३१ डिसेंबर विकांताला लागून येत असल्याने कुठेतरी बाहेर जायचे हे नक्की ठरवले होते. केरळला जायचे कधी पासून मनात होते म्हणून कोट्टयाम-आलप्पी येथे हाउसबोटवर ३१ची रात्र घालवण्याचा प्लॅन केला. पण ख्रिसमस आणि वर्षअखेर असल्याने केरळचे बुकिंग ४ महिने आधीच फुल्ल होते. आत्ता कुठे जायचे असा विचार सुरू होता. एका मित्राकडून देवबाग बीच रिसॉर्टबद्दल ऐकून होतो. तिथेदेखील हाउसबोट उपलब्ध असते असे कळले पण केरळच्या बॅक-वॉटर इतकी मज्जा नाही पण प्रत्यक्ष बीच रिसॉर्टचा रिव्यू चांगला होता. बुकिंग तसं महाग होतं आणि त्यात हे रिसॉर्ट कर्नाटक सरकारद्वारा चालवले जाते म्हणून कसं असेल ह्याबद्दल मन जरा साशंकच होतं. नेट वर पाहिलं तर रिव्यू चांगला होता. अर्थात काही ठिकाणी under utilize असा उल्लेख होता पण बहुतेक सर्व लोकांनी या ठिकाणाला पसंती दर्शवली होती. म्हटलं तसं ही काही मिळत नाही तर करून टाकु बुकिंग. ऑनलाइन बुकिंग सेवा आहे आणि अगदी तत्पर. मी तिथे चौकशीची नोंद केल्यावर काही तासात त्यांनी फोन करून शेवटची काही कॉटेज शिल्लक आहेत असं कळवलं. मी पण फार आढे वेढे न घेता त्याच दिवशी बुकिंग करून टाकलं.
ठरल्याप्रमाणे ३०च्या रात्री बंगलोरहून आम्ही निघालो. देवबाग कारवारमध्ये आहे. दुसर्या दिवशी सकाळीच आम्ही कारवारला पोहोचलो. चेकईन दुपारी बारा वाजताचे होते. आत्ता इतका वेळ काय करायचे हा प्रश्न. मला वाटले होते की कारवार बर्यापैकी मोठे शहर असेल. सकाळी फ्रेश होऊन आजूबाजूला काही भटकण्यासारखे असेल तर चक्कर मारू. पण कसलं काय? तिथे धड बस स्टॅंड देखील नव्हता. ब्रेकफास्ट करावा तर धड नीट हॉटेल नाही. शेवटी एक बर्यापैकी हॉटेल दिसले तिथे टिपिकल डोसा वैगरे खाऊन घेतला. तिथे जवळपास काही बघण्यासारखे आहे का अशी चौकशी केली तर कारवार बीच सोडून दुसरं काही ऐकू आले नाही. आत्ता इतक्या सकाळी बीचवर खो-खो खेळायला बसलेली लोकं थोडीच पाहायची होतीत?
