Sunday, September 8, 2013

लगबग...


काय रे झाली काय तयारी. मखराचे पडदे नीट बांधा. समया, निरांजन आणि बाकी पूजेची भांडी लख्ख घासून पुसून घ्या.

आबांनी बाजारातून येऊन सामानाच्या पिशव्या खाली ठेवत ओटीवर बसल्या बसल्या चौकशी कम सूचना सुरू केल्या. आबांचा लेक सदा आणि पुण्याहून आलेले त्याचे दोन चुलत भाऊ देवघरात गणपतीसाठी मखर तयार करीत होते. तिथे बारीक चुका, खिळे, टेकस, कात्री, हातोडी, पक्कड, वायरी, टेस्टर, स्क्रु-ड्रायवर, फेविकल कॉल, सजावटीचे रंगीत कागद आणि काय काय असे सगळे सामान पडलेले होते. लहान मुले तिथे लुडबूड करायला बघत होती त्यामुळे अधूनमधून माजघरातून एखादा हात येऊन त्या चिल्ल्या-पिल्यांची गठली उचलून त्यांना आत नेत होता. पण गप्प बसतील ती चिल्ली-पिल्ली कसली. त्यामुळे थोड्या थोड्या वेळाने सगळीकडून त्यांच्या नावाने कल्ला सुरू होता. पडवीत आबांचे वडील नाना आराम खुर्चीत रेलुन पुन्हा पुन्हा तीच वर्तमान पत्रे आणि पुरवण्या चाळीत होते. नानी शाळेत जाणार्‍या नातवंडांबरोबर बसून दुर्वा नीट करीत होती. आजीने नीट केलेल्या दुर्वा मोजून नातवंडे बरोब्बर २१ दुर्वांची एक अश्या जुड्या बांधून त्या टवटवीत रहावया म्हणून तांब्याच्या पाणी भरलेल्या पेल्यात नीट उभ्या करून ठेवत होतीत. आबा येताच नातीने हातातील दूर्वाच्या जुडीचे काम झाल्यावर उठून सगळ्या पिशव्या माजघरात मोठ्या काकूकडे म्हणजे आबांच्या बायकोकडे म्हणजे वासंती काकूकडे नेऊन दिल्या. तिकडे माजघरात जावा जावा आणि त्यांच्या हाताखाली लेकी सुना राबत होत्या. घरात गॅस-सिलेंडर असला तरी माणसे वाढल्यामुळे माजघरातील चूलदेखील पेटलेली होती. त्यावर भात आणि आमटीचे टोप ठेवलेले होते. नविन आणि शहरी सुनांना चुलीची सवय नसल्याने चूल संभाळण्याचे काम अर्थातच वासंती काकूकडे होते.

आबा: तात्याची गाडी कुठपर्यंत आली?

सदा: मघाशी फोन केला तेंव्हा कशेळी घाटात होते म्हणजे येवा चिपळूणपर्यंत आले असतील.

आबा: अरे मुंबै सोडून आठ तास उलटून गेले नां त्यांना? अजुन चिपळूणातच. येवा घरात पोचूक हवो होतो. मखराचा सामान आणि लायटिंग घेवन येतोय तो. आत्ता सजावट करणार कधी?

सदा: ओ तात्या म्हायत हाय नां तुम्हाला? त्याका आधीच सांगितला होता की शुक्रवारी रात्रीच निघ नायतर शनवारी सकाळी तरी. पण नाय. हा आज रविवारी सकाळी निघाला. आज हायवे फुल्ल जाम. गेल्या वर्षी पिंट्या आणि मंडळी आदल्या दिवशी निघालेली ती गणपतीची स्थापना होऊन रात्रीची आरती झाली तरी आली नव्हतीत. मग रात्री चंद्र दिसेल म्हणून माना खाली घालून घरात आलीत.

आबा: मग हे तात्याला म्हायत नाय? जाव दे... तुम्ही मखर पुरा करून ठेवा. चौरंग मांडून घ्या. मग तात्या आला की काय ता लायटिंग लावा.

सदा: ओ तात्या कुणाचा ऐकता काय कधी? सगळीकडे आपला ता खरा. पुणेकरा कशी आंबा घाट उतरून शनवारी सकाळी हजर. मुंबैच्या लोकांक कोण सांगूक जायल. तरी नशीब आत्ता गाडी हाय त्याच्या धुंगणाखाली. नायतर दरवर्षी हा जायपर्यंत यसटी आणि रेल्वेचो बुकिंग फुल्ल झालेला असायचा आणि मग प्रायवेट नायतर ज्यादा गाडी पकडून चेंगरून यायचा.

