स्वातंत्र्य दिन, प्रजासत्ताक दिन मग कारगिल दिवस आणि आत्ता २६/११. आज २६/११ ला एक वर्ष पूर्ण झालं. वर्षभर कसाबने पाहुणचार झोडला. नुकतचं महाराष्ट्र टाइम्स मध्ये वाचलं की कसाबची काळजी घेण्यासाठी सरकारी तिजोरीतून वर्षभरात तब्बल ३१ कोटी रुपये खर्च करण्यात आले आहेत. शहिदांच्या घरी मात्र मदत पोहोचली नसेल. त्याचबरोबर कसाबसोबत आलेल्या इतर अतिरेक्यांचे मृतदेह अजुन ममीसारखे जपून ठेवलेले आहेत. आपण अमराठी लोकांचा थारा करणार नाही असे म्हणतो पण हजारो रुपये खर्चून कडेकोट पहार्यात दहशतवाद्यान्चे मृतदेह मात्र बाळगून आहोत. २६/११ नंतर गृहमंत्री पदावरून पायउतार झालेले आर आर पाटील आज पुन्हा गृहमंत्री आहेत. हल्ल्यानंतर मंत्री बदलल्याने काय होते हे आजपर्यंत कळले नाही. अर्थात त्यांना दोष देण्यात काहीच अर्थ नाही, आपणच निवडून दिले आहे त्यांना.
भारताची राजनीति समजण्याला लागते
षंढता ही खूप, थोडी-थोडकी ना लागते
खूप केला यत्न आम्ही आम्हास नाही समजली
ना कळो आम्हास आहे पुष्काळांना समजली
इतके वर्ष अफजल गुरूला पोसतोय आत्ता कसाबला पोसू. त्यात काय एवढे? पाकिस्तानला अधून मधून पुरावे देत राहू. कालच प्रधानमंत्री की संरक्षण मंत्र्यानी २६/११ मधल्या गुन्हेगारांना शिक्षा होणारच असे ठामपणे सांगितले आहे. बस्स आणि काय पाहिजे?
आता कशाची लाज आता काश्मिरही देऊ आम्ही
काय त्याने भारताचे व्हायचे आहे कमी
दिल्ली जरी गेली तरीही हार ना आम्ही म्हणू
उंचावूनी लुंग्या स्वत:च्या 'जय जगत्' आम्ही म्हणू
२६/११ मुळे पोलिसांची सामान्य माणसाच्या मनातील प्रतिमा मात्र बदलली हे नक्की. २६/११ नंतरच्या दिवसात विजय साळस्कर, अशोक कामटे आणि हेमंत करकरे ह्या तिघा अधिकार्यांबद्दल जे वाचायला मिळाले त्यावरून आपण किती मोठे आणि कर्तव्यदक्ष अधिकारी गमावले हे कळते. कामटेनी सोलापूर मध्ये ज्या रीतीने काम केले होते त्यावरून ते किती मोठे होते ते कळते. एका पोलिस अधिकर्याच्या मृत्यूमुळे लोकानी उत्स्फूर्तपणे बंद पाळल्याचे माझ्या वाचण्यात नव्हते. एखाद्या हीरोला शोभेल असे व्यक्तिमत्व. पिळदार शरीरयष्टी. रात्री १० नंतर फटाके फोडले म्हणून आमदाराला भर रस्त्यावरून फटके मारुन पोलिस स्टेशनपर्यंत धिंड काढून नेलेला अधिकारी असा लौकिक. विजय साळस्करानी २४ वर्षाच्या कारकिर्दीत ७९ गुंडाना ढगात पोचवलेले. हेमंत करकरे ATS चीफ. व्यवसायाने मेकॅनिकल इंजिनियर पण पोलिस अधिकारी म्हणून कारकीर्द. सोप नाही. इंजिनियर झाल्यावर पुन्हा IPS वैगरे परीक्षा देऊन पोलिसाची नोकरी. हे सगळे नक्कीच स्पेशल होते.
ऐसे नव्हे की भारती या बुद्ध नुसता जन्मला
नुसताच नाही बुद्ध येथे आहे शिवाजी जन्मला
जन्माला जो जो इथे तो वीर आहे जन्माला
अध्यात्म ही या भारताचा युद्धात आहे जन्माला
आहे ध्वजा नक्कीच आमुची पिंडीवरी लहरायची
फक्त आहे देर त्यांनी समरी पुन्हा उतरायची
अरे कुठला हा पाक याचे नावही नव्हते कुठे
कळणारही नाही म्हणावं होता कुठे गेला कुठे...
२६/११ मध्ये बळी पडलेल्या तमाम निरपराध नागरिकांना आणि शहिदांना भावपूर्ण श्रद्धांजली...
========================================================================================
नोंदीमध्ये वापरलेली वरील शायरी भाऊसाहेब पाटणकर लिखीत "दोस्त हो!" ह्या पुस्तकातील आहे.
शहिदांना भावपूर्ण श्रद्धांजली...!
ReplyDeleteहेमंत करकरे आमच्या सी ओ ई अमरावतीचे मेक इंजी ग्रॅज्युएट बरं कां. माझ्या सिनिअरचे क्लास मेट होते ते. त्या सिनिअर च्या मुलिच्या लग्नात भेट झाली होती.तेंव्हा रात्री आम्ही एक पर्यंत सोबतच होतो. तेंव्हा ते इतके फेमस नव्हते, पण केवळ एक इंजिनिअर आणि पोलिसमधे म्हणुन लक्षात राहिले होते ते.. नागपुरची गोष्ट आहे ही..
ReplyDeleteश्रध्दांजली....
भावपुर्ण श्रद्धांजली...
ReplyDelete-अजय