Tuesday, September 21, 2010

ई ग्रहांची महादशा

गेले दीड वर्ष बी.एस्.एन्.एल्.चे इंटरनेट वापरतोय. आत्तापर्यंत सरकारी काम म्हणून कधी बी.एस्.एन्.एल्.चे कुठलेही कनेक्शन घेण्याच्या भानगडीत पडलो नव्हतो. एका शनिवारी सकाळी चहा प्यायला म्हणून बाहेर पडलेलो. चहा पिता पिता बी.एस्.एन्.एल्.ने रस्त्यावर लावलेला स्टॉल दिसला. बी.एस्.एन्.एल्.चा आधून मधून ग्राहक मेळावा भरतो आणि त्या दोन तीन दिवसांमध्ये फुकट सिम कार्ड, ज्यादा टॉक टाइम, बिना डीपॉझीट नवीन ब्रॉडबॅंड कनेक्शन वैगरे वैगरे स्किम असतात. मित्र म्हणाला अरे तसही डीपॉझीट वैगरे काही घेत नाही आहेत तर भर अर्ज. मग काय पत्ता लिहून आलो. मोडेम आणि फोन वैगरे माझ्याकडे होताच. त्यामुळे मला केवळ इंटरनेटचे बिल भरायला लागणार होते. मग आम्ही "आज अर्ज दिलाय, आत्ता हे येतील एक वर्षांनी" अश्या गप्पा मारत घरी आलो आणि विसरून पण गेलो. पण झालं भलतचं सोमवारी दुपारीच मोबाइल थरथरला.

मी: हॅलो
पलीकडून: साssssर, बी.एस्.एन्.एल्.कनेक्सन.
मी: हू ईज़ धिस?
पलीकडून: साssssर तमिल, तेलगू, कन्नडा?

आयला ह्यांच्यासाठी तमिल, तेलगू, कन्नडा झालं की थेट पाकिस्तान आणि नेपाळची बॉर्डर लागते. मध्ये बाकी कुणी नाहीच. मराठी सोडा राष्ट्रभाषा पण फाट्यावर?

मी: (मनात: हाड् रे) हिंदी हिंदी.
पलीकडून: साssssर बी.एस्.एन्.एल्. कनेक्सन होना ?
मी: हां हां मैने अप्लिकेशन किया था.
पलीकडून: हा करेक्ट साssssर.
मी: कब मिलेगा कनेक्शन?
पलीकडून: अब्बी.
मी: अभी? अभी तो मैं ऑफीस मे हूँ.
पलीकडून: आय यॅम इन फ्रंट ऑफ युवर हौस नो? कम नाऊ ओन्ली.

नशिबाने ऑफीस पाच मिनिटांच्या अंतरावर असल्याने मी त्याची नाऊ ऑर नेव्हर ऑफर स्वीकारून लगेच रूमवर पोहोचलो. पुढच्या दहा मिनिटात सगळं जोडून माणूस (पैसे न मागता) निघून गेला देखील. बी.एस्.एन्.एल्.चं असं सुसाट काम बघून माझा विश्वासच बसत नव्हता. ऑफीसच्या लोकांनाही ही गोष्ट पचनी पडली नाही. त्यातल्या काही बुजुर्ग लोकांनी "अरे आत्ता बघ रोज रोज डिसकनेक्ट झाल्याच्या तक्रारी करायला बी.एस्.एन्.एल्. ऑफीसच्या वार्‍या करायला लागतील" असा आशीर्वाद दिला. पण नाही. तो ते कनेक्शन जोडुन गेल्या पासून पुढची दीड वर्षे मी ती रूम बदले पर्यंत काडीचीही तक्रार नाही. केवळ वेळेवर बिल भरा आणि सेवेचा आनंद घ्या. बिलात देखील कधी चुकीचे रीडिंग नाही की भरमसाठ रक्कम नाही. ह्याच बी.एस्.एन्.एल्.च्या कृपेमुळे ब्लॉग देखील सुरू झाला. जमेल तसं लिखाणं झालं. बी.एस्.एन्.एल्.बद्दल असलेलं माझं मत पूर्ण बदललं होतं. प्राइवेट कनेक्शन वापरणार्‍या माझ्या एक दोन मित्रांना पण मी पुढच्या मेळाव्यावर लक्ष ठेवा आणि बी.एस्.एन्.एल्. चं ब्रॉड बॅंड घ्या असं सांगून ठेवलं.

