आणि प्लास्टिकची कार्ड. लिंडा आणि ऑल्टन रोज हा खेळ खेळायचे (फोटोत दिसत आहे तो खेळ). आम्ही गेलो की आम्ही त्यांच्यात सामील व्हायचो. ऑल्टन असो वा आम्ही, रमी क्यूब मध्ये बहुतांशी लिंडा जिंकायची. एरवी प्रेमळ आणि दुसर्‍यांसाठी मदतीला तयार असणारी लिंडा रमी क्यूबमध्ये मात्र सगळ्यांच्या विरुद्ध उभी ठाकायची. ऑल्टन लबाडी करण्यात माहीर होता. लिंडाला हरवण्यासाठी तो आम्हालाही वेगवेगळे गनिमी कावे सुचवायचा. पण लिंडाच्या बारीक नजरेतून काही सुटायाचे नाही.

राजकारणापासून ते Technology पर्यंत सगळ्या विषयावर गप्पा व्हायच्या. ऑल्टन आमच्या कामाची चौकशी करायचा, आम्ही कुठल्या प्रॉजेक्टवर, काय काम करतो ह्याची माहिती करून घ्यायचा. आम्हाला त्याची नवी जुनी उपकरणे दाखवायचा. कॅल्क्युलेटर नसताना ते जी स्केल वापरायचे (नाव विसरलो मी) ती ते कशी वापरायचे आणि त्यातून अचूक मोजमाप कसे काढायचे अश्या गप्पा रंगायच्या. त्यांना भारताबद्दल खूप आकर्षण होते. खूप प्रश्न विचारायचे. मला गर्लफ्रेंड नाही याचे लिंडाला आश्चर्य वाटायचे. :-( तुम्ही लोकं एकमेकाला ओळखत नसताना (अरेंज) मॅरेज कसे करता असा साधा प्रश्न तिला नेहमी पडे. "Look at us. I dated with Alton for 3 years then only we decided to get married. Sid you should go for love marriage." मी आपला एक उसासा सोडून गप्प.

नाताळच्या आदल्या दिवशी आम्हाला लिंडाच्या घरी ख्रिसमस पार्टीसाठी खास आमंत्रण होते. लिंडाने सगळ्यांना ख्रिसमसची काही ना काही भेटवस्तू दिली. रात्री उशिरापर्यंत आम्ही रमी क्यूब खेळलो. त्यानंतर लिंडाने ख्रिसमसची रोषणाई दाखवण्यासाठी आम्हाला त्यांच्या भागात फिरवून आणले. फार मज्जा आली. ऑल्टन आणि लिंडा म्हणजे आमच्यासाठी संताबाबाच झाले होते. न मागता आमच्या पोतडीत त्यांनी भरभरून आनंदाचे क्षण टाकले.

दोन्ही वेळा भारतात परत येताना लिंडा आणि ऑल्टनचा निरोप घेणे जड गेले. कोण कुठली सातासमुद्रापारची माणसं, पण मनात घर करून आहेत आणि रहातील ही आणि त्यांच्याबरोबर साजरा केलेला ख्रिसमस देखील...

Tuesday, December 8, 2009

माझा अर्जुन झालाय!!!


व. पु. काळ्यांचे एक पुस्तक आहे "आपण सारे अर्जुन". कुरुक्षेत्रावर समोर आपलीच भावंडे, सगेसोयरे आणि गुरू ह्या सर्वांना पाहून अर्जुनाची द्विधा अवस्था झाली होती. त्यांच्यावर शस्त्र उगारावं की रणभूमी सोडून मागे फिरावं असा प्रश्न त्याला पडला. प्रश्न देखील तितकाच गहन होता त्यामुळे तसे होणे सहाजिकच होते. अर्जुनानंतर इतका गहन प्रश्न बाळासाहेबांसमोर उभा ठाकला असेल, फक्त इथे त्यांना गीता सांगणारा कुणी कृष्ण नाही लाभला. हे झालं मोठ्या लोकंबाबत. आपल्यासारख्या सामान्य लोकांचादेखील दैनंदिन आयुष्यात अनेकदा अर्जुन होतोच.

आज हे सगळं आठवण्याचं कारण म्हणजे सध्या माझा गेम झालाय. पूर्णपणे अर्जुन झालाय. फक्त माझी लढाई ही अर्जूनाप्रमाणे कुणा आप्त् स्वकियांबरोबर नसून स्वत:बरोबर आहे. हे करू की ते करू ह्यात मी अडकून पडलो आहे. सध्या काहीतरी बकवास काम करतो आहे. ऑफीसमध्ये कामात मन लागत नाही तरी केवळ डेडलाइन पूर्ण करण्यासाठी उशिरापर्यंत पडिक राहायचे. बर जास्त वेळ थांबून काम होईलच ह्याची खात्री नाही तरी देखील वेळेवर घरी जाणे नाही. घरी जाव की काम करत ऑफीस मध्ये बसावं ह्यात माझा रोज अर्जुन होतो. आहे त्या जॉबचा कंटाळा आलाय पण जॉब बदलून देखील परिस्थिती बदलेलं का हा विचार पुन्हा माझा अर्जुन करून टाकतो. असे बरेच प्रश्न आहेत ज्यात माझा अर्जुन होतो. काही न करता शरीर साथ देतय म्हणून धाप लागेपर्यंत देशा विदेशातल्या माणसांबरोबर कुठल्यातरी Technology च्या मागे धावत राहावं की शांत पणे गावी जाऊन आहे त्यात समाधान मानून घरच्यांबरोबर रहावं? ह्या while(1)मध्ये loop पळणार्‍या रॅट रेस मधून आपण कधी तरी बाहेर फेकले जाणार हे माहिती असून देखील त्या दिवसाची वाट पहात राहावी की स्वत:हून त्यातून बाहेर यावं? नवीन Skills शिकून, Domain बदलून Job profile जास्त flexible बनवावं की आहे त्याच domain मध्ये अनुभव वाढवून comfort zone मध्ये राहावं? मी कायम IT मध्ये काम करेन असं मला स्वत:ला तरी वाटतं नाही पण IT नाही तर नक्की करायचं काय हे अजुन मलाच माहिती नाही. IT मध्ये रहायच तर मग काही वर्षे Onsite काम केलं पाहिजे असं एकीकडे वाटतं पण मग वर्ष-वर्ष बाहेर देखील राहायचं नाही. गौरी-गणपती, दसरा-दिवाळी, पाडवा आणि होळी हे आपल्या माणसात, आपल्या घरातच साजरे करायचे असतात. दर २-४ महिन्यांनी गावी जाऊन आपल्या माणसात राहायचं असतं. दोन्ही दगडावर पाय कसा ठेवायचा? बर भारतातच राहावं तर बंगलोर की पुणे? तसा विचार केला तर दोन्ही घरापासून दूरच. एका बाजूला बंगलोरमधलं जीवन पुण्यापेक्षा बरं वाटत पण तरी देखील आतून कुठेतरी पुण्याची ओढ लागते. महाराष्ट्रात राहाणार्‍या प्रत्येकाला मराठी बोलता आलं पाहिजे हे राज ठाकरेंचे विचार पटतात पण गेली काही वर्षे बंगलोरला राहून मी स्वत: मात्र कन्नड नाही शिकलो. का? कारण कन्नड नाही आलं तरी माझं इथे काहीच अडतं नाही. मग मी राज ठाकरेंच्या विचारांना पाठिंबा द्यावा की महाराष्ट्रात राहून मराठी न येणार्‍या अमराठी लोकांना? असो विषयांतर होतय पण काय करणार? वैयक्तिक गोष्टींबरोबरचं सामाजिक आणि राजकीय विचारांबाबत देखील माझा अर्जुन झालाय.

Wednesday, November 25, 2009

शहिदांना भावपूर्ण श्रद्धांजली...

स्वातंत्र्य दिन, प्रजासत्ताक दिन मग कारगिल दिवस आणि आत्ता २६/११. आज २६/११ ला एक वर्ष पूर्ण झालं. वर्षभर कसाबने पाहुणचार झोडला. नुकतचं महाराष्ट्र टाइम्स मध्ये वाचलं की कसाबची काळजी घेण्यासाठी सरकारी तिजोरीतून वर्षभरात तब्बल ३१ कोटी रुपये खर्च करण्यात आले आहेत. शहिदांच्या घरी मात्र मदत पोहोचली नसेल. त्याचबरोबर कसाबसोबत आलेल्या इतर अतिरेक्यांचे मृतदेह अजुन ममीसारखे जपून ठेवलेले आहेत. आपण अमराठी लोकांचा थारा करणार नाही असे म्हणतो पण हजारो रुपये खर्चून कडेकोट पहार्‍यात दहशतवाद्यान्चे मृतदेह मात्र बाळगून आहोत. २६/११ नंतर गृहमंत्री पदावरून पायउतार झालेले आर आर पाटील आज पुन्हा गृहमंत्री आहेत. हल्ल्यानंतर मंत्री बदलल्याने काय होते हे आजपर्यंत कळले नाही. अर्थात त्यांना दोष देण्यात काहीच अर्थ नाही, आपणच निवडून दिले आहे त्यांना.

भारताची राजनीति समजण्याला लागते
षंढता ही खूप, थोडी-थोडकी ना लागते
खूप केला यत्न आम्ही आम्हास नाही समजली
ना कळो आम्हास आहे पुष्काळांना समजली

इतके वर्ष अफजल गुरूला पोसतोय आत्ता कसाबला पोसू. त्यात काय एवढे? पाकिस्तानला अधून मधून पुरावे देत राहू. कालच प्रधानमंत्री की संरक्षण मंत्र्यानी २६/११ मधल्या गुन्हेगारांना शिक्षा होणारच असे ठामपणे सांगितले आहे. बस्स आणि काय पाहिजे?

आता कशाची लाज आता काश्मिरही देऊ आम्ही
काय त्याने भारताचे व्हायचे आहे कमी
दिल्ली जरी गेली तरीही हार ना आम्ही म्हणू
उंचावूनी लुंग्या स्वत:च्या 'जय जगत्' आम्ही म्हणू

२६/११ मुळे पोलिसांची सामान्य माणसाच्या मनातील प्रतिमा मात्र बदलली हे नक्की. २६/११ नंतरच्या दिवसात विजय साळस्कर, अशोक कामटे आणि हेमंत करकरे ह्या तिघा अधिकार्‍यांबद्दल जे वाचायला मिळाले त्यावरून आपण किती मोठे आणि कर्तव्यदक्ष अधिकारी गमावले हे कळते. कामटेनी सोलापूर मध्ये ज्या रीतीने काम केले होते त्यावरून ते किती मोठे होते ते कळते. एका पोलिस अधिकर्‍याच्या मृत्यूमुळे लोकानी उत्स्फूर्तपणे बंद पाळल्याचे माझ्या वाचण्यात नव्हते. एखाद्या हीरोला शोभेल असे व्यक्तिमत्व. पिळदार शरीरयष्टी. रात्री १० नंतर फटाके फोडले म्हणून आमदाराला भर रस्त्यावरून फटके मारुन पोलिस स्टेशनपर्यंत धिंड काढून नेलेला अधिकारी असा लौकिक. विजय साळस्करानी २४ वर्षाच्या कारकिर्दीत ७९ गुंडाना ढगात पोचवलेले. हेमंत करकरे ATS चीफ. व्यवसायाने मेकॅनिकल इंजिनियर पण पोलिस अधिकारी म्हणून कारकीर्द. सोप नाही. इंजिनियर झाल्यावर पुन्हा IPS वैगरे परीक्षा देऊन पोलिसाची नोकरी. हे सगळे नक्कीच स्पेशल होते.

ऐसे नव्हे की भारती या बुद्ध नुसता जन्मला
नुसताच नाही बुद्ध येथे आहे शिवाजी जन्मला
जन्माला जो जो इथे तो वीर आहे जन्माला
अध्यात्म ही या भारताचा युद्धात आहे जन्माला

आहे ध्वजा नक्कीच आमुची पिंडीवरी लहरायची
फक्त आहे देर त्यांनी समरी पुन्हा उतरायची
अरे कुठला हा पाक याचे नावही नव्हते कुठे
कळणारही नाही म्हणावं होता कुठे गेला कुठे...

२६/११ मध्ये बळी पडलेल्या तमाम निरपराध नागरिकांना आणि शहिदांना भावपूर्ण श्रद्धांजली...
========================================================================================
नोंदीमध्ये वापरलेली वरील शायरी भाऊसाहेब पाटणकर लिखीत "दोस्त हो!" ह्या पुस्तकातील आहे.

Saturday, November 14, 2009

मानाचा मुजरा



नेहमी प्रमाणे मास्तर, दत्त्या, गेंगण्या, बाबू तोडणकर, गंपू शेट अशी सगळी गँग मामाच्या हॉटेलमध्ये बसली होती. रविवार होता. सकाळची वेळ असली तरी बाबू नेहमी सारखा बर्‍यापैकी टूंन्न होता.
मास्तर: काय गंपू शेट आज हजामाती नाय वाटतं?
गंपू शेट: नाय ता काय मी आज काय दुकान उघडायचो नाय. येका कार्यक्रमाक जावचो असा.
दत्त्या: खैसर जावाळ करायचो असा काय?
गंपू शेट: नाय रे.
बाबू: मेल्या रविवारचो धंदो बंद करून खै चाललोस? असो खैचो काम उपटायाचो असा तुज?
गंपू शेट: आज क्रिकेटची मॅच असा.
सगळे: क्रिकेटची मॅच?
बाबू: तू काय थयसर दोनी टीमची भादरवूक जातस?
गंपू शेट: मेलो बेवडो. माका काय हजामाती सोडून बाकी काय दुसरो काम येत नाय असो वाटलो काय? माज्यासारखो अष्टपैलू खेळाडू आजुबाजूच्या गावात नव्हतो. काय समजलावं?

गंपू शेट तसे १०-१२ वर्षांपूर्वी गजालवाडित आलेले असल्यामुळे लोकांना त्यांच्या तरुणपणीचे पराक्रम फार माहीत नव्हते. एकेकाळी गंपूशेट म्हणजे मधल्या फळीतले चिवट फलंदाज आणि फिरकी गोलंदाज. गंपुशेट शब्द जसे गर्रकन फिरवतात तसे चेंडू पण फिरवू शकतात हे कोणाला सांगून खरे वाटले नसते. क्रिकेटबद्दल गंपू शेटना मजबूत प्रेम. आणि सचिन तेंडुलकर म्हणजे सर्व सामान्य क्रिकेटप्रेमींप्रमाणे गंपू शेटचा देव.

