Friday, December 30, 2011

मसाला चाय...

गेले काही दिवस थंडीचा कडाका वाढलेला. रोज घरी येताना कुडकुडत यावे लागतेय. आज तर कहरच झाला. तामिळनाडूत 'थेन' वादळ येवून गेले आणि त्याचा परिणाम म्हणून इथे बंगलोरमध्ये अचानक पाऊस सुरु झाला. संध्याकाळी ऑफिसमधून बाहेर पडलो तर आधीच थंडी त्यात रिमझिम पाऊस आणि त्यात भरीस भर म्हणून पावसामुळे अडलेल्या ट्राफिकमधला गारवा. घरी पोहोचेपर्यंत साडेसात वाजून गेलेले. वाटेत पूर्ण भिजायला झाले होतेच आणि ट्राफिकमध्ये रांगून रांगून थोडीफार भूक पण लागलेली. रात्रीच्या जेवणाला फार वेळ नसल्याने त्याआधी काही गरमा गरम करून मिळेल याची आशा नव्हती. थंडीतून आल्याने चहा तर हवाच होता. त्यामुळे चहा आणि भूक या दोन्हीवर एकच उपाय होता मसाला चहा...

मसाला चहाची कृती एकदम सोप्पी...

साहित्य :- एक कप दूध, एक टी-स्पून चहा पूड, एक चमचा साखर, लवंग, दालचिनी, काळी मिरी, वेलची, असे काय काय मिळतील ते मसाल्याचे प्रकार आणि हो सगळ्यात शेवटचे आणि सर्वात महत्वाचे म्हणजे फरसाण... तुमच्याकडे फरसाण नसेल तर घेवून या (गुजरात्याकडचे असेल तर अतिउत्तम) आणि जवळपास मिळत नसेल तर पुढे वाचू नका. निषेधाच्या फालतू प्रतिक्रिया स्वीकारल्या जाणार नाहीत.

कृती :- नेहमीप्रमाणे गॅसवर चहाच्या भांड्यात एक कप दूध, चहा पूड आणि साखर टाकून चहा बनवून घ्यावा. कुडकुडणार्‍या थंडीतून येवून तुम्ही हा चहा प्राशन करणार असल्याने उगाच माज दाखवण्यासाठी त्याला अमृततुल्य चहा असे संबोधावे. आत्ता मघाशी साहित्यामध्ये जमवलेले मसाले चहात टाकायचेच राहिले असे तुम्हांला आठवले असेल तर काळजी नसावी. त्या मसाल्याचे खरे काम चहा उकळल्यानंतरच आहे. तर उकळलेला अमृततुल्य चहा, ओट्यावर न सांडता, नीट कपात गाळून घ्यावा. एका छानश्या ट्रेमध्ये हा चहाचा कप आणि मघाचचे मसाले नीट मांडावे. ह्या सगळ्या साहित्याचा 'मसाला चहा' ह्या सदरात टाकण्यासाठी एक छानसा फोटो काढावा. झाले... मसाल्याचे काम संपले. आत्ता हा काढलेला मसाला म्हणजे लवंग, दालचिनी, काळी मिरी, वेलची इत्यादी इत्यादी ज्या छोट्या छोट्या तोंडांच्या पिशव्यांमधून काढला असेल त्या छोट्या छोट्या पिशव्यांच्या छोट्या छोट्या तोंडातून पुन्हा भरून ठेवावा (हे लै वेळ काढू आणि कटकटीचे काम आहे, पण नाही केले तरी कटकट होईलच त्यामुळे कुठली कटकट जास्त सोईची हे तुमचे तुम्ही ठरवा. मी मुळातच व्यवस्थित आणि टापटीप असल्याने मी नेहमीच पहिला पर्याय स्वीकारतो)

तर आत्ता लागलेली सौम्य भूक आणि थंडी यावर उतारा म्हणून अमृततुल्य चहाचे मसाला चहामध्ये रूपांतर करायला घ्यावे. सगळ्यात आधी थंडीचा कडाका कमी व्हावा म्हणून दोन घोट चहा पिऊन घ्या. त्यामुळे थोडी हुशारी येईलच पण अजून एक फायदा म्हणजे मघाशी साहित्यात गोळा केलेला महत्वाचा पदार्थ म्हणजे फरसाण चहाच्या कपात टाकण्यासाठी थोडी जागा देखील होईल. आत्ता थोडीफार भूक लागलेली भूक भागेल आणि रात्रीचे जेवण होईपर्यंत तग धरता येईल अश्या हिशोबाने फरसाण चहात मिक्स करा.

चमच्याने ते फरसाण चहात नीट बुडवून घ्या आणि नीट फुंकर मारून चहा गार होण्याआधी चवीचवीने मिटक्या मारीत खावे. फरसाण खावून झाले की उरलेल्या चहावर छानसा मसालेदार तवंग आलेला दिसेल. अश्या प्रकारे तुम्ही बनवलेला अमृततुल्य चहा मसाला चहामध्ये परिवर्तीत होवून तुमच्या हातातील कपात अवतरलेला दिसेल.

ShareThis