सगळं कसं सुरळीत सुरू होतं. मे महिन्याची सुट्टी संपवून हापूस आंब्याचे फोटो ब्लॉगवर टाकले आणि जून अखेरीस ग्रह फिरले. नवीन जॉब जॉइन केला त्याच बरोबर आधीच्या मालकाने भाडेवाढ मागीतल्याने त्याच गल्लीत चार घरं सोडून नवीन रूमवर शिफ्ट देखील झालो. नवीन नोकरीत आणि नवीन जागेत इतर गोष्टी सुरळीत सुरू झाल्या मात्र माझ्या पत्रिकेतले ई-ग्रह मात्र बिघडले. त्यांची महादशा सुरू झाली. नवीन प्रॉजेक्टमध्ये बाहेरच्या सगळ्या साइट्स ब्लॉक. ब्लॉगिंग सोडा पर्सनल ई-मेल्सदेखील वाचता येईनात. म्हटलं नवीन रूम त्याच गल्लीत आहे बी.एस्.एन्.एल्. ब्रॉडबॅंड कनेक्शन पटकन जोडुन देतील. जुलैच्या पहिल्याच विकांताला जाऊन त्याबद्दल अर्ज देऊन आलो. म्हटलं नवीन कनेक्शन फटकन दिलं तर हे रिलोकेशन रातोरात करून टाकतील. पण नाही. ई-ग्रहसौख्य पूर्ण बिघडून गेलेलं होतं. पूर्ण आठवडा गेला तरी साधा फोन देखील नाही. शनिवारी बी.एस्.एन्.एल्. ऑफीसला चक्कर टाकून आलो तर संबंधित माणसे गायब. कुठे तरी मोठा लोचा झालेला तो सोडवात बसलेले. आत्ता माझं नवीन ऑफीस लांब गेल्याने सोमवार ते शुक्रवार काहीच करता येईना. दोन आठवड्यानंतर संबंधित माणूस भेटला एकदाचा. इथल्या प्रथेप्रमाणे त्याचंही नावं श्रीनिवास होतं. मी माझी शिफ्टिंगची वर्कऑर्डर त्याच्या पुढयात धरली. ती हातात धरून एखाद्या माणसाची पत्रिका पाहावी तशी पहात २-३ मिनिटे काहीतरी गूढ विचार करीत बसला. थोड्यावेळाने त्याने गंभीर शब्दात समस्या सांगितली

श्रीनिवास : "साssर, केबल नही है".
मी: क्या??? केबल नही?
श्रीनिवास : हा स्टोर रूम ने भी नही. आप अपना नंबर दो मुझे मैं आपको दो बजे कॉल कर के बताता हूँ.