दुसरा काही मार्ग नव्हता म्हणून सरळ देवबाग बीच रिसॉर्टच्या ऑफीसला फोन लावला. तर त्यांनी ऑफीसला या असे सांगितले. म्हटले चला इथे तिथे भटकत बसण्यापेक्षा सरकारी कचेरीतल्या बाकड्यावर बसून मख्ख चेहरे पाहत बसू. मग रिक्षा करून देवबाग बीच रिसॉर्टच्या ऑफीसला गेलो. शहरापासून ५-६ किलोमीटर आहे. तिकडे पोहोचल्यापासून एक एक सुखद अनुभव यायला सुरूवात झाली. त्यांचे ऑफीस कारवारबीच जवळ एका बंगल्यात होते. आजूबाजूला मस्त नारळ पोफळीची झाडे. आत गेलो तर सकाळ असून ऑफीसची पुरेशी लोकं होती. चौकशी केल्यावर समजलं की ते लोकं शिफ्टमध्ये काम करतात आणि ऑफीस कायम उघडे असते. आमचे वाऊचर पाहून आधी आमची आल्याची नोंद केली आणि लगेचच आम्हाला बारा वाजेपर्यंत रहाण्यासाठी त्याच बंगल्यात वरच्या मजल्यावरची एक सुसज्ज रूम दिली. चेक-ईन/चेक-आउट हे दुपारी बारा वाजता असल्याने आणि शहरातील असुविधांचा विचार करून पर्यटकांसाठी ही सोय केलेली होती. जाताना देखील दुपारपासून ते रात्री तुमची बस/ट्रेनची वेळ होईपर्यंत तुम्ही इथे आराम करू शकता. आधीच रात्री बसमध्ये झोप नीट झाली नव्हती त्यात सरकारी कचेरीतल्या बाकड्या ऐवजी बेड मिळाल्यावर आम्ही मस्त ताणून दिली. दोन-अडीज तास झोप पूर्ण केल्यानंतर आंघोळ वैगरे करून आम्ही रिसॉर्टला जायला तयार झालो. तोवर इतर लोकं देखील आली होती. मग तिथून बोटीत बसून आम्ही रिसॉर्टला जायला निघालो. रिसॉर्ट म्हणजे तसं पूर्ण बेटावर वसलेलं नाही. एका बाजूने जमिनीला जोडलेले आहे. पण शहराच्या दिशेने पाहिलं की दर्शनी भागाकडून ते पाण्यात आहे असे वाटते. त्यात बोटराइडचा आनंद मिळावा म्हणून पर्यटकांना बोटीने रिसॉर्टला घेऊन जातात. १५-२० मिनिटांच्या बोटराइड नंतर आम्ही तिकडे पोहोचलो.
बोटीतून खाली उतरल्या उतरल्या सुरुची दाट झाडी सुरू होते. सुरुवातीलाच जंगल लॉजेस अँड रिसॉर्टचा फलक आहे. सुरूच्या बनातून एक पायवाट आत जाते. समुद्रावरचा वारा सुरुच्या झाडामधून वाट काढत सूss सूss आवाज करत जात होता. आजूबाजूचे वातावरण पाहाता सगळे अपेक्षेपेक्षा चांगले अनुभवायला मिळत होते. ८-१० वर्षा पुर्वी रत्नागिरीलादेखील भाट्ये समुद्रकिनारी असलेल्या नारळ संशोधनकेंद्रासमोर समुद्रावरुन येणार सोसाट्याचा वारा अडावा म्हणून दाट सुरूची झाडी होती. पण तिथे येणार्याजाणार्यावर बंधन नसल्याने ती हळू हळू कमी झाली. येणारे जाणारे ह्यामध्ये सुरुबनात चाळे करायला येणार्या लोकांचाच जास्त भरणा होता. त्यात पावसाळ्यात वादळाने पडलेली झाडे जवळपासची लोकं जळणासाठी लाकूडफाटा म्हणून वापरु लागली. पुढे पुढे तर लोकांनी जळणासाठी झाडे तोडून देखील नेली पण पुन्हा झाडे लावण्याचे कुणाच्या मनात आलेले नाही. त्या दृष्टीने कर्नाटक सरकारने देवबागला सुरुबनाचा पर्यटनासाठी खूप चांगला वापर करून घेतला आहे. असो...
१०-१५ मिनिटे चालल्यानंतर कॉटेज दिसू लागली. सुरुवातीला काही चिरेबंदी कॉटेज लागली. ती बहुतेक नवीन बांधलेली दिसत होती. तिथे एकूण १५ कॉटेज आहेत. सर्व एसी. पुढे गेलो तशी पुर्वी बांधलेली, जमिनीपासून उंचावर असलेली लाकडी कॉटेज होती. प्रत्येक कॉटेजसमोर सुरूच्या झाडामध्ये बांधलेला झुला. आमच्या सुदैवाने आम्हाला वुडन फ्लोअर असलेलं लाकडी कॉटेज मिळालं. कॉटेज देखील आतमधून एकदम प्रशस्त आणि सुसज्ज. सगळी सोय बघून इथे येण्याचा खेळलेल्या जुगारातून जॅकपॉट लागल्याचे समाधान मिळाले. बरं बायकोला नेहमीप्रमाणे काहीच न सांगितले असल्याने तिच्यासाठी तर मस्त सरप्राइज होते. खरं तर मला देखील आधी काय आणि कसं असेल ह्याची काहीच माहिती नसल्याने माझ्यासाठीसुद्धा मोठे सरप्राइजच होते.