मास्तर: अहो गंपुशेट आज मध्येच हे मॅचचं कुठून काढलं नवीन?
गंपू शेट: ओ मास्तर आज तारीख काय?
मास्तर: तारीख? आज १५ नोव्हेंबर. त्यात काय? तारखेचा आणि तुमच्या मॅचचा काय संबंध?
गंपू शेट: ओ मास्तर ना तुम्ही? तरीच केलाव् काम बराबरं. पोरांना काय घंटा शिकिवनार? अहो आज तेंडुलकरच्या क्रिकेट कारकिर्दिला २० वर्षं झाली. त्या प्रित्यर्थ येक आत्ता अकरा वाजता सामना आयोजित केलेला आहे गावाच्या पोरांनी. तिकडंच जातोय मी.

तसे दुकानात सचिन तेंडुलकरची पोस्टर पाहून गंपुशेटना क्रिकेटमध्ये इंट्रेस्ट आहे हे लोकांना माहीत होतं पण गंपुशेट इतके तेंडुलकर प्रेमी असतील ह्याची कल्पना नव्हती.

मामा: असो नाय, मग बरा झाला दुकान बंद ठेवलास ता. नायतर ते चॅनेलवाले दिवसभर तेंडुलकरच्या बालपणापासून ते आजपर्यंत काय काय झाला ता दाखवत बसतील आणि गंपुशेट ता बघता बघता लोकांचे कान मान कापून टाकायचो.
गेंगण्या: नाय तर काय? येकदा गंपूशेट मॅच बघता बघता फाफ्या कदमाची दाढी करीत व्हते. तिकडे तेंडुलकरने ष्ट्रेट द्राइव्ह मारल्यानं आणि इकडे गंपुशेटनी ष्ट्रेट फाफ्याची अर्धी मिशी उडवल्यानी.
बाबू: नायतर काय. अरे तिकडे तेंडुलकर ठोकूक लागलो की गंपु आपल्या हातात वस्तरा हाय हे विसरून जाता. अशीच येकदा कैचीची कट लागून गेली कानास माझ्या. तेवापासून परत कधी मॅचच्या दिवशी हजामात करुक गेलो नाय गंपू शेटकडे.
मास्तर: अहो त्यात काय? हेल्मेट घालून जायचं की?
गंपू शेट: मेलो बेवडो. अरे मी कट कशाक मरूक हवी. झिंगीत तुझोच मस्तक डूलत असता.
मास्तर: ते जाऊ दे ओ गंपुशेट. त्या तेंडुलकरच्या कारकिर्दिला २० वर्षे पूर्ण झाली त्यात काय एवढे? तुम्ही धंदा बंद करून तुम्हाला काय मिळणार?
गंपू शेट: मास्तर सोडून द्या. तुम्हांस नाय कलायचा ता. तुमची कारकीर्द २० वर्ष्याची झाली की तुम्ही शिकवलेली किती पोरा तुमची आठवन काढतात ता बघा. काय समजलावं?
मामा: अरे मास्तर बरोबर बोलततं. अरे तो खेळलो तरी आपण मॅच जिंकत नाय. तो खेळलो की भारत हरलोच समजायचो. तू कशाक खै कडमडूकं जातंस?
गंपू शेट: मामा काढलीस ना सोताची लायकी? ह्याच कलता ना तुला क्रिकेटमधला? बेवड्या सांग बरे सचिनची वन डे मधली शतका किती असतं?
बाबू: ४५.
गंपू शेट: आणि त्याताल्या ३२ शतकानी संघाक विजय मिळवून देलानी. मास्तरांनू काढा टक्केवारी आणि घाला मामाच्या घश्यात.
मास्तर: ४५ पैकी ३२ म्हणजे ७० टकक्याहून जास्त.
गंपू शेट: मंग? आत्ता बोल मामा? वाचा बसली नां तुझी? अरे मेल्यानू तो खेळला तरी बोंबलताव आणि नाय खेळला तरी बोंबलताव . आत्ता परवा येकट्यानं केलानं नां १७५. अवो सोन्याचो भाव आणि तेंडुलकरची येक येक धाव म्हंजे रोज एक नवो शिखर. दोघांनी कसो हातात हात घालून १७ हजारी टप्पा पार केल्यानी.
मामा: पण शेवटी झालो काय आपण मॅच हरलो नां?
गेंगण्या: आत्ता तो बाद झाल्यावर ढुन्गणाकडचे लोग हगले त्याला तो काय करील?
गेंगण्याने अचानक टीम बदलली आणि गंपू शेटला जॉइन केले
गंपू शेट: मागे येकदा मद्रासला पण पाकिस्तान बरोबरच्या कसोटीत तो बाद झाला तेंव्हा १६ रन्स हवे होते? किती १६ आणि आपले ४ जन शिल्लक होते. आणि निकाल विचारा. भारत १२ रन्स ने हरला व्हता. आत्ता तो काय फेडररसारखो एकेरी सामने नाय खेळत जो जाता येता येकट्यानं जिंकवून् देल.
गेंगण्या: २००३ चो वर्ल्डकप आठवा. येकट्यान काढलान सगल्या मॅची.
गंपू शेट: मंग? विसरलाव? आज त्याची हर एक रन्स वर्ल्ड रेकॉर्ड हाय. काय समजलावं? अरे नुसती बॅटिंग करून थांबलोय काय? मोइन खानला जावन् विचारा. त्याच्या ढेन्गातून बॉल गेलो कधी नि दांडके पडले कधी त्याचो त्यालाच नाय कळलो. परवा १७५ रन करून देलान ना तोंडात रिटायर हो, रिटायर हो म्हणून बोंबलनार्‍या लोकांच्या. अरे ती शारजातली मॅच आठवा. वादाल येवन् गेल्यावर शेन वार्नची जी काय पिसा काढल्यान् व्हती की तो अजुन आठवण काढतो आणि जल्ली मामा सारखी लोका विसरतात.
दत्त्या: अहो क्रिकेट जगतातले म्हातारे कोतारे पण त्याच्या पेक्षा बाकी कोण कोण श्रेष्ट हे किती वेळा बोंबलले. तो १९४ असताना आपल्याच लोकांनी डाव सोडल्यानी पण कधी कोणाकं एका शब्दानं तरी बोलल्याचो आठवताय? असो सभ्य खेळाडू दिसता कोन दुसरो तुम्हास?
गेंगण्या: हल्ली ताजो ताजो त्या विनोद कांबळ्यान् उगाच काय तरी बोलायचो म्हणून बोलल्यान् आणि सोताच्या तोंडाक काला फासल्यान्. आपल्या मच्छिन्द्र कांबळ्यान् जा काय नाव कमावल्यान् ता विनोद कांबळ्यान् घालवल्यान्.
बाबू: "हा म्हणजे बिशन सिंग बेदीन् कमावलेलो नाव येकट्या मंदिरा बेदीन् घालवल्यान् तसलो प्रकार झालो." बाबूला बर्‍याच वेळांन किक आली.
गंपू शेट: आज काल कोन पन ट्वेंटी ट्वेंटी खेलता पण २० वर्षे कसोटी, वन डे क्रिकेट कोण खेलेल हे सांगा? अरे लोका पुर्‍या कारकिर्दीत १०-१२ शतका झाली तरी धन्य मानतात. पण हा आपल्या कारकिर्दीत १६ वेळा नव्वदित बाद झालो. नाय तर १०० शतकांचा आकडो कधीच पार झालो असतो
मास्तर: होय होय ते पण खरचं. पुर्वी पासून क्रिकेट भारतात लोकप्रिय होत पण आज क्रिकेट म्हणजे पैश्याची गंगा झालीय, लोक आपल्या मुलाला क्रिकेटर म्हणून पाहु लागली आहेत, क्रिकेट एक करियर म्हणून विचार करावा इतकं पुढे गेलय. क्रिकेट आता व्यवसाइक झालाय. ह्याच सगळ्यात जास्त श्रेय सचिनलाच जातं हे कोणीही मान्य करेल.
मामा: अरे ता सगला मान्य पण वर्ल्डकपचो काय?
गंपू शेट: हा तेवडो मात्र खरां. २००३ ला त्यानं एकट्याच्या जिवावर वर्ल्ड कप आणल्यांनचं होतो पण शेवटची फाइनल फसली. नायतर आज त्याची कारकीर्द कशी झलालून दिसली असती. तेवढि येकच कमी राह्याली हाय आत्ता. त्यासाठीच मी जातय म्हांराजाकं गार्‍हानं घालूक...

सगळे: आमी पण येतो. आमी पण येतो.

रे म्हांराजा !!!!!
बारा राटीच्या, बारा वहिवाटीच्या म्हांराजा !!!!! तुका आज गार्‍हाणं घालतायं रे म्हांराजा !!!

तेंडुलकरांच्या सचिनने आज कारकिर्दीक २० वर्षे पुरी केल्यान्.
व्हयं म्हांराजा !!!

आजपर्यंत धावांचो डोंगर उभा केल्यान्.
व्हयं म्हांराजा !!!

जगातल्या सगल्या बोलर लोकांकं धडकी भरवल्यान् आनी फील्डर लोकांकं सैरभैर करून सोडल्यान् .
व्हयं म्हांराजा !!!

जाता-येता विक्रम मोडल्यान्... नवीन नवीन विक्रम आपल्या नावावर केल्यान्.
व्हयं म्हांराजा !!!

तर ह्याच्या पुडे पण त्याच्या हातान् अशीच कामगिरी होत रवांदे.
व्हयं म्हांराजा !!!

त्याचो खेळ असोच बहरत जावांदे.
व्हयं म्हांराजा !!!

आनी २०११ चो विश्वकप भारतात येवांदे...
व्हयं म्हांराजा !!!

Saturday, November 7, 2009

यंदाची दिवाळी - भाग २

भाग एक पासून पुढे चालू

दिवाळी दिवशी साडेपाचला उठलो. घरातली मोठी माणसे कधीच ४-४ १/२ पासून उठून तयारीला लागली होतीत. मस्त नारळाच्या रसात भिजवलेल्या ऊटण्याचा छान वास येत होता. आई, बाबा, काका, काकू, भाऊ, वहिन्या ह्यांच्या आंघोळी देखील आटोपल्या होत्या. देवपूजेची तयारी सुरू होती. देवाला देखील ऊटणे लावून पूजेची सुरूवात झाली. तोवर आजूबाजूच्या मुलांनी दणके बाज फटाके फोडले. त्या आवाजाने आमच्या घरातले बाळगोपाळदेखील उठले आणि फटाके फोडण्यासाठी धावले. सगळ्यात लहान सिद्धी फटक्याच्या आवाजाने दचकून उठली आणि फुल्ल भोकाड पसरले. मी देखील ऊटणे लावून आंघोळ करून घेतली. दिवाळी दिवशी आई, काकी, आत्ये अशा सगळ्या आम्हा भावंडांना ऊटणे लावतात. आमच्या वेळी असं नव्हतं असे म्हण्याची अजुन गोष्ट म्हणजे दिवाळीतली थंडी. लहानपणी खूप थंडी असायची. कधी एकदा सगळ्याजणी आपल्याला ऊटणे लावतात आणि कधी एकदचा गरम पाण्याचा तांब्या अंगावर घेतो असे व्हायचे. थंडी नक्की कोणत्या दिवाळीत गायब झाली आठवत नाही पण गायब झाली हे मात्र नक्की. हल्ली दिवाळी मे महिन्यात येते की काय असे वाटते. आपल्या नकळत सगळं किती भराभर बदलतं नां. आंघोळीनंतर तुळशी समोर कारेट फोडलं. ही प्रथा कुठे कुठे पाळतात हे ठाऊक नाही म्हणून लिहितो. कारेट नावाचं एक अंड्याच्या आकाराचे फळ रानात किंवा डोंगरावर मिळते. नरकचतुर्थी दिवशी नरकासूर समजून डाव्या पायाच्या अंगठ्याने हे कारेट तुळशीसमोर फोडायाचे. लहानपणी मला केवळ पायाच्या अंगठ्याने हे फोडता नाही यायचे. मग पूर्ण पाय द्यायचो आणि कारेट चपटून टाकायचो. घरातल्या सगळ्यांच्या आंघोळी झाल्यानंतर पुढच्या ओटीवर सगळे एकत्र फराळाला बसलो. देवपूजा आटोपली होती. दिवाळी दिवशी देवाला दूध पोह्याचा नेवैद्य दाखवतात. मस्त फराळ आणि दूधपोह्यावर ताव मारला. छोट्या मुलांना सतावणे वैगरे सुरू होतेच. आमचं झाल्यावर लेडीजची बॅच फराळाला बसली. नंतर शेजारच्या घरात फराळची देवाणघेवाण सुरू झाली. पप्या वाडीतल्या गँगचा म्होरक्या झालाय. हल्ली बरीचशी मुलं नोकरीशिक्षणानिमित्त घराबाहेर असल्याने पप्या आणि समस्त गँग दसरा, कोजागिरी साजरी करू शकले नव्हते. त्यामुळे दिवाळी दिवशी सगळे एकत्र येऊन सगळ्या घरात जाऊन दिवाळी शुभेच्छा देत फिरत होते. गँगचा दिवाळीच्या शुभेच्छांबरोबर दुसर्‍या दिवशी गणपतीपुळे ट्रिपचा प्रस्ताव देखील होता. मे महिन्यानंतर झालेले वाढदिवस आणि कोजागिरी हातखंब्याजवळच्या धाब्यावर चिकन हाणून साजरे करण्याचा प्लान होता. (हातखंबा हे मुंबई-गोवा हाइवे वरचे एक गाव. सुजाण वाचकांनी हात खंबा अशी शब्द फोड करू नये.) आत्ता मी सतत बाहेरच चिकन खात असल्याने रविवार घरीच साजरा करणार होतो. त्यामुळे पप्या आणि कंपनीचा प्रस्ताव साहजिकच धुडकावून लावला आणि मी मंदिरात जाण्यासाठी बाहेर पडलो. दिवाळी दिवशी भल्या पहाटे मुले देखील न चुकता मंदिरात जातात ह्याचे कारण सांगायची गरज नाही. त्या दिवशी इतक्या छान छान मुली पाहायला मिळतात की काय बोलावे. मला जरा उशीरच झाला पण Better late than Absent या सदाबहार सुविचारला धरून मी हजेरी लावून आलो. पदरी अगदीच निराशा नाही पडली.