मी आपला नंबर देऊन आलो पण पुन्हा आठवडा भर काहीच हालचाल नाही. साहेबांना फोन केला तर साहेब फोन उचलतील तर हराम. महिना होऊन गेला पण रूमवर ब्रॉडबॅंडचा काहीच पत्ता नाही. महिना अखेरीस बी.एस्.एन्.एल्.ने न वापरलेल्या इंटरनेटचे बिलमात्र नवीन पत्त्यावर पाठवून आपली तत्पर सेवा दाखवून दिली. त्याच्या पुढच्या शनिवारी ते बिल घेऊन बी.एस्.एन्.एल्.च्या ऑफीस मध्ये गेलो. म्हटलं इंटरनेटचा पत्ता नाही आणि हे बिल कुठून आले? तर म्हणतात कसे "ते तुम्ही इंजिनियरला विचारा. आम्ही फक्त बिलं बघतो." श्रीनिवासच्या थोबाडासमोर बिल नाचवलं तर त्याचं पुन्हा "साssर, केबल नही है". म्हटलं अरे महिना उलटून गेला तरी बी.एस्.एन्.एल्.कडे केबल नाही सांगताना लाज वाटतं नाही का? त्याच्यावर काही परिणाम दिसला नाही. मागच्यावेळीप्रमाणे "मैं आपको दो बजे कॉल कर के बताता हूँ" सांगून मला मार्गाला लावला. सर्वीस नसताना बिल कसं काय आलं हे विचारायला तिथल्या वरिष्ठ अधिकार्‍याकडे गेलो तर तो म्हणे "डोण्ट वरी साssर. वी विल कॅन्सल इट नो." कॅन्सल कसलं डोंबलाचं आधीच्या महिन्याची लेट फी मिळवून दर महिना बिल येतय. मध्यंतरी माझ्या बोलण्यातून हा विषय घरी बाबांना पण कळला होता. ते म्हणाले अरे दे १०० रुपये, करेल काम सटकन. मी म्हटलं त्याला हवे तर त्याने हात पसरून मागवेत. मी स्वत:हून देणार नाही. भीक हवी तर भीक मागण्यात लाज कसली? आणि मला असं दोन महिने पिळल्यानंतर आत्ता तर मी त्याला xxदेखील देणार नाही.

हळूहळू कामाच्या गडबडीत बी.एस्.एन्.एल्.चा नाद सोडून दिला. दरम्यान ह्या महादशेतून एक दोन ग्रह हटले आणि महिनाभरात मला दुसरा प्रॉजेक्ट मिळाला. आत्ताच्या ह्या प्रॉजेक्टमध्ये कुठलीही साइट ब्लॉक नाही. त्यामुळे ऑफीसमधून का होईना इंटरनेट वापरायला मिळतं. अधूनमधून बझता येतं. बी.एस्.एन्.एल्.कडून पुन्हा कनेक्शन मिळेलं ही अशा सोडली आहे तरी पण परवा पुन्हा सहजच त्यांची छेड काढायला गेलो. पाहतो तर श्रीनिवासकडे नेहमीप्रमाणे कुणीतरी आपले गार्‍हाणे घेऊन उभा होता आणि श्रीनिवास आपल्याकडच्या कागदावर काहीतरी लिहून घेत होता.

मी: क्या ये आप से अपना नंबर मांग रहे है?
पीडीत: हां
मी: इसने कहा की ये आप को दो बजे कॉल करेगा?

इतकं अचूक निदान ऐकल्यावर त्या पीडीत माणसाबरोबर श्रीनिवासनेदेखील चमकून वर पाहिले. मला पाहून तो काही बोलणार इतक्यात

मी: इसने बहूत लोगोंक को कहा है की ये दो बजे कॉल करेगा. क्या है ना इसे सिर्फ दो बजे फ्री कॉलिंग होता है. आज दो बजे तो आप का नंबर नाही लगने वाला क्यों की मैं पहलेसे लाइन मे हूं और मुझे दो महिने से कभी कॉल नही आया. अगर आप चाहते हो की ये आपको कॉल करे तो इसे ५० पैसा दे दो.

मग श्रीनिवासकडे वळून

मी: बराबर है ना? आपको आउट गोइंग ५० पैसा ही है ना?

त्याला काही बोलू न देता पुन्हा त्या पिडीताला उद्देशून

मी: चलो छोड दो. आप पुरा १ रुपया ही दे दो. पक्का कॉल आयेगा.

पुन्हा श्रीनिवासकडे वळून

मी: ठीक है ना?

ह्या दरम्यान श्रीनिवासच्या चेहर्‍यावर "हा आत्ता कुठून उपटला" पासून "क्या बात करते साssर", "हो", "नाही", "अबे चूप" असे सगळे भाव झरझर उमटत होते. माझा बोलण्याचा पवित्रा पाहून ह्या वेळी मी कनेक्शन कधी देताय हे विचारायला आलेलो नाही हे एव्हाना त्याच्या लक्षात आलं होतं. तरी पण काहीतरी सबळ आणि नवीन कारण देण्यासाठी त्याने तोंड उघडले.

