Wednesday, December 23, 2009

आठवणीतला नाताळ

गेल्या दिवाळीत अमेरिकेला गेलो होतो. जानेवारीपर्यंत तिकडेच मुक्काम होता त्यामुळे दिवाळी चुकली तरी नाताळची मज्जा अनुभवता आली. कॅलिफोर्नियाला पोहोचल्याबरोबर कॅब पकडून ऑफीस गाठलं. आयुष्यात पहिल्यांदाच परदेशात पाउल टाकलेले. तिकडे कसे होईल, लोकं कसे असतील, काम पूर्ण होईल की नाही असे असंख्य प्रश्न मनात होते. तिथे आगमनाची वर्दि देताच आतून साधारण साठीकडे झुकलेली अमेरिकन बाई हसत मुखाने माझ्या स्वागताला बाहेर आली. लिंडा जॉनसन. "हे सिद्धार्थ यु आर लुकिंग सो हॅंडसम" पहिलाच यॉर्कर, मी क्लीन बोल्ड. आजवरच्या आयुष्यात समस्त स्त्रीवर्गा कडून आलेली अशी ही पहिलीच प्रतिक्रिया. भारतातल्या मुलींचा सेन्स चांगला नाही ह्या वर अमेरिकेत आल्या आल्या शिक्का मोर्तब झाले. किंवा बहुतेक २४ तासाहून जास्त प्रवास केल्यानंतर (पूर्ण प्रवासात मी २० तास तरी झोप काढली) कदाचित आपण हॅंडसम दिसत असु असे वाटून गेले. अशी होती माझी लिंडाशी पहिली भेट.

ऑफीस मधून आपल्या गाडीतून ती मला माझ्या अपार्टमेंटला घेऊन गेली. तिथल्या ऑफीसमध्ये सगळ्या औपचारिक बाबी संपल्यानंतर आम्ही माझ्या अपार्टमेंट मध्ये गेलो. मस्त आलिशान २ बेडरूमची जागा. आत सगळ्या सोयी. तिथे गेल्यावर मला तिथला इलेक्ट्रिक गॅस, डिश वॉशर, वॉशिंग मशीन, हीटर आणि इतर सगळ्या गोष्टी कश्या वापरायच्या याच प्रात्यक्षिक दाखवलं. नंतर मला पोटापाण्याच्या जरूरी वस्तू घेऊन देण्यासाठी डिपार्टमेंटल स्टोरला घेऊन गेली. जाता जाता कुठे कसं जायचं, रस्त्याने किंवा पार्किंगमध्ये चालताना कुठले नियम पाळायाचे हे सगळं समजावून झालं. एव्हाना नवखेपणाची भावना आणि इथे आपलं कसं होणार ही भीती कुठल्या कुठे पळून गेली होती. तासाभारातच मी देखील आपण लिंडाला गेली अनेक वर्षे ओळखतो इतका comfortable झालो. दुसर्‍या दिवशी देखील ऑफीसमध्ये ती ज्या प्रकारे माझी सगळ्यांशी ओळख करून देत होती तेंव्हा मला क्षणभर असे वाटले की जणू ही मला माझ्या लहानपणापासून ओळखते.

आधी वाटलं की कदाचित आपण इथे नवे आहोत म्हणून आपल्याला कंफर्ट वाटण्यासाठी ही असे बोलत असेल. पण काही लोकंच अशी असतात की ते जसे वागतात तसे ते खरोखरच आहेत, उगाच आव आणत नाहीत हे कळून येते. लिंडा ही त्यातलीच एक होती. मला तरी असे लोकं फार कमी भेटले. नाहीतर आपल्याकडे HR मध्ये काम करणारी लोकं. जेव्हा तुम्ही एखादी कंपनी जॉइन करता तेंव्हा आणि पहिले काही दिवस नुसते गुळ, साखर, मैसूर-पाक(बंगलोरमध्ये) तोंडात ठेवूनच बोलत असतात. एकदा का तुमची नवखेपणाची एक्सपाइरी डेट संपली की मग तुम्ही फाट्यावर. हा असला अनुभव गाठिशी असल्याने ही बया देखील २ दिवसांनी आपल्या कामाशी काम ठेवून राहील असे वाटले. पण नाही. तिथल्या वास्तव्यामधील प्रत्येक दिवशी गुड मॉर्निंग बरोबरच माझ्या मूड किंवा कपड्यावर एखादी तरी टीपण्णी असायचीच. फार बरं वाटायचं. किती छोट्या छोट्या गोष्टी असतात ज्या आपल्याला किंवा दुसर्‍याला नकळत आनंद देऊन जातात.