सकाळी सगळे लवकर उठलेले त्यामुळे जेवणं झाल्या झाल्या सगळे पटापट झोपी गेले. २-३ तासाच्या विश्रांती नंतर चहापान झाल्यावर सगळे पुन्हा फ्रेश झाले. संध्याकाळी लक्ष्मी पूजन होते. दिवेलागणी बरोबर पुन्हा एकदा कंदील, पणत्या आणि त्याचबरोबर फटाके फोडणार्‍या बाल-गोपाळ मंडळींवर लक्ष्य ठेवणे हे काम माझ्याकडे आले. मोठी माणसे लक्ष्मी पूजनाच्या तयारीला लागली. वहिनीने पिवळ्या आणि केशरी गोंड्या च्या पाकळ्यांची छान रांगोळी काढली होती. छान प्रसन्न वातावरणात लक्ष्मी-पूजन पार पडले. गोड शिरा आणि श्रीखंड पूरीचा नेवैद्य झाला. सगळं आटपेपर्यंत साडेआठ वाजून गेले. पुन्हा थोड्या गप्पाटप्पा नंतर जेवण करून दिवाळीच्या पहिल्या दिवसाची सांगता झाली.

दुसर्‍या दिवशी रविवार. साहजिकच पुन्हा एकदा मच्छीमार्केटची वाट धरण्यात आली. रविवार चिंगळ(Prawns), कालव्, तिसरे मुळे (एक शिंपी) यापैकी काहीतरी अशी माझी फर्माईश होती. कालव् आणि तिसरे मुळे मिळणे कठीण आहे हे माहीत होतं. प्लान के मुताबिक चिंगळ आणि जोडीला गावठी चिकन. आमच्याकडे होळीच्या दुसर्‍या दिवशी धुलीवंदनाला कोंबडी-बोकडाचे गावजेवण असते. गावाचे लोक होळीला ईच्छेनुसार कोंबडी-बोकड किंवा नाराळाचा नवस बोलतात. हे मटण गावाचे पुरूष शिजवतात. ह्याला कसलेही वाटप किंवा स्पेशल चिकन मसाला वैगरे लावत नाहीत. फक्त नवसाचे नारळ आणि कांदा वापरुन केलेले असते. आम्ही ह्याला सुक्क मटण म्हणतो. त्या दिवशी घरी चिंगळाबरोबर तसं सुक्क चिकन शिजलं होतं. मी रेसिपी लिहून आणली आहे. एक दोन आठवड्यात करून पाहीन एखाद्या रविवारी.

आता अशा जेवणा नंतर पुन्हा झोप ओघानेच आली. झोपून उठल्यावर चहा वैगरे घेऊन झाल्यावर बाजारात जाऊन कागद आणि गोंद घेऊन आलो. महेंद्र्जींनी केलेला कंदील पाहिल्यापासून यंदा आपण देखील कंदील करावा हे मनात आले होते. लहानपणीचे दिवस आठवले. लहानपणी दिवाळीची सुट्टी पडली की कंदील आणि मातीचा किल्ला करणे ही दोन कामे दिवाळीच्या दिवसाआधी उरकणे ही मोठी जबाबदारी असायची. मोठ्या कंदीलाबरोबर १०-१२ छोटे कंदील ही करावे लागत. शेजारच्या काकांकडून सिगारेटची रिकामी पाकिटे आणून ती मधून कापून त्यावर कागदी करंज्या आणि शेपूट लावली की झाला कंदील. आत्ता मात्रा कागदी करंज्यांचाच पण एकच मोठा कंदील करायचे ठरवले. जवळपास १४-१५ वर्षांनी कंदील करत होतो. पुतणे आणि भाचे मंडळी कुतुहलाने बघत होते. कंदीलाचा सांगाडा बनवायला ड्रेसच्या खोक्याचा पुट्ठा वापरला. दोन तासात कंदील झाला. मला कंदील करताना बघून बाबा पण मदतीला आले. बाबांनी प्रत्येक करंजीच्यामध्ये सोनेरी कागद कापून नाजूक ठिपके लावले. दिवाळीला नाही तरी भाऊबीजेआधी कंदील अंगणात लागला. ऑफीसचे बेचव काम सोडून आपल्याला अजुन काही येते ह्याचा उगाचच अभिमान वाटला. पुन्हा एकदा कॅमरा न आणल्याचा पस्तावा झाला. मला साधाच मोबाईल आवडतो पण आपल्या मोबाईल मध्ये कॅमेरा नाही ह्याच त्यावेळी पहिल्यांदा वाईट वाटलं. दादाच्या मोबाईलवर फोटो काढला पण नंतर कॉपी करायाचा राहिला. नंतर चार दिवसांनी संध्याकाळी अचानक पावसाची बर्‍यापैकी मोठी सर आली त्यात कंदीलाचा काही भाग भिजला.

दुसर्‍या दिवशी भाऊबीज. त्या दिवशी दिवाळीसारखचं बहिणींनी उटण लावलं. आंघोळी नंतर ओवाळणी. मला मोठ्या बहिणीने भाऊबीजेला एक छोटी कढई दिली. माझ्याकडे इथे कढई नव्हती म्हणून मी तिला आधीच सांगून ठेवले होते. फ्रायपॅनमध्ये अंडा बुर्जी तितकीशी चांगली होतं नाही आणि शिवाय डीपफ्राय करण्यासारखं काहीच करता येत नाही. आत्ता कढई आलीय मग अंडा बुर्जी, कांदा-भजी, बेसनचा सुका झुणका, हरा-भरा कबाब हे सगळं बनवता येईल. बनवेन लवकरच. माझ्या स्वयंपाक घरातल्या करमती आणि पाक कौशल्यावर एक पोस्ट होईलच कधी तरी. पाहु लिहायला लवकरच वेळ मिळो. असो तर गोडाधोडाचं खाऊन भाऊबीज साजरी झाली. माझ्या वहिन्याचे भाऊ पण भाऊबीजे निमित्त आपल्या बहिणींकडे म्हणजे आमच्या घरी आले होते. आईला भेटायला माझा मामा देखील आलेला. त्या निमित्ताने आमची पण भेट झाली. भाऊबीज संपली. दिवाळीचे सगळे मुख्य कार्यक्रम पार पडले. आत्ता मस्त आराम. म्हणजे मी गेले चार दिवस फार काम उपसले अश्यातला भाग नव्हता. पण तरी आपलं म्हणायचं. सकाळ संध्याकाळ ब्रेकफास्टपासून रात्रीच्या जेवणापर्यंत काय काय पाहिजे ते फर्मान सोडायाचे आणि हादडायचे हाच एक कलमी कार्यक्रम. अगदीच हुक्की आली तर बाजारात फेरफटका मारायचा. दोन दिवस संध्याकाळी छोटे कंपनीला घेऊन मांडवी बंदरला जाऊन आलो. वाळूत किल्ले बांधले. पुन्हा कॅमेरा नाही!!! भेळ, आइस्क्रीम, कटलेट चोपले. बाकी वडापाव, ढोकळा, मिक्स-भजी ह्या सगळ्यांचा आस्वाददेखील घेऊन झालाचं होता. भावाची छोटी मुलगी होती. तिच्या बरोबर खेळण्यात वेळ चटकन निघून जात होता. ह्या आधी तिला पहिल्यांदा पहिली तेंव्हा ती सहा महिन्यांची होती. नुकतीच बसू लागली होती. आत्ता तर ती दूडू-दूडू धावू लागली होती. वेळ किती भुर्रकन निघून जातो नाही? भाऊ, काका, मामा अशी सगळी नातेवाईक मंडळी मुंबई किंवा पुण्याला. त्यामुळे अधूनमधून त्यांच्या भेटीगाठी आणि रत्नागिरीला येणं जाणं सुरूचं असतं. आम्ही दक्षिणेकडे जाऊन पडावं ही श्रींची इच्छा त्यामुळे मी एकटा तिकडे बंगलोरमध्ये. मुंबईला अगदी जवळचं कुणाचं लग्न असेल तरच जाणं होतं. त्यामुळे गणपती, दिवाळी किंवा मे महिन्यामध्ये जाणं झालं तरच माझी इतरांशी भेट होते. नाहीतर सहा सहा महिने दर्शन नसतं. बघू पुण्याला कधी येणं होतं?

सुट्टीच्या दिवसांपैकी एक दिवस निवडणूक निकालांचा होता. पप्याचा जनसंपर्क एकदम चांगला आहे. गावात कुणाकडे ही अडल्या नडल्यावेळी हा हजर त्यामुळे तो पुण्यात गेल्या पासून त्याची उणीव हल्ली सगळ्यांनाच जाणवते. पोरगं राजकारणात शिरलं तर चांगलं नाव काढेल. तसा तो active आहे सुद्धा. निवडणुकीच्या धामधुमी आधी राष्ट्रवादी आणि शिवसेनेमध्ये स्पर्धा निर्माण करून रस्त्याचे काम करून घेण्यात पप्याचा हात होता. साहजिकच निकालादिवशी पप्या सकाळपासून गायब. मतमोजणी केन्द्रावर हजर होता. रत्नागिरीतून अपेक्षेप्रमाणे राष्ट्रवादीचे उदय सामंत निवडून आले. कार्यकर्ता म्हणून साहजिकच पप्याला पार्टीला आमंत्रण होते. गुहागरला रामदास कदम, विनय नातू आणि भास्कर जाधव ह्या तीन त्रिमूर्तीची चार दिवसापासून फार चर्चा होती. निकालादिवशी भास्कर जाधवांनी बाजी मारली. गुहागर मतदारसंघ फेररचनेमुळे कुणाचं कसे नुकसान झाले, मुंबईत शिवसेनेचे कसे हाल झाले, मनसेने कसा दणका दिला ह्याचीच दोन दिवस चर्चा होती.

ह्या सगळ्या मौजमजेत अचानक एक दिवस उद्या आपल्याला निघायचे आहे हे आठवले. मग फराळाचे पॅकिंग सुरू झाले. काय आहे ना घरी असल्याने नॉन-व्हेज आणि बंगलोरला न मिळणार्‍या गोष्टी खाण्यावार मी भर देतो आणि फराळ वैगरे टिकाऊ पदार्थ घेऊन बंगलोरला येतो म्हणजे इथल्या इडली-वड्यापासून काही दिवस सुटका होते. ऑफीसमधल्या मित्रांसाठी भाकर-वडी आणि कोहाळे पाक घेतला. रविवारी दुपारचा मस्त्याहार करून नेहमीप्रमाणे मनात नसताना दुपारच्या कोल्हापूर गाडीने रत्नागिरी सोडले. कोल्हापूरहून पुन्हा बंगलोरची वोल्वो पकडली. पुन्हा कन्नड चित्रपट. बहुतेक क.रा.प.मंने फक्त कन्नड चित्रपटचं लावायचे ठरवलेले दिसते. परतीच्या प्रवासाबद्दल बाकी काही फार लिहाण्यासारखं नाहीए. हा प्रवास जरा उदासवाणाच असतो. बराचसा झोपेतच जातो.

अश्या प्रकारे यंदाची दिवाळी मस्त खादडण्यात आणि मौज-मजेत गेली. इतकी मोठी पोस्ट होईल असे वाटलेच नव्हते. दिवाळीपेक्षा मत्स्याहाराचीच जास्त चर्चा झाली हा भाग वेगळा. लिहायला बसलो आणि बरचं काही काही सुचतं गेलं. वाटलं तसं लिहीत गेलो. पहिल्यांदाच एवढ्या मोठ्या पोस्ट लिहाल्या आहेत. पहिल्या पोस्टला बर्‍यापैकी प्रतिक्रिया मिळाल्या. बरे वाटले. थोडा हुरूप आला लिहण्याचा. बोअरिंग झाले नसेल अशी आशा बाळगतो.

Saturday, October 31, 2009

यंदाची दिवाळी - भाग १

गुरुवारी १५ ऑक्टोबरला ऑफीसमधून चक्क पळ काढला आणि साडेआठची कोल्हापूरला जाणारी "ऐरावत" पकडली. कर्नाटक सरकार कढून काही घेण्यासारखे असेल तर त्यांची राज्य परिवहन मंडळाची सेवा. अगदी साध्या गाड्यांपासून ते वोल्वोपर्यंत पाहिजे त्या श्रेणीत उत्तम सेवा उपलब्ध आहे. पुन्हा ड्राइवर कंडक्टर (निदान वोल्वोच्या) लोकांना आपल्या ड्राइवर कंडक्टर सारखा माज नाही. नेहमीप्रमाणे बस वेळेवर सुटली. हलतडुलट शहरातील गर्दीतून बाहेर पडायला दोन तास गेले. सगळ सुरळीत सुरू होते आणि कंडक्टरने कधी नाही तो हिंदी ऐवजी चक्क कन्नड सिनेमा लावला. मला उगाचच कुणा एखाद्या कानड्या मुंबईमध्ये चोपला तर नाही ना असे वाटून गेले. मग गाडितला एक "मनसे"वाला पेटला. आपण स्वत: परराज्यात असल्याने त्याने अगदीच मराठीचा नाही तर हिंदीचा हट्ट धरला. पण कंडक्टरदेखील "कनसे"चा निघाला. त्याने मनसेच्या मागणीला फाट्यावर मारून तमाम जनतेला यन्डू सिनेमा पाहायला लावला. मी म्हटले चला कळले नाही तरी निदान नवीन सिनेमा बघायला मिळेल अशी स्वत: ची समजूत करून घेतली. मी इतका होमसीक झालेलो की मला तिथे त्या सिनेमाचा अनुवाद करून सांग असे सांगितले असते तरी मी अनुवाद केला असता. त्यामुळे ही बस कोल्हापूरला जाते आणि मला बुड टेकायाला जागा आहे ह्या दोन गोष्टीवर मी समाधानी होतो. सिनेमाची कथा समजून घेण्यात कुणाला कष्ट पडले नसावेत कारण एकदा का पडद्यावर दिसणार्‍या तमाम नमुन्यानंमधला हिरो कोण हे कळले की मग बाकी काही फारसे उरत नाही. तिथे हीरोइन, इतर पात्र, कथा अशा उगाच गोष्टींना स्थान नसते. तो so called हिरो जाता येता सगळ्याना बडवत असतो. अश्याच एका निरर्थक(?) हाणामारीनंतर सिनेमा संपतो. आत्ता आपल्याला भाषा कळतं नसल्यामुळे आपल्यासाठी तो अचानक संपतो. सुदैवाने गाडी जेवायला थांबल्यावर सिनेमा बंद करण्यात आला तो पुन्हा सुरू झाला नाही. पण मला कळलेल्या एकंदर कथेवरून मी पुढच्या घटनांचा अंदाज लावला होता आणि इथे परत आल्यावर कचेरितल्या कन्नड सहकार्‍याला माझी अंदाज कथा ऐकवली. ती ९०% बरोबर होती. असो...