श्रीनिवास: साssर, ऐसा नही है साssर. आप बोलते ऐसा क्या भी नाही होता.

मी मात्र माझ्या भलत्याच मुद्द्यावर ठाम.

मी: क्यों आप को दोपहर दो बजे फ्री कॉलिंग नही होता? तो कब होता है? आप तो सब को दो बजे हो बोलते हो.
श्रीनिवास: (त्रासून तरी पण शक्य तितक्या समजावणीच्या सुरात) नही साssर. क्या है ना पहले हमारे पास केबल नही था. अब केबल आया पर उस के लिये रास्ता खोदना पडता. मुन्सिपालटी उसका पर्मिसन नही देता.
मी: तो अब क्या? मैं क्या करू?
श्रीनिवास: क्या बी नही . जैसे ही काम होगा मैं आप को कॉल करूंगा.
मी: (जाता जाता) हा ठीक है, लेकिन बस दोपहर को दो बजे कॉल मत करना. क्या है दो बजे मैं थोडा ज्यादा बिज़ी रहता हूँ. आप कॉल करो. काम होते ही आप के कॉल का पैसा मैं आपको लौटा दूँगा.

एवढे बोलून अजुन काही आणा भाका न घेता मी तिकडून बाहेर सटकलो.

तर असं आहे. सध्या नवीन प्रॉजेक्टमध्ये काम पण खूप आहे त्यामुळे ऑफीसमध्येच जास्त वेळ जातो. ऑफीसच्या जवळच नवीन रूम पहावी म्हणतो त्यामुळे सध्यातरी नवीन कनेक्शन घ्यायचा विचार नाही. ऑफीसमध्ये वेळ मिळाला तशी ही पोस्ट टंकली. बी.एस्.एन्.एल्.बद्दल बोलायचं तर अपेक्षाभंग नक्की कधी झाला हे कळत नाही? अपेक्षा नसताना मिळालेल्या सेवेमुळे की त्यांनी आपली औकात दाखवून दिली तेंव्हा?

असो. आत्ता पाहू ई-महादशा कधी संपते आणि पुन्हा कधी घरून विकांताला मस्त लोडाला टेकून वाचन सुरू होतं. कोकणात असतो तर एखाद्या भगताकडून श्रीनिवासचे भूत उतरवले असते (की त्याच्या मानेवर बसवले असते?). सध्या तरी ह्या ईहलोकात असून ई-लोकात येण्याजाण्यावर काही निर्बंध आले आहेत हे नक्की.

25 comments:

  1. सिद्धार्था .. अगदी अगदी माझा शेम टू शेम अनुभव... (शेम फॉर देम)... :D
    फरक इतकाच की मला त्यांनी ब्रॉडबॅण्ड ऐवजी WLL फोन दिला आणि सोबत डायल अप इंटरनेट.. चॅट आणि बझ पुरतं होतंय .. आणि केस क्लोज्ड :D

    ReplyDelete
  2. आनंद अरे बी.एस्.एन्.एल्. ऑफीसमध्ये येणार्‍या पीडीत लोकांची संख्या इतर कुठल्याही सरकारी कचेरी प्रमाणेच मुबलक आहे. दीड वर्ष नशिबाने मी त्यांच्या कचाट्यातून सुटलो इतकच.

    ReplyDelete
  3. मस्तच..
    माझा मटेल होत (एमटीएनएल)..
    मख्खन चालायच... डोंम्बिवलीमध्ये बिस्नल च्या हापिसात गेलो तर म्हणे २ महिन्यांनी कनेक्शन देऊ.. फोर्म भरला ..दोन महिने झाले.. गेलो बिस्नेलकडे.. "तुमच्या बिल्डिंगमधुन पर्यंत लाईन नाही टाकली" ...च्यायला मग मी काय करु तर म्हणे...२ महिन्यांनी येईल कनेक्श्न..
    शेवटी केबलनेट घेतलं...

