आपला तर बुवा बरेच दिवसांनी मस्त वीकेंड साजरा झाला... कांगारूंची औसी की तैसी करून इंग्लंडने मानाची अॅशेस पटकावली. गेले काही दिवस आपण जेव्हा गणपतीबाप्पाच्या स्वागताच्या तयारीत गूंतलो होतो तेव्हा इंग्रज कांगारूंच्या विसर्जानाची तयारी करत होते. गेली काही वर्षे घरघर लागलेल्या ऑस्ट्रेलियन टीमला आज पुन्हा एकदा तडाखा बसला. क्रिकेटवर जवळपास दोन दशकं अधिराज्य गाजवल्यानंतर त्यांना असा काही माज आला होता की बास रे बास. स्टीव वॉ ने सुरू केलेली हुकुमत पॉंटिंगने पुढे चालू ठेवली होती. अर्थात ज्या टीम मध्ये ग्लेन मॅकग्राथ, गिलख्रिस्त, शेन वॉर्न, लॅंगर असे खेळाडू आहेत ती टीम कुठेही जिंकेल ह्यात काही वाद नव्हता. पण जसजसे हे सगळे दिग्गज हळूहळू निवृत्त झाले तसतशी ऑस्ट्रेलियन साम्राज्याला उतरती कळा लागली. त्यातच बरेचसे ऑस्ट्रेलियन खेळाडू माजले होते. उद्धटपणा आणि गुर्मी मैदानाबाहेर आणि मैदानात ही दिसू लागली होती. सगळ्यात पहिल्यांदा सौरव गांगूलीच्या संघाने त्यांना जमिनीवर आणले होते. त्यानंतर सुद्धा भारतीय संघाने जेव्हा जेव्हा कांगारूंशी सामना केला तेव्हा त्यांना जेरिला आणले होते. ह्याच वर्षी दक्षिण आफ्रिकेने त्यांना ऑस्ट्रेलियामध्ये घरच्या प्रेक्षकांसमोर पाणी पाजले होते. त्यानंतर नुकत्याच झालेल्या ट्वेंटी-ट्वेंटी विश्वचषकामध्ये कांगारू पहिल्याच फेरीत झाले होते. हरभजनने माकड नाही म्हटले तरी सायमंड्सने "आधीच सायमंड्स त्यात दारू प्यायला" ही म्हण खरी करून दाखवली.
आत्ता देखील अॅशेस मालिकेसाठी कांगारूंनी इंग्लंडमध्ये पाऊल ठेवताच प्रथेप्रमाणे इंग्लंडच्या खेळाडूवर काही ना काही शेरेबाजी सुरू केलीच होती. खरं तर मालिकेच्या सुरुवातीला इंग्लंड चा संघ मालिका जिंकू शकेल असे मला तरी वाटले न व्हते मालिका सोडाच पण एखादा सामना देखील जिंकेल की नाही ह्या बद्दल शंकाच होती. मायकेल वॉसारखा अनुभवी खेळाडूने निवृत्ती घेतलेली. फ्लिन्टॉपदेखील दुखापतीनी बेजार. त्यात पहिल्या सामन्यानंतर केविन पीटरसन मालिकेबाहेर पडलेला. अश्या एक ना अनेक कटकटी असून देखील इंग्लंडने दुसरा सामना जिंकला. तिसरा सामना कांगारूंसाठी मायकल क्लार्कने वाचवला. चौथ्या सामन्यात कांगारूंनी इंग्लंडचा साफ चोथा करून टाकलेला. चौथ्या सामन्यात कांगारूनी ज्या रीतीने पुनरागमन केले ते पाहून शेवटच्या निर्णायक सामन्यात इंग्लंडने सामना वाचवून मालिका बरोबरीत सोडावली तरी खूप झाले असे वाटत होते. पण इंग्लिश खेळाडूनी ही विश्वचषक किंवा IPLपेक्षा अॅशेस जास्त मोलाची असा निर्धार करून पण आज मालिका २-१ अशी काबीज करून कांगारूंचे मनसुबे पूर्णपणे उधळून लावले. संपूर्ण मालिकेत हेडन, लॅंगर, गिलख्रिस्तशिवाय ऑस्ट्रेलियन फलंदाजी आणि ग्लेन मॅकग्राथ, शेन वॉर्न, ब्रेट लीशिवाय गोलंदाजी अगदीच मिळमिळीत दिसली. एखाद दुसर्या सामन्यात जॉनसन, मायकल क्लार्क आणि सायमन कॅटीच सोडले तर कुणीही प्रभाव पाडू शकला नाही. इंग्लंडने २००५ प्रमाणेच पुन्हा एकदा गेलेली अॅशेस परत मिळवलीच पण कांगारूना अनेक वर्षानंतर कसोटी क्रिकेटमध्ये प्रथमच चौथ्या क्रमांकावर नेऊन बसवले. त्याचबरोबर २००५ची अॅशेस गाजवणारा अँड्रू फ्लिन्टॉप देखील सन्मानने कसोटी क्रिकेट मधून निवृत्त झाला. Bravo...
ह्या सगळ्यात रिकी पॉंटिंगचे थोबाड बघण्यासारखे होते. गेली काही वर्षे जी काही गुर्मी आणि माज घेऊन तो वावरत होता तो आज पूर्णपणे उतरलेला दिसला. बरेचदा सचिन, लारा अश्या खेळाडूंशी तुलना करताना २ वेळा विश्वचषक उचलणारा पॉंटिंग वरचढ ठरतो. एक फलंदाज म्हणून पॉंटिंग नक्कीच श्रेष्ठ आहे पण स्टीव वॉनंतर तो आजवर कप्तान म्हणून जो काही नावरूपाला आला तो केवळ ग्लेन मॅकग्राथ, गिलख्रिस्त, शेन वॉर्न, लॅंगर असे खेळाडू दिमतीला होते म्हणूनचं. मला स्व:तला तर ऑस्ट्रेलिया हरली पण त्याचबरोबर ती पॉंटिंगच्या नेतृत्वाखालीखाली इंग्लंडमध्ये सलग दुसर्यादा हरली ह्याचा जास्त आनंद आहे. आत्ता सगळ्यात मज्जा येणार आहे ती पुढील काही दिवसात. पंटर आणि कंपनीवर ऑस्ट्रेलियन निवड समिती, माजी खेळाडू आणि मुख्य म्हणजे प्रसार माध्यमं उभी-आडवी चढतील. बहुतेक पॉंटिंगचे कर्णधारपद देखील जाईल. Ashes संपली आणि आत्ता पाळी आहे पंटर आणि कंपनीच्या ASS'es ची. काय मंडळी??? खरा की नाय???
Ekdam khara haay tuza...
ReplyDeletekharech mala pun faarch aanad zala. Australia la England ne chaglech pani pajale.