सकाळी साडे-आठला कोल्हापूरला पोहोचलो. सामान होते बर्‍यापैकी त्यामुळे बाबा गाडी घेऊन कोल्हापूरला न्यायला आले होते. वोल्वो मधून उतरून म.रा.प.म.च्या लाल डब्यामध्ये बसणे म्हणजे रावाचा रंक होण्यासारखा प्रकार. बंगलोर-कोल्हापूर ६००+ किलोमीटरचा प्रवास दोनदा परवडला पण कोल्हापूर-रत्नागिरी १२५ किलोमीटर नकोसा होतो. त्यामुळे सामान गाडीत टाकले आणि महाराष्ट्रात दाखल झाल्याच्या आनंदात बटाटावडा खाऊन रत्नागिरीच्या दिशेने कूच केले. फार ट्रॅफिक नव्हते. छान गार वारा सुटला होता. यंदा पाऊस उशिरापर्यंत पडल्यामुळे अगदी रत्नागिरीपर्यंत नुसती शेतंच नव्हे तर माळरान देखील हिरवेगार होते. साधारण दसर्‍यानंतर ऑक्टोबर हीटमध्ये गवत सुकून जाते त्यामुळे मला दिवाळीला घरी जाताना असे हिरवेगार दृष्य कधीच दिसले नव्हते. जोन्धळ्याची गच्च भरलेली कणसे मस्त डोलत होती. दीड तासाने आंबा घाट लागला. घाटात वळणे घेताना लहानपणीच्या "आला खंडाळ्याचा घाट, तिथे गाडी झाली ताठ" ह्या मजेदार ओळी आठवल्या. आंबा घाटातलं सौंदर्य हिरवाईमुळे अजुनच खुललं होतं. नेमका ह्यावेळी मी कॅमरा घेऊन गेलो नव्हतो. खूप छान फोटो काढता आले असते. एरवी बसमधून जाताना कितीही वाटलं तरी उतरून काही बघता येत नाही. आत्ता गाडी होती तर कॅमेरा नाही. नशिबाने नेहमीप्रमाणे गेम दिलेला. म्हटलं चला पुढच्यावेळी काढू कारण आंबा घाटातनं दिसणारं दृष्य नेहमीच छान असतं फक्त जोन्धळ्याच्या कणसासाठी पुन्हा वर्षभर वाट पाहावी लागेल.

बरोबर एक वाजता घरी पोहोचलो. गेल्याबरोबर पटकन आंघोळ उरकली. घरी एक बरं असतं की जर सकाळी ९-१० नंतर आंघोळ करायची झाली तर चुलीवर पाणी तापवायला लागत नाही. गच्चीवरच्या टाकीतलं पाणी बर्‍यापैकी गरम असतं. आणि तिकडच्या हवेत इतका दमटपणा आहे की गार पाण्याच्या आंघोळीला देखील ना नसते. आंघोळ झाल्याझाल्या लगेच जेवायला बसलो. रिज़र्वेशन केलं त्या दिवशीच बाबांना मला कुठले कुठले मासे आणि Sea Food खायला हवे ते सांगून ठेवले होते. सकाळी मला आणायला कोल्हापूरला जायचं म्हणून बाबांनी आदल्या दिवशीच मासे आणून ठेवले होते. बरेचसे मच्छीमार बांधव मुस्लिम असल्यामुळे शुक्रवारी बाजारात मासे कमी आणि किंमती जास्त असे वातावरण असते. त्यामुळे बाबांना गुरुवारीच मस्त ताजे मासे शुक्रवार/रविवारच्या तुलनेत निम्म्या दारात मिळाले होते. मस्तपैकी कोकेरी आणि म्हाकूल मिळाला होता. कोकेरीचं कालवण + फ्राय आणि म्हाकलाचे मटण होतं. म्हाकूल हा इतर माश्यांप्रमाणे तळून किंवा कालवण करून खाण्याचा प्रकार नाही. त्याचे चिकन सारखे छोटे छोटे तुकडे करून मटणासारखा प्रकार केला जातो. म्हाकूल सहसा मिळत देखील नाही. आणि मुबलक मिळाला तर स्थानिक बाजारात न विकता एक्सपोर्ट केला जातो. चांगली किंमत येते. मला आठवते मी शाळेत असताना माझ्या वर्गातली मच्छीमारांची मुले म्हाकूल मिळायला लागला की रात्री कंदील घेऊन मासेमारीला जायची. हा मासा कंदीलाच्या उजेडाला आत्कृष्ट होऊन येतो आणि लावलेल्या गरीला अडकतो असं ते सांगायचे. आत्ता हा कंदील कसा प्लँट केला जायचा हे माहीत नाही पण ही मुले सीज़नमध्ये म्हाकूल विकून सात-आठशे रुपये कमवायची. त्या स्व:कमाईमधून जीन्स पॅंट, टी-शर्ट अशी खरेदी व्हायची. (मला त्या वेळी आपण फुकट आहोत आणि ह्या पुस्तकांच्या रगाड्यात आपला अमुल्य वेळ घालवतो आहोत असे वाटायचे. आज देखील हीच भावना ऑफीस, काम आणि अश्या अनेक निरर्थक गोष्टी बद्दल टिकून आहे. मी नक्की काय करू शकतो हे मलाच नक्की माहीत नाही त्यामुळे देश एका चांगल्या "कोणाला" तरी मुकला एवढचं सांगू शकतो) इतर वेळी हीच कमाई पडलेल्या कैर्‍या आंबे विकून आंब्याच्या सीज़नमध्ये देखील होते. आणि ह्या म्हाकूल/आंब्याच्या व्यवसायामध्ये स्पर्धा ही घरातच असते. आयस, बापूस आणि मुलं हे सगळे एकमेकांचे प्रतिस्पर्धी. कदाचित त्यामुळे अंबानी-बंधू वाद वैगरे प्रकरणं हे लोक चघळत बसत नाहीत असे मला विश्वसनीय सूत्रांकडून कळले. एकमेकांपासून लपूनछपून, कुरघोडी करून "माल" जमा करणे आणि विकणे. प्रत्येकाचे कस्टमर वेगळे. तर ही झाली म्हाकूल नामक माशाची पाककृतीपासून सुरू झालेली शिकार, शिकारी, मार्केटिंग ते विक्री अशी (उगाच लांबलेली) सुफल संपूर्ण कथा. सांगण्याचा मूळ मुद्दा हा की झक्कासपैकी भाकरी, कोकेरीचे फ्राय + कालवण, म्हाकलाचे मटण आणि भात असे स्वर्गीय भोजन हाणलं. एव्हाना प्रोजेक्ट, स्टेटस, डेडलाइन अश्या क्षुद्र आणि यश्किंचित गोष्टींचा कधीच विसर पडला होता. भ्रमण ध्वनी बंद झाला होता. पुढील १० दिवसाच्या इनिंगची ओपनिंग कोकेरी आणि म्हाकुलाच्या झणझणीत भागीदारीने झाली होती. Non-vegसाठी वखवखलेल्या जिभेला येणार्‍या दिवसात काय काय चाखायला मिळणार याची नांदी मिळाली होती.

जेवणानंतर गप्पा मारत सगळे जरा लवंडलो. आमचं एकत्र कुटुंब असल्यामुळे घरी जाम धमाल असते. विशेष करून गणपतीत तर नोकरी-व्यवसाया निमित्त बाहेर गेलेले सगळे झाडून घरी असतात. २५-३० जण सहज असतात. यंदा प्रथमच मी गणपतीत घरी गेलो नव्हतो. २ दिवसासाठी कशाला जा जा आणि ये ये असं म्हटलं. बंगलोरवरुन घरी जायचं म्हणजे दीड-दीड दिवस प्रवासातच जातो. अमेरिकेतून यायचो तेंव्हा देखील जवळपास तेवढाच वेळ लागायचा. त्यात गणपतीत स्वाइन फ्लूचं प्रस्थ होतं. म्हणून तेंव्हाच दिवाळीत जाऊ चांगली लांबलच्चक सुट्टी घेऊन असे ठरवले होते. नंतर गणपतीच्या दिवसात फार चुकल्यासारखे वाटले ते वेगळे. शेवटी शिमगा, गटारी आणि गणपती ह्या सणांचा आनंद कोकणातला माणूस बाहेर करोडो रुपये खर्चून देखील साजरा करू शकत नाही. आत्ता देखील आईने ह्यापुढे २ दिवस का होईना पण ये, गणपती चुकवू नको असे बजावून ठेवले आहे आहे. संध्याकाळ तशी चकाट्या पिटण्यात गेली. शेजारचा पप्यापण हल्ली शिक्षणानिम्मित्त पुण्याला असतो. तो नुकताच घर सोडून बाहेर पडलाय. त्यामुळे तो तसा महिन्यातून २ फेर्‍या मारतोच. लहानपणापासून घरी मासे-मटण आणि बटाट्याची भाजी ह्याशिवाय काही खाल्लेले नाही. घरात रोज बाकी काही शिजल तरी ह्याच्यासाठी बटाट्याची भाजी. अश्या "राजविलासी आणि घोडा पलंगाशी" थाटात वाढलेला थेट पुण्यात जाऊन पडला. मासे-मटण सोडाच बटाट्याची भाजी देखील दुर्मिळ अशी अवस्था. हल्ली रोज दह्या बरोबर जेवून दिवस काढतो. त्यात गणपतीनंतर मित्राला भेटायला मिरजला गेलेला. नेमकी त्याचवेळी तिकडे दंगल झाली आणि करफ्यु लागल्यानंतर साहेबांनी एक दिवस शिल्लक असलेला चिवडा आणि एक दिवस पूर्ण उपाशी असे दिवस काढले. त्याच्या ह्या सगळ्या कहाण्या ऐकण्यात मस्त टाइम पास झाला. त्या सगळ्यावर कहर म्हणून मी जाऊन काकूना "तुम्ही लहानपणापासून खाण्याच्या बाबतीत ह्याचा जरा छळ केला असतात तर आज ही वेळ आली नसती. आत्ता देखील ह्याला बटाटा सोडून बाकी भाज्या खायला घाला" असे सांगून आलो. बिचारा पप्या माझ्याकडे "साल्या तुला काय माझे चार दिवस सुखात गेलेले बघवत नाय काय" अश्या नजरेने बघत होता. संध्याकाळी मग दिवेलागणी झाल्यावर छोटे कंपनी बरोबर पणत्या वैगरे लावल्या. रात्री पुन्हा उरलेल्या माश्यांना मोक्षप्राप्ती घडवून दिवाळी दिवशी लवकर उठण्यासाठी झोपी गेलो.

Thursday, October 15, 2009

दीपावलीच्या लक्ष लक्ष शुभेच्छा!!!


दीपावलीच्या लक्ष लक्ष शुभेच्छा. आंतरजालावरील तमाम गाववाल्यांना ही दिवाळी सुखसमृद्धीची आणि भरभराटीची जावो.

Monday, September 28, 2009

लतादीदीनां वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा


आज दसरा, साडेतीन मुहूर्ता पैकी एक त्याचप्रमाणे आज स्वररत्न भारतरत्न लता मंगेशकर यांचा वाढदिवस. दीदीनीं आज ८१ व्या वर्षात पाऊल टाकले. सहस्त्र पूर्णचंद दर्शनाचा प्रवास पुरा करत आलेल्या लतादीदीबद्दल मी काय बोलावे. नुकतीच CNN IBN वर त्यांची मुलाखत पहिली. त्यानी आपल्या लहानपणीच्या, गाण्यांच्या अशा अनेक आठवणी सांगितल्या.

दीदी तुम्हाला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा... तुमच्या कर्तुत्वाला सलाम!!!

Saturday, September 26, 2009

'व्हॉट्स युवर राशी'

काल रात्री आशुतोष गोवारीकरचा 'व्हॉट्स युवर राशी' पहिला. मी तसा चित्रपट वेडा नाही पण ठराविक दिग्दर्शक किंवा कलाकारांचे चित्रपट आवर्जून पाहतो. त्यातल्या त्यात आमिर खान, नाना पाटेकर, नसरुद्दीन शहा ह्या कलाकारांचे किंवा आशुतोष गोवारीकर, विशाल भारद्वाज अश्या दिग्दर्शकांचे चित्रपट शक्यतो सोडत नाही. तसं चांगला असेल तर राम गोपाल वर्माचा चित्रपट देखील पाहतो, पण आमिर खान, आशुतोष गोवारीकर अश्या लोकांचे चित्रपट शक्यतो पहिल्या दिवशी पाहतो. दुनियेचा review यायच्या आधी मी आपला रिस्क घेऊन मोकळा होतो. आमिर, आशुतोषने अजुन तरी कधी फार निराशा केली नाही. गेल्या वर्षी 'गजीनी' थेटरला जाऊन पहिला, त्यानंतर गेल्या महिन्यात 'कमिने' ला गेलो होतो. आत्ता काल 'व्हॉट्स युवर राशी' ला गेलो. असो हा झाला माझा थेटर भेटिचा Algorithm.

