Wednesday, August 26, 2009

बाल्या डान्स, जाकडी नृत्य आणि हरीनाम सप्ताह

गणेशोस्तव आला की आठवतात त्या आरत्या, बाल्या डान्स आणि जाकडी नृत्य. बाल्या डान्स आणि जाकडी नृत्य ही नावं बर्‍याच लोकांना नवीन असतील. कोकणातील नामशेष होत जाणार्‍या संस्कृती आणि कलांपैकी ही दोन नावे. कोकणात हा प्रकार अजूनही काही गावात प्रचलित आहे. ह्यात जण ढोलकी घेऊन बसतात आणि काही लोकं ह्यांच्याभोवती फेर धरून नाचतात. नाचणार्‍यांच्या एका पायात घूंगरू बांधलेले असतात. जसं जसा नाच पुढे सरकत जातो तसं तसा नाचण्याचा आणि फेर धरण्याचा वेग वाढत जातो. मज्जा येते पाहायला. नाचताना उडत्या चालीची गाणी (पारंपरिक गाणी, हिंदी नव्हे) म्हणतात. हल्ली हे कलाकार फार नाही राहीले. पोटापाण्यासाठी बरेच लोकं मुंबईची वाट धरतात आणि गावाची नाळ हळू हळू तुटत जाते. कलियुगात दुष्काळ, भ्रष्टाचार आणि स्वाइन फ्लू अशा अवकळा लवकर पसरतात पण ह्या सगळ्यात बाल्या डान्स आणि जाकडी अश्या कला कधी नष्ट होऊन जातात हे कळत देखील नाही.

गणेशोस्तवा आधी श्रावण महिन्यात गावातल्या देवळात हरीनाम सप्ताह असायचे. श्रावण महिन्यात देवधर्माचे जास्त कार्यक्रम असण्याचे अजुनएक कारण म्हणजे पुर्वी पावसाळा वेळेवर सुरू व्हायचा. मग जून-जुलै मध्ये शेतीची कामे संपली की लोक रिकामेच असायचे दसर्‍यापर्यंत. मग त्यात श्रावण महिन्यात गावातल्या देवळात सप्ताह बसायचे. ह्यात गावातल्या वाड्या (आळी) सहभागी व्हायच्या. प्रत्येक वाडीला ३तास याप्रमाणे दिवसाच्या २४ तासाचे विभाजन व्हायचे. असा पूर्ण आठवडा मंदिरात अहोरात्र हरीनामाचा गाजर चालत असे. सप्ताह दरम्यान अभक्ष्य भक्षण आणि प्राशन बंद असे. पूर्ण सप्ताह गावातल्या बेवड्याची तोंडे बघण्यासारखी होतं असत. भजनात पण मज्जा येई. तीन तास भजन म्हणजे नाही म्हटल तरी लांबायाचेच. मग आधून मधून लोकांमध्ये जान आणण्यासाठी "जंजिरा पाण्यामध्ये किल्ला, शिवाजी आत कसा शिरला", "यमुनेच्या तिरी काल पाहिला हरी, कान्हा वाजावतो बासरी" अशी "जोश" भजने म्हटली जात. यासाठी खास टाळ आणि घंटानाद केला जाई. अधून मधून भजन म्हणणारा एखाद्या ओळी वर जरा जास्त रमला किंवा काही कीडा करून आपली गायकी दाखवू लागला की जमलेल्या कोरसमधून "वा बुवाsss" अशी शाल जोडीतील दाद येत असे. दाद देणार्‍याला वयाची मर्यादा नव्हती. २री ३री तले शेंबडे मूल देखील ही दाद देऊ शकत होते. फक्त खार्‍या हवेतील खोचकपणा अंगात हवा मग झाले. आम्ही देखील जमेल तशी शाळेला दांडी मारुन देवळात जात असु.आमच्यासाठी खास आकर्षण म्हणजे विणेकरी. देवळात गाभार्‍यासमोर लोक दोन रांगा करून भजन म्हणत उभी असतात. गाभार्‍याकडे तोंड करून तबला-पेटीवाले उभे रहातात. त्यांच्या आजूबाजूला भजन म्हणणारे. ह्या सगळ्यांच्या मधोमध एक जण वीणा घेऊन मागे पुढे फिरत असे. दर्शनाला येणारे सर्वजण विणेची देखील पूजा करतात, विणेकार्‍याला नमस्कार करतात. विणेकरी होण्यासाठी आम्हा मुलांची जोरदार शर्यत असे. लोक आपल्याला एवढा मान देतात, आपल्याला नमस्कार करतात हे म्हणजे आम्हाला काहीतरी आड्स (आड्स म्हणजे अचाट, सही, फंडू इत्यादी इत्यादी...) वाटे. सगळ्यात महत्वाचे म्हणजे आमचे शाळेतले गुरुजी, बाई, हेडमास्तर हे देखील देवळात आल्यावर विद्यार्थ्यासमोर झुकत असत. आज हे सगळं आठवलं की हसू येतं, पण आजच जीवन पहिलं की वाटत यार आपण लहानपणीचं भरभरून जगलो. आत्ता बस्स श्वास सुरू आहे. सगळं कसं यांत्रीक आणि साचे बद्ध होऊन गेलय.

2 comments:

  1. लै भारी ... भन्नाट्च .
    . थोड्याफार फरकाने आम्ही ही गावाला असलेच जगलो. तुम्ही कोकनी आन आम्ही घाटी त्यामुले काय तो फरक .. भाषन, कविता वाचन, कसे बंद पादायाचे किंवा एखाद्याची काशी जिरावायाची ह्याच्या किक शकली असायच्या... पण कुणाला त्याचा फरसा राग यायचा नाही ... मज्जा यायची.
    .

    यंत्राच्या आणि फोर्मल जगात खर्या आनदापासुं दुरच चाललो आहे...
    .
    बाकी बाल्या डांस पाहायची खुप इच्छा आहे , तो फक्त टी व्ही वर १-२ पाहिउला आहे.
    . मस्त बरका|

    ReplyDelete
  2. सचिन, प्रतिक्रियेबद्दल धन्यवाद!!! बाकी घाटावर, कोकणात किंवा पूर्ण भारतात म्हणा, गाव कुठेही असो, तिथल्या आठवणी कुठल्याही परदेश आणि मोठ्या शहरापेक्षा जास्त आनंददायी असतात.

    ReplyDelete

ShareThis