सुरुवातीचे काही दिवस मी कॅबने ऑफीसला येत जात होतो. नंतर तिने माझ्यासाठी कार बुक केली. मग मला तिथल्या वाहतूकीच्या नियमांची सवय व्हावी म्हणून पुढचे २-३ दिवस रोज ती आणि मी लंच टाइममध्ये आणि ऑफीस सुटल्यावर ऑफीस ते अपार्टमेंट आणि आजूबाजूच्या भागात ड्राइविंग करण्यासाठी जात असु. मला तिथल्या वातावरणात व्यवस्थित कार चालवायला जमते ह्याची खात्री झाल्यानंतरच तिने मला एकट्याला कार चालवायची परवानगी दिली. खरं तर ती आमच्या ऑफीस मधली Senior Admin होती. आमच्या रहाण्याची बुकिंग करणे आणि दर आठवडा आमचे पे चेक देणे हे तिचे नेमुन दिलेले काम होते. ह्याव्यतिरिक्त आम्ही काय करतो किंवा आमचे कसे चालू आहे ह्याच्याशी तिला काही घेणे देणे नव्हते. पण तीने मला अडीअडचणीच्या वेळी गरज पडली तर तिच्या घरचा फोन नंबर, स्वत:चा मोबाइल नंबर असे सगळे नंबर देऊन ठेवले होते. माझ्यानंतर आठवड्याभरात भारतातून अजुन दोन जण तिकडे पोहोचले. त्यांना देखील हाच अनुभव आला. लिंडाशिवाय आमचे पान हलत नसे. आज जेवायला कुठे जाणार, कुठे काय छान मिळतं, कुठल्या रेस्तोरंट मध्ये काय मागवायचे? काय स्पाइसी, काय मीडियम स्पाइसी ऑर्डर करायचे हे सगळं सांगायची. आमच्या बरोबर यायला जमलं नाही तर रेस्तोरंटचा मॅप आणि काय मागवायचे ह्याची लिस्ट आम्हाला न मागता मिळत असे.

वीकेंडला तिच्या घरी हमखास बोलावणे असायचे. तिच्या घरी तिच्या नवर्‍याची ऑल्टन जॉनसनशी भेट झाली. तो लिंडापेक्षा ८-९ वर्षानी मोठा. दोघांचेही हे दुसरे लग्न होते. त्यांना एक मुलगा आणि एक मुलगी. मुलगी नर्स होती आणि एका डॉक्टराबरोबर लग्न करून नुयोर्क ला स्थायिक झालेली. मुलगा टेक्सासला एका मोठ्या कंपनीचा CEO होता. हे दोघे अधून मधून तिला भेटायला जायचे. उन्हाळी सुट्टीत, नाताळमध्ये मुलगा मुलगी नातवंडांना घेऊन यायचे. अमेरिकन संस्कृती प्रमाणे लिंडा आणि ऑल्टन एकटेच राहात होते. हेच कशाला आजही ऑल्टनची ९८ वर्षांची आई नेवाडा राज्यात एकटी रहाते हे ऐकून आम्हाला धक्काच बसला होता. पण अमेरिकेत हे अगदी कॉमन आहे.