'व्हॉट्स युवर राशी' बद्दल बोलायचे झाले तर चित्रपट पाहण्यामागे आशुतोष गोवारीकर आणि प्रियांका चोप्रा ही दोन कारणे होती. हर्मन बवेजा हा रिस्क फॅक्टर होता. अपेक्षा भंग झाला की नाही हे मी अजूनही नक्की सांगू शकत नाही. मुलगी पहाणे हा बहुतेक सगळ्या लग्नाळू मुलांच्या आयुष्यातला अविभाजित घटक. (आमचे पण घोडा मैदान दूर नाही. आणि खाजगीत तुम्हाला म्हणून सांगतो मुलगी पहाणे म्हणजे काय हे जरा जवळून समजावून घेता येईल हे चित्रपट पाहण्या मागचे तिसरे कारण). अरेंज मॅरेज असो किंवा प्रेम विवाह, मुलगी पहाणे आलेच. तर असा एक नेहमीचा साधा सरळ विषय फक्त नवीन मांडणी. चित्रपट तसा हलका फुलका आणि विनोदी आहे. बारा राशीच्या बारा मुली प्रियांका चोप्राने छान उभ्या केल्या आहेत. प्रत्येकीचा लुक वेगळा. प्रियांकाची पहिलीच मेष राशी वाली एंट्री आणि त्या राशीचा लुक, मेक अप आणि अभिनय हा बाकी अकरा राषींच्या तुलनेत सरस. फुल्ल टाळ्या!!!
बाकी अकरा खास नाहीत असे नाही. प्रत्येक राशीचे वेगळेपण जपलेले आहे. चित्रपट संपल्यावर देखील प्रत्येक राशीची प्रियांका तिच्या लुक सकट आठवते ह्यातच सगळे आले. अरेंज मॅरेज आणि मुलगी पहाणे ह्या प्रकारमध्ये मुलींना काय काय प्रकारांना तोंड द्यावे लागते, कशा कशाला सामोरे जावे लागते अश्या पारंपारीक रूढी आशुतोष गोवारीकरने कधी विनोदी तर कधी गंभीर पद्धतीने अश्या छान हातालळ्या आहेत. हर्मन बवेजाचे पहिले दोन्ही फ्लॉप चित्रपट मी पाहिलेले नव्हते त्यामुळे तो किती बकवास अभिनेता आहे ह्याची मला तरी कल्पना नव्हती. 'व्हॉट्स युवर राशी'मध्ये तरी तो टोकाचा बकवास वाटला नाही. त्याने बर्‍यापैकी झेपवले आहे. त्याला पाहून हृतिक रोशन आठवतो हे मात्र नक्की. इनफॅक्ट काही वेळा मला इथे हृतिक रोशन असायला हवा होता असे वाटून गेले. रणबीर कपूर पण चालला असता. असो पण हर्मन मुळे चित्रपट असह्य होत नाही हे नक्की.
चित्रपट मध्यंतरापर्यंत मनाप्रमाणे आहे. खरा प्रॉब्लेम सुरू होतो तो गाण्यांमुळे. पहिली मेष रास सोडली तर उरलेल्या अकरा राशीच्या अकरा मुलींचे गाणे आहे. त्यामुळे नंतर नंतर थोडा तोच तोच पणा येतो. २-३ गाणी सोडली तर बाकीची झेपवत नाहीत. ह्यामुळे पूर्ण चित्रपटाची लांबी ४०-४५ मिनिटानी वाढली आणि शेवटी कधी एकदा योगेसला (हर्मनचं चित्रपटातलं गुजराती नाव) पोरगी भेटते आणि चित्रपट संपतो असे होते. सुरुवातीला आवडलेला चित्रपट शेवटी शेवटी आशुतोष गोवारीकरने लोकांसाठी बनवला नसून प्रत्येक मुलीला एक गाणे ह्या न्यायाने तडजोड न करता स्व:त साठी बनवला की काय असे वाटून गेले. हल्ली हिंदी चित्रपट देखील सव्वादोन-अडीज तासात संपतात त्यामुळे साडेतीन तास बसायची राजश्री वाल्यांनी लावलेली जनतेची सवय मोडली आहे. तसे आशुतोष गोवारीकरचेच 'लगान' आणि 'जोधा अकबर' पण साडेतीन तास चालले पण ते अकारण लांबलेले वाटले नाहीत. 'व्हॉट्स युवर राशी' मात्र लांबलेला जाणवतो.
तर गाववाल्यानू माका विचारलाव् तर साताट एक्स्ट्रा गाणी बघीत साडेतीन तास कळ काढलाव तर पिक्चर बघूक हरकत नाय . मनोरंजनाची ग्यारेंटी!!!

Thursday, September 17, 2009

आमच्यावेळी बुवा असे नव्हते...

आमच्यावेळी बुवा असे नव्हते... साधारणपणे वडीलधारी माणसे नवीन पिढीबद्दल बोलू लागली की हे वाक्य हमखास येतेच असे म्हटले तर वावगे नाही ठरणार. मी स्व:तच्या बाबतीत पहिल्यांदा हे उदगार लहानपणी अभ्यास करताना ऐकले. घरी आईला गणिताबद्दल एखादी शंका किंवा गणित सोडवायची पद्धत विचारली की ती काही वेगळ्या पद्धतीने गणित सोडवून दाखवायची. शाळेत काही वेगळी पद्धत शिकवलेली असायची. नक्की कुठली गणिते ते आत्ता आठवत नाही. तसाहि माझा आणि गणिताचा ३६ चा आकडा. मग मी माझ्या पद्धतीने सोडवले की "आमच्या वेळी अशी पद्धत नव्हती" असे ऐकायला मिळायचे. कधी कधी अभ्यासक्रम बदलायचा. काही नवीन विषय असायचे. कधी कधी काही पाठ्यपुस्तकांमधले धडे बदलायाचे. मग ३-४ वर्षे मोठी असलेली भावंडे देखील "आमच्या वेळी असे नव्हते" असे बोलून उगाचचं आमच्यामध्ये ३-४ वर्षाची जनरेशन गॅप निर्माण करायचे.

माझे आई बाबा शाळेत होते तेंव्हा सातवी पास म्हणजे मॅट्रिक आणि सातवी पास झालेल्यानां सरकारी नोकरीसाठी ओढून नेत आणि आम्ही इंजिनियर झाल्यानंतर एक वर्ष काही मिळेल ते काम करत होतो. त्यावेळी निवृत्तीला आलेल्या समस्त जनतेचे "आमच्या वेळी असे नव्हते" असे उदगार पुन्हा एकदा ऐकू आले. हल्ली कोणी पळून जाऊन लग्न केले किंवा रजिस्टर लग्न केले तरी (मानपान हुकलेली) काही टाळकी "आमच्या वेळी असे नव्हते" असे म्हणून नाराजी व्यक्त करतात. माझे काका इंग्रजांच्या काळात पोलिस सेवेत होते. त्यावेळी सायबाच्या कडक शिस्तीत काम केलेले. कामासाठी मैलोन मैल चालत फिरलेले. ते हल्लीच्या पोलिसांचा फिटनेस आणि कारभार पाहून "आमच्या वेळी असे नव्हते" असे बरेचदा म्हणत.

पुर्वी म्हणजे अगदी १९९५ पर्यंत म्हणा, मुंबईला असलेल्या काका आणि भावाची खुषालीची पत्रे यायची. आमच्याकडे तेंव्हा टेलिफोन ही नव्हता. तेंव्हा टेलिफोन हा ठराविक लोकांकडे किंवा पूर्ण गावात एक-दोन जाणांकडे असे. टेलिफोन म्हणजे चैनीची वस्तूचं होती. नंबर लावल्यानंतर घरी यायला काही वर्षे लागायची. पण आज गावी गेलो की कट्ट्यावर लोक आपापल्या मोबाइल वर रिंगटोन वाजवत नाहीतर गेम खेळत बसलेले असतात. मोबाइलच्याच बाबतीत बोलायचे झाले तर एके काळी ज्या उच्चभ्रू लोकांकडे मोबाइल होता ते इनकमिंगचे देखील पैसे मोजत होते. मोबाईल असणे म्हणजे एक स्टेटस होते. आज चिंधी-चोर, सोम्या-गोम्याकडे हायएण्ड मोबाइल पाहून एकेकाळचे उच्चभ्रू लोक "आमच्या वेळी असे नव्हते" असे म्हणून हळहळत असतील.

तसही हल्ली "आमच्या वेळी असे नव्हते" असे म्हणायला दोन पिढ्यांचे अंतर किंवा वयाने फार मोठे असणे जरूरी राहीले नाही. हल्लीच्या झटपट (सबकुछ ट्वेंटी-ट्वेंटी) युगात जनरेशन-गॅप देखील झपाट्याने कमी झालीय. वीस वर्षात केवळ ५२ कसोटी सामने खेळणारे सर डॉन ब्रॅडमन आज वीस वर्षात सचिन तेंडुलकरला १५९ सामने खेळताना बघून "आमच्या वेळी असे नव्हते" असे नक्कीच म्हणाले असते. हेल्मेटशिवाय विंडिजच्या तोफखान्याचा सामना केलेले सुनील गावसकर आजच्या सुविधा पाहून "आमच्या वेळी असे नव्हते" असे म्हणत असतील. कींबहुना कसोटी आणि एकदिवशीय सामने खेळून आज ट्वेंटी-ट्वेंटीचा थरार पाहता सचिन, गांगूली आणि द्रविड "आमच्या वेळी असे नव्हते" असे मनातल्या मनात म्हणत असतील. फार कशाला आम्ही जेंव्हा इंजिनियरिंगच्या पहिल्या वर्षाला होतो तेंव्हा आम्हाला सेमिस्टरला ८ असे वर्षाला १६ विषय होते. पण आम्ही शेवटच्या वर्षाला गेलो आणि अभ्यासक्रम बदलला. नवीन अभ्यासक्रमानुसार पहिल्यावर्षी १६ ऐवजी १० विषय झाले. त्यावेळी आम्ही आयुष्यात पहिल्यांदा "आमच्या वेळी असे नव्हते" हा डायलॉग मारला होता.

हल्ली सगळं वह्या-पुस्तके, दप्तर, अभ्यासक्रम, मोबाइल(आमच्यावेळी खिशात फणी असायची तसा हल्लीच्या शाळकरी मुलांकडे मोबाइल असतो), फॅशन इतक्या भराभर बदलतं की २ वर्षाचं अंतर असणार्‍या भावंडामध्ये जनरेशन गॅप दिसते. जरा मोठं भावंड दुसर्‍याकडे पाहून "आमच्या वेळी असे नव्हते" असे म्हणते. मी स्व:त देखील माझ्या लहानपणी आमच्या गावात जी मज्जा केली,
काजू-कैर्‍या-करवन्दं पाडून खाल्ल्या, दिवाळीत किल्ले बांधले, तासाला १ रुपया देऊन सायकल भाड्याने घेऊन शिकलो, समुद्र किनारी वाळूत किल्ले बांधले, कुर्ल्या पकडल्या अश्या एक ना अनेक उचापती केल्या, पण माझ्यापेक्षा फार फार तर १० वर्षानी लहान भावंडानी ह्यातील निम्म्या गोष्टीचा देखील आनंद लुटला नाही कारण मधल्या १० वर्षात गाव बदलला, घरी स्व:त ची सायकल आली, काजू-कैर्‍या पुर्वी सारख्या लागेना झाल्या, समुद्र किनार्‍यावर गर्दी वाढली. हल्ली तर तिथे कोणीतरी हॉटेल बांधतोय म्हणे. उद्या माझ्या मुलांना ह्यातील किती गोष्टी चित्रात दाखवून आमच्या वेळी असं होतं असे सांगावे लागेल कुणास ठाऊक? पण हे असेच सुरू राहाणार. जनरेशन गॅप एक दिवस दिवसावर येऊन ठेपेल आणि लोक "आमच्या वेळी" ऐवजी "काल" असे नव्हते म्हणून नाक मुरडतील. तो दिवस दूर नाही कारण चार महिन्यापूर्वीचा 'मी' तूरडाळ खरेदी करताना आजच्या 'मी' ला "आमच्यावेळी असं नव्हतं" असे हळूच म्हणतो...

Wednesday, September 2, 2009

एक उनाड दिवस

आज पहिल्यांदा ऑफीसला दांडी मारुन घरी बसलो होतो... तशी उगाच दांडी नाही मारली. काल येताना भिजून आलो. रात्री बर्‍यापैकी थंडी पण होती. रात्री कधी कोणास ठाऊक पण जरा अंग दुखु लागले. सकाळी उठावेसे वाटत नव्हते. उगाचच किंचित अशक्त झालोय असे वाटून गेले. उठून पाणी अंगावर घ्यावे असे बिलकुल वाटत नव्हते. म्हटलं जाऊ दे.... आज आराम करू. तसही कालच टेस्टटीमने वेचून काढलेला संगणक प्रणालीतला एक मोठा सूर्याजी पिसाळ(Bug) ठेचून मारला होता. मग काय ह्या आठवड्याच्या स्टेटस रिपोर्टची सोय झाली होती. पडल्या पडल्या गेल्या वर्षी पाहिलेला अशोक सराफचा "एक उनाड दिवस" चित्रपट आठवला. त्यात म्हटल्याप्रमाणे आयुष्यात एक दिवस वेगळे जगून बघावे, आयुष्य पाच वर्षानी (की दिवसांनी???) वाढते म्हणे. म्हटले चला मारू दांडी... आयुष्य वाढो वा न वाढो आज जरा मज्जा करू. तसाच पडून जरा टी व्ही पहिला. मग आरामात उठून बाहेर जाऊन दूध, पाव, अंडी आणि बारीक-सारिक सामान घेऊन आलो. बाहेर अजूनही पावसाळी वातावरण आणि थंडी होतीच. मस्त ओम्लेट पाव आणि हळद टाकून ग्लासभर गरमा गरम दूध असा मस्त नाश्ता झाला. टाइम्स वाचून झाल्यावर आंतर जाला वर मटा आणि लोकसत्ताचे वाचन झाले. बुधवारचा Times Ascent पण चाळून झाला. साला अजुन मार्केटमध्ये अंबूजा सिमेंट (बोले तो जान) नाही आलेली. जोपर्यंत ईंन्फोसिसची चार थोबाडं पहिल्या किंवा शेवटच्या पानावर दिसत नाहीत तोपर्यंत मार्केट काही स्थिरस्तावर होत नाही. मग मराठी ब्लॉग वर चक्कर टाकली. गेले आठवडाभर तसं सवडीने काही वाचता आलं नव्हतं. आज मस्त निवांतपणे नवे जुने ब्लॉग वाचून काढले.
मग पुन्हा एकदा बल्लव अंगात संचारला आणि मटार भाताचा कूकर लावला. एकदाच दोन वेळा पुरेल इतकी सामुग्री कूकर मध्ये कोंबली. रात्रीच्या जेवणाचा ताप नको, अगदीच मूड आला तर कूळथाचे पीठले करू असा दूरदर्शी विचार त्यामागे होता. दुपारी पहिल्या ट्वेंटी ट्वेंटी विश्वचषकामधला भारत इंग्लंड सामन्याचे पुन: प्रक्षेपण सुरू होते. मटारभाताबरोबर युवराज सिंगच्या ६ चेंडुत ६ षटकारांची मेजवानी घडली. नंतर थोडी फार ताणून दिली. संध्याकाळ मात्र जरा बोरं गेली. इतर वीकेंड प्रमाणे कोणी गर्लफ्रेंड असती तर बरे झाले असते असे आजदेखील वाटून गेले. तरी बाहेर जरा फेर फटका मारुन आलोच. लहानपणी आजारपणाचे कारण सांगून शाळा चुकवली की दुपारी जेवणाच्या वेळी आणि संध्याकाळी शाळा सुटताना आपण कोणाला दिसणार नाही ह्याची खबरदारी घ्यावी लागत असे. शाळा अगदी २ मिनिटांच्या अंतरावर होती. शाळेतली मुले आणि शिक्षक आमच्या घरावरूनच पुढे जात त्यामुळे त्यांना जाता येता आपण दृष्टीस पडू नये ही धडपड असायची. आत्ता मात्र ऑफीस जवळ असले तरी ही चिंता नाही. त्यामुळे मनमोकळेपणाने भटकता आले. आल्यावर पुन्हा टी व्ही. त्यात दुपारपासून आंध्र प्रदेशच्या मुख्यमंत्र्यांचे हेलीकॉपटर सकाळपासून गायब असल्याच्या बातम्या येऊ लागल्या. ही ब्रेकिंग न्यूज़ जरा नवीन आणि हटके असल्यामुळे प्रत्येक न्यूज़ चॅनेलवाले वेगळ्या प्रकारे न्यूज़ कव्हर करण्याचा केविलवाणा प्रयत्न करत होते. दुपारपर्यंत आंध्रप्रदेशपर्यंत सीमित असलेली बातमी संध्याकाळपर्यंत राष्ट्रीय बातमी होऊन गेलेली त्यामुळे जरा गांभीर्य वाढले होते. पुन्हा एकदा देशातील सुरक्षाव्यवस्था आणि तांत्रीक बाबतीतील प्रगती ह्यावर प्रश्नचिन्ह उभे राहीले. आजपर्यंत सामान्य माणूस भोगत होता पण आत्ता हे मुख्यमंत्र्यांच्या स्तराला पोहचले आहे. अजुन तरी काही तपास लागलेला नाही. त्यातल्या त्यात सत्तधारी पक्षाने ही विरोधी पक्षाची चाल आहे अशी वक्तवे केली नाहीत हे नशीब. असो ह्यावर एक वेगळी नोंद होईल.
बाकी सध्या श्रीलंका-न्यूझीलंड ट्वेंटी-ट्वेंटी सामना पाहतो आहे. रात्री पुन्हा ऑस्ट्रेलिया-इंग्लंड ट्वेंटी ट्वेंटी सामना होईलच. मधल्या वेळेत दुपारच्या मटारभाताचा समाचार घेऊन गादीवर टेकलो की कुठेही उनाडक्या न करता साजरा केलेल्या एका उनाड दिवसाची सांगता होईल.