आबा: मुंबैकरा लै शाणी. पडीचो हापूस साशे रुपये डझन घेवन् खातत. पण तात्याकं काय बोलूचा तर तो नानीचो लाडको लेक. आपण काय बोलणार. बरा ता जाव दे. भटाला किती वाजता बोलावलात हाय? आणि ढोलताशेवाल्याक सांगितला हायस नां. काय हाय, भट आणि वाजंत्रीवाले, उद्या दोघांच्या पण धंद्याचो दिवस. त्यांना पयला सांग. बाकी बघून घेता येता.

सदा: होय तर... भटाकं सकाळी धा वाजता बोलावलंय. ताशेवाला पेंटरच्या घराशी येतंय.

आबा: बरा आठवला. जमला तर संध्याकाळी पेंटरकडे एक फेरी मारुन येतो. गणपती तयार हाय की नाय बघूक हवो नाय तर गेल्यावर्षी सारखो नको. चतुर्थीला आपण गणपती आणूक गेलो तरी पेंटरचो पुतणो आपलो उंदीर रंगवताय.

नानी: सकाळी लवकर उठा. मी चार वाजता बंब पेटवन ठेवतो. आपला आणि आपापल्या कॅलेंडरांचा पटापट आवरा. आठच्या आत पेंटरकडे पोचूक हवा. आणि मिरवणूक काढा काय ती पण धाच्या आत घरी येऊक हवो. नायतर गेल्या वर्षी भट घरात वाट बघीत बसलेलो आणि तुम्ही घाटीत नाचित होतात. तुमची मिरवणुकीची हौस काय ती विसर्जनाच्या दिवशी भागवा. उद्या सगळा टायमात होऊक हवा. मिरवाणूकीसाठी गाड्या आणूक वाडीतली पोरा कधी जातायत् ता बघ.

सदा: गाड्या आणतो आम्ही पण तात्या म्हणीत होता की त्याच्या नवीन गाडीतून गणपती आणायचा म्हणून.

आबा: खुळावलाय काय तो? नविन गाडी घेतलान म्हणून बुजवताय वर्षभर. अरे आपल्या गणपतीचो पाट तरी त्याच्या गाडीच्या दरवाजातून आत जायल काय?

सदा: ता त्यास तुम्ही सांगा. गाडी घेवन येव दे त्यास म्हणजे तुम्ही तात्या आणि बापू अशी तिघा भावंडा तुमचे दुखरे गूढगे, मणके आणि मोतिबिंदू घेऊन त्यात बसून मिरवणुकीच्या मागंन या. नायतरी घाटी चढवत नाय तुमच्यान.

आबा: पेकटात लाथ घालीन माझ्या गूढग्याक काय बोललस तर. तुम्ही आपला बघा. दशावताराची आणि सत्यनारायणाची आरती सुरू झाली की नाल (आरतीच्या वेळी वाजवायचे ढोलके ) वाजवताना तुमच्या चडड्या पिवळ्या होतात. "घालिन लोटांगण" सुरू व्हायच्या आधी तुम्ही लोटांगण घातलेला असता.

सदा: लाथ घालायच्या फंदात पडू नका नायतर परत गूढगा धरून बसायला लागेल... ( देवघरातून तिघांच्या ख्या ख्या ख्या चा आवाज येतो )

नाना: तोंडाकडन् पुढे गेलीत कार्टी...

आबा: जाव दे नाना. काय बोलणार. आपल्याकडे बघूनच शिकलीत ती. (देवघराच्या दिशेने पहात) आणि रात्रीच्या आरत्यांना जास्ती उशीर करू नका. कोणाकडे कधी सत्यनारायण आहे ते विचारून भजनाचा ठरवा. नंतर लोकांची कीटकीट नको. आपल्याकडे गुरुवारी पूजा धरलेली आहे. बापूचा लेक आणि नवीन सूनबाई बसू दे पूजेला. काय नाना, बरोबर नाय?

हो हो... नवीन जोडाच बसू दे पूजेला... नानांची संमती.

अहो आणि बापू आला की त्याला आणि नातवाला सांगून टाका की पुढच्या गणपतीत अंगणात गोधड्या आणि लंगोट वाळताना दिसले पाहिजेत. ता काय ता प्ल्यानिंग बिनिंग करीत बसू नका... नानीने नातवासाठी डेडलाईन जाहीर करून टाकली.

आबा: होय ता पण बराबर. पुढच्या श्रावणात तुमचा सहस्त्र-चंद्रदर्शन सोहळा करायचा आहेच त्यात पणतू दर्शन कार्यक्रम पण करून टाकु. (सदाला उद्देशून देवघराच्या दिशेने पहात) बाकी पूजेचा सामान मी आणून ठेवलंय. उद्याच्या पूजेची तयारी चोख करून ठेवा, उगाच भटासमोर मला तोंड सोडायला लाव नका. पोरांना पाठव वाडीत आणि दुर्वा, शमी आणून ठेव. बाळा आणि राणीला सांगून ठेवलंय मी. रोज सकाळी लवकर उठून दुर्वा, शमी आणि पारिजातकाची फुले पुजेला आणून ठेवायची. दुर्वा नीट करून जुड्या करून ठेवा रोजच्या रोज. मी रोज सकाळी पूजेला बसलो की सगळ्या गोष्टी तयार हव्यात. हे दे ते दे नको. सगळं जागच्या जागी असु दे.