    ReplyDelete
  4. आनंद, ब्लॉगवर स्वागत आणि प्रतिक्रियेबद्दल आभार. डोंबिवलीत बहुदा नवीन कनेक्शनची वारंवारता २ महिने असेल. इथे दररोज दुपारी दोन वाजता ;-)

    ReplyDelete
  5. बिएसएनएल जो पर्यंत चालतं , तो पर्यंत एकदम बेस्ट आहे मुंबईला तरी.. आज पर्यंत काहीच प्रॉब्लेम आला नाही.
    माझा रिलायन्सचा अनूभव फार वाईट आहे.. अजिबात निट चालत नाही.

    ReplyDelete
  6. हो ना काका. बीएस्एन्एल् चालतं तोपर्यंत बेस्ट असतं. पुन्हा दर देखील परवडेबल. म्हणून तर अजुन कॅन्सल नाही करत. जर काम झालं तर उत्तम. माझं नीट चालत होतं तेंव्हा मलाही प्रश्न पडायचा की लोकं बीएस्एन्एल् का घेतं नाहीत? आत्ता कळलं ;-)

    ReplyDelete
  7. कामातून वेळ काढून तू इतके हेलपाटे घातलेस हेच खूप रे! बी.एस.एन.एल. चा अनुभव मला नाही त्यामुळे काही बोलू शकत नाही. हॅथवे वाल्यांनी मात्र संयमाची कसोटी पाहिली होती. रिलायन्सचा अनुभव तर गचाळ. ते तुमच्या बी.एस.एन.एल. सारखंच न वापरलेल्या गोष्टींचे पण पैसे लावतात.

    ReplyDelete
  8. सध्या तरी कॉमकास्टच्या अंगणात सुखेनैव विहरतोय.. परत आल्यावर एकंदरीतच कठीण दिसतंय... मला वाटतं आत्तापासूनच बुकिंग करून ठेवायला लागेल. ;)

    ReplyDelete
  9. कांचन, अगं गेली दीड वर्षे बिनातक्रार स्वप्नवत सेवा मिळाली म्हणून अजूनही पुन्हा एकदा कनेक्शन मिळावं अशी इच्छा आहे. त्यात त्यांचे ऑफीस तसे जवळच आहे त्यामुळे आठवड्यातून एकदा सदिच्छा भेट देतो पण त्यांची ती थोबाडं बघून आणि कारण ऐकून आत्ता वीट आलाय. पाहू काय होतं.

    ReplyDelete
  10. हेरंब अरे आत्ताच बुकिंग कर. वरती आनंदने म्हटलेच आहे डोंबिवलीमध्ये २ महिन्यानंतर बोलावतात. दर दोन महिन्यांनी येत जा रे म्हणजे मिळून जाईल.

    ReplyDelete
  11. कमालच आहे...
    एक डिपार्टमेंट वेगवान आणि दुसरं असं!
    हे म्हणजे आपल्या ISRO आणि DRDO सारखं आहे!
    एकानं चंद्रावर रॉकेट पाठवलं आणि दुसर्‍याला बीजींग पर्यंत पाठवता येत नाही!

    ReplyDelete
  12. विभी, अरे ह्यांना कुठल्याही अडचणी नसतात. ह्यांना xx हलवायला नको. कुठल्याही गोष्टीला डेडलाइन नाही त्यामुळे हम करे सो कायदा. CWG Games चचं बघ नां. डेडलाइन असून चार वर्षात ६५० कोटी ऐवजी ७०,००० कोटी खर्च करण्यापलीकडे काही केलं का? इतकं होऊनही क्रीडा स्पर्धा होणे नाही.