Wednesday, August 26, 2009

बाल्या डान्स, जाकडी नृत्य आणि हरीनाम सप्ताह

गणेशोस्तव आला की आठवतात त्या आरत्या, बाल्या डान्स आणि जाकडी नृत्य. बाल्या डान्स आणि जाकडी नृत्य ही नावं बर्‍याच लोकांना नवीन असतील. कोकणातील नामशेष होत जाणार्‍या संस्कृती आणि कलांपैकी ही दोन नावे. कोकणात हा प्रकार अजूनही काही गावात प्रचलित आहे. ह्यात जण ढोलकी घेऊन बसतात आणि काही लोकं ह्यांच्याभोवती फेर धरून नाचतात. नाचणार्‍यांच्या एका पायात घूंगरू बांधलेले असतात. जसं जसा नाच पुढे सरकत जातो तसं तसा नाचण्याचा आणि फेर धरण्याचा वेग वाढत जातो. मज्जा येते पाहायला. नाचताना उडत्या चालीची गाणी (पारंपरिक गाणी, हिंदी नव्हे) म्हणतात. हल्ली हे कलाकार फार नाही राहीले. पोटापाण्यासाठी बरेच लोकं मुंबईची वाट धरतात आणि गावाची नाळ हळू हळू तुटत जाते. कलियुगात दुष्काळ, भ्रष्टाचार आणि स्वाइन फ्लू अशा अवकळा लवकर पसरतात पण ह्या सगळ्यात बाल्या डान्स आणि जाकडी अश्या कला कधी नष्ट होऊन जातात हे कळत देखील नाही.

गणेशोस्तवा आधी श्रावण महिन्यात गावातल्या देवळात हरीनाम सप्ताह असायचे. श्रावण महिन्यात देवधर्माचे जास्त कार्यक्रम असण्याचे अजुनएक कारण म्हणजे पुर्वी पावसाळा वेळेवर सुरू व्हायचा. मग जून-जुलै मध्ये शेतीची कामे संपली की लोक रिकामेच असायचे दसर्‍यापर्यंत. मग त्यात श्रावण महिन्यात गावातल्या देवळात सप्ताह बसायचे. ह्यात गावातल्या वाड्या (आळी) सहभागी व्हायच्या. प्रत्येक वाडीला ३तास याप्रमाणे दिवसाच्या २४ तासाचे विभाजन व्हायचे. असा पूर्ण आठवडा मंदिरात अहोरात्र हरीनामाचा गाजर चालत असे. सप्ताह दरम्यान अभक्ष्य भक्षण आणि प्राशन बंद असे. पूर्ण सप्ताह गावातल्या बेवड्याची तोंडे बघण्यासारखी होतं असत. भजनात पण मज्जा येई. तीन तास भजन म्हणजे नाही म्हटल तरी लांबायाचेच. मग आधून मधून लोकांमध्ये जान आणण्यासाठी "जंजिरा पाण्यामध्ये किल्ला, शिवाजी आत कसा शिरला", "यमुनेच्या तिरी काल पाहिला हरी, कान्हा वाजावतो बासरी" अशी "जोश" भजने म्हटली जात. यासाठी खास टाळ आणि घंटानाद केला जाई. अधून मधून भजन म्हणणारा एखाद्या ओळी वर जरा जास्त रमला किंवा काही कीडा करून आपली गायकी दाखवू लागला की जमलेल्या कोरसमधून "वा बुवाsss" अशी शाल जोडीतील दाद येत असे. दाद देणार्‍याला वयाची मर्यादा नव्हती. २री ३री तले शेंबडे मूल देखील ही दाद देऊ शकत होते. फक्त खार्‍या हवेतील खोचकपणा अंगात हवा मग झाले. आम्ही देखील जमेल तशी शाळेला दांडी मारुन देवळात जात असु.आमच्यासाठी खास आकर्षण म्हणजे विणेकरी. देवळात गाभार्‍यासमोर लोक दोन रांगा करून भजन म्हणत उभी असतात. गाभार्‍याकडे तोंड करून तबला-पेटीवाले उभे रहातात. त्यांच्या आजूबाजूला भजन म्हणणारे. ह्या सगळ्यांच्या मधोमध एक जण वीणा घेऊन मागे पुढे फिरत असे. दर्शनाला येणारे सर्वजण विणेची देखील पूजा करतात, विणेकार्‍याला नमस्कार करतात. विणेकरी होण्यासाठी आम्हा मुलांची जोरदार शर्यत असे. लोक आपल्याला एवढा मान देतात, आपल्याला नमस्कार करतात हे म्हणजे आम्हाला काहीतरी आड्स (आड्स म्हणजे अचाट, सही, फंडू इत्यादी इत्यादी...) वाटे. सगळ्यात महत्वाचे म्हणजे आमचे शाळेतले गुरुजी, बाई, हेडमास्तर हे देखील देवळात आल्यावर विद्यार्थ्यासमोर झुकत असत. आज हे सगळं आठवलं की हसू येतं, पण आजच जीवन पहिलं की वाटत यार आपण लहानपणीचं भरभरून जगलो. आत्ता बस्स श्वास सुरू आहे. सगळं कसं यांत्रीक आणि साचे बद्ध होऊन गेलय.

Sunday, August 23, 2009

औसी की तैसी

आपला तर बुवा बरेच दिवसांनी मस्त वीकेंड साजरा झाला... कांगारूंची औसी की तैसी करून इंग्लंडने मानाची अॅशेस पटकावली. गेले काही दिवस आपण जेव्हा गणपतीबाप्पाच्या स्वागताच्या तयारीत गूंतलो होतो तेव्हा इंग्रज कांगारूंच्या विसर्जानाची तयारी करत होते. गेली काही वर्षे घरघर लागलेल्या ऑस्ट्रेलियन टीमला आज पुन्हा एकदा तडाखा बसला. क्रिकेटवर जवळपास दोन दशकं अधिराज्य गाजवल्यानंतर त्यांना असा काही माज आला होता की बास रे बास. स्टीव वॉ ने सुरू केलेली हुकुमत पॉंटिंगने पुढे चालू ठेवली होती. अर्थात ज्या टीम मध्ये ग्लेन मॅकग्राथ, गिलख्रिस्त, शेन वॉर्न, लॅंगर असे खेळाडू आहेत ती टीम कुठेही जिंकेल ह्यात काही वाद नव्हता. पण जसजसे हे सगळे दिग्गज हळूहळू निवृत्त झाले तसतशी ऑस्ट्रेलियन साम्राज्याला उतरती कळा लागली. त्यातच बरेचसे ऑस्ट्रेलियन खेळाडू माजले होते. उद्धटपणा आणि गुर्मी मैदानाबाहेर आणि मैदानात ही दिसू लागली होती. सगळ्यात पहिल्यांदा सौरव गांगूलीच्या संघाने त्यांना जमिनीवर आणले होते. त्यानंतर सुद्धा भारतीय संघाने जेव्हा जेव्हा कांगारूंशी सामना केला तेव्हा त्यांना जेरिला आणले होते. ह्याच वर्षी दक्षिण आफ्रिकेने त्यांना ऑस्ट्रेलियामध्ये घरच्या प्रेक्षकांसमोर पाणी पाजले होते. त्यानंतर नुकत्याच झालेल्या ट्वेंटी-ट्वेंटी विश्वचषकामध्ये कांगारू पहिल्याच फेरीत झाले होते. हरभजनने माकड नाही म्हटले तरी सायमंड्सने "आधीच सायमंड्स त्यात दारू प्यायला" ही म्हण खरी करून दाखवली.

आत्ता देखील अॅशेस मालिकेसाठी कांगारूंनी इंग्लंडमध्ये पाऊल ठेवताच प्रथेप्रमाणे इंग्लंडच्या खेळाडूवर काही ना काही शेरेबाजी सुरू केलीच होती. खरं तर मालिकेच्या सुरुवातीला इंग्लंड चा संघ मालिका जिंकू शकेल असे मला तरी वाटले न व्हते मालिका सोडाच पण एखादा सामना देखील जिंकेल की नाही ह्या बद्दल शंकाच होती. मायकेल वॉसारखा अनुभवी खेळाडूने निवृत्ती घेतलेली. फ्लिन्टॉपदेखील दुखापतीनी बेजार. त्यात पहिल्या सामन्यानंतर केविन पीटरसन मालिकेबाहेर पडलेला. अश्या एक ना अनेक कटकटी असून देखील इंग्लंडने दुसरा सामना जिंकला. तिसरा सामना कांगारूंसाठी मायकल क्लार्कने वाचवला. चौथ्या सामन्यात कांगारूंनी इंग्लंडचा साफ चोथा करून टाकलेला. चौथ्या सामन्यात कांगारूनी ज्या रीतीने पुनरागमन केले ते पाहून शेवटच्या निर्णायक सामन्यात इंग्लंडने सामना वाचवून मालिका बरोबरीत सोडावली तरी खूप झाले असे वाटत होते. पण इंग्लिश खेळाडूनी ही विश्वचषक किंवा IPLपेक्षा अॅशेस जास्त मोलाची असा निर्धार करून पण आज मालिका २-१ अशी काबीज करून कांगारूंचे मनसुबे पूर्णपणे उधळून लावले. संपूर्ण मालिकेत हेडन, लॅंगर, गिलख्रिस्तशिवाय ऑस्ट्रेलियन फलंदाजी आणि ग्लेन मॅकग्राथ, शेन वॉर्न, ब्रेट लीशिवाय गोलंदाजी अगदीच मिळमिळीत दिसली. एखाद दुसर्‍या सामन्यात जॉनसन, मायकल क्लार्क आणि सायमन कॅटीच सोडले तर कुणीही प्रभाव पाडू शकला नाही. इंग्लंडने २००५ प्रमाणेच पुन्हा एकदा गेलेली अॅशेस परत मिळवलीच पण कांगारूना अनेक वर्षानंतर कसोटी क्रिकेटमध्ये प्रथमच चौथ्या क्रमांकावर नेऊन बसवले. त्याचबरोबर २००५ची अॅशेस गाजवणारा अँड्रू फ्लिन्टॉप देखील सन्मानने कसोटी क्रिकेट मधून निवृत्त झाला. Bravo...

ह्या सगळ्यात रिकी पॉंटिंगचे थोबाड बघण्यासारखे होते. गेली काही वर्षे जी काही गुर्मी आणि माज घेऊन तो वावरत होता तो आज पूर्णपणे उतरलेला दिसला. बरेचदा सचिन, लारा अश्या खेळाडूंशी तुलना करताना २ वेळा विश्वचषक उचलणारा पॉंटिंग वरचढ ठरतो. एक फलंदाज म्हणून पॉंटिंग नक्कीच श्रेष्ठ आहे पण स्टीव वॉनंतर तो आजवर कप्तान म्हणून जो काही नावरूपाला आला तो केवळ ग्लेन मॅकग्राथ, गिलख्रिस्त, शेन वॉर्न, लॅंगर असे खेळाडू दिमतीला होते म्हणूनचं. मला स्व:तला तर ऑस्ट्रेलिया हरली पण त्याचबरोबर ती पॉंटिंगच्या नेतृत्वाखालीखाली इंग्लंडमध्ये सलग दुसर्‍यादा हरली ह्याचा जास्त आनंद आहे. आत्ता सगळ्यात मज्जा येणार आहे ती पुढील काही दिवसात. पंटर आणि कंपनीवर ऑस्ट्रेलियन निवड समिती, माजी खेळाडू आणि मुख्य म्हणजे प्रसार माध्यमं उभी-आडवी चढतील. बहुतेक पॉंटिंगचे कर्णधारपद देखील जाईल. Ashes संपली आणि आत्ता पाळी आहे पंटर आणि कंपनीच्या ASS'es ची. काय मंडळी??? खरा की नाय???

Thursday, August 20, 2009

आमदार दुष्काळग्रस्तांना देणार चक्क २० टक्के पगार ???

पक्षाध्यक्ष सोनिया गांधी यांनी गेल्या आठवड्यात, पक्षाच्या प्रत्येक लोकप्रतिनिधीने आपल्या पगारातील २० टक्के रक्कम दुष्काळग्रस्तांसाठी द्यावी असा आदेश दिला. आत्ता २० टक्के म्हटल्यावर आपल्यालाही वाटेल की बाबा काही समाधानकारक रक्कम जमा होईल. पण आत्ताच महाराष्ट्र टाइम्स मध्येखालील बातमी वाचली.