माजघरच्या दिशेने बघत... अहो सगळा जिन्नस आहे नां भरलेला? अगदी पापड लोणच्यापर्यंत सगळं एकदा तपासून पहा. नानी तू तांदूळ धुवून सुकवून दिले होतेस त्याचे पीठ आले का गिरणीतून. त्या बाजारच्या पीठाचे मोदक काही धड होत नाहीत.

नानी: हो रे बाबा. मोदक आणि घावण्याचा पीठ तयारा असा. मुंबैकरा आणि पुणेकरा रविवारी निघतील तेंव्हा त्यांच्यासाठी वड्याचा पीठ पण करून ठेवलाय. वडे सागूती खावन श्रावण सोडून जाव दे पोरा माझी.

नाना: ती श्रावण सोडायची राह्यलीत काय अजुन...

नानी: असू दे ओ. आत्ता आठवडाभर तरी उपास करतीलच नां. रविवारी सकाळ्ळच जेटीवर जा आणि ताजा फडफडीत म्हावरा घेवन ये. माझ्या धाकट्या नातवाक चुलित भाजलेलो बांगडो आवडता.

आबा: होय गो. ते पुढच्या रविवारचो बघू नंतर. आत्ता पासून म्हावर्‍याचो विषय नको. आत्ता सध्या मोदकाचा पीठ महत्वाचा. आणि लेकी सुनांना जरा मऊ हातान मोदक कसे करायचे ते शिकव. त्यांच्या हातचे ते राक्षसी मोदक खावत नायत. देवाच्या नेवेद्याच्या पानात तू केलेले मोदकच लाव.

पुन्हा एकदा माजघराच्या दिशेने... अहो परवाच्या ऋषिच्या भाजीसाठी बाजारातून मिळतील तितक्या भाज्या आणल्या आहेत. कणसे आणि शेंगापण मिळाल्या. उद्या घरोघरी गणपती बसणार त्यामुळे बाजारात भाजी पण भेटताना मुश्कील.

नानी: सगळ्या भाज्या कशाला आणल्यास. वासंतीने परसात वाली, अळु, पडवळ, भेंडा, कारली, दोडकी असा भाजीपाला केला आहे. यंदा पाऊस पण चांगला झाला त्यामुळे भाजीपाला, दुर्वा, शमी, फुले यांना तोटा नाही.

आबा: हो घरची भाजी वापरा. मी पण आपली आणून ठेवली बाजारातून. आत्ता एवढी सगळी मंडळी येणार. ऋषिच्या भाजीत नाही तर दुसर्‍या दिवशीला होईल.

वासंती काकू: सगळं आहे व्यवस्थित. फक्त लेक येणार आहे सासरहून आणि तिचे हौसे आहेत यंदा. त्यासाठी सुपल्या आणि बाकीचे साहित्य आणायचे आहे. आज संध्याकाळी आणून ठेवा. नानी सांगतील काय काय आणायचे आहे ते.

आबा: अरे हो. ता राह्यलाच. गेल्यावर्षी हौसे नव्हते त्यामुळे लेकिचे लग्नानंतर पहिल्या वर्षीचे सगळे सण झाले तरी हा कार्यक्रम बाकी आहे. बरं त्यात तुमच्या जावयाचे काही लाड करायचे नाहीत नां? काय गो नानी?

नानी: नाय रे. जावयाला काय देऊचा नसता.

आबा: नाय मी आपला विचारून घेतला. आमच्या वेळी माज पण काय मिळालो नव्हतो. तरी पण जावयाचो काय मान असात तर मी पण माझ्या सासरी वसुलीकं गेलो असतो.

नानी: जल्ला... तुझा आपला काय तरीच...

आबा: चला. तर सगळी तयारी झाली. आत्ता उद्या मंगल मूर्तीचे आगमन झाले की पुढचे पाच दिवस कसे मंगलमय आणि आनंदाचे जातील.

नानी: होय रे बाबा. मोरया मोरया मंगल मूर्ती मोरया...

=========================================================

उद्या गणेश चतुर्थी. कोकणातला सगळ्यात मोठा उत्सव. कोकणातील बहुतेक सगळ्या घरात पुण्या-मुंबईचा चाकरमानी पोहोचतोय. मंगलमूर्तीच्या आगमनाची तयारी जवळ जवळ पूर्ण होत आलीय. घराघरातील ही सगळी लगबग आणि उत्साह शब्दात मांडण्याचा हा प्रयत्न...

ShareThis