कॉटेजमध्ये फ्रेश होऊन आजुबाजूला काय काय आहे त्यावर नजर टाकतो तोच जेवणाची वर्दि घेऊन एक जण आला. अरे हो एक सांगायाचेच राहीले. इथले लोकं कोंकणी भाषा बोलतात. कन्नड पण चालते पण आम्ही सकाळपासून लोकांचे बोलणे ऐकत होतो ते यंडूगुंडू नव्हते. बर्यापैकी कळत होते. त्यांना पण आम्ही आपापसात काय बोलतो ते थोडे फार कळत होते. कॉटेज दाखवायला जो मुलगा आमचे सामान घेऊन आला आमच्या बरोबर आलेला तोच पुन्हा जेवाणाचा निरोप घेऊन आलेला. आम्हाला मराठीत बोलताना ऐकले असल्याने त्याने सरळ "१ वाजल्या पासून गोलघरमध्ये जेवण सुरू होते" असा शुद्ध मराठीत निरोप दिला. सुरूबनात मधोमध गोलघर आहे. नावाप्रमाणेच गोलबांधणीचे. तिथे डायनिंगची सोय आहे. सगळं बुफे पद्धतीने. दुपारचे जेवण आणि संध्याकाळी स्नॅक्स/चहापाणी गोलघरमध्ये. स्नॅक्सनंतर समुद्रात तासाभराची बोटराइड, रात्री बार्बीक्यू, ड्रिंक्स आणि जेवण समुद्रकिनारी वाळूत कॅंपफायरमध्ये. भल्या सकाळी ६:३० वाजता Nature Walk आणि त्यानंतर पुन्हा गोलघरमध्ये ब्रेकफास्ट आणि दुपारी चेकआउट असा २४ तासांचा कार्यक्रम होता जो दुपारच्या जेवणापासून सुरू होतो.
सॉलिड मज्जा केली आहेस... जियो :)
ReplyDeleteमस्तच धमाल केली आहेस की... :) :)
ReplyDeleteनवीन वर्षाच स्वागत जोरात केल रे रिसोर्ट वर जावून ....
ReplyDeleteसुहास, योगेश, सचिन,
ReplyDeleteप्रतिक्रियेबद्दल धन्यवाद.
वाह.. क्या बात है! लिहिणं सुरु केलंस तर परत.. छान..
ReplyDeleteआता नियमीत लिही..
मस्तच.. धमाल केलीत एकदम !!
ReplyDeleteकाय सही समुद्रकिनारा आहे रे.. सूर्यास्ताचे फोटू तर मस्तच आलेत एकदम !
mi fakt photos pahilet...pan majja tar keliya..sadhya scrollable post wachaycha muhurt lawkar yet nahi...pan winantila maan deun postlyabadal Thanku.....lihite raha....mahadasha samapali aselach....
ReplyDeleteकाका, हेरंब, अपर्णा,
ReplyDeleteप्रतिक्रियेबद्दल धन्यवाद. काही ना काही कारणास्तव लिखाण थांबले होते. ३१ डिसेंबरला अपर्णा, रोहन आणि हेरंबने 'लवकर लिखाण सुरू कर' असा प्रेमळ दम भरला आणि ही पोस्ट आली. महादशेचे बोलायचे झालेच तर घरी इंटरनेट आले आणि लॅपटॉप बिघडला. काय बोलणार आत्ता? ही पोस्ट ऑफीसमध्ये संध्याकाळी जरा जास्त वेळ बसून टंकली.
मस्तय राव.. :) जायला हवे एकदा... आणि तू पोस्टा टाकायला लागलास ना नियमितपणे??? :) शाब्बास.. :)
ReplyDeleteनवीन वर्षाची सुरुवार छान झाली. नवीन वर्षाच्या शुभेच्छा !!!
ReplyDeleteमस्तच रे, आवडला वृत्तांत :)
ReplyDeleteआता हयसर कधीतर जाव्कच व्हाया :) तुच्याकाड्नाच म्हायती घेतलंय. मजा आली वाचून.
ReplyDelete