लिंडा आणि ऑल्टनचं घरं म्हणजे आलिशान महालापेक्षा कमी नव्हतं. पूर्ण घरात गुबगुबीत गालीचा, सगळ्या अत्याधुनिक सुखसोयी, घराबाहेर स्विम्मिंग पूल. अनेक छान छान गोष्टींनी सारे घर भरलेलं होतं. गर्भश्रीमंत म्हटलं तर वावगं ठरणार नाही. ऑल्टन व्यवसायाने सिव्हील इंजिनीअर होता त्याच बरोबर त्याला फोटोग्राफीचा छंद देखील होता. त्यामुळे सहाजिकच सारं घर फोटो फ्रेमनी भरलेलं होतं. आमच्या ऑफीसच्या कुठल्याही पार्टीमध्ये ऑल्टन कॅमेरामन म्हणून यायचा. त्याला पूर्ण ऑफीस ओळखायचे. लिंडा आणि ऑल्टन पूर्ण परिवाराबरोबर जवळपास पूर्ण अमेरिका आणि युरोपचा काही भाग फिरलेले. तरुणपणी ऑल्टनचं स्वत:चं चक्क २ सीटचं छोटसं विमान होतं. आत्ता बोला. लिंडा देखील स्वत: स्काइ डाइविंग करायची. या वयातही ती आम्हाला स्काइ डाइविंगला घेऊन गेली होती. माझी तर विमानातून उडी मारताना नुसती बोबडी वळली होती. पण तो अनुभव आयुष्यातला एक अविस्मरणीय अनुभव होता. Admin म्हणून काम करण्यापुर्वी लिंडा स्विमिंग ट्रेनर होती. एप्रिल-मेमध्ये पुन्हा अमेरिकेत जाणं झालं तेंव्हा वीकेंडला आम्ही त्यांच्या घरी स्विमिंगपूलमध्ये पडिक असायचो. आम्ही नदीत आणि समुद्रात पोहलेली माणसं. मग पोहताना तू किती आवाज करतोस, तुझे स्ट्रोक कसे चुकीचे आहेत अश्या प्रतिक्रिया यायच्या. तिने आम्हाला डाइविंग पॅडवरुन पाण्यात सूर मारायला देखील शिकवलं. त्याच दरम्यान त्यांच्या घरच्या बागेत एक बदक आपली पिल्ल घेऊन मुक्कामाला आलं होतं. काही दिवस स्विमिंग पूल बदकांसाठी राखीव होता. त्या पिल्लाना खाऊ घालण्यासाठी लिंडा जेवणाच्या सुट्टीत घरी जायची. दररोज आम्हाला त्या पिल्लाच्या गोष्टी ऐकायला मिळायाच्या. एके दिवशी पिल्ले मोठी झाल्यावर लिंडा आणि ऑल्टन त्या सगळ्या बदकाच्या कुटुंबाला जवळच्या मोठ्या तळ्यावर सोडून आले. पुढे काही दिवस रोज ती बदकांची पिल्ले कुठे दिसतात का हे पाहायला ती दोघं तळ्यावर जात होतीत. त्यांच्या घरी एक मांजर देखील होते. त्याचे देखील घरातीलच एका सदस्या प्रमाणे मजबूत लाड व्हायचे.

एवढं सगळं ऐश्वर्य, डामडौल असूनही लिंडा आणि ऑल्टनचा स्वभाव इतका आपुलकीचा होता की आम्हाला कधीही तिथे दबून गेल्या सारखे वाटले नाही. आम्ही तिथे अक्षरशः दंगा करायचो. लिंडा आणि ऑल्टनदेखील आमच्यात सामील असायचे. अधून मधून पाहुण्यांचाही राबता असायचा. त्यावेळी देखील आम्हाला आमंत्रण असायचे. कुठेही काहीही आडपडदा नाही, भेदभाव नाही. आम्ही देखील दरवेळी मस्तपैकी वाईन आणि केक घेऊन त्यांच्या घरी पोहचायचो. आम्हाला देखील काहीतरी नवीन चाखायला मिळायचे. त्या पदार्थांच्या पाककृतीबद्दल चर्चा व्हायच्या. सुट्टीत घरी आलेल्या नातवंडांचे आजी आजोबा जसे प्रेमाने लाड करतात तसेच काहीसे आमचे देखील लाड व्हायचे. आम्ही देखील त्यांना आपला कडक, ताजा, उकळी काढलेला कटिंग चहा पाजायचो. एकदा मुर्गी पण चाखवली. त्यांना तिखट लागली पण तरी देखील त्यांनी आवडीने खाल्ली. लिंडाच्या घरी गेल्यावर आणखी एक हमखास होणारी गोष्ट म्हणजे रमी क्यूबचा डाव. हा पत्त्यांप्रमाणेच एक खेळ आहे. नियम थोडे वेगळे आणि प्लास्टिकची कार्ड. लिंडा आणि ऑल्टन रोज हा खेळ खेळायचे (फोटोत दिसत आहे तो खेळ). आम्ही गेलो की आम्ही त्यांच्यात सामील व्हायचो. ऑल्टन असो वा आम्ही, रमी क्यूब मध्ये बहुतांशी लिंडा जिंकायची. एरवी प्रेमळ आणि दुसर्‍यांसाठी मदतीला तयार असणारी लिंडा रमी क्यूबमध्ये मात्र सगळ्यांच्या विरुद्ध उभी ठाकायची. ऑल्टन लबाडी करण्यात माहीर होता. लिंडाला हरवण्यासाठी तो आम्हालाही वेगवेगळे गनिमी कावे सुचवायचा. पण लिंडाच्या बारीक नजरेतून काही सुटायाचे नाही.

