Saturday, February 13, 2010

मेरा पहेला प्यार!!!

कधी तुम्हा कुणाला बोललो नाही. तशी गरज देखील वाटली नाही. पण माझ्या एकंदरीत बोलण्यावरून सॉरी लिहण्यावरून कदाचित तुमच्या पैकी काही जणांनी ओळखलं देखील असेल की I am engaged. हो आहे माझं प्रेम तिच्यावर आणि तेदेखील लहान पणापासून. जेंव्हा फार काही समजण्याची अक्कल नव्हती तेंव्हापासून. खरं तर तिची ओळख घरच्यांनीच करून दिली त्यामुळे आमच्या प्रेमाला विरोध वैगरे कधी झालाच नाही. आत्ता घरच्यांनी विरोध नाही केला त्यामुळे समाज काय म्हणेल वैगरे फालतू विचार मी कधी केला नाही. त्यामुळे माझे तिच्यावर किती प्रेम आहे आणि मी तिच्याशिवाय कसा राहू शकत नाही ह्याचा बभ्रा करत मी दुनिया फिरलोय.

तिचा विरह तर मी दोन दिवस देखील सोसू शकत नाही. आत्ता मी कोकणात असताना ती मला जशी मनमोकळे पणाने भेटायची तशी पुण्यात असताना आणि आत्ता बंगलोरला नाही भेटत. खरं तर आधी मी बंगलोरला आलो तेंव्हा तर फार हाल झाले हो. अगदी जिकडे पाहावं तिकडे सारखे तीचेच भास व्हायचे. भेट होणार नाही हे माहीत असल्यामुळे निदान तिला पर्याय शोधण्यासाठी तरी मी वीकेंडला नाना ठिकाणी भटकायचो. अर्थात तिला पर्याय शोधत होतो म्हणजे माझं तिच्यावरचं प्रेम कमी झालं असं समजू नका. उलट तिला दुसर्‍या रूपात स्वीकारण्याची ती तडजोड होती. अखेर एक दिवस केरळी वेषात मला तशीच स्वप्न-सुंदरी भेटली देखील. ही खोबरेल तेल लावून यायची पण आत्ता विरहच सहावेसा झाल्यानंतर खोबरेल तेल तर खोबरेल तेल, मी परिस्थितीला सामोरे जाण्याचं ठरवलं. इतक्या दूर बंगलोर सारख्या ठिकाणी आपल्याला आपलं प्रेम मिळतय ह्यातच मी खुश होतो. बाकी सणासुदीला घरी गेलो की ती भेटतच होती. त्या दोन चार दिवसात आमच्या प्रेमाला नुसतं उधाण येत असे. नंतर एके दिवशी मला बंगलोरला तिच्यासारखीच अगदी हुबेहुब दुसरी बसस्टॅंड जवळच्या कामातांकडे दिसली. मला तर अगदी "अगर सच्चे दिल से किसी को चाहो तो पुरी कायनात उसे तुमसे मिलाने के लिये जूट जाती है" चा याची देही याची डोळा प्रत्यय आला. ही अस्सल सारस्वत घराण्यातील होती. मी तर बेह्द्द खुश. सारस्वतांबद्दल ऐकून होतो पण आत्ता तर प्रत्यक्ष अनुभवायला मिळत होते. घरापासून इतक्या दूर मला माझे प्रेम पुन्हा मिळाले होते. तेंव्हापासून खोबरेल तेल लावून भेटायला येणारीचं तोंड देखील पाहिलं नाही. चालतं तेवढं. प्रेमात आणि युद्धात सगळं क्षम्य असतात म्हणे. आजकाल रविवार दुपारी १५ किलोमीटर अंतर तुडवून मी कामातांकडे जातो. आठवड्यात एखाद्या दिवशी सुट्टी मिळाली तर ती देखील सत्कारणी लावतो. हिच्यासोबत घालवलेल्या रविवारच्या आठवणीत आणि येणार्‍या रविवारच्या भेटीची स्वप्न बघत उरलेला आठवडा कंठतो. खरं प्रेम असेल तर कुठेही भेटतं कारण परदेशी गेलो तेंव्हा मला तिच्या सारख्याच एकीची ओळख झाली. ही जापनीज होती पण किती 'सुशी'ल. आजही तिच्या आठवणीने मनाचा कोपरा हळवा होतो.

आज वॅलिंटाइन डे. शुक्रवारी शिवरात्रीची सुट्टी होती म्हणून खास लॉंग वीकेंडला जोडुन सोमवारी सुट्टी घेऊन आज वॅलिंटाइन डेला हिला भेटायला खासं घरी आलोय. म्हटलं आज वॅलिंटाइन डे हिच्याबरोबर घरी साजरा करू. चला तर मंडळी मी तिला घरी घेऊन जायला आलोय. आत्ता मी तिची एवढी स्तुती केलीय तर तिचे फोटो पण देतो. मला खात्री आहे तुमच्यापैकी बरेच जण तिला जवळून ओळखत असतील, कदाचित माझ्यप्रमाणे तिच्यावर जीव ओवाळून देखील टाकत असतील. ती आहेच तशी प्रेमात पडण्यासारखी आणि प्रेमात पडल्यावर पुन्हा न विसरण्यासारखी... माझी प्रिय मासोळी...

10 comments:

  1. हा हा हा.. एकदम जबरदस्त पोस्ट.. तुझ्या प्रेमाला असाच बहर येऊदे ही खादिच्छा आपलं सॉरी सदिच्छा !!

    ReplyDelete
  2. जबरी पोस्ट आहे. कुणीही गळ्यात पडावी व्हावी इतकी गोड आहे तुझीवाली ;-)

    ReplyDelete
  3. हाहाहाहाहा...
    मस्तच!

    ReplyDelete
  4. Sahich........
    Mastch aahe post........ Ekdam Jabardast!!!

    ReplyDelete
  5. वाह.. काय टेस्टी दिसते नां ती? मी सध्या गोव्याला आहे.. काल पासुन नुसतं खादाडी सुरु आहे.. :)

    ReplyDelete
  6. अरे प्रेमात पडल्यावर तुझ्या प्रियेला असं खाऊन टाकलेलं कसं चालेल? :)

    सहीच झालीय पोस्ट!

    ReplyDelete
  7. हे..हे..हे...
    खरंच प्रेमापोटी(:D) लिहिलेली पोस्ट आवडली :)

    ReplyDelete
  8. XXकट, तुला तर कुटलं पाहिजे रे! माझ्या ब्लॉगवर अगदी येऊन येऊन लिंक दिलीस.

    पोस्ट जबरी आहे आणि फोटो तर कुणालाही मोह पडावा असा आहे.

    ReplyDelete
  9. प्रेमात पड रे पण फ़ोटो कशाला आता...कस्संस होत असे फ़ोटो पाहिले की....

    ReplyDelete

ShareThis