    ReplyDelete
  13. माझी गेल्या चार वर्षातली लिस्ट... रिलायंस, एम.टी.एन.एल. मोबाईल इंटरनेट, एअरसेल, व्होडाफोन (हो, इंटरनेट साठीच), एअरटेल, आणि आता पुन्हा एकदा एम.टी.एन.एल. Broadband चालू आहे, बघुया किती दिवस चालते ते

    ReplyDelete
  14. मला बी.एस.एन.एल च नेट हव होत तेव्हा सुरुवातीला हाफ़िसात गेलो होतो...फ़क्त चौकशीसाठी दोन तास घेतले होते...माठ साले स्थितप्रज्ञासारखे बसुन असतात..शेवटी यु टेलिकॉमच घेतल...ते उत्तम पळतय...काही अडचण नाही...मध्यंतरी पुन्हा एकदा बी.एस.एन.एल. घ्यावा असा विचार होता पण आनंद (पत्रे बर का)चा अनुभव ऐकुन विचार बदलला होता.

    >>सा SS र वाचुन तो श्रीनिवासन उभा असल्याचा भास झाला बघ.. :) :)

    ReplyDelete
  15. प्रसिक, प्रतिकेबद्दल धन्यवाद.
    तू तर कुठलाच सर्विस प्रोव्हाईडर शिल्लक ठेवला नाहीस बहुतेक.

    ReplyDelete
  16. अजून तरी असला काही अनुभव आला नाही. इथे घरी पण २४ तास कॉलेज च नेट आहे त्यामुळे अजून तरी ई-सुखात आहे.

    ReplyDelete
  17. मनमौजी प्रतिक्रियेबद्दल आभार.
    बाकी बीएस्एन्एल् चे कनेक्शन मिळवणे हा एक लॉटरीचाच प्रकार आहे. ते नीट चालणे हा नशीबाचा खेळ.

    ReplyDelete
  18. सचिन मग काही टेन्शन नाही रे. भाग्यवान आहेस.

    ReplyDelete
  19. छान जिरवलीस त्या श्रिनिवासाची...मी गेली दोन वर्षे अगदी सुखात उपभोगल बीएसेनेलच ब्रॉडबॅंड पण गेल्या दोन-तीन महिन्यात त्याला ’डिस्कनेक्ट’ ची अशी महादशा लागली वर चार-पाच वेळा बीएसेनेलवाल्यांची पुजा करुनही हया दशेची शांती करायला नाही जमल त्यांना..मग त्यांची चांगलीच आरती उतरवुन टाटा फोटॉन घेतल...

    ReplyDelete
  20. देवेंद्र, मलाही लवकरच दुसरा पर्याय पाहावा लागणार आहे.

    ReplyDelete
  21. वाह ग्रहच फिरले होते म्हणायचे की..छान अद्द्ल घडली त्याला..
    आता एक लॉँग टर्म कनेक्शन घेऊन ठेव..मी हॅथवे गेली दोन वर्ष कभी खुशी कभी गम :)

    ReplyDelete
  22. हो रे सुझे. पहातो. आलेल्या प्रतिक्रियांमधून कळलेच आहे की कुणीही धड नाही. पण आत्ता कुठेतरी मटका मारुन पहावा लागणार आहेच.

    ReplyDelete
  23. ते कम नाउ ओन्ली मी चुकून "कम नाउ लोन्ली" वाचल मल आधीच त्या लोकान्च्या लडिवाळ बोलाबद्दल् शका होतीच वाटल खरच की काय
    बाकी मला भारतात याबाबत फ़ार् काही माहित नाहिये तू माहित करून घे नंतर उपयोग होईल्

    ReplyDelete
  24. >>"कम नाऊ लोन्ली"
    हा हा जबरा. आत्ता मला त्यांची भीती आणि स्वता:ची काळजी वाटू लागली आहे.

    ReplyDelete
  25. BSNL Boadband २ वर्षापासून वापरात आहे मस्त चालत तसाही दुसरा पर्याय नाही गावाकडे, परंतु मस्त चालू आहे मधी आधी हुकी येते त्याला ;)
    सध्या ३ G ची वाट पाहत आहे बघू कधी सुरु होतेय ते
    बाकी तुझा अनुभव टिपिकल सरकारी आहे आणि तो सर्वांनाच कधीना कधी आलेलाच असतो :)

    ReplyDelete

ShareThis