"पक्षाध्यक्ष सोनिया गांधी यांनी गेल्या आठवड्यात, पक्षाच्या प्रत्येक लोकप्रतिनिधीने आपल्या पगारातील २० टक्के रक्कम दुष्काळग्रस्तांसाठी द्यावी असा आदेश दिला. याचे स्वागत महाराष्ट्रातील काँग्रेस आमदारांनी करायला हरकत नाही. कारण त्यांना पगार मिळतो अवघा २००० रूपये. यापैकी २० टक्के म्हणजे ४०० रूपये देण्यास त्यांची काहीच हरकत नसणार. इतक्या कमी पगारात आमदारांचे कसे काय भागत असणार असा प्रश्ान् सामान्य मतदाराच्या मनात आला असणार. यावर आमदाराला मिळणारे भत्ते ही पगारापेक्षा कितीतरी अधिक असतात. उदाहरणच द्याचे झाले तर, टपाल खर्चासाठी महिना ७५०० रूपये, वाहन भत्ता २५,००० रूपये, टेलिफोन भत्ता दरमहा ८००० रुपये, इतर भत्ते १५०० रूपये आणि पीएचा पगार ८००० रूपये आमदाराला मिळतात. याखेरीज, अधिवेशनाला आणि सभागृहाच्या समितीच्या बैठकीला उपस्थित राहील्यास दरदिवसाला पाचशे रूपये इतका भत्ता दिला जातो.
हे सर्व भत्ते करमुक्त असतात आणि मिळणारे २००० रूपये मासिक वेतन आयकराच्या जाळयात येत नाही." (संदर्भ - महाराष्ट्र टाइम्स)

सर्वसामान्य माणसाला कसं उल्लू बनवला जातं ह्याच अजुन एक उदाहरण. लगे रहो... कारण ह्या बातमीने देखील काहीच फरक पडणार नाही. उलट हा ४०० रुपयाचा निधी अजुन एखादा भत्ता निर्माण करून वसूल केला जाईल. जय हो!!!

Tuesday, August 11, 2009

अजुन एक स्वातंत्र्यदिन...

आज १५ ऑगस्ट... अजुन एक स्वातंत्र्यदिन. सालाबादप्रमाणे आज आपला सगळ्यांचा देशाभिमान जागृत होणार. काल परवापासून सिग्नलला मिळणार्‍या झेंड्याची खरेदी झाली असेलच. मी शाळेत असताना कागदी झेंडे मिळायचे पण हल्ली प्लास्टिकचे मिळतात. दुसर्‍या नाहीतर तिसर्‍या दिवशी जनतेचा देशाभिमान फूटपाथ, रस्ता आणि कचर्‍याकुंड्या अश्या ठिकाणी दिसू लागतो. देशाभिमान टिको ना टिको पण हे झेंडे जास्त टिकतात. आणि मग एक दिवस इतर प्लास्टिकच्या कचर्‍याबरोबर सगळे समुद्रात जाते. पुढच्या पावसाळ्यात एखाद्या वादळी दिवशी समुद्र हा सगळा आहेर तुम्हाला परत देतो. (यंदा मुंबई मध्ये आलेल्या अजस्त्र लाटांनी साडे सहा लाख टनाचा प्लास्टिकचा कचरा साभार परत केला).

हे झाले झेंड्या बाबत. मग देशभक्तिपर चित्रपट पहिल्या शिवाय स्वातंत्र्यदिन पूर्ण होणे शक्यच नाही. तसं ही हा पूर्ण आठवडाच "आजादी का जश्न" म्हणून बहुतेक वाहिन्यानी गाजवला असेलच पण खास स्वातंत्र्यदिना निमित्त राखीव म्हणून बॉर्डर, भगत सिंग, क्रांतीवीर, रंग दे बसंती असा बर्‍यापैकी देश भक्ति उफाळुन आणणारा चित्रपट ठेवलेला असतोच. यंदाचे खास आकर्षण "A Curious Case of" स्लमडॉग मिलेनीयर आहे.

त्याचप्रमाणे यंदा आपल्याकडे श्रियुत कसाब खास पाहुणे म्हणून आहेतच. त्यांच्याबरोबरीने मुंबई बॉम्बस्फोटप्रकरणी नुकतेच फाशी जाहीर झालेले तिघं देखील एखाद्या कार्यक्रमाला उपस्थिती लावू शकतात. बरं फाशीचा दुसरा अर्थ भारतात जन्मठेप असा आहे. कारण फाशीची शिक्षा झालेला गुन्हेगार हा अतिशय उत्तम आरोग्यदायी आयुष्य भोगून नैसर्गिक रित्या मरतो. उत्तम उदाहरण म्हणजे अत्यंत क्रूरपणे लहान मुलांच्या हत्या केलेली अंजनाबाई तुरुंगात शांतपणे मेली. तिकडे अफजल गुरू फाशीची वाट बघत बसलाय आणि नुकतेच गेल्या आठवड्यात मुंबई बॉम्बस्फोटातील तिघांना वेटिंग लिस्ट टाकलाय. हे लोक एवढे माजले आणि निर्ढावले आहेत की ह्यांना जेवणात मासे-मटण हवे. तो कसाब म्हणे शाकाहारी जेवणाचे ताट फेकून देतो. हे सगळं वाचून अशी काही सणकते की काही विचारू नका. आपले सैनिक, पोलिस जिवावर उदार होऊन लढतात, आपले प्राण गमावतात आणि आपला कायदा कसाब सारख्याला वर्षानुवर्षे खटला चालवत, त्याला हवे नको ते बघत पुढच्या हल्ल्याची वाट बघत राहतो. बॉम्बस्फोट होऊन गेले की पुन्हा सगळा सिनेमाची स्क्रिप्ट लिहाल्यासारखे. तेच तेच Dialoges, आलटून पालटून त्याच त्याच जिहादी संघटनांचे जबाबदारी स्वीकारल्याचे कबुलीजवाब, आपल्या हिजड्या राजकारण्याची घटना स्थळाला भेट आणि "हे खपवून घेतले जाणार नाही, चोख प्रत्तुत्तर दिले जाईल" अशी (ही धमकी बर का) दरवेळची टेप. जखमीना ५० हजार आणि मेलेल्याना ५ लाख. मिळतात की नाही कोणास ठाऊक. ते स्वत: जखमी झाल्याशिवाय कळणार नाही. मेलो तर कळण्याचा प्रश्नच नाही म्हणा. मला तर डाउट आहे की जस सरकारी घर योजना मंत्रीसंत्री लोकांच्या नातेवाईका ना मिळतात तसे हे पैसे पण हेच लोक "आम्ही मेलो" असे दाखवून खात असतील. ह्या साल्यानी सामान्य माणसाचे जीवन स्वस्त आणि जगणे महाग करून ठेवले आहे.

वपु काळ्यांचे एक पुस्तक आहे "आपण सारे अर्जुन". जरूर वाचावे असे पुस्तक आहे. त्यात वपुनी म्हटले आहे "पेपरात रोज भ्रष्टाचार, खून दरोडे आणि इतर मनस्ताप देणार्‍या बातम्या वाचून प्रत्येक घरात, प्रत्येक मनात एक ठिणगी पडते आणि विझून जाते. ज्या दिवशी ह्या ठिणग्या घरात न विझता बाहेर येतील तेंव्हा सगळ्या वाईट प्रवृती, राजकारणी जाळूनच पुन्हा घरात जातील." पण दुर्दैवाने ह्या ठिणग्या कधीच एकत्र येत नाहीत. आणि येणार तरी कश्या? सरकारने व्यवस्थाच अशी करून ठेवली आहे की प्रत्येकाला जीवनावश्यक वस्तूसुद्धा दररोज धावपळ करून अक्षरशहा जमवव्या लागतात. मग ते दूध असो किंवा स्वयंपाकाचा गॅस, भाजी असो वा पेट्रोल. कधी त्यात भेसळ तर कधी वाहतूकीच्या संपामुळे तूटवडा. ह्या सगळ्यात सामन्या माणसाला इतका गुरफटवून टाकलेला आहे की त्याला समाजात सोडाच घरात पण घरात पण पुरेसे लक्ष्य द्यायला वेळ मिळत नाही. बिचारा बॉम्बस्फोट झाले तरी दोनवेळच्या जेवणासाठी पुन्हा कामावर हजर होतो. तीच गर्दी, तीच धावपळ. बॉम्बस्फोटातून वाचला तर आज वाचलो म्हणून दुसर्‍या दिवशी पुन्हा संध्याकाळी सुखरूप घरी येण्याची आशा धरून पोटासाठी बाहेर पडतो. नाही पडला तर संध्याकाळी काय खायचे हा प्रश्ना आहेच. ह्याला "मुंबई स्पिरिट" म्हणून खपवले जाते. प्रत्येक जण दररोज रात्री दत्ताजी शिंदे असल्याप्रमाणे "बचेंगे तो और भी लढेंगे" म्हणून झोपी जातो.


स्वतंत्र दिनाकडे एक सुट्टी म्हणून पहिले जाते. यंदा तर १५ ऑगस्ट शनिवारी आला आणि त्यामुळे सुट्टी किंवा संभावीत Long Weekend फुकट गेला असा सूर जास्त होता. चालायचेच. अर्थात ह्यात आपण सगळेच येतो. कुणालाही दोष देण्याआधी आपण किती जबादारीने वागतो ह्याचा विचार केला पाहिजे. मी स्वत: देखील बर्‍याच गोष्टी चुकीच्या आहेत हे माहीत असून देखील दुनिया करते म्हणून करतच असतो. चौकट मोडायची हिंमत नाही. पण दुसर्‍याने मात्र बरोबर वागावे ही अपेक्षा. ह्या सगळ्या मुळे वेनस्डे आणि डोंबिवली फास्ट सारखे चित्रपट मनाला भावतात. आपण कुठेतरी स्वत:ला पडद्यावर पाहत असतो. असो तर. लिहाण्यासारखे खूप आहे पण मी असाच उगाच भरकटत जाईन. लिहायला काही वेगळेच बसलेलो आणि उतरलं काही भलतचं. विषय कुठून कुठे गेला. त्यामुळे बराचसं विस्कळित आहे...

चला तर, गाववाल्यानू तुम्हा सगळ्यांका स्वातंत्र दिनाच्या खूप खूप शुभेच्छा... भारत खराखुरा स्वतंत्र होवो, आणि त्यासाठी आपला खारीचा तरी वाटा असो ही मनोकामना...

H1N1: दुष्काळात तेरावा महिना

ह्या वर्षाची सुरूवात मंदीच्या विषयाने झाली. महागाई वैगरे चिल्लर विषय होतेच नेहमीप्रमाणे. मग सालाबाद प्रमाणे हळूहळू पावसाळ्याची भाकितं सुरू झाली. 26 जुलैची पुनरावृत्ती होऊ नये केलेली उपाय योजना पाहून घाबरलेला पाऊस पडलाच नाही. दुष्काळ तोंडावर आला तर स्वाइन फ्लूची भर पडली. दुष्काळात तेरावा महिना म्हणतात ते ह्याला.
आपल्याकडची सुरक्षा व्यवस्था म्हणजे आधीच बोलायची सोय नाही. कुठेतरी बॉम्बस्फोट झाला की त्यानंतरचे दोन दिवस बस स्थानक, रेल्वे स्टेशन अशा ठिकाणी अगदी कसून तपासणी असते. परत 4 दिवसा नंतर कुणीही पुन्हा बॉम्ब घेऊन सहज आत जाऊ शकतो. हा ही त्यातलाच प्रकार आहे फक्त दहशतवाद्याएवजी इथे न दिसणारा पण जास्त संहारक विषाणू आहे. दहशतवादी हल्ल्यानंतर घटना स्थळांना भेटी देणारे राजकारणी आत्ता कुठे शेपूट घालून बसले आहेत? आपल्याकडे निष्पाप लोकांचा बळी गेल्याशिवाय यंत्रणेला जाग येत नाही हे त्रिवार सत्य आहे. नेहमीप्रमाणे आत्ता देखील सगळीकडे कडक सुरक्षा असेल आणि हे प्रकरण निवळल्यानंतर पुन्हा येरे माझ्या मागल्या. 2-3 महिन्या पुर्वी जेंव्हा स्वाइन फ्लूचे लोण पसरले तेंव्हाच योग्य ती खबरदारी न घेतल्यामुळे आज ही परिस्थिती ओढवली आहे.

आत्ताच बातमी वाचली की पुण्यात दहीहंडी रद्द करून येता गणेशोत्सव साधेपणाने साजरा करण्याचा निर्णय बर्‍याच मंडळानी घेतला आहे. अगदी योग्य वेळी योग्य पाऊल उचलले असून हा निर्णय सर्वांच्या हिताचा आहे. पुण्या मुंबईतील गणेशोत्सवाची गर्दी पाहता हा सण डामडौल न करता जितक्या साधेपणाने केला जाईल तितके चांगले.

Saturday, August 8, 2009

नवज्योतसिंग सिध्दूची मला सर्वात भावलेली कॉमेंट

काल परवाच शशी थरूर ह्याच्या "Across The Playing Field" पुस्तकाचे प्रकाशन झाले. त्या समारंभाला सचिन तेंडुलकर, हर्षा भोगले, नरेंद्र मोदी ही क्रिकेटशी निगडीत माणसे उपस्थित होती. त्यावेळी हर्षा भोगलेने सचिन संदर्भात सिद्धूची एक फारच छान कॉमेंट सांगितली. "1947 के बाद भारत के साथ सबसे अच्छी बात ये हुवी की यह बच्चा (सचिन तेंडुलकर) यहाँ पैदा हुवा, वहाँ नही|" खरचं यार जर सचिन तेंडुलकर भारता ऐवजी पाकिस्तानात जन्माला आला असता तर?... कल्पनाच नाही करवत. जाऊ दे कशाला उगाच असले विचार करा... त्यापेक्षा महाराष्ट्राची खंत, राखी सावंत जर पाकिस्तानात जन्माला आली असती तर... हा विचार जास्त चांगला आणि प्रेरणादायी आहे.

असो तर सिद्धूची कॉमेंट मला तरी फारच भावली. तसा नवज्योतसिंग सिध्दू त्याची क्रिकेट कारकीर्द संपल्यानंतरच जास्त प्रकाश झोतात आला आणि तोही त्याच्या कॉमेंट्स मुळेच. अर्थात त्याला नंतर त्याच्या कॉमिंट्रीमुळेच कांट्रॅक्ट पूर्ण व्हायच्या आधी घरी बसवले हा भाग वेगळा. चला तर आत्ता सिद्धूचा विषय निघालाचा आहे तर जाता जाता मला ह्याआधी आवडलेली त्याची टिपिकल सिद्धू कॉमेंट लिहून ही नोंद संपवतो. (ही कॉमेंट मराठीत मला तितक्या प्रभावीपणे मांडता न आल्याने ती जशीच्या तशी इंग्रजीत लिहीत आहे.)

Situation भारत-श्रीलंका सामना. भारत धावसंख्येचा पाठलाग करताना चांगला मोठ्या धावफरकाने पिछाडीवर. हार निश्चित. पण भारताची शेवटची जोडी बराच वेळ धावसंख्या वाढवत तग धरून मैदानात उभी.

सिद्धू: There is light at the end of the tunnel for India, but it's that of an oncoming train which will run them over.