राजकारणापासून ते Technology पर्यंत सगळ्या विषयावर गप्पा व्हायच्या. ऑल्टन आमच्या कामाची चौकशी करायचा, आम्ही कुठल्या प्रॉजेक्टवर, काय काम करतो ह्याची माहिती करून घ्यायचा. आम्हाला त्याची नवी जुनी उपकरणे दाखवायचा. कॅल्क्युलेटर नसताना ते जी स्केल वापरायचे (नाव विसरलो मी) ती ते कशी वापरायचे आणि त्यातून अचूक मोजमाप कसे काढायचे अश्या गप्पा रंगायच्या. त्यांना भारताबद्दल खूप आकर्षण होते. खूप प्रश्न विचारायचे. मला गर्लफ्रेंड नाही याचे लिंडाला आश्चर्य वाटायचे. :-( तुम्ही लोकं एकमेकाला ओळखत नसताना (अरेंज) मॅरेज कसे करता असा साधा प्रश्न तिला नेहमी पडे. "Look at us. I dated with Alton for 3 years then only we decided to get married. Sid you should go for love marriage." मी आपला एक उसासा सोडून गप्प.

नाताळच्या आदल्या दिवशी आम्हाला लिंडाच्या घरी ख्रिसमस पार्टीसाठी खास आमंत्रण होते. लिंडाने सगळ्यांना ख्रिसमसची काही ना काही भेटवस्तू दिली. रात्री उशिरापर्यंत आम्ही रमी क्यूब खेळलो. त्यानंतर लिंडाने ख्रिसमसची रोषणाई दाखवण्यासाठी आम्हाला त्यांच्या भागात फिरवून आणले. फार मज्जा आली. ऑल्टन आणि लिंडा म्हणजे आमच्यासाठी संताबाबाच झाले होते. न मागता आमच्या पोतडीत त्यांनी भरभरून आनंदाचे क्षण टाकले.

दोन्ही वेळा भारतात परत येताना लिंडा आणि ऑल्टनचा निरोप घेणे जड गेले. कोण कुठली सातासमुद्रापारची माणसं, पण मनात घर करून आहेत आणि रहातील ही आणि त्यांच्याबरोबर साजरा केलेला ख्रिसमस देखील...

9 comments:

  1. मनमिळाउ लोकं असतात बरीच. पण तुमची ही लिंडा आवडली.
    कॅल्क्युलेटर नसतांन जे स्केल आम्ही वापरायचो त्याला स्लाईड रुल म्हणतात. अगदी पंचविस टु द पॉवर ८.२ पण त्यावर करता यायचं..
    बाकी अनुभव मस्त आहे..

    ReplyDelete
  2. @kayvatelte - "स्लाईड रुल" अगदी बरोबर काका. काल पासून आठवण्याचा प्रयत्न करतोय. अगदी गूगलदेखील करून पाहिलं पण नक्की सर्च वर्ड माहीत नव्हता त्यामुळे नाही मिळालं. त्यासाठी आणि प्रतिक्रियेसाठी दोन्हिसाठी धन्यवाद.

    ReplyDelete
  3. सिद्धार्थः तुमची लिंडा आणि मी मध्यंतरी ह्यूस्टन ला गेलो होता तेव्हा बार्बरा यात असंच साम्य आहे. तुमच्या लिंडा वरुन मला बार्बराची आठवण झाली. अगदी तुम्ही जे लिहिलं आहे ते सगळं बार्बरासुदधा लागु पडत असाच तिचाही स्वभाव होता. काही काही लोक घरातील नसुन सुद्धा मनात घर करुन बसतात हेच खरं. खुपच छान लेख झालाय. ५ पैकी ५ मार्क्स. सलील चौधरी हा लेख पाठव मॅगॅझीन साठी.

    ReplyDelete
  4. @अजय - प्रतिक्रियेसाठी आणि मॅगॅझीनमध्ये माझा लेख recommend करण्यासाठी धन्यवाद.
    बाकी भारतातून अमेरिकेत गेलेले लोकं देखील स्वकीयांना विचारात नाहीत. अशावेळी लिंडा, बार्बरा सारखी लोकं नक्कीच मनात घर करून जातात.

    ReplyDelete
  5. सिद्धार्थ खूप अविस्मरणीय अनुभव आहे. मस्त लिहालय तुम्ही!!!

    ReplyDelete
  6. @मनमौजी - प्रतिक्रियेसाठी धन्यवाद.
    @कांचन कराई - प्रतिक्रियेसाठी आणि टॅगल्याबद्दल धन्यवाद

    ReplyDelete
  7. सिद्धार्थ, खूप छान झालाय लेख.

    ReplyDelete
  8. खूपच छान लिहिले आहेस रे लिंडा घरीच स्वत असल्यासारखे वाटले
    एकदम मस्त

    ReplyDelete
  9. मस्त लेख झालाय
    व्यक्ती तितक्या प्रवृत्ती
    पण समविचारी व चांगल्या प्रवृत्तींशी साथ लाभायला पूर्वजन्मीची पुण्याई लागते.
    तुझी नक्कीच आहे असे दिसून येते.

    ReplyDelete

ShareThis