Wednesday, July 29, 2009

मंदीवर गावठी उपाय

हल्ली साला मजबूत मंदी वैगरे आहे असं जाता येता कानावर येत राहतं. कधी कोणाला फाट्यावर मारुन घरी बसवतील सांगता येत नाही. तेंव्हा मी जनहितार्थ (उगाच) बेकारीवर उपाय योजना म्हणून काय काय करता येईल ह्याचा विचार करत होतो. हल्लीच्या जमान्यात टीव्हीवर चाललेले आयटम पाहता मला काही पर्याय सुचले आहेत ते खालील प्रमाणे...

गाण्याच्या प्रोग्रॅमला परीक्षक: अर्थात ह्यासाठी गाण्याची थोडीफार माहिती असणे आवश्यक आहे. म्हणजे नरड्यात फार नसली तरी काहीतरी गंम्मत असणे ही काळाची गरज आहे. तसं पूर्णवेळ परीक्षक म्हणून जायचे नाही. आपला गेस्ट Appearance. काय असता हल्ली दोन कायमचे परीक्षक असतात. गाणं झालं की शक्यतो आपण बोलायला सुरूवात करायची नाही. जे नेहमीचे परीक्षक असतील त्याना पकवु द्यायचे. त्यांचे झाले की आपण त्या दोघांशी अगदी सहमत आहोत असे सांगून त्यांनी संगितलेला एखादा मुद्दा जरा उचलून धरायचा. आपल्याकडून उगीचच खालचे/वरचे सूर, खालची/वरची नोट, अंतरा/मुखडा ह्यामध्ये काहीतरी कीडा उकरुन काढायचा. परीक्षकांच्या प्रतिक्रियेवर निदान मराठी स्पर्धांमध्ये तरी स्पर्धक कधीच आक्षेप घेत नाही. परीक्षकांचे म्हणणे फाइनल असते. त्यामुळे अगदी उभे आडवे नाही तर थोडेफार चढुन घ्यावे. अगदीच कोणी जबरा गाऊन गेला तर "तुमच्या गाण्याचे वर्णन करायला शब्द नाहीत माझ्याकडे" असे बोलून वेळ मारुन न्यावी. जर आपल्याला पहिल्यांदा प्रतिक्रिया विचारली तर मात्र जरा सांभाळून काहीतरी बोलायचे. आपण कुठल्याच रेकॉर्डिंगला जातीने उपस्थित असण्याची तीळमात्र ही शक्यता नसल्याने त्या गाण्याची आपल्या आयुष्यातील एक "उगाच" आठवण सांगायची आणि बाकी दोघांकडे बघून "हे तुम्हाला काय ते सांगतीलच" असे सांगून मोकळ व्हायचे.

दस का दम: परीक्षक व्हायला निदान बर्‍यापैकी नरडयाचे भांडवल लागते. पण बिन भांडवला चे काम करायचे असेल तर सरळ जाऊन दस का दम मध्ये भाग घ्यावा. जर तुम्ही सेलेब्रिटी नसाल तर हमखास तुम्ही दहा हजार घेऊन येणार. इथे कसं असतं ना की तुम्ही एक लाखा पर्यंत जिंकणार आणि दहा लाखाचा प्रश्ना चुकणार हे नक्की. अगदीच त्या दिवशी सोनी वाले दानधर्म करायच्या मूडमध्ये असले तर एक लाख पण घेऊन याल. दस का दम म्हणजे कायदेशीर मटका ज्याचे शूटिंग आणि टीव्हीवर प्रक्षेपण होते. तिकडे जावून तरी दुसरे काय करायचे असते? आकडाच लावायचा ना? कारण कौन बनेगा करोडपती सारखा तिथे विचारण्यात येणार्‍या प्रश्नाला अचूक पर्याय/उत्तर नाही. त्यामुळे सोनी टीव्ही आणि सलमान खानची मर्जी असेल तोपर्यंत तुमची उत्तरं बरोबर येत राहणार. पण तिथून कोणी खाली हात आलेला नाही म्हणजे तुम्ही वाईटात वाईट दहा हजार घेऊन परत. आणि त्यासाठी फार फार तर एक दिवस घालावा लागेल. टॅक्स वैगरे कापून सात हजार मिळायला हरकत नाही. फक्त तिथे "कितने प्रतिशत लोग दस का दम देखते है?", "कितने प्रतिशत लोगों को सलमान खान या उसकी फिल्मे पसंद है?" असे विचारले तर मात्र नीट विचार करूनच उत्तर द्यावे लागेल...

Modi-fied IPL: आत्ता भारतात जन्माला आलेला बहुतेक प्रत्येक माणूस हा भारतीय असण्याबरोबरच क्रिकेटच्या कुठल्या ना कुठल्या प्रकारमध्ये काही ना काही कर्तुत्ववान असतोच. एक-दोन वर्षापुर्वी हे कर्तुत्व कसोटी, एकदिवशीय सामने एवढेच मर्यादित होते. कधीही बॅट बॉल (का कुणास ठाऊक मराठीत ला बॅट ला चेंडू फळी म्हणतात हे मला अजिबात आवडत नाही...) हातात ना घेतलेले घरी बसून समालोचकाची भूमिका वठवत. समलोचक म्हणजे "मेलो खेळणार, कशाला उठवून मारायचा, हा ऑफ साइडला खेळायला हवा होता." अश्या तत्सम "उगाच" कॉमेंट्स. असो ह्या विषयावर वेगळी नोंद होईल. मंदीच्या दृष्टीने बोलायचे झाले तर जर बर्‍यापैकी आडवी बॅट किंवा जरा बोलिंग मध्ये लाईन लेंथ ठीक असेल तर लंम्बदंडगोलपिंड दणादण प्रतियोगितेसाठी म्हणजे ट्वेंटी-ट्वेंटी क्रिकेट साठी प्रयत्न करायला हरकत नाही. एक सीज़न खेळलात तरी डोक्यावरून पाणी. एक दोन वर्षे खेळलात तर सध्या आहे तोच खर्च कायम ठेवून राहणीमान न बदलता राहिलात तर पुढच्या दोन पिढ्या पोसू शकाल हे नक्की. बाकी एकदा क्रिकेट मध्ये गेलात आणि जरा बरे खेळलात की निदान एक हॉटेल तरी सुटतचं. मालवणी जेवणाचो हॉटेल नाही तर खाणावळ टाकायची माका लैई इच्छा हाय बरं का!!! तुमका सांगताय गाववाल्यानू लोकां जेवनं अशी काय तृप्त होतील की खालेल्या कोंबडी माश्याचो आत्मो डाइरेक्ट स्वर्गात जातलो... जल्लो नुसत्या विचारान माझे तोंडक पाणी सुटलो...


बाकी पैसे कमवायचे अजुन बरेच उपाय आहेत. कसली तरी स्कीम काढून फिरायचे. दहा की वीस मेंबर करा आणि डबल पैसे कमावा. बरेच गावतात म्हणे... फक्त तुम्ही नंतर त्यांच्या तावडीत गावालात की मग ते हाय आणि तुम्ही हाय... दुसरा ताजा ताजा आयटम म्हणजे "हप्ता बंद". आदेश भाओजीचं पैठणी वाटून समाधान झालं नाही तेव्हा आजकाल पैसे वाटू लागले. तरी नशीब महागुरू चचले. तो महागुरू आणि आदेश भाओजी हे कॉम्बो पॅकेज म्हणजे एक अत्याच्यार होता.

आत्ता वेळ निघून गेली आहे पण तरीही अगदीच दळभद्री वेळ आली असती तर अवदसेच्या स्वयंवरात "वर" म्हणून ज्याला हरकत नव्हती... तिकडे वर म्हणून गेलात की "वर" जायला वेळ लागला नसता . वर म्हणजे करियर मध्ये म्हणतो मी कारण हिला असे वाटते की सगळे (सगळे म्हणजे कोण? हा संशोधनाचा विषय आहे) तिचा शीडी सारखा वापर करतात. साला ही म्हणजे कोण टाटा बिर्ला की अंबानी लागून गेली काय हिच्याशी लग्न करून कोणी मोठा बनू शकतो? पण हे माझे वैयक्तिक मत आहे/होते कारण हिच्याशी लग्न करायला जगभरातून असंख्य (खूळचोट) मुलांचे अर्ज आले होते म्हणे. तो आकडा वाचून मला आपण IPL आणि आय-पिलच्या जमान्यात देखील किती मागासालेल्या आणि संकुचित विचारसरणीचे आहोत ह्याची कल्पना आली... अर्थात वर शोधण्यासाठी एवढ्या खालच्या पातळीवर उतरण्याची काही गरज नव्हती. त्यापेक्षा स्वयं वर गेली असती तर... असो. तिला अवदसा एवढ्या साठी म्हणतो कारण मला तिचे नाव नुसतेच घेणे शक्य नाही कारण तीच्या नावाच्या मागेपुढे असंख्य शिव्या आल्याशिवाय माझे वाक्य पूर्ण होऊच शकत नाही आणि त्या सगळ्या इथे लिहणे शक्य नसल्यामुळे थोडक्यात भागवतो. ही मराठी आहे म्हणून मला भैय्या किंवा येन्ना रास्कल फेम मूरगन (माइंड इट) कॅटागरीत असतो तर बरे झाले असते असे बरेचदा वाटते. साला आमच्या पूर्ण सावंतवाडीचे नाव खराब झाले असेल. मला तर आधीपासून ही आलेल्या अभागी (खूळचोट) पोरापैकी कुणाबरोबर लग्न करणार नाही ह्याची खात्री होतीच. काही तरी तमाशा करून भोकाड पसरेल ही अपेक्षा होती. हिच्यामुळे जनतेला प्रथमच रीयॅलिटी शोचा स्पर्धा जिंकून देखील पहिला "अभागी" विजेता पाहायला भेटला मिळाला. आत्ता पण मला खात्री आहे की ही बया काही त्याच्याशी लग्न करणार नाही. आणि लग्न नाही झाले तर समलिंगी कायदा आल्यामुळे अवदसेला स्वयंवर(?) पार्ट 2 करायला हरकत नाही.


चला तर गाववाल्यानू... भेटू परत...

Sunday, July 26, 2009

कारगिल विजय दिवस

आज कारगिल विजय दिवस... १० वर्षांपुर्वी कारगील युद्धाची सांगता झाली. भारतानं टायगर हिल परत आपल्या ताब्यात घेतलं पण इतर कुठल्याही युद्धाप्रमाणे नेहमीप्रमाणेच आपल्या सैनिकांची आहुती देऊनच... माहीत नाही त्यांना श्रद्धांजली वाहण्याची तरी आपली कुवत आहे की नाही... अस कधीतरी त्यांची आठवण काढायची, त्या दिवशी ऐ मेरे वतन के लोगों ऐकायचे, टीव्हीवर देशभक्तिपर चित्रपट पाहायचे. (आज तर फक्त दूरदर्शन वर प्रहार लागला होता बाकी चॅनेल वाल्यांना अजूनही कारगिल विजय दिवसाची सवय झालेली नसावी.) 15 ऑगस्ट 26 जानेवारी प्रमाणे कोणी राजकीय नेता जावून पुष्पचक्र अर्पण करतात. झाले... अर्थात नुसत्या राजकारणी लोकांना दुषण देण्यात काही अर्थ नाही. आपण तरी फार काय मोठं करतो. सैनिकांसाठी, त्यांच्या कुटुंबियांसाठी आपण जर काही करू शकलो तर तीच त्यांना खरी श्रद्धांजली ठरेल.

Thursday, July 23, 2009

रे म्हांराजा !!!!!

कधी पासून मनोगत आणि मराठी ब्लॉग्सपॉट वर ब्लॉग आणि इतर लेखन वाचतो आहे... आत्ता म्हटले आपण पण लिहावे काही... लोक लिहातात तितक नाही जमणार पण ठीक आहे ना!!!! साला इथे कोण अप्रेज़ल देणार नाहीय. माझ्या बद्दल सांगायचे झाले तर मी कोकणातल्या खार्‍या हावेवर आणि खारवलेल्या माश्यांवर पोसलेला माणूस. त्यामुळे अंतू बर्व्यासारखे जिभेचे वळण तिरके. बोलणे जरा जास्तच रोखठोक. जे आहे ते आहे, समोरच्याला काय वाटेल हे असले विचार फाट्यावर. तिरकस विचार जास्त. चारचौघात बसून लोकांची मारत बसणे आणि मुख्य म्हणजे लोकांना प्रॉपर नावे ठेवणे ह्यात हातखंडा. कळस म्हणजे आत्ता सुद्धा ब्लॉगला नाव काय द्यावे ह्या विचारात असताना सगळ्यात आधी "येड**", "बाबा चमत्कार", "तीरसट" "खूळ**" ही अशी नावे आधी आठवली... आणि मुख्य म्हणजे सगळी उपलब्द्ध होती. म्हणजे पंचक्रोशीतच नव्हे तर चक्क समस्त आंतरजाला वर आपला टाळकं जरा जास्तच हटके (सटक) आहे याची खात्री पटली. बरा वाटला. मराठी असल्याचा मजबूत अभिमान आणि मालवणी सारख्या शिवराळ भाषेवर मनापासून प्रेम. पक्का भारतीय असल्यामुळे क्रिकेट म्हणजे जीव की प्राण आणि ह्या एकाच कारणामुळे पाकिस्तान नंतर ऑस्ट्रेलिया वर खुन्नस. असो तर... माका काय बाकी लोकां सारखा स्टोरया, प्रेम-प्रकरणा, लफडी (झेंगाट) आणि बाकी काय काय लिवूक जमायाचा नाय. कविता माका झ्याटा कळत नाय. (संदीप खरेची सोडून) कविता मी वाचत पण नाय तर लिवायचा सबंधच नाय... तर मी जा काय लिवनार हाय ता ग्वाड मानून घ्या...

तर आंतरजालावरच्या गाववाल्यांनू ह्या माजा पहिलाच एण्ट्री असा तेवा प्रथे प्रमाणे म्हांराजाला गार्‍हाणं घालूनच पुढे जावूक हवा...

रे म्हांराजा !!!!!

बारा राटीच्या, बारा वहिवाटीच्या म्हांराजा !!!!! तुका आज गार्‍हाणं घालतायं रे म्हांराजा !!!

आंतरजाला वर ब्लॉग लिवूक घेतला असा म्हांराजा !!!!!

ता लिवतना तुझी नजर असु दे म्हांराजा !!!!!

नेमी नेमी जमला नाय तरी अधनं मधनं मालवणीतून लिखान घडवून आण म्हांराजा !!!!!

व्हयं म्हांराजा !